मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2224. मेकॅनिक

       दोन वर्षांपुर्वी मी मुरुड मार्गे श्रीवर्धनला गेलो होतो. मुरूडच्या पुढे आगरदांड्याहून रो रो (अशी बोट ज्यामध्ये कार आणि बस देखील वाहून नेल्या जातात) मध्ये गाडी चढवून पुढे दिघी आणि दिवेआगर मार्गे श्रीवर्धनला पोचलो होतो. दुसऱ्या दिवशी मी दुपारी थोडं उशीरा निघालो आणि जेव्हा मी मुरुडमधून बाहेर पडून अलिबागकडे निघालो तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. मुरूडपासून पुढे नांदगांव गेल्यावर रस्त्यावर गडद अंधार पडला होता. काशिदचा समुद्र किनाऱ्यावरून जात असताना मागून एक फोर व्हीलर वेगाने मला ओवरटेक करून पुढे निघून गेली. पुढे काशिद गेल्यावर बारशिव गाव लागतं. बारशिव गेल्यावर रस्त्याच्या कडेला काही मिनिटांपुर्वी मला ओवरटेक करून गेलेली गाडी उभी दिसली. त्या गाडीतून उतरून दोघांनी मला रस्त्यात आडवे येऊन थांबवले. गाडीवर एम एच बारा पासून सुरू होणारा नंबर होता. त्यांची स्कॉर्पिओ बंद पडली होती. गाडीत आणखीन चार जण बसलेले होते. 
        मला त्यांनी विचारले इथे रस्त्यात कुठे गॅरेज आहे का? मी म्हटले मला काही कल्पना नाहीये. गॅरेज असले तरीही आता आठ वाजायला आले आहेत तिथं कोणी मिळणार नाही. इकडे लवकर बंद करून जातात. बरं आमच्यापैकी दोघं जण तुमच्यासोबत गाडीत येतो रस्त्यात गॅरेज असेल तर मेकॅनिकला घेऊन  येऊ. रस्त्यावर अंधार पडलेला होता. इतर वाहनांची पण वाहतूक तुरळकच होती. एकाचे गॅरेज वाल्या पर्यंत लिफ्ट द्या म्हणून सांगून झाल्यावर दुसरा म्हणाला की, नाहीतर असं कराल का, आम्हाला अलिबाग पर्यंत ड्रॉप कराल का तुम्ही. मी त्यांना विचारले आता काही वेळापुर्वी तुम्ही वेगाने मला ओव्हरटेक करून आलात आणि लगेच गाडी कशी काय बंद पडली. काय झालं आहे गाडीला. आता गाडीत बसलेले चौघेही गाडीतून खाली उतरले. दारू पिऊन झिंगले होते पण गाडी चालवणारा आणि त्याच्यासोबत अगोदर उतरलेला दोघांनी दारू प्यायल्या सारखी वाटत नव्हती. 
     सगळ्यांचे वय एकवीस बावीस वर्षे असावं. एकाच कॉलेज मधील ते सगळे अलिबाग मुरुड फिरायला आलेले पर्यटक वाटत होते. गाडी चालवणारा मुलगा बोलला की गाडी बंद पडली आहे आणि आता चालूच होत नाहीये काहीच कळत नाही काय झालंय. मी विचारले काय करता तुम्ही सगळे जण, त्यांनी सांगितलं की आम्ही इंजिनियरिंग करतो आहोत. तिसऱ्या वर्षाला आहोत. मला त्या सगळ्यांची मजाच वाटली, ऑटोमोबाईल इंजिनियरिंग करत आहेत आणि गाडीला काय झालं आहे ते या सगळ्यांपैकी कोणालाही कळत नाहीये. मी गाडी जवळ गेलो तर गाडीचे बोनेट गरम झाल्याचे जाणवले. तरीही गाडीला चावी लावून फिरवायला सांगितली, गाडीच्या पॅनल वर हाय टेम्परेचरचा इंडिकेटर दिसला. माझ्या अंदाजाप्रमाणे गाडी गरम होऊनच बंद पडली होती.  गाडी चालवणाऱ्याला विचारले, तुला इंजिन टेम्परेचर वाढले ते दिसले नाही का, त्यावर तो म्हणाला आजपर्यंत कधी बघितलेच नाही आणि टेम्परेचर बघायचं म्हणून कोणी सांगितलं पण नाही. आज पहिल्यांदाच असं झालं.  मी मनात म्हटलं मीच बरं यांना सांगतोय की गाडी चालवताना इंजिन टेंपरेचर वगैरे बघायचं असतं.  गाडीचे बोनेट उघडायला सांगितले, बोनेट उघडल्यावर त्यातून गरम वाफा निघायला लागल्या त्यातून जळलेल्या ऑइलचा वास येऊ लागला. 
      त्या बघून  झिंगेलेल्या चौघांची दारू उतरली. बाप रे इंजिन जाळलं की काय रव्याने गाडी जोरात पळवून. काय रे रव्या लावलीस का आता वाट असे बोलून एकजण गाडी चालवणाऱ्या कडे रागाने बघू लागला.   त्यांना सांगितले इंजिन वगैरे काही जळलं नाही, इंजिन गरम झाल्याने त्याच्यावर लीक झालेले ऑईल गरम होऊन त्याचा जळाल्या सारखा वास येतो आहे.  रेडिएटर मध्ये कुलंट आहे का बघा, सांगितल्यावर सगळे माझ्या तोंडाकडे बघू लागले. त्यांना बोटाने रेडिएटर आणि कुलंटचा टँक दाखवला. कुलंटचा टँक रिकामाच होता, एकजण रेडिएटरचे झाकण उघडायला गेला तर त्याच्या हाताला चटका बसला, त्याला सांगितले गाडी पुसायच्या फडक्याने उघड ते झाकण. रेडिएटर मध्ये बिलकुल कुलंट नव्हते. गाडीच्या खाली मोबाईल ची बॅटरी ऑन करून बघितले तर कुलंटचे थेंब ठिपकत होते. रेडिएटर आणि इंजिनला जाणारा रबरी पाईप लीक झाला होता. रव्या बोलला आता हा पाईप कुठे आणि कधी मिळायचा. गाडी आता रात्रभर इथेच ठेवावी लागणार आणि उद्या टोविंग करून न्यावी लागणार.  ते सगळे मला बोलायला लागले. आम्ही एकमेकांच्या मांड्यांवर बसतो आम्हाला प्लीज अलिबाग पर्यंत घेऊन जाल का?  मी मनात म्हटलं यांची आता थोडी गंमत करू या.
     त्यांना बोललो, हे बघा गाडी अलिबाग पर्यंत टोविंग करायचे तीन चार हजार जातील,  इंजिन गरम होऊन गाडी बंद पडल्याने ते दुरुस्त करायला सात आठ हजार जातील आणि मेकॅनिक काम करायचे चार पाच हजार घेईल. दहा पंधरा हजार तर जातीलच शिवाय रात्रभर गाडी इथे रस्त्यावर बेवारस म्हणून पडून राहील. दोघांनी हो दादा तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पण आता काय करणार.  मी तुमची गाडी आता पंधरा मिनिटांत चालू करून देतो पण मला पाच हजार द्यावे लागतील. दोघांनी एकदम पाचच हजार ना मग दिले असं समजा आणि एकदाची गाडी चालू करून दया असं सांगितलं.  मी माझ्या गाडीतून स्वीस नाईफ काढला, त्यांच्या गाडीचा रबरी पाईप जिथून लीक झाला होता त्याचा रेडिएटर वरील चिमटा काढून , लीक झालेला भाग कापून रेडिएटरला जोडला, पाईप ची लांबी कमी झाल्याने लावताना थोडी ओढाताण आणि त्रास झाला पण पाईप लागला, त्यावर घट्ट बसणारा चिमटा लावला.  त्यांच्यापैकी एकजण विचारू लागला आता कुलंट कुठून टाकणार तुम्ही, कुलंट शिवाय गाडी कशी चालू होणार?  मी त्यांच्याकडे गाडीतील पाण्याच्या बाटल्या काढायला सांगितल्या गाडीत पिण्याचे पाणी कमी आणि बिअरचे कॅन जास्त असल्याचे त्यांनी दात दाखवत सांगितले. मी माझ्या गाडीतून पाण्याची दीड लिटर ची बाटली काढली. रेडिएटर मध्ये आणि कुलंट टँक मध्ये पाणी भरले. रेडिएटरचे झाकण उघडे ठेऊन रव्याला गाडी स्टार्ट करायला सांगितली. रव्या गाडी स्टार्ट करण्यासाठी चावी फिरवू लागला, इंजिनची थोडी घर घर पण गाडी स्टार्ट झाली नाही. माझी फजिती झाली असं वाटून एकजण दुसऱ्याच्या कानात कुजबुजला बघ मी बोलत होतो ना हा आपल्याला चूत्या बनवतो आहे. मी रव्याला बोललो खाली उतर आणि सगळ्यांना धक्का मारायला सांग, माझ्या पण लक्षात नव्हते आणि गाडीची लाईट सुरूच ठेवल्याने बॅटरी डाऊन झाली होती. मी गाडीत बसून त्यांना सगळ्यांना धक्का मारायला लावला, गाडी थोडी पुढे गेली आणि गिअर मधे टाकून लगेच चालू झाली. रेडिएटर चे झाकण उघडे होते त्यातून हवा बाहेर आल्यावर पाण्याची आणखीन भर घालून झाकण लावून बंद केले.
       त्यातील एकजण विचारू लागला आता गाडी बंद तर नाही ना पडणार आणि कुलंट ऐवजी साधं पाणी टाकलं आहे त्याच्याने नुकसान तर नाही ना होणार. मला हसायला आलं. त्यांना बोललो माझे पाच हजार द्या मग काय ते सांगतो. त्यावर एकाने मोबाईल वर जी पे ॲप ओपन करून माझा जी पे नंबर मागितला. तुमची गाडी आता बंद पडणार नाही फक्त चाळीस पन्नासच्या स्पीड ने चालवा. कुलंट मध्ये ऐंशी टक्के पाणीच असतं इंजिन मध्ये गंज लागू नये आणि कुलिंग आणखीन चांगले व्हावे म्हणून त्यात केमिकल असतात. गाडी हळू चालवली तर काही बिघडणार नाही.  उद्या सकाळी अलिबाग मध्ये कुलंट विकत घ्या आणि रेडिएटर मधील दोन लिटर पाणी काढून त्यात कुलंट टाकून घ्या. रेडिएटर मधील पाणी कुठून काढायचं ते पण त्यांना दाखवले. त्यांना विचारले इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहात, तिथं कॉलेज मध्ये काही शिकवत नाही का रे तुम्हाला.  नाही दादा आम्ही कॉलेजमध्ये नुसतं टाईमपास करतो लेक्चर बंक मारतो आणि लेक्चर मधे असलो तरी अर्ध लक्ष मोबाईल मध्ये असतं. लाख लाख रूपये भरून क्लासेस लावतो आणि परीक्षा पास होतो.  मोबाईल मध्ये जी पे उघडलेल्याने माझ्याकडे पुन्हा एकदा पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी माझा मोबाईल नंबर मागितला. मला एकही रुपया नकोय तुमचा. मी तुमची मस्करी केली होती, गाडी चालू करायचे पैसे द्यावे लागतील म्हणून. एकाने गाडीतून चिल्ड बॉक्स मधून बिअरचे दोन थंडगार कॅन आणले, आणि हे तर घ्या म्हणून पुढे केले. मी डोक्याला हात मारून ते परत त्यांच्याच गाडीत ठेवायला लावले.  मी माझ्या गाडीत बसत असताना तुम्ही मेकॅनिक आहात का म्हणून एकाने विचारले. 
      लाखो टन क्षमता असलेल्या एका तेलवाहू जहाजाच्या चीफ इंजिनिअरला रस्त्यात बंद पडलेली गाडी चालू करून दिल्याबद्दल मेकॅनिक आहात का म्हणून विचारल्याने मला हसावं की रडावं असं झालं.  हो मी एक मेकॅनिक असून माझं खोल समुद्रात तरंगणारे गॅरेज आहे.  गाडी हळू हळू चालवा इथून एक तासा ऐवजी सव्वा तासात अलिबागला पोहचाल पण चाळीस च्या पुढे स्पीडने पळवू नका. असं सांगून मी माझ्या गाडीचा स्टार्टर देऊन निघालो. इंजिनिअरिंग म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान मिळवणे किंवा परीक्षा पास होणे एवढंच नाही. रट्टा मारून क्लासेस मध्ये दिल्या जाणाऱ्या अनेक सराव प्रश्नपत्रिका सोडवत राहून सगळेच पास होतात.  कॉमन सेन्स नावाचं ज्ञान कुठल्याही शाळेत कॉलेजात किंवा पुस्तकात मिळत नाही. हल्ली सगळं रेडीमेड मिळत असल्याने, काही बिघडलं की एकतर नवीन घ्या किंवा सर्व्हिस सेंटरला कॉल करा. एखादा प्रकार कशाने झाला किंवा काय केल्याने त्यातून मार्ग निघेल याचा स्वतःहून शोध घेण्याची वृत्तीच दिसत नाही.  इंस्टा फेसबुकवर मध्ये रमणाऱ्याना शंभर गुणिले सहा करायला कॅल्क्युलेटर लागतो, पाचा पाचा पंचवीस असतात याचा पण काहीजणांना विसर पडतो, इतकी वाईट अवस्था बघायला मिळते. घरात गळणारा नळ बदलण्यासाठी प्लंबर आणावा लागतो, लाईटचा बल्ब बदलण्यासाठी इलेक्ट्रिशियन बोलावावा लागतो, गाडी धुवायला पैसे देऊन माणूस ठेवावा लागतो नाहीतर सर्व्हिस सेंटर वर जावे लागते अशी सध्याच्या कॉलेजला जाणाऱ्या युवकांची परिस्थिती आहे. 

© प्रथम रामदास म्हात्रे 
    मरीन इंजिनिअर 
    कोन, भिवंडी, ठाणे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...