त्या रूममध्ये मी आणि माझी सासू आम्ही दोघीच होतो. रूममध्ये भयानक शांतता होती. औषधांचा तो दर्प आणि अद्यावत मशिनरी तिथल्या एकंदर परिस्थितीला आणखी गंभीर करत होत्या. सासू बेडवर मृत्यूच्या दारात होती. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिचे फक्त काही दिवस शिल्लक राहिले होते. रोहित, माझा नवरा खाली मेडिकल मध्ये गेला होता. मी मात्र सासूच्या शेजारीच बसलेली होती. त्यांच्या या गंभीर परिस्थितीत त्या माझ्याकडे फक्त बघत होत्या आणि मीही त्यांच्याकडे....!!! शेवटच्या क्षणी मी आणि माझा नवरा आम्ही दोघंच त्यांच्याजवळ होतो, बाकी कोणीही नव्हतं. स्वतःच्या मुली आणि दुसरा मुलगा यांनी सुद्धा केव्हाच दुरी निर्माण केली होती. खऱ्या लोकांची पारख याच वेळी होत असते. म्हणतात ना,व्यक्ती जेव्हा मृत्यूच्या शय्येवर असते तेव्हा ती खोटं बोलत नाही, माझ्या सासूच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते, पण तिच्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू तिला तिच्या पश्चातापाची जाणीव करून देत होता. तिला काय सांगायचं हे मला समजत होतं, तिला हेच सांगायचं होतं की, आयुष्यभर मी तुला ओळखण्यात चूक केली. तुला समजून घ्यायला चूक केली, मी समजत होते तशी तू कधी नव्हतीच. पण आज मला समजलं तूच फक्त माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहिली, बाकीचे स्वार्थ संपला आणि निघून गेले.
वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर जेव्हापासून माझी सासू माझ्याकडे रहायला आली त्या क्षणापासून का कुणास ठाऊक माझ्या मनातला तिच्याबद्दलचा राग,तिरस्कार,घृणा सगळं अचानक निघून गेलं. जेव्हा दोन व्यक्तींचे विचार पटत नसतील, त्या ठिकाणी वादविवाद होणे, मत,मतांतरे होणे अगदी स्वाभाविक आहे, कारण त्यावेळी दोन्ही व्यक्तींचा अहंकार हा एका वेगळ्या उंचीला पोहोचलेला असतो. कुणालाही माघार घ्यायची नसते. मात्र जेव्हा ती आमच्या घरी आली, तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आमच्या दोघांमधली एक व्यक्ती म्हणजे माझी सासू शांत झाली होती. ज्या ठिकाणी विरोधच संपतो, त्या ठिकाणी शत्रुत्व आपोआप संपते. मुळात ते शत्रुत्व नसतेच, फक्त आपला विचार समजून घेतलेला नसतो, खरं शत्रुत्व याच मुळं निर्माण होत. आमच्या दोघींच्या त्या नजरानजरेमध्ये मी केव्हा भूतकाळात गेले मला समजलेच नाही.मला माझे सुरुवातीचे दिवस आठवले. लग्न होऊन मी जेव्हा सासरी आले ते दिवस...
आई ,वडील, भाऊ, बहीण आणि माहेर या सगळ्या गोष्टी सोडून सासरी येणं, एका नव्या विश्वात प्रवेश करणं आणि तेही अशा ठिकाणी जिथे आपल्याला कसलीच कल्पना नाही. वातावरणाचा अंदाज नाही, तिथल्या लोकांच्या विचारांची पातळी कोणत्या दर्जाची आहे हे माहित नाही, कोण कशाप्रकारे घडवलेला आहे हे माहित नाही,या सगळ्यांबरोबर जुळवून घेणं म्हणजे एखाद्या स्त्रीला खूप अवघड गोष्ट असते. सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा माझे आई-वडील आमच्या सासरी आले तेव्हा याच सासुने
"तुमच्या मुलीला तुम्ही काही शिकवल नाही वाटतं, तिला साधा स्वयंपाक सुद्धा येत नाही." असं बोलून सगळ्यासमोर अपमान केला होता. हा अपमान माझ्या इतका जिव्हारी लागला की मी तो कित्येक दिवस विसरले नाही. घरातील मोठी व्यक्ती म्हणून परिस्थिती सांभाळून घेणे की फक्त बघ्याची भूमिका घेण, यातला फरक सुद्धा ज्या लोकांना कळत नाही ती लोक शिक्षित असून सुद्धा अडाणी असतात. माझ्या चुकांसाठी मला दोष दिलेला केव्हाही चालला असता, परंतु माझ्या आई-वडिलांना अपमानित करणे हे कोणतीही मुलगी सहन करणार नाही. मलाही ते सहन झाले नाही. मग मी ठरवले, मला स्वयंपाक येत नव्हता असं नाही, पण जर एखाद्याने चूक काढायचीच ठरवली तर तो कुठेही चूक काढतो, पण त्यानंतर मी मात्र स्वयंपाकात पारंगत झाले. घरात एक दीर,दोन नणंद,सासू सासरे आणि आम्ही दोघं नवरा-बायको.....!! नव्याचे नऊ दिवस असतात असे म्हणतात, माझ्याही बाबतीत तेच झालं. चांगलं किंवा वाईट कोणीही नसतं, समोरची व्यक्ती आपल्याबरोबर कशी वागते अगदी तसंच आपण त्या व्यक्तीशी वागत असतो. एक वेळ दोन पुरुष एका घरात लवकर जुळवून घेतील, पण दोन स्त्रिया लवकर जुळवून घेत नाही. मी मुळात अशा घरातून आले होते, जिथे आमच्यावर आई-वडिलांचे संस्कार पूर्णपणे झालेले होते. प्रत्येक आई हे काम करते, आपापल्या परीने मुलीला ती सगळे संस्कार शिकवते. मी सासरी आल्यानंतर मला जी गोष्ट जाणवली ती म्हणजे एखाद्याला नोकरासारखी दिली जाणारी वागणूक...!! मानसन्मान हा दिला तरच मिळतो, दुसऱ्यांचा अपमान करून परताव्यात आपल्याला मान कधीच मिळत नाही. त्या घरामध्ये प्रत्येक जण अहंकाराने भरलेला होता. नवऱ्याचं आणि माझं कोणत्याच बाबतीत वाद नव्हता, परंतु घरातल्या लोकांमुळे त्याचं बिचाऱ्याच सँडविच होतंय हे मला कळत होतं. घरात सगळ्यांना मान सन्मान देऊन सुद्धा प्रत्येक जण आपापल्या अहंकारमध्ये वाढत होता आणि हाच अहंकार पुढे सर्वांना त्रासदायक ठरला. प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान असतो, आणि एकदा की स्वाभिमानाला ठेच पोहोचली मग ती व्यक्ती कोणाचच ऐकत नाही. माझ्याही बाबतीत तेच झालं. मी घरातल्या सर्वांचा मान ठेवला, प्रत्येकाला आधार दिला, परंतु त्याच्या बदल्यात मला काय मिळालं तर अपमान, माझ्या आई वडिलांचा उद्धार, संस्काराचे धींडवडे, आणि बिनबुडाचे आरोप.....!!
मला कळून चुकलं होतं आता ह्या घरात जास्त दिवस थांबून उपयोग नाही, कारण अशीच जर परिस्थिती राहिली तर स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. रोहितला घरातील लोक कसे वागतात हे सगळं समजतही होतं आणि दिसत होतं, तो होता होईल तेवढा मध्यमार्ग काढायचा प्रयत्न करायचा पण त्याला ते शेवटपर्यंत जमलं नाही, म्हणजे या लोकांनी जमू दिलं नाही. सासू-सासर्यांनी सुद्धा आपली मुलं आणि मुली जिथे चुकतात त्यांना त्याच ठिकाणी त्यांची चूक दाखवली पाहिजे, पण त्यांनीच जर त्यांच समर्थन केलं तर मग परिस्थिती हाताबाहेर जाते पण त्यासाठी तुम्ही निपक्षपाती असले पाहिजे, तुम्हाला चूक आणि बरोबर यातला फरक समजायला पाहिजे, माझे सासू-सासरे चुकीच्या वेळेस सुद्धा मुलाची आणि मुलीची बाजू घेत होते. मी आणि रोहितने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मुळात हा निर्णय माझाच होता, कारण मला कोणत्यातरी निर्णयाला येणं गरजेचं होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये मी तिथे राहू शकत नव्हते. रोहितला मी समजावून सांगितले.
"हे बघ रोहित,आपण वेगळे राहतोय म्हणजे आपण तुझ्या आई-वडिलांना सोडले असा अर्थ होत नाही. आपल्याला आपल्या दोघांच्या मानसिक शांतीसाठी त्या घरातून वेगळं व्हायचं आहे. जर आपल्याला आज मानसिक शांती मिळाली तर आपण त्यांच्यासाठी उद्या काहीतरी करण्याचा मार्ग शोधू शकतो."
रोहितला माझे म्हणणे पटले. पुढे काही महिन्यामध्ये आम्ही घरामध्ये स्पष्ट सांगून टाकले, आम्हाला या घरामध्ये राहणे जमणार नाही. त्यावेळी घरामध्ये मोठा तांडव झाला. याही ठिकाणी परत सगळ्यांचा अहंकार जागा झाला. आम्ही मात्र आमच्या निर्णयावर ठाम होतो. आज त्या घटनेला पंधरा वर्षे होऊन गेली आणि आम्ही घेतलेला निर्णय किती योग्य होता हे मला आज समजतंय. दिवस बदलायला वेळ लागत नाही. या पंधरा वर्षांमध्ये सगळ्या गोष्टी बदलल्या, आमचे नशीब बदलले. आम्ही आमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकलो,आमची संपत्ती वाढवू शकलो आणि त्याचबरोबर आमचे संबंधही सर्वांबरोबर चांगले राहिले. मात्र माझा दीर आणि दोन ननंद यांचे दिवस मात्र पूर्ण उलटे फिरले. तुम्ही चांगली कर्म केली तर त्याच फळ चांगले मिळत, वाईट कर्म केली तर त्याच फळ वाईट मिळतं. आज ते तिघेही त्यांच्या संसारामध्ये इतके गुरफटून गेले आहेत, त्यांनी जे माझ्याबरोबर केलं आज त्याच गोष्टी त्यांच्याबरोबर घडत आहे हा नियतीचा एक नियमच आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. आज त्या तिघांना सुद्धा आपल्या आई-वडिलांकडे बघायला वेळ नाही पण हेच मला आणि रोहितला आज सर्व करून माझ्या सासू-सासरांसाठी द्यायला वेळ आहे.
सासरे तीन वर्ष अर्धांगवायूशी लढले त्यावेळी सुद्धा आम्ही दोघांनी त्याची संपूर्ण जबाबदारी उचलली आणि आम्ही ठरवलं होतं त्या दोघांची जबाबदारी आपणच घ्यायची. आमच्यासाठी ती एक मोठी संधी होती. संधी एका सेवेची, संधी एका परतफेडेची, संधी आई-वडिलांनी दिलेल्या संस्काराला जागण्याची, संधी आमच्या मुलांना म्हणजे येणाऱ्या पिढीला वयस्कर लोकांची काळजी कशी घ्यायची हे अनुभवण्याची, आम्हाला त्या संधीचं सोनं करायचं होतं.
दोन्ही ननंदाचे आणि दिराचे लग्न झाल्यानंतर माझे सासू-सासरे हे आमच्याकडेच होते. आम्ही त्यांना शेवटपर्यंत परक वाटू दिलं नाही. आमच्या मुलांना आजी आणि आजोबाकडून सुख मिळालं अर्थात त्यांनाही आपल्या नातवांकडून सुख मिळालं होतं. आता सासू ही अंथरुणाला खिळली होती. आमच्या सोबत तिचं आयुष्य अतिशय छान गेल होत. आमच्या सासूने तिचा अहंकार खूप आधीच सोडून दिला होता, कारण तिला कळून चुकलं होतं आपण जर या अहंकारात राहिलो तर नुकसान आपलंच आहे. आमच्यातले वाद केव्हाच संपले होते. मी माझ्या सासूकडे कधीही द्वेषाच्या भावनेने बघितले नाही, कारण समोरची व्यक्ती जर तुमच्याशी प्रेमाने वागत असेल तर तुम्ही प्रेमच द्याल हा जगाचा नियम आहे. रोहितला माझ्यात झालेला बदल बघून कधी कधी खूप आश्चर्य वाटायचे. त्याला मी सांगायचे ",अरे जगात वाईट कोणीच नसतं, आपण एकमेकांसोबत कसे वागतो यावरूनच नातेसंबंध जुळत जातात आणि वृद्धिंगत होतात."
तेवढ्यात रूमचा दरवाजा वाजला आणि क्षणात मी भानावर आले. माझं मन काही काळापुरतं अगदी भूतकाळात गेल होत.
"तुम्ही थोड्यावेळ बाहेर जाता का? मला जरा यांचे कपडे बदलायचे आहेत." नर्स ने मला विनंती केली.
मी माझी पर्स उचलली आणि बाहेर आले. बाहेर रोहित उभा होता, आईच्या काळजीने....!!!
मी म्हंटल ", काळजी करू नको." त्याच्या डोळ्यात पाणी होतं, शेवटी प्रत्येक मुलांचं आपल्या आई वडिलांवर प्रेम असतंच, आपण फक्त त्यात भर घालायची असते.
मी रोहितचा हात धरला, त्यालाही गहिवरून आलं. आम्ही दोघेही नर्स बाहेर येण्याची वाट बघत होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा