मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2239. गणपतीच्या मूर्ती

      दुकानांतून गणपती दिसू लागले की खूप छान वाटतं नै? मला तरी वाटायचं बुवा. खूप प्रसन्न. संध्याकाळी उशिरा कामावरुन परततांना ते गणपती दिसत. नी दिवसभराचा शिण मग, कुठल्या कुठे पळून जात असे माझा. माझ्या मित्राचं असं एक हंगामी दुकान होतं. अजुनही आहे. स्टेशन पासून अगदी जवळ. माझ्या जाण्या - येण्याच्या रस्त्यावरच. इतर अख्ख वर्ष तो ते दुकान, दुसर्‍या कोणाला चालवायला देई. पण गणपती उंबरठ्यावर आले की. महिनाभर आधीपासून फक्त नी फक्त, बाप्पाने भरुन अन् भारुन गेलेलं असे ते दुकान. मी डोकावत असे आत जवळजवळ रोजच, आॅफिसहून घरी जाता जाता. मग तो दोन खुर्च्या मांडी. बाहेरच असलेल्या चहाच्या टपरीवरुन दोन कटिंग मागवी. मस्त अर्धा तास बसत असे मी गप्पा मारत. तर कधी फक्त बघत, त्या वेगवेगळ्या मुर्तींकडे. 
     तर त्या दिवशीही असाच बसलो असतांना. एक वयस्कर, साधारण साठीचे असे एक काका आले दुकानात. हातात स्टीक, डोळ्यांना गाॅगल. अंध आहेत हे बघून लगेच कळावं. माझ्या मित्राने "य्याssssss" म्हणत त्यांच, दिलखुलास स्वागत केलं. त्यांना बसण्यासाठी आणिक एक खुर्ची मांडली. काका बसले. मागवलेला चहा पिता पिता, खास आवडीच्या विषयांवर गप्पा झाल्या दोघांत. लता, रफी, किशोरी, मदन मोहन, खय्याम वैगरे आवडत्या मंडळींच्या स्वर्गिय कामाचा, थोडक्यात ऊहापोह झाला. आणि काका खुर्चीवरुन उठले. मला वाटलं आता फोल्ड केलेली स्टीक उघडतील, नी बाहेर पडतील. पण ते आणिक आत गेले दुकानात. फुल शर्टच्या बाह्या दुमडत, कोपरापर्यंत आणल्या त्यांनी... नी मांडी घालून खाली बसले ते. माझ्या मित्राने त्यांच्यासमोर रंगाचे तीन डबे, नी जाड - पातळ असे काही ब्रश आणून ठेवले. चार रंग न झालेल्या मुर्तीही आणून ठेवल्या. मी हे सगळं बघून अवाक् झालो होतो. नेत्रहीन व्यक्ती रंग कसा काय देऊ शकणार बाबा?. ह्या विचाराने हैराण झालो होतो. माझा मित्र पुन्हा माझ्या बाजूला येऊन बसला... हळू आवाजात बोलू लागला.
 " अरे ह्यांचा मुलगा माझ्याकडे यायचा मुर्तींना रंग काढायला. खूप मनापासून काम करायचा. आवड होती त्याला. he was a student of JJ n was working with some Advertising agency... was earning quite a well too... पण ही त्याची आवड होती. चार वर्ष गणपती रंगवले त्याने माझे. एक छदामही न घेता. प्रचंड आवड नी थोडीशी सेवा ह्या हेतूने. मनःस्वी होता पोरगा. तीन महिन्यांपुर्वीच तो गेला अरे. ट्रेनमधून पडून.. on the spot... गेल्याच महिन्यात हे त्याचे बाबा, मला भेटायला आले. म्हणाले 'माझ्या मुलाला दोन गोष्टींचं भयंकर वेड होतं. एक म्हणजे रंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीची मुर्ती. आमच्या घरी माझ्या लेकाने जमवलेल्या गणपतीच्या, जवळपास दिडशे - दोनशे मुर्ती आहेत. अगदी सुपारीच्या आकारापासून आपल्या पंजाच्या आकारापर्यंतच्या. ह्या त्याच्या दोन आवडी त्याच्या बरोबरीनेच संपुन जाऊ नयेत, असं मला वाटतं. तुम्ही मला परवानगी द्याल इथे येऊन, तो बसत असे तिथे बसून. गणपती रंगवायची?' काय बोलणार होतो मी ह्यावर? त्या माणसाची एका शब्दानेही तक्रार नव्हती देवाकडे की, इतकं करुनही लेकाला अकस्मातच उचललं म्हणून. उलट लेकाकडून कदाचित राहून गेलेली सेवा, त्यांना पुढे चालू ठेवायची होती. मी काहीही अधिक न विचारता, त्यांना यायला सांगितलं. आठवड्यातून दोनदा ते येतात. मी त्यांच्यासमोर तीन - चार मुर्ती ठेवतो. ते त्यांच्या परिने त्या रंगवतात. मी अजिबात काही खोड काढत नाही. उलट कौतुकच करतो त्यांच्या कामाचं. कृतार्थ वाटतं त्यांना, नी ते जातात निघून. त्यांच्या पद्धतीने ते त्यांच्या मुलाला, स्वतःच्या आत जिवंत ठेऊन आहेत. आता मी दरवेळी त्याच त्या मुर्ती त्यांच्या समोर ठेवल्या असत्या, तरी त्यांना काय कळणार होतं?... पण मी नाही करत तसं. दरवेळी नविन, बिनरंगवलेल्या मुर्तीच देतो त्यांना. आतापर्यंत बारा मुर्ती झाल्यात रंगवून त्यांच्या. ज्या मी ठेऊन दिल्यात वेगळ्या, एका फळीवर. कोण घेणार त्या?. अजिबातच सफाईदार कलाकुसर नाही त्यांवर. जाऊ दे. ही माझ्याकडून किंचितशी सेवा, असं मानतो मी". 
एवढं बोलून तो थांबला. मी काकांकडे पाहिलं... ते देव रंगवण्यात रंगून गेले होते. मी निघायला उठलो... दरवाजापाशी गेलो... पुन्हा मागे वळलो... नी बोललो...
"ह्यावर्षीपासून प्रत्येक वर्षी माझ्या घरी, काकांनी रंगवलेल्या मुर्तींपैकीच एक येईल. त्या सांभाळून ठेवणं, हे मात्र तुझं काम". 
"अरे पण त्या अगदीच यतातथा रंगवलेल्या आहेत. दर्शनाला येणारे काय म्हणतील?".
"येणारे लोक जर मुर्ती आतल्या देवत्वा ऐवजी, फक्त मुर्तीच्या बाह्य दर्शनाला येत असतील तर मग ते न आलेलेच बरे. काकांच्या बोटांद्वारे, त्यांच्या मुलानेच मिसळलेला रंग चढलाय ह्या मुर्तींवर. त्याची परिक्षा बाहेरच्या लोकांनी का करावी?"
मित्राने मला फक्त मिठी मारली होती...अगदी कडकडून.
.
.
.
.
दरम्यान अकरा वर्ष उलटून गेलीयेत. आम्ही चौघेही एकत्रच बसलोय आत्ता. काका, त्यांचा मुलगा, माझा मित्र आणि मी. काका त्यांच्या मुलाला कौतुकाने दाखवतायत वरुन, त्यांनी रंगवलेली अन् उरलेली शेवटची मुर्ती. माझा मित्र कौतुकाने बघतोय त्याच्या मुलाकडे की त्याच्यामागेही त्याच्या लेकाने, काकांच्या मुर्तींची जिवापाड काळजी घेतलीये. आणि माझ्याही डोळ्यांतून अपार कौतुक दाटून आलंय माझ्या मोठ्या लेकाबद्दल, अशा करता की त्याने माझ्यानंतरही ही 'परंपरा' जपली, फक्त जाता जाता मी त्याला केलेल्या एका विनंतीवर. 
आपल्यातल्या ह्या अशा चांगुलपणाचा काहीसा अंश, पुढच्या पिढीत नक्कीच झिरपत असावा का? जसं झिरपतं त्या मुर्तीतलं 'देवपण', तिचं मनःपुर्वक करणार्‍या प्रत्येकाच्या आत ज्याला खरंतर कुठलाच रंग नसतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...