गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

205. वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवू नये

        एका प्रवासी बोटीचा भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडपे प्रवास करत होते. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात. त्यांना दिसतं की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेवून जीवरक्षक बोटीत उडी मारतो !!! पत्नी बुडत्याबोटीवर थांबते.
     शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, "पत्नी पतीला काय म्हणाली असेल?" बहुतेक विद्यार्थी म्हणतात, "मला तुम्ही धोका दिलात ! मी तुम्हाला ओळखलेच नाही !!" एक मुलगा मात्र गप्पच असतो. शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!" तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटतं ती म्हणाली असेल, मुलांना सांभाळा !!!" शिक्षक चकित होऊन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?" तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, "नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती !" "तुझे उत्तर बरोबर आहे."  शिक्षक हलकेच म्हणाले.
     बोट बुडाली. पतीने घरी जाऊन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केले. बऱ्याच वर्षानंतर वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते. त्यातून असे समजते की तिच्या आईला आधीच दुर्धर आधार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत राहण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नसतो. त्या डायरीत पतीने पुढे लिहलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती !  पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून यावं लागलं !"
     ही गोष्ट आपणाला सांगते की चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठीमागे कधी-कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवू नये.
     जे मित्र आपली हॉटेलची बिले भरतात, ते त्यांच्यापाशी खूप पैसा आहे म्हणून नव्हे तर त्यांना मित्र पैशापेक्षा अधिक प्रिय असतात म्हणून !
     जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मूर्ख असतात म्हणून नव्हे तर त्यांना त्यांची जबाबदारी कळते म्हणून !
     जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून !
     जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात म्हणून !

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...