अजून रात्र संपली नव्हती. पण सहाच्या गजराची वाट बघत शलाका कधीची अंथरुणात बसून होती. सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात केली तरच दुपारी एक वाजेपर्यंत ताट मांडता येईल असा हिशेब तिने केला होता. गजर झाल्याबरोबर दुसऱ्या क्षणी पलंगा शेजारी असलेल्या मेजाच्या दिशेने शलाकाचा हात गेला. तिथे असलेल्या घड्याळाच्या डोक्यावरची कळ तिने घाईघाईने दाबली. गजर एक सेकंद जरी अधिक वाजला असता तरी त्या घड्याळाची झीज झाली असती आणि घड्याळाचं आयुष्य एका सेकंदाने कमी झालं असतं असं जणू तिच्या कृतीतून वाटलं. गजर झाल्यावर तिने घड्याळ हलकेच उचललं. आपल्या मऊसूत रुमालाने ते पुसलं आणि ॲंटिक शिसवी शोकेसमध्ये जपून ठेवून दिलं. फेवर लुबाचं घड्याळ आणि अप्रतिम कोरीवकाम केलेली शिसवी शोकेस ह्या दोन वडिलोपार्जित गोष्टी सर्वेशला जीव की प्राण होत्या. घरातील गेल्या सत्तर ऐंशी वर्षांच्या इतिहासाच्या त्या साक्षीदार होत्या. सर्वेश हळूवारपणे घड्याळ उघडून साफसूफ करत बसत असे. एका घड्याळजीकडून त्यासाठी त्याने एक ब्रश विकत घेतला होता. घड्याळाला तेलपाणी करणं, अधूनमधून घड्याळजीला ते दाखवून आणणं ह्या गोष्टी तो नित्यनेमाने करत असे. पण सर्वेश गेला आणि ते घड्याळही एक दिवस बंद पडलं. सर्वेश गेल्याच्या दुःखातून सावरल्यावर शलाकाने बंद पडलेलं घड्याळ दुरुस्तीसाठी दुकानदाराला दाखवलं. घड्याळ पाहून तो म्हणाला,
"ताई, घड्याळ इतकं जुनं आहे की दुरुस्तीच्या खर्चात छान नवीन घड्याळ येईल."
पण शलाकाने नकार दिला आणि ती शांतपणे म्हणाली,
"जो काही खर्च येईल तो द्यायला मी तयार आहे. तुम्ही घड्याळ दुरुस्त करून द्या."
शलाका त्या घड्याळाच्या रुपात जणू सर्वेशलाच मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवणार होती.
शलाकाने घड्याळ कपाटात ठेवून दिलं. आता त्या घड्याळाच्या गजराची गरज बरोबर एका वर्षानंतर लागणार होती.
एरव्ही वर्षभर सकाळी सहा काय आणि सात काय शलाकासाठी सर्व सारखंच झालं होतं. घडाळ्याच्या काट्यावर चालणारं जीवन तिने स्वतःच्या हाताने थांबवलं होतं. ठामपणे थांबवलं होतं. तिच्या दृष्टीने वेळेचं महत्त्व सर्वेश गेला त्याचवेळी संपलं होतं.
शोकेस बंद करताना शलाकाने डोळे भरून घड्याळाकडे बघितलं. डोळ्यांच्या कडा पाणावल्या खऱ्या पण अश्रुंना मात्र तिने वाटेतच रोखलं. सर्वेशला आपण असं रडलेलं अजिबात आवडलं नसतं हे तिला माहीत होतं.
आता ती भराभरा कामाला लागणार होती.
वरणभात, शेवग्याच्या शेंगा घालून केलेली आमटी, ताकातला पालक, डाळिंबी उसळ, मसालेभात, बटाट्याचा तळलेला पापड आणि हलकेच बोट फिरवलं तरी फाटेल इतकी रेशमा सारखी तलम मुलायम पुरणपोळी, त्यावर घरी कढवलेलं चांगलं चार चमचे भरुन साजूक तूप आणि हो, ताटा शेजारी वाडग्यात अदमोरं दही!
हे सर्व निगुतीने करून ताट तयार करायचं होतं.
'दुपारी एकच्या ठोक्याला ताट तयार ठेवायला हवं. नाहीतर स्वारी फुरंगटून बसायची.'
सर्वेशच्या फोटोकडे पाहताना शलाकाच्या मनात आलं आणि ती स्वत:शीच खुदकन हसली.
सर्वेश हयात असताना शलाकाचा जो दिनक्रम असायचा तसाच आजही सुरू होता. फेरफार झाला होता तो वेळापत्रकात.
सर्वेशच्या स्मृतीदिनाच्या दिवशी मात्र वेळापत्रक मिनिटभराने देखील इकडेतिकडे होणार नाही ह्याची शलाका काटेकोरपणे काळजी घेत असे.
एकावेळी पन्नास पन्नास सूर्यनमस्कार घालणारा सर्वेश, शलाकालाही योगासने करण्याचा आग्रह करे. सकाळचा व्यायाम आणि संध्याकाळी किमान तीन चार किलोमीटरचा 'इव्हिनिंग वॉक' ह्यामुळे वार्धक्याकडे झुकू लागलेला हा जोडा तब्येतीने खुटखुटीत राहिला होता.
पूर्वी केलेल्या व्यायामाचा परिणाम अजूनही राहिला होता. म्हणूनच शलाकाचा कामाचा उरक तरुण वयात होता तसाच आजही राहिला होता.
रोजच्या रोज व्यायाम करणाऱ्या सर्वेशला जेव्हा ह्रदयविकाराचा पहिला झटका आला होता तेव्हा सर्वांनाच आश्र्चर्य वाटलं होतं.
हॉस्पिटलमधून घरी आल्यावर काहीशा गंभीर झालेल्या सर्वेशने निर्वाणीची आवराआवर करायला सुरुवात केली होती.
एक दिवस त्याने शलाकाला शेजारी बसवून घेतलं.
सर्वेशच्या चेहऱ्यावर निग्रही व कठोर भाव होते.
"मी जे काही सांगेन ते अत्यंत शांतपणे नीट ऐकून घे आणि समजून घे."
असं म्हणून त्याने शेजारी ठेवलेल्या दोन तीन बॅंकांची पासबुकं उघडून एकेक एंट्री तिला समजावून सांगायला सुरुवात केली. ते झाल्यावर फिक्स्ड डिपॉझिटस्, रिकरींग डिपॉझिटस् आणि अन्य ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीची कागदपत्रे तिला दाखवली. ह्या सर्व गुंतवणूकींची त्याने सूची केली होती . तीही दाखवली. सर्वेशवर नितांत प्रेम आणि विश्वास असलेल्या शलाकाच्या मनात काहूर माजलं होतं. पण ते दूर सारून ती व्यवहार समजून घेत होती. जवळजवळ दीड तास सर्वेश सर्व आर्थिक गोष्टी शलाकाला समजावून सांगत होता. परत परत समजावून सांगत होता आणि शलाका एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे ते सर्व समजून घेत होती. जमाखर्च समजावून सांगितल्यावर शलाकाचा हात हातात घेऊन सर्वेश म्हणाला,
"मॅडम, प्लेनचं तिकीट मिळालंय. स्पेशल विमान आहे. माझ्या एकट्यासाठी! तिकीटावर तारीख अस्पष्ट आहे. पण तिकीट कन्फर्म आहे. शलाका, आपण खऱ्या अर्थाने आयुष्य मनमुराद जगलो. खूप प्रेम केलं एकमेकांवर, एकमेकांना खूप साथ दिली. आपण दोघांनी संपूर्ण भारत बघितला, जग प्रवास केला. पण आता मात्र मला एकट्याने प्रवास करायचा आहे. मॅडम, तुम्हाला चकवून ह्यावेळी मी एकटाच जाणार आहे."
शलाकाने सर्वेशला अडविण्याचा प्रयत्न केला पण तो बोलतच राहिला होता.
शलाकाच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रुधारा वहात होत्या.
सर्वेशने ते अश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तो तिचा हात फक्त थोपटत राहिला होता.
बऱ्याच वेळाने शलाका शांत झाली.
किंचित रागाने ती म्हणाली,
"हे काय आज नवीनच...."
त्याचा चेहरा अजूनही निग्रही होता.
"शलाका, तयारी करून ठेवूया. माझ्या शरीररुपी घड्याळाची वॉरंटी संपली आहे. पण गजर मात्र ठरलेल्या वेळीच होणार आहे."
तिच्याकडे क्षणभर रोखून बघत तो पुढे म्हणाला, "निभावून नेऊ शकशील ना सर्व..."
तिला काय तो अर्थ समजला होता. निश्चयाने तिने मान डोलावली. सर्वेशला खात्री पटली. तरीही तो म्हणाला,
"शलाका, आज पर्यंत जगलो तसंच ह्या पुढलंही आयुष्य आनंदाने जगायचं.... आत्मविश्वासाने जगायचं ....काय ?"
तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून होकार दिला आणि ती त्याच्या मिठीत शिरली.
जेमतेम सहा महिन्यांतच सर्वेशला दुसरा ॲटॅक आला आणि त्यातच तो गेला.
काळ भराभर सरकत होता. वय जाणवत होतं पण तरीही सर्वेशला वचन दिल्याप्रमाणे शलाका अत्यंत ग्रेसफुली जीवन जगत होती. आणि त्याच ग्रेसफुली सर्वेशचा स्मृतीदिन साजरा करत राहिली होती. आज सर्वेशच्या आवडीचं जेवण तयार झालं की ती मोगऱ्याचा स्वत: गुंफून तयार केलेला हार फोटोला घालणार होती. सुबकपणे पदार्थ मांडलेलं ताट फोटो समोर ठेवलं की पानडीच्या सुगंधाची उच्च प्रतीची उदबत्ती ती लावणार होती. उदबत्तीच्या मंद सुगंधासोबत सर्वेशला आवडतं शिवकुमारांचं संतूर लावणार होती.
'सर्व कसं वेळेत आटपलं.'
असं स्वतःशीच म्हणत सर्वेशच्या फोटोकडे बघत बसणं हा शलाकाचा दरवर्षीचा नाद होता. प्रेमाने ओथंबलेल्या डोळ्यांनी ती सर्वेशच्या फोटोकडे पहात बसे. कितीतरी वेळ ती तशीच बसलेली असे. आजही ती तशीच बसणार होती. सर्वेश गेला त्या दिवशी पुण्याहून मुंबईला आलेला त्याचा मुलगा मुकुल, सून मृण्मयी आणि नात अवनी दिवसकार्य पार पडे पर्यंत शलाका सोबत राहिले होते. तेराव्या दिवशी संध्याकाळी मुकुल शलाकाला म्हणाला होता,
"आई, आता तरी चल पुण्याला. इथे एकटी राहून काय करणार आहेस?"
"चला ना आई, काही दिवसांसाठी तरी चला."
असा मृण्मयीने देखील अगदी मनापासून आग्रह केला होता.
शलाकाने त्या दोघांना जवळ बसवलं आणि म्हणाली,
"काही काळ जाऊदे रे... काही काळ त्याचं ह्या घरातलं अस्तित्व तसंच राहील. तो जो भास असेल की नाही, तो ही मला पुरेसा आहे. मी सावरले ना की येईन तुमच्याकडे."
अवनीने तर गळ्यात हात घालून हट्टच धरला होता. त्यावेळी मात्र शलाका जराशी डळमळली होती. पण तरीही सावरून तिचा गालगुच्चा घेत ती म्हणाली,
"येईन, मे महिन्याच्या सुट्टीत नक्की येईन. आता आले तर तुझ्या अभ्यासात व्यत्यय नाही का येणार."
मुकुलचा कसनुसा झालेला चेहरा बघून शलाकाच्या मनात कालवाकालव झाली होती खरी पण तिने चेहरा शिताफीने निर्विकार ठेवला होता. छान हसून तिने तिघांना निरोप दिला.
"आई, दर दोन चार दिवसांनी फोनवर तरी एकमेकांची विचारपूस करुया....फोन केला तर चालेल ना?"
आवंढा गिळत मुकुलने विचारलं.
"अरे, नुसता फोन कशाला... व्हिडिओ कॉल करूया की... म्हणजे अगदी समोर बसून गप्पा मारल्यासारखं वाटेल."
अवनीकडे डोळे मिचकावून बघत शलाका म्हणाली होती. मुकुलकडे बघणं टाळून तिने अवनीचा छान पापा घेतला आणि हसत हसत म्हणाली,
"चला उशीर करू नका आता. म्हणजे वेळेत पोहोचाल. आणि पोहोचल्यावर दमलेले असाल, त्यामुळे फोन नाही केलात तरी चालेल. व्हाटस् ॲपवर कळवा."
गाडी नजरेआड होईपर्यंत ती हात हलवत राहिली होती. मात्र गाडी नजरेआड होताक्षणी ती पटकन वळली. तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. मध्येच तिचं फोटोतल्या सर्वेशकडे लक्ष गेलं. तिने घोगऱ्या आवाजात म्हटलं,
"आज मी तुझं ऐकणारच नाहीये मुळी. कोणासमोर अश्रू गाळायचे नाहीत असं तू माझ्याकडून वचन घेतलं होतंस. पण मी एकटी असतानाही रडणार नाही असं मी कधीच म्हटलं नव्हतं."
शलाकाच्या मनात आलं.
'मुकुल पुण्याला रहायला गेल्याला दहा वर्षं उलटून गेली. ह्या दहा वर्षांत, वर्षाकाठी दोन तीन वेळाही ना मुकुल आपल्याला भेटायला आला, ना कधी आपण पुण्याला त्याच्या घरी गेलो.' मुकुलची इच्छा असायची की दरवर्षी निदान सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला तरी बाबांनी यावं. संगीत महोत्सवाचा आनंद घेता घेता नकळत अनवधानाने निर्माण झालेली कटूता बाबांनी विसरून जावी. पण सर्वेशने ती दुखरी नस कुरवाळत ठेवली होती आणि मृण्मयीचा पीळ सैल व्हायलाही काही वर्षं जावी लागली होती.
श्रीमंत घरातून येताना मृण्मयीने श्रीमंती ताठा बरोबर आणला होता. मृण्मयी कर्तव्यात कसूर करत नव्हती. पण त्यात आपलेपणाचा अभाव असायचा. आपल्यात आणि सासू सासऱ्यात तिने सफाईने अदृष्य रेष आखून ठेवली होती. मुकुलच्या लग्नानंतर घरात आधुनिक प्रकारच्या नवीन वस्तू यायला लागल्या होत्या. त्या वस्तूंसमोर आईवडीलांचा संसार सजवलेल्या वस्तू आउटडेटेड ठरायला लागल्या होत्या. डोळ्यादेखत एकेका वस्तूचं उच्चाटन होताना बघून शलाकाचा जीव तुटत होता. पण तरीही ती नाराजी व्यक्त करत नव्हती. क्वचित कधी मुकुलशी बोलायची. मग तोही मृण्मयीशी बोलायचा. पण शेवटी मृण्मयीच्या मनासारखंच व्हायचं. शलाकाची तडफड सर्वेशला बघवत नव्हती. पण तो गप्प होता. अर्थात, तो वरवरचा शांतपणा होता. एका रविवारी मात्र त्याचा स्फोट झाला. दुपारी जेवण झाल्यावर सर्वेश आपलं आवडतं फेवर लुबाचं घड्याळ दुरुस्त करत बसला होता. त्याचा पसारा बघून मृण्मयी तटकन बोलून गेली,
"बाबा, किती हा पसारा...टाकून द्या आता ते घड्याळ. एकाहून एक सुंदर इलेक्ट्रॉनिक घड्याळं मिळतात. त्यातलं एक घेऊन या. किती काळ जुन्या वस्तू कवटाळून बसणार..."
ठिणगी पडली होती. मनाशी निर्णय पक्का करून सर्वेशने धारदार आवाजात मुकुलला हाक मारली. मृण्मयीकडे तीक्ष्ण नजरेने बघत तो मुकुलला म्हणाला ,
"मुकुल, हे माझं घर आहे."
मृण्मयीला मेसेज मिळाला होता. 'हे माझं घर आहे' ह्या चार शब्दांचे पडसाद मृण्मयीच्या कानात अनेक दिवस उमटत राहिले होते. पुढच्या काही दिवसांत मुकुलने पुण्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि दोन तीन महिन्यांतच सर्व जुळवाजुळव करून त्याने मुंबई सोडली ती कायमचीच.
शलाकाच्या मनात अजूनही कधीतरी येतं,
'जुन्याचा हव्यास आणि नाविन्याचा सोस ह्यामधे कोण जिंकलं आणि कोण हरलं? आणि शेवटी कोणाच्या हातात नक्की काय राहिलं...'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा