एक माणूस एका अरण्यात फिरता-फिरता वाट चुकला. भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आत
पोहचला. अरण्याचा हा भाग एकदम निर्जन होता. तिथे एका परी आणि भूताचे राज्य होते.
दोघेही आपापल्या वेशीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करीत होते. वाट चुकलेल्या माणसाला
बघून परी म्हणाली, "अरे, मी ओळखते ह्याला ! लहानपणी मी ह्याच्या स्वप्नात जायचे. हा खूप-खूप आनंदून जायचा
मला बघून. मग आम्ही खूप-खूप खेळायचो, नाचायचो, खूप-खूप भटकायचो. हा तर अगदी हट्टच
करायचा तू जाऊ नकोस म्हणून. मला आठवतंय. सगळं त्यालाही आठवेल ! तो ओळखेल मला नक्कीच. मला वाटतंय, तो माझ्याच शोधात आलाय इथे. मी त्याचं
अगदी जोरदार स्वागत करीन. त्याला माझ्या राज्यात नेईल. त्याला छान सगळीकडे फिरवील.
मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन. आम्ही खूप खूप मज्जा करु." भूत
म्हणाले, "मी ही ओळखतो ह्याला. मी ही जायचो लहानपणी ह्याच्या स्वप्नात.
तेंव्हा हा खूप घाबरायचा मला. अगदी थरथर कापायचा. मला बघून ह्याला भर थंडीतही
दरदरुन घाम फुटायचा. कधीकधी तर झोपेतून
दचकून उठायचा. मग पांघरुण ओढून गुडूप झोपायचा प्रयत्न करायचा." परी म्हणाली,
"तुझं असंच रे, तुला सगळेच घाबरतात. तो काही केल्या तुझ्याजवळ यायचा
नाही." भूत म्हणाले, "नाही, तसं होणारच नाही. तो माझ्या राज्यातून पुढे
जाऊच शकणार नाही." परी म्हणाली, "नाही ! नाही तो
नक्कीच येईल. तू बघ, त्याला खूप खूप आवडायची रे मी." भूत म्हणाले, "ती
फार जुनी गोष्ट. तेंव्हा तो लहान होता. आता तर त्याला तू आठवणारही नाहीस."
परी म्हणाली, "आठवेल, आठवेल त्याला सगळं ! किती किती
गोड होतं ते सगळं. ते रम्य बालपण. त्या गोष्टी विसरतो काय कुणी?" भूत म्हणाले, "तुला वाईट वाटेल पण तो तुला विसरलाय हे नक्की.
आता तर तो तुझ्यावर विश्वाससुध्दा ठेवणार नाही." परी म्हणाली, मग तो तुझ्या
राज्यात काय म्हणून येईल. तो तुलाही
विसरला असणारच ना?" "तो मला नक्कीच ओळखेल. तो मला
विसरणार नाही कधीच. परी म्हणाली, "तो मलाही विसरणार, बघ तू आता कशी आठवण करुन
देते त्याला. तू बघच.
माझा निर्माता आहे विश्वास.
विश्वास कधीच खोटा ठरायचा नाही. तू बघच. तो मला नक्कीच ओळखेल, लावतोस पैज !" भूत म्हणाले, "पैज लावू नकोस
कारण मला चांगला अनुभव आहे तू नक्कीच हारशील." परी म्हणाली, "नाही. माझा
विश्वास कधीच खोटा ठरणार नाही. तूच घाबरतो आहेस पराभवाला. म्हणून टाळतो आहेस ना?" भूत म्हणाले, "ठीक आहे. बघ प्रयत्न करुन." परी म्हणाली,
"सांग. मी जिंकले तर काय देशील?" भूत हसले आणि
म्हणाले, "जर तू जिंकलीस तर मी तुला माझे पूर्ण राज्य देऊन टाकीन आणि मी
कायमचा ह्या जगातून निघून जाईन." "बघ हं.." परी म्हणाली,
"वेळेवर शब्द फिरवायचा नाही." भूत म्हणाले, "नाही फिरवणार."
मग परीने विश्वासाची आराधना केली
आणि तिने गोड आवाजात गाणे म्हणायला सुरु केले. पक्षीही आपल्या गोड गळ्याने तिला
सुरात साथ देऊ लागले. परीने मग हळूहळू नाचायला सुरवात केली. वारा मंद मंद शीळ
वाजवून तिला साथ देऊ लागला. पानांची सळसळ सुरु झाली. आनंदानी झाडे आणि वेलीही डोलू
लागली. फुलांनी आपल्या पाकळ्या पसरायला सुरवात केली. वातावरण प्रसन्न होऊ लागले.
माणूसही आनंदी होऊ लागला. परीने मग मनातल्या मनात दुप्पट जोमानी विश्वासाची आळवणी
केली, आता सूर्याने वनावर आपली किरणे फेकली. त्या किरणात माणसाला परीचे सोनेरी
केस, तिचे सुंदर डोळे दिसू लागले. हळूहळू त्याला तिची पूर्ण आकृती दिसू लागली. परी
आनंदून गेली. तिने त्याच्या स्वागतासाठी हात पसरले. माणसाला स्वत:च्या डोळ्यावर
विश्वास बसेना. भ ! भ !
भूत !!! त्याच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर
पडले.
अचानक आकाशात ढग भरुन येऊ लागले.
विजांचा कडकडाट सुरु झाला. सूर्य ढगांच्या आड लपून गेला. अंधारुन येऊ लागले.
सोसाट्याचा वारा सुटला. झाडे कडाकडा मोडून पडू लागली. माणूस भयाने घामाघूम झाला.
त्याची दातखीळ बसली आणि तो गतप्राण झाला. सर्वकाही शांत झाले. परी धावतच माणसाजवळ
गेली आणि रडू लागली. ती भूताला म्हणाली, "तू जिंकलास. नेहमी तूच का रे जिंकतोस? मला सगळे का विसरुन जातात?" भूतही खिन्न झाले. त्याने परीच्या खांद्यावर थोपटले. ते म्हणाले,
"हे असंच होतं. नेहमीच ! तुझा निर्माता आहे विश्वास आणि
माझा निर्माता आहे भय. विश्वास काय आणि भय काय हे ह्याच्याच डोक्यातून जन्म घेतात.
हाच आपला मूळ निर्माता आहे. आपले वेगळे अस्तित्व नाही. पण ! पण
!" "पण काय?" परी म्हणाली. "हा मोठा झाला होता आणि जसा जसा माणूस मोठा होत
जातो ना तसा तसा त्याचा विश्वास कमी होत जातो पण भय मात्र वाढत जातं. म्हणूनच मी
जिंकतो. पण तू उदास होऊ नकोस, माझा शब्द अजून कायम आहे. जेंव्हाही विश्वासाचा विजय
होईल ना त्या दिवशी मी खरंच हे जग
नेहमीसाठी सोडून जाईन." भूत म्हणाले.
लेखक : जयनित दिक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा