सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

219. एक वेगळी प्रेमकहाणी

          कॉलेजचे दिवस. मित्रांची मस्ती, रोज काहीतरी नवीन, मित्रांची पार्टी, बर्थडे पार्टी. या सर्व गोष्टी आता फक्त ईशानसाठी आठवणीत राहिल्या होत्या. आत्ता ती मस्ती मित्रांसोबत कधीच करता येत नव्हती. प्रेम नसतानाही उगाच गुलाबाचं फूल घेऊन मुलींना प्रपोज करायचं. स्वत:चा वाढदिवस नसतानासुध्दा मुलींसोबत वाढदिवस साजरा करायचा. या सर्व गोष्टी आठवणीत जपून ईशानने डॉक्टरची पदवी घेतली. एम.बी.बी.एस. पूर्ण करुन आता ईशान डॉक्टर झाला होता. पेशंटला पाहताच तो समजून जायचा की याला काय झालं आहे. डॉक्टर होऊन ईशानला आता दहा वर्षे पूर्ण झाली होती. मित्र म्हणतात, प्रेम पहावे करुन. घरचे म्हणतात लग्न पहावे करुन, कोणी हे म्हणत तर कोणी ते म्हणत. या प्रत्येक जणाचे ऐकून ईशान काय करावं याचा विचार करुन अगदी कंटाळून गेला होता. घरी गेला की आईचा लग्नाचा विषय चालू. त्यात आजीपण बोलायला मौका अजिबात सोडणार नाही. बाबा काही बोलणार नाहीत. ते नेहमी म्हणणार की आईला बोलू दे पण तुला जोपर्यंत लग्न करायचं नाही तो पर्यंत करु नको कारण बाबांना माहित आहे की लग्नानंतर माणसाची अवस्था काय होते ते.
         ईशानने काही दिवसानंतर स्वत:चं क्लिनिक सुरु केलं. यात ईशानची कॉलेजची मैत्रिण आनंदी सहभागी होती. दोघांमध्ये ईशानने हे क्लिनिक सुरु केलं. आनंदी ही ईशानची कॉलेजची बेस्ट मैत्रीण होती आणि प्रत्येक कामात ती ईशानला मदत करत असत. यामुळे ईशानने आनंदी सोबत जॉईन क्लिनिक चालू केलं. ईशानला काही बनून दाखवायचं होतं आणि तो ते पूर्ण करत होता. लगेच काही दिवसानंतर ईशानने क्लिनिकचा उद्घाटन सोहळा ठेवला. या उध्दाटन सोहळ्याला ईशानने कॉलेजच्या मित्र मंडळींना बोलावलं. ते आले पण आणि लगेच मित्रांचा हट्ट पार्टी आणि ईशानने पार्टी दिली. एका हॉटेलमध्ये सर्व मित्र-मंडळीसह मैत्रिणीसह त्याच रात्री ईशानने एका हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. पार्टी चालू झाली. सर्वजण पार्टीचा आनंद घेत होते. पार्टी म्हणजे डान्स, मस्ती, ड्रिंक हे सर्व चालू असणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जुन्या आठवणी आणि जुन्या आठवणींचं बोलायला सुरवात केली की थांबाव पण वाटत नाही. पार्टी सुरु असताना आनंदी खूप सुंदर दिसू लागली होती आणि पूर्ण सोहळा संपेपर्यंत आनंदी ईशानला खूप काळजीने मदत करत होती. हे सर्व ईशानचे मित्र पाहून ईशानला आनंदीबद्दल चिडवू लागले. आनंदीला हे सर्व समजलं पण ती मनावर न घेता पार्टीला अजून प्रतिसाद देऊ लागली.
     काही वेळाने सर्वांचं जेवण झालं आणि पार्टी संपली. सर्वजण पार्टीमधून बाहेर पडू लागले. आनंदी आणि ईशानपण बाहेर आले. सर्वजण आपापल्या घराकडे निघाले. आनंदी ईशानला बोलून ती पण आपली कार घेऊन घराकडे निघाली. ईशान पण घराकडे निघाला. तेवढ्यात ईशानचा मित्र राहूल ईशानला दिसला आणि ईशानने राहूलला कारमध्ये घेतलं.
राहूल : थँक्स ईशान... मला टॅक्सी मिळाली नाही.
ईशान : इट्स ओके राहूल. काही प्रॉब्लेम नाही, तुला अगोदर घराकडे सोडतो मग मी घराकडे जातो.
राहुल : ठीक आहे चालेल... ईशान तुला एक बोलू...
ईशान : हो बोल ना...
राहुल : दिवस किती लवकर निघून जातात.
ईशान : हो... वेळ कोणासाठी पण थांबत नाही राहूल.
राहुल : मग तू का थांबत आहेस ईशान.
ईशान : म्हणजे....
राहुल : आनंदी.... तिच्याबद्दल बोलतोय...
ईशान : आनंदी... आनंदीबद्दल काय राहूल...
राहुल : मला खूप आनंद होतोय की तुम्ही दोघांनी जॉईन क्लिनीक चालू केलंय. पण ईशान तू आनंदीला बोल. तू आत्ता क्लिनिकमध्ये सोबत राहणार पण पुढे काय...
ईशान : राहुल, तुला काय बोलायचं आहे ते नीट सांग. मला काहीच समजत नाही.
राहुल : तुझा तर हाच प्रॉब्लेम आहे ईशान. तुला लवकर समजत नाही. मला हेच म्हणायचं आहे की तू आनंदीसोबत लग्न कर...
ईशान कार थांबवतो.
राहुल : कार का थांबवलीस.
ईशान : चहाचा गाडा... चल चहा घेऊ..
राहुल : हो ठीक आहे... चल.
दोघेही चहा घेत कारच्या बाजूला उभारतात.
ईशान : राहुल, आनंदी माझ्यासोबत असते. ती मला प्रत्येक वेळी मदत करते पण याचा अर्थ असा नाही की मी तिच्यासोबत लग्न करु.
राहुल : ईशान... मी आनंदीला पाहिलय. ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते पण ती दाखवत नाही. कदाचित ती तू प्रेम करायची वाट बघत असेल आणि ती तू बोलव म्हणून थांबली असेल.
ईशान : राहुल... मी प्रेम करतोय.
राहुल : काय...
ईशान : पण आनंदीवर नाही. मी एका मुलीवर प्रेम करतोय. ती अनोळखी आहे.
राहुल : काय... अनोळखी.
ईशान : हो... कॉलेजमध्ये असताना मला हे प्रेम झालं.
     मी रोजच्या प्रमाणे कॉलेजला निघालो होतो. बस पकडली. एकपण जागा रिकामी नव्हती. मी तिकीट काढून थांबलो. काही वेळाने एक स्टॉप आला आणि खूप माणसे उतरली. मग मी जागा पकडण्यासाठी थोडा पुढे गेलो. बस चालू झाली. मला एक जागा दिसली आणि मी बसलो. बस पुढे गेली. नंतर माझ्या पायाला काहीतरी स्पर्श जाणवला. मी खाली पाहिलं तर एका मुलीची पर्स. मी ती उचलली. इकडे-तिकडे पाहिले पण लगेच माझा स्टॉप आला आणि मी उतरलो. मी ती पर्स माझ्या बॅगमध्ये ठेवली. कॉलेजला पोहोचल्यानंतर मी पर्स उघडून पाहिली. त्या पर्समध्ये काही पैसे आणि तिचा फोटो. ती इतकी सुंदर. तिचा चेहरा पाहून मी ती कशी असेल लगेच ओळखलं. तिची पर्स मी अजून पाहिली. तिचा पत्ता मिळेल का? ती कोठे राहत असेल? तिचा मोबाईल नंबर? पण पर्समध्ये तिचा फोटो आणि पैसे याशिवाय दुसरं काहीही नव्हतं. पण ती माझ्या मनात आणि माझ्या हृदयाला लगेच भावली. मी रोज कॉलेजला निघताना ती पर्स घेऊन निघू लागलो. कारण त्या स्टॉपवर कदाचित ती मला दिसेल आणि मी तिची पर्स तिला परत करु शकेन. खूप दिवस निघून गेले. मी रोज तोच प्रयत्न करु लागलो पण काही फायदा झाला नाही. मी रोज तिचा फोटो पाहू लागलो आणि मला त्या चेहऱ्यावर खूप प्रेम झालं. ती माझ्यासाठी अनोळखी जरी असली तरी ते माझं पहिलं प्रेम आहे आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी या मुलीची वाट पाहीन. कुठेतरी असेल. बहुतेक इथेच असू शकते. कधीही भेटू शकते. उद्या पण ती मला कुठेही भेटू शकते. राहूल...
राहुल : बस ईशान... बस कर... पागल आहेस तू... तू अशा मुलीसोबत प्रेम करतोयस जी तुला अनोळखी आहे. ती कुठे राहते? काय करते? तिचं नाव तुला माहित नाही. ती कधी भेटणार आहे का नाही हे सुध्दा तुला माहित नाही. अशा मुलीवर तू प्रेम करतोस. कदाचित तिचं लग्न सुध्दा झालं असेल.
ईशान : तरी पण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. ती मला भेटेल कुठेतरी, कधीतरी...
राहुल : पण ईशान हे कसं पूर्ण होईल? जे तुझ्यासाठीसुध्दा खूप कठीण आहे. कुठे शोधशील तिला, कोणाला विचारशील? काय करशील तिला भेटण्यासाठी?
ईशान : खूप काही केले राहूल. ती फेसबुकवर मिळेल म्हणून तिला फेसबुकवर शोधलं. तरी ती भेटली नाही. अजून मी खूप प्रयत्न करेन तिला भेटण्यासाठी. जर माझं प्रेम आहे तर ती मला भेटेल... केंव्हाही...
राहुल : मला वाटत नाही की ती तुला भेटेल.
ईशान : चल खूप वेळ झालायं. निघायला हवं.
राहुल : हो... चल.
ईशान आणि राहूल कार घेऊन निघतात.
राहुल : बाय द वे... आनंदीला हे सर्व माहित आहे?
ईशान : हो...
राहुल : मग तिला काय वाटतं या प्रेमाबद्दल?
ईशान : माहित नाही.
राहुल : ईशान, मला अजूनही वाटत आहे की तू हे सर्व विसरुन आनंदी सोबत एका नवीन जीवनाची सुरवात करावी.
ईशान : तुझं घर आलं.
राहुल : हो... बोलत-बोलत कधी पोहोचलो कळलं पण नाही. ठीक आहे. चल गुड नाईट.
ईशान : गुड नाईट.
राहुल : ईशान...
ईशान : काय?
राहुल : बघ विचार कर. जीवनात काही विसरुन पुढे जावं लागतं.
ईशान : हो... नक्की मी विचार करेन.
     ईशान कार वळवून घराकडे निघतो. ईशानच्या डोक्यात राहूलचे एक-एक कोरुन बसले. तो याच गोष्टीबद्दल विचार करु लागला. मी ज्या मुलीचा फोटो पाहून प्रेम केले ती जर खरच मला भेटली नाही तर. काय करावं? आनंदीला हे सर्व काही सांगितलें तर आनंदी काय म्हणेल? तिलाच विचारुन पाहतो. काही वेळाने ईशान घरी पोहोचतो आणि झोपी जातो.
     दुसऱ्या दिवशी आनंदी क्लिनिकला येते. ईशान अजून आला कसा नाही असा विचार करत ती तिच्या जागी बसते. काही वेळाने पेशंट अजून येत असतात तरी ईशान अजून आला नाही. बऱ्याच पेशंटांना आनंदी ॲडमिट करते. सर्वकाही काम ती व्यवस्थितपणे करते. ईशानचे पेशंटसुध्दा आनंदी सांभाळून घेते. तरीसुध्दा ईशान का आला नाही असे प्रश्न आनंदीला सतावत असतात. दुपार होते, आनंदीला ईशानचा खूप राग येतो. ती चिरडीला येते.  पेशंट  कमी होतात. मग आनंदीला थोडंस बरं वाटतं. लगेच ईशान तिला येताना दिसतो. ईशानला पाहताच ती रागाने ईशानकडे निघते.
आनंदी : ही वेळ आहे तुझी क्लिनिकला यायची...
ईशान : आनंदी मला खूप महत्वाचं काम होते.
आनंदी : हो, तुझं बाहेरच महत्वाचं काम होतं.. पण मी इथे  किती पेशंट सांभाळून घेतले याची काळजी आहे का तुला? विचार तरी केलास का तू की मी एकटी कसं सांभाळून घेणार ते. अरे पण एकतरी फोन करायचास. मी कितीवेळा फोन लागवला तुला पण तू उचललास नाहीस.
ईशान : आनंदी मला हेच पाहायचं होतं की तू मी नसतानासुध्दा सर्व क्लिनिक सांभाळू शकतेस का नाही? आणि...
आनंदी : आणि...
ईशान : आणि तू माझ्यापेक्षा जास्ती क्लिनिकची जबाबदारी सांभाळू शकतेस.
     आनंदीचा रागीट असलेला चेहरा उतरतो आणि ती लाजून ईशान समोरुन निघून जाते. परत मागे फिरुन पाहते तर ईशान पेशंट पाहण्यासाठी निघून जातो. आनंदी ईशानकडे पाहत ईशानच्या प्रेमात पडते. ती ईशानच्या स्वप्नात निघून जाते. आनंदी फक्त ईशानचा विचार करु लागली. काही वेळाने ईशानकडे सहज जाऊन यावं म्हणून आनंदी ईशानकडे निघते. ईशानकडे पाहताच तिला धक्का बसतो. ईशान त्या मुलीची पर्स हातात धरुन फोटोला पाहत असतो. आनंदीच्या डोळ्यांतून पाणी येतं आणि ती पळत आपल्या जागी येते. ईशान अजूनपण त्या मुलीशी प्रेम करतो. तो तिला विसरला नाही तर माझ्यावर तो प्रेम कसं करु शकेल? आनंदीला खूप दु:ख होते आणि ती ईशानला काहीही न सांगता घरी निघून जाते. रात्र होते. ईशान विचारात असतो आनंदी ही न सांगता का निघून गेली. रात्री असणारे डॉक्टर्सचा निरोप घेऊन ईशान घराकडे निघतो. आनंदीला फोन करत तो कार चालवत असतो. आनंदी फोनकडे पाहून फोन उचलत नाही. शेवटी ईशान आनंदीच्या घरी फोन करतो.
आनंदीची आई : हॅलो...
ईशान : हॅलो... आनंदी.
आनंदीची आई : अरे ईशान, मी आनंदीची आई...
ईशान : काकू नमस्ते.
आनंदीची आई : नमस्ते.. आनंदीला बोलवायचे का?
ईशान : हो. तिचा फोन लागत नाही म्हणून मी हा नंबर लावला.
आनंदीची आई : हो.. बरं. मी बोलवते तिला. आनंदी.... अग ईशानचा फोन आहे तुझ्यासाठी. ये लवकर.
आनंदीची आई : मी बोलवले तिला. ती येईल..
आनंदीची आई फोन बाजूला ठेवून जाते आणि आनंदी येते, फोन : उचलते
आनंदी : हॅलो...
ईशान : आनंदी काय हे? तुला सांगून जाता आलं नाही का?
आनंदी : ईशान मला महत्वाचं काम आलं होते लक्षात. त्यामुळे मी...
ईशान : अग पण तुझं फोन उचलायचास ना. मी किती वेळा लावला...
आनंदी : बर ठीक आहे. मी ठेवते फोन. उद्या वेळेवर ये क्लिनिकला.
ईशान : आनंदी अगं.
आनंदी फोन ठेवून देते आणि ती निघून जाते. आनंदीची आई तिला पाहते. ती विचार करते या दोघांत नक्कीच काहीतरी झालंय.
     दुसऱ्या दिवशी ईशान वेळेवर क्लिनिकला येतो. ईशानच्या अगोदर आनंदी क्लिनिकमध्ये आलेली असते. सर्व पेशंटांना पाहून ईशान आपल्या हॉलमध्ये बसतो. काचेतून आनंदी अगदी ठळक दिसत होती. आनंदीला पाहून ईशान विचार करतो. आनंदीसारखी मुलगी खरंच भेटणार नाही कुठे. आणि ईशान पेशंटला तपासण्यात मग्न होतो. लगेच काही फाईल चेक करत आनंदी ईशानकडे पाहते. ईशानला अगदी मन लावून काम करत असताना पाहून आनंदीला आनंद होतो. लगेच ईशान आनंदीकडे पाहतो. दोघेही एकमेकांना पाहून ईशान हसतो पण आनंदी न हासता आपली नजर वळवते.
     सहा महिने निघून जातात. ईशान आणि आनंदीचं हॉस्पिटल खूप मस्त चालू लागत. त्यात आनंदीचा वाढदिवस जवळ येतो. ईशानला हे समजत आणि ईशान वाढदिवसाची चांगली तयारी करतो. आनंदीला हे माहित होऊ न देता ईशानचे मित्र आणि आनंदीच्या मैत्रिणी पण यांत सहभागी होतात. सर्व तयारी पूर्ण करुन ते बघतात. रात्र होते. आनंदी रोजच्याप्रमाणे घराकडे निघाली. घरी पोहोचल्यानंतर ती जेवण करुन झोपी जाते. रात्री चे बारा वाजतात आणि आनंदीला क्लिनिकमधून फोन येतो. ईशानचा अपघात झालाय. तू लवकर हॉस्पिटलकडे ये. ती विचार न करता घाबरुन कार घेऊन क्लिनिककडे निघते. क्लिनिकला पोहोचताच आनंदीला धक्का बसतो. समोर सर्वजण मित्र आणि मैत्रिणी, एक सुंदर सजावट... मोठासा केक...लाईट्स.... आणि ईशान... हे सर्व पाहून ती खूप आनंदी होते. मग वाढदिवस साजरा होतो. आनंदी सर्वांकडे पाहून केक कापते. केक सर्वांना खाऊ घालते. ईशानकडे येऊन ती ईशानला केक खाऊ घालते. वाढदिवस पूर्ण होतो. सर्व मित्र आनंदीला गुड बाय करुन निघून जातात. ईशान आणि आनंदी दोघेच राहतात.
ईशान : कसं झालं वाढदिवस...
आनंदी : माझ्या जीवनातला पहिला वाढदिवस जे अशाप्रकारे मी साजरा केला आहे.
ईशान : तू आनंदी आहेस ना.
आनंदी : खूप....
ईशान : चल उशीर झालायं... आपण निघायला हवं...
आनंदी : हो... मी पण निघते.
दोघेही घराकडे निघतात. आनंदीला ईशानला बोलायचं होतं पण ती कसं बोलावं याचा विचार करत असते. ईशान कारमध्ये बसणार तोच आनंदी ईशानला आवाज देते.
आनंदी : ईशान...
ईशान : हं... काय?
आनंदी : मला तुझ्याशी काही बोलायचे आहे.
ईशान : बोल ना...
आनंदी : आपण गेली 15 वर्षे सोबत राहतो. आज पण सुध्दा आपण सोबत आहोत. मला हे म्हणायचं आहे की आपण पुढे पण सोबत राहू शकत नाही का...
ईशान : आनंदी... मी एका मुलीवर प्रेम करतो हे तुला पण माहित आहे.
आनंदी : पण ईशान ती कुठे आहे? काय करते? तुला याबद्दल काही माहित नसताना तू कसं जगणार आहेस? ईशान....
ईशान : आनंदी, ते माझ्या जीवनातील पहिलं प्रेम आहे. मी विसरु नाही शकत तिला.
आनंदी : ईशान किती दिवस असं जगणार आहेस...
ईशान : मी आजपर्यंत थांबलोय तर पुढे पण थांबेन.
आनंदी : ईशान हे काय? मी आज फक्त तुझ्यासाठी न लग्न करता थांबले आहे. फक्त तुझ्यासाठी मी आजपर्यंत एका मुलाला भेटले नाही. रोज मला माझी आई लग्नाचा विषय काढून बोलते. पण फक्त तू ईशान. मी तुझ्यावर खूप प्रेम करते ईशान. तुला त्या अनोळखी प्रेमामुळे माझं प्रेम खूप जास्ती महत्वाचं वाटत नाही का...
ईशान : आनंदी, तू माझ्यावर प्रेम करतेस पण मी तुझ्यावर प्रेम करत नाही. तरी तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रेमासाठी मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे.
आनंदी : ईशान, तू जर माझ्यावर प्रेम करत नसचिल तरी मी पुढे तुझ्या प्रेमाची कधीही वाट पाहीन आणि मला माहित आहे की तू माझ्याकडे नक्की येशील.
ईशान : चल निघायला हवं. गुड नाईट.
आनंदी : गुड नाईट
ईशान आणि आनंदी घरी निघून जातात. ईशानला झोप येत नसते. राहूल आणि आनंदीचे शब्द ईशानला सारखे आठवत असतात आणि तो शेवटी खूप विचार करुन आनंदीला एक मॅसेज पाठवतो. मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे आनंदी... हा मॅसेज आनंदी वाचून ती खूप खुश  होते. काही दिवसानंतर आनंदी घरी सांगते की ईशानसोबत लग्न करणार आहे. हे आनंदीच्या घरी समजताच सर्वजण खूप खूश होतात. आनंदीची आई तर लगेच तयारीला लागते. ईशानपण घरी सांगतो. ईशानचे आई-वडीलपण तयार होतात. सर्वांना ही गोष्ट लगेच कळते. सर्वजण खूप खूश होतात. आनंदीला वाटत असतं की तिने ईशानसोबत लग्नाला तयार होऊन चांगलं काम केलंय. ईशानचे आई-वडील आणि आनंदीचे आई-वडील एका  दिवशी भेटून साखरपुडा पण ठेवतात. बघता-बघता ईशान आणि आनंदीचा साखरपुडा जवळ येतो. अगदी दोघेही तयारीला लागतात. आनंदीला येवढी आनंदी पाहून ईशान त्या प्रेमाला विसरुन नवीन प्रेमाची सुरवात करावी आणि पुढे आनंदाने रहावे याचा विचार करत तो सर्व तयारीमध्ये सहभागी होतो. साखरपुड्याचा दिवस उजाडतो. सर्व पाहुणे, मित्र मंडळी, सर्वजण येतात आणि साखरपुडा दोघांचाही होतो. ईशान आनंदीला अंगठी घालतो आणि आनंदी पण ईशानला अंगठी घालते. या दोघांचा पण अगदी चांगल्या पध्दतीने साखरपुडा पूर्ण होतो. सर्वजण खूप आनंदी होतात.
         काही दिवसानंतर ईशान लग्नाची पण तारीख ठरवतो. सर्वांना ती तारीख आवडते. आनंदीला पण ती तारीख आवडते. सर्वजण या तारखेला होकार देतात आणि लग्न याच तारखेला करायचं असं ठरतं. ईशान लग्नाच्या तयारीला लागतो. अगदी लक्षपूर्वक तो तयारी करत असतो. आनंदीच्या आवडी-निवडीसुध्दा तो पाहू लागतो. आणि तिला काय आवडेल आणि काय आवडणार नाही याची सुध्दा तो काळजीपूर्वक तयारी करतो. लग्नाची खूप चांगली तयारी होते. पत्रिकाही छापून येतात. सर्वांकडे पत्रिका पोहचतात पण सर्वजण या लग्नाला खूप खूश असतात. बघता बघता लग्न दोन दिवसानंतर हळदीचा दिवस उजाडतो. सर्वजण हळदीची तयारी करत असतात. इकडे आनंदीच्या घरी धुमधडाक्यात हळदीची तयारी चालू असते आणि इकडे ईशानच्या घरी पण एकदम जोरात हळदीची तयारी चालू असते. पण ईशानने क्लिनिक बंद ठेवले नाही कारण तो पेशंटला देव मानत असत आणि एखादे पेशंट जर खूप आजारी असेल तर त्या पेशंटला थोडा वेळ काढून तो तपासायचा अधूनमधून तो क्लिनिकला पण जाऊ लागला. पण आज हळदी असल्यामुळे तो क्लिनिकला जाऊ शकत नव्हता. सर्वजण ईशानला हळद लावत होते. यात ईशान हळदीने पूर्ण हळदीने पिवळा झाला होता. इकडे आनंदी पण हळदीने अजून सुंदर दिसत होती. बघता-बघता रात्र झाली. सर्वजण कामे पूर्ण करुन झोपायच्या तयारीत होते. तर ईशानला क्लिनिकमधून फोन आला आणि तो कपडे बदलून कार घेवून गडबडीमध्ये क्लिनिककडे निघाला. ईशानचे बाबा पण कार घेऊन ईशानच्या मागे निघाले. सर्वजण काळजीत पडले. हा ईशान येवढ्या गडबडीमध्ये क्लिनिकला का गेला? आनंदीला पण फोन येतो आणि ती पण लगेच क्लिनिककडे निघते. ईशान क्लिनिकला पोहचताच तो अपघात झालेल्या पेशंटकडे धाव घेतो आणि पेशंटला ऑपरेशन हॉलमध्ये घेऊन जातो. लगेच आनंदी पण ऑपरेशन हॉलमध्ये येते. आणि ऑपरेशनकडे लक्ष देते. ऑपरेशन करत असताना चेहरा पूर्ण साफ केल्यावर ईशानला धक्का बसतो. आनंदी ईशानकडे पाहून त्या पेशंटकडे पाहते तर आनंदीला पण धक्काच बसतो. इतके दिवस ज्या मुलीची वाट पाहिली ती आज डोळ्यासमोर आहे. तिचा अपघात झाला होता. खूप ठिकाणी तिला लागलं होतं. पायाला पण मार लागला होता. ईशान हे सर्व पाहून गोंधळात पडला. तरी ईशानने अगदी काळजीपूर्वक तिचं ऑपरेशन पूर्ण केलं आणि तिला सलाईन लावून तो ऑपरेशन हॉल मधून बाहेर आला. आनंदी पण विचारात पडली. इतके दिवस ईशान हिला शोधत होता. पण आज ही याच क्लिनिकमध्ये भेटली. देवाला पण काय करायचेय काय माहित? ईशानला आनंदी बोलण्यासाठी गेली.
आनंदी : ईशान ती... तीच आहे ना.
ईशान : आनंदी ती आज माझ्या डोळ्यासमोर आहे. मला विश्वास पण बसत नाही.
आनंदी : ईशान पण तू काय करणार आहेस?
ईशान : मला हेच समजत नाही की मी काय करु?
आनंदी : ईशान उद्या आपल्या दोघांचं लग्न आहे.
ईशान : आनंदी, मी हे लग्न करु शकत नाही.
आनंदी : काय... पण ईशान सर्व तयारी झालीय. फक्त लग्न बाकी आहे. तू हे वेड्यासारखं बोलू नको. ईशान इतके दिवस ती तुला भेटली नाही पण तू आज माझा पण विचार करु शकत नाहीस का? माझं प्रेम तू आणि फक्त मी? या अनोळखी प्रेमापुढे माझं प्रेम काहीच नाही का?
ईशान : पण आनंदी आज ती माझ्यासमोर आहे. ती मला भेटलेली असताना सुध्दा जर मी तुझ्यासोबत लग्न केले तर मी प्रेमात हरलो असेन.
आनंदी : पण ईशान माझ्या प्रेमाचं काय... मी काय करु... तुला कसं समजत नाही ईशान माझं प्रेम.
     ईशान आनंदीला काहीच न बोलता तिच्याकडे जातो. ती झोपलेली असते. तिच्याकडे पाहून तो तिला बोलायला चालू करतो. मला तुझी पर्स भेटली. तुझ्या पर्समधील तुझा फोटो पाहून मी तुझ्या प्रेमात पडलो. का पाडलंस तू मला प्रेमात? का? आणि उद्या माझं लग्न आहे आणि तू मला आज भेटलीस. मी तुला वेड्यासारखा शोधत गेलो. रोज बस स्टँडला जायचो. कुठेतरी भेटशील म्हणून मी तुला रोज शोधत राहिलो तरी तू मला भेटली नाहीस. रोज तुझा फोटो पाहून मी तुझ्या स्वप्नात रंगून जायचो आणि तू मला आज भेटलीस. तू मला आधी का भेटली नाहीस?
       ईशानचे वडील हे सर्व पाहतात आणि आनंदीला सर्वकाही विचारतात. आनंदी सर्वकाही ईशानच्या प्रेमाबद्दल सांगते. ईशान या मुलीवर प्रेम करतो गेल्या पंधरा वर्षांपासून आणि आज ईशानच्या समोर ती आली.  हे सर्व ऐकून ईशानचे वडील या प्रेमाचा स्वीकार करतील असं आनंदीला वाटू लागलं. पण ईशानचे वडील ईशानकडे जाऊन ईशानला बोलवू लागले.
ईशानचे वडील : ईशान आजपर्यंत तू या मुलीची वाट बघितलीस. पण ती तुला भेटली नाही. आणि आज ती तुला भेटली. पण मी तुला या मुलीला भेटू देणार नाही. तुला आनंदीसोबतच लग्न करावं लागेल.
ईशान : नाही बाबा. मी आनंदी सोबत लग्न करु शकत नाही. कारण मला हिला माझ्या प्रेमाबद्दल सांगायचे आहे. आणि जर ती माझ प्रेमाचा स्वीकार करत असेल तर मी तिच्यासोबत लग्न करेन आणि मी हे शेवटचं सांगत आहे. हे ऐकताच आनंदी रडत तिथून निघून जाते. ईशान आनंदीला पाहून तिच्या हॉलमध्ये जातो आणि ईशानचे वडील विचार करत खाली बसतात.
     सकळ होते. ईशान तिच्या हाताजवळ डोके ठेऊन झोपलेला असतो. ईशानचे वडील हे पाहून घराकडे निघतात. घरी सर्वजण तयारीमध्ये असतात. हे सर्व पाहून ईशानच्या वडीलांना काय करावे हे कळत नाही. ईशानची आई जवळ येते. काय झाले म्हणून विचारते. पण ते काहीच सांगत नाहीत. अजून एक वेळेस ईशानची आई विचारते, "अहो, काय झालंय? सांगा तरी. ईशान कुठे आहे. ईशानला खूप तयारी करायची आहे. आनंदीकडे निघायचे आहे. सांगा ईशान कुठे आहे?
ईशानचे वडील : ईशान लग्न करणार नाही आनंदीसोबत...
ईशानची आई : काय? हे काय म्हणता तुम्ही? शुध्दीवर तर आहात ना?
ईशानचे वडील : मी शुध्दीवर आहे पण ईशानचं डोकं खराब झालंय.
ईशानची आई : अहो, नीट सांगा मला काय म्हणाला तो?
ईशानचे वडील : तो एका मुलीवर प्रेम करतो इतके दिवस तिचा फोटो पाहून. पण ती ईशानला कधीच भेटली नाही आणि काल ती ईशानच्या समोर आली आणि तो आता म्हणतोय की हिला मी माझ्या प्रेमाबद्दल सांगितल्याशिवाय लग्न करणार नाही.
ईशानची आई : तुम्ही समजावलं नाही का ईशानला...
ईशानचे वडील : तो माझे एकपण ऐकत नाही. काय करु कळत नाही.
     इकडे क्लिनिकमध्ये ईशानला जाग येते. तो उठतो. तिला पाहून ईशान प्रेमाने तिच्यावरुन हात फिरवतो. तर लगेच ती शुध्दीवर येते. हळूच डोळे उघडून ती ईशानला पाहते. ती बोलणार तोच ईशान तिला बोलतो.
ईशान : तू... तू झोप... तू उठू नकोस... तू आराम कर.
ती : तुम्ही?
ईशान : मी डॉक्टर ईशान.
ती : डॉक्टर ईशान. मी ठीक कधीपर्यंत होईल.
ईशान : अजून काही दिवस तुला आराम करावा लागेल.
ती : ठीक आहे. पण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर मला सोडाल का?
ईशान : का? इतकी घाई का?
ती : तीन दिवसानंतर माझं लग्न आहे म्हणून म्हणते.
ईशानला हे ऐकताच धक्का बसतो पण तो असं न दाखवता लगेच बोलतो.
ईशान : तुझं लग्न आहे तरी तू इथे कशी?
ती : मी माझ्या मैत्रिणीला माझ्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आले होते. पण माझा काल अचानक अपघात झाला. पण मला कळलंच नाही की माझा अपघात झाला कसा?
ईशान : तुझं नांव सांगशील?
ती : माझं नाव प्रिया.
ईशान : तुझं लग्न कधी ठरलं?
प्रिया : एक महिन्यापूर्वी. पण तू हे का विचारतोयस.
ईशान : काही नाही.... असंच.
ईशान विचार करतो की हिला जर माझ्या प्रेमाबद्दल विचारले तर ही माझं प्रेम आत्ता स्वीकार करणार नाही. तेवढ्यात पोलिस क्लिनिकमध्ये येतात.
ईशान : इन्स्पेक्टर तुम्ही...
पोलिस अधिकारी : डॉक्टर ईशान मला हिच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे.
प्रिया : हां बोला... काही मिळालं तुम्हाला माझ्या कारजवळ.
पोलिस अधिकारी : हो. आम्हाला ही एका मुलीची घड्याळ भेटली आहे.
प्रिया : बघू...
पोलिस प्रियाला घड्याळ देताना ईशानला बोलतात.
पोलिस अधिकारी : डॉक्टर ईशान, हा अपघात नसून प्रियाला कायमचं मारण्याचा प्रयत्न होता आणि प्रिया गेली चार दिवस येथे होती. या चार दिवसामध्ये तिच्यावर तिसरा वार आहे. म्हणून प्रियाने आम्हांला कळवलं आणि मग आम्ही प्रियावर लक्ष ठेवू लागलो. तरी काल रात्री प्रियाचा अपघात झाला.
ईशान : पण प्रियाला इथे मारणारं कोण असेल?
प्रिया : तेच मला कळत नाही डॉक्टर ईशान, या चार दिवसामध्ये माझ्यावर हा तिसरा वार आहे.
ईशान : तुझी कोणती मैत्रीण आहे. तिचं नाव अनू. आम्ही सोबतच राहायचो पण माझ्या पप्पांची बदली झाली दिल्लीला आणि मग मी तिला सोडून दिल्लीला गेले. त्यानंतर मी तिला एक दोन वेळेस भेटले पण मी दहा वर्षाखाली एक महिने इथेच होते. त्यामध्ये माझी पर्स पण हरवली आणि ज्या दिवशी माझी पर्स हरवली त्या दिवशीच मी दिल्लीला गेले. त्या दिवसानंतर मी आत्ता आले. आल्यानंतर  दुसऱ्या दिवसापासून कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करतोय. मी अनूला पण भेटले पण तिला याबद्दल काहीच माहित नाही.
पोलिस अधिकारी : तुम्ही काही काळजी करु नका प्रिया. मी हॉस्पिटलमध्ये काही पोलिस ठेवेन. काहीही झालं तर लगेच मला कळवा. आम्ही निघतो. पुढील तपासणीसाठी मला माहित आहे की जो कोणी असेल तो हॉस्पिटलमध्ये लगेच येईल.
ईशान : ठीक आहे इन्स्पेक्टर. मी पण आहे. इथेच लक्ष ठेवेन.
पोलिस निघून जातात. लगेच ईशानची आई येते.
ईशानची आई : ईशान. हे काय तुझी जिद्द. चल, असं जर तू करशील तर काहीच होणार नाही.
ईशान : आई आपण बाहेर जाऊन बोलू.
ईशानची आई : बाहेर जाणार नाही मी. इथेच हिच्यासमोर बोलणार.
ईशान : आई मी लग्नाला तयार आहे. आपण बाहेर जाऊन बोलू.
ईशानची आई : काय? तू लग्नाला तयार आहेस.
ईशान : हो. चल बाहेर.
ईशानची आई : चल.
ईशान आणि आई दोघेही बाहेर जातात.
ईशानची आई : ईशान अरे आनंदी तुझ्यावर जिवापाड प्रेम करते. तू जर तिला असा नकार दिलास तर ती कधीच लग्न करणार नाही. अरे तिचा तर विचार कर.
ईशान : आई मी आनंदीचा विचार करुन जर तिच्याशी लग्न केलं तर मी तिला कधीच आनंदी ठेऊ शकणार नाही.
ईशानची आई : का रे असं का म्हणतोस? ती तुझ्यासोबत आयुष्यभर राहण्यासाठी तयार आहे आणि तू का राहू शकत नाहीस.
ईशान : कारण माझं प्रेम नाही तिच्यावर. ती माझ्यासोबत राहते, मला नेहमी मदत करते. म्हणून मी तिच्याशी लग्न करायचं का आई...
ईशानची आई : मग तू आधी का नाही म्हणालास. तुझा साखरपुडा झाला. सर्वकाही झालं. आज लग्न आहे तर तू आत्ता हे विचार करतोयस.
ईशान : पण आई, आज ती मला भेटली जिच्यावर मी गेली पंधरा वर्ष प्रेम करत आलोय. पण तिचसुध्दा दोन दिवसानंतर लग्न आहे. ती मला भेटली पण अजून दूर गेली आई.
ईशानची आई : ईशान देवाने तुझी जोडी आनंदी सोबत बनवली आहे. तू चल ईशान. ऐक माझं. जर तू येणार नसशील तर याच लग्नामध्ये माझं मेलेलं तोंड बघशील.
ईशान : आई हे असं बोलू नको. मी तयार आहे चल.
     ईशान आईला घेऊन लग्न मंडपाकडे निघतो. घरी जाऊन तो तयार होतो. आनंदीला समजत की ईशान लग्नासाठी तयार झालाय आणि ती लगेच तयार होते. हे सर्व प्रिया ऐकते. ती विचार करते आज डॉक्टर ईशानचं लग्न आहे आणि हा गेली पंधरा वर्षे कोणासाठी थांबला आणि का ती तिच्या कारजवळ भेटलेल्या घड्याळाला पाहते. खूप लक्षपूर्वक पाहिल्यानंतर तिला आठवत की ही घड्याळ कोणाची आहे ते. ती उठते, पोलिसांना लगेच कळवते ती दुसऱ्या डॉक्टरला सांगून सलाईन काढून घेते आणि निघणार तेच तिला तिथ एक पर्स दिसते. ती पर्सकडे पाहते. पर्स हातात घेऊन उघडते तर तिची हरवलेली पर्स.... मध्ये फोटो आणि जशाच तसे पैसे. ती पर्स जशी हरवली तशीच तिच्यासमोर एक पण रुपये कमी नाहीत. येवढं या पर्सला कोणी जपलं असेल. मध्ये पाहते तर एक कागद आणि त्या कागदावर काहीतरी लिहलेलं होतं. ती वाचायला चालू करते.
     मला ही पर्स भेटली. मी तुला फक्त फोटोत पाहिलं. तू फोटोत येवढी सुंदर दिसत आहेस तर तुला समक्ष पाहिलं तर किती सुंदर असशील. मला तुझं नांव पण माहित नाही. जसं तुझं सुंदर रुप आहे तसं तुझं सुंदर नांव पण असेल. मला माहित नाही की मी हे का लिहतोय. पण तुला पाहिल्यापासून मला तुझ्यावर प्रेम झालं आहे. तुला मी खूप शोधत आहे. तू जेंव्हा भेटशील तेंव्हा तुला मी कधीच सोडणार नाही. तू माझ्या प्रेमाला समजून घेशील का? आणि माझ्यावर पण प्रेम करशील का? तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे पण तू मला कधी भेटणार आहेस माहित नाही. मी देवाला रोज म्हणतो की तू कधीतर कुठे तर भेटावं... ईशान
     हे वाचल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. लगेच तिला कोणीतरी आल्यासारखं जाणवतं आणि ती घाबरुन हॉलच्या बाहेर येते. आवाज देते. कोण आहे. पण कोणीही तिथे नसतो. ती क्लिनिक मधल्या फोनवरुन पोलिसांना फोन करते आणि बोलते.
प्रिया : हॅलो इन्स्पेक्टर मी प्रिया...
इन्स्पेक्टर : हा प्रिया बोला...
प्रिया : मला इथे कोणतरी आहे असं वाटत आहे. प्लीज तुम्ही लवकर या.
इन्स्पेक्टर : हो मी तिकडेच निघालो आहे.
     लगेच कोणीतरी फोनचा वायर कट करतो. प्रिया फोन कट झाला म्हणून घाबरते. फोन ठेवून इकडे-तिकडे पाहते पण कोणीही दिसत नाही. परत प्रिया आवाज देते. कोण आहे. मग तिच्यासमोर काळे कपडे घातलेला पूर्ण चेहरा रुमालाने बांधलेला एक माणूस येतो. ती घाबरते आणि विचारते, "कोण आहेस तू?" तो पण लगेच तिला बोलतो, "तुला कायमचं मारुन टाकायला आलोय. काल तर तू अपघातामध्ये जीवंत राहिलीस पण आत्ता तू जीवंत राहू शकणार नाही."  प्रिया घाबरते आणि लगेच त्या बोलते, "तू का मारतोयस मला? मी काय केलय तुला?" तो लगेच बोलतो, "हे मला माहित नाही. पण तू वाचणार नाहीस. तो लगेच प्रियाच्या मागे लागतो. प्रिया घाबरुन पळते. सगळीकडचे दरवाजे बंद असतात. तिथे असलेली डॉक्टर्स आणि नर्स बेशुध्द असतात. हे पाहून ती अजून घाबरते आणि बाहेरच्या दरवाज्याकडे पळते. पण तो दरवाजा बंद असतो. तो मोठा चाकू घेऊन प्रियाच्या पाठीमागे लागतो. तो जवळ येतो. ती चकवून बाजूला सरकते. तो अजून एक वेळेस चाकू तिच्याकडे मारतो पण ती अजून चुकवते. परत ती पळते. पाय घसरुन ती खाली पडते. तिच्या हाताला एक लोखंडाचा दांडू भेटतो. तो जवळ येतो, तिला चाकू मारणार तोच ती लोखंडाचा दांडू त्याच्या डोक्यात मारते. त्याला जोरात मार लागतो. तो खाली पडतो आणि लगेच तिथे पोलिस येतात. पोलिस आलेले पाहून ती खूश होते. पोलिस प्रियाला कुठे लागलं का पाहतात आणि त्या माणसाला पकडतात. त्याला लगेच विचारतात की कोण आहेस तू? पोलिसांना पाहून तो लगेच सर्व सांगून टाकतो. मी इथेच राहतो. छोटी-मोठी चोरी करुन मी जगतो. पण मला काही दिवसाखाली एक मुलगी येऊन खूप पैसे आणि या मुलीचा फोटो दिला. मी विचारले की काय करायचं आहे? अपंग, डोळे फोडू का हात तोडू? तिनं चक्क म्हटलं की मारुन टाक. मग मी नको म्हणालो, पण तिने अजून जास्त पैसे माझ्यापुढे ठेवले. मग मी अगोदर हिला दोन वेळेस वार केला पण ही वाचली. काल पण वाचली. पण आज हिला मला मारायचं होतं तरी ही वाचली. पोलिस हे सर्व ऐकून त्याला विचारतात की कोण आहे ती? तिचा फोटो आहे का तुझ्याकडे? तो म्हणाला, "फोटो नाही पण नाव माहिती आहे." पोलिस विचारतात, "काय आहे नांव तिचं?" तो म्हणतो, "आनंदी." लगेच पोलिस त्याला पकडून निघत असतात. तर तिथे आनंदीचा फोटो असतो. ते बघून त्या फोटोकडे पाहून तो म्हणतो, "हीच आहे ती जिने मला हिला मारण्यासाठी पैसे दिले. सर्वजण फोटो पाहतात. प्रियाही फोटो पाहताच तिला धक्का बसतो. ती म्हणते, ही तर माझी मैत्रीण अनू आहे. ती तिथल्या फाईल पाहते. तिला समजते की ही इथे डॉक्टर आहे. पण ही मला का मारणार होती काय माहित? लगेच तिला पर्स दिसते आणि बाजूला घड्याळ. ती पर्स आणि घड्याळ उचलते. एकदा घड्याळीकडे पाहते आणि एकदा पर्सकडे. तिला सर्वकाही समजतं आणि पोलिसांना ती सांगू लागते. इन्स्पेक्टर मला सर्वकाही समजलं. डॉक्टर ईशान आणि अनू म्हणजे आनंदी यांचा हा हॉस्पिटल. दहा वर्षांपूर्वी ईशानला माझी पर्स भेटली आणि तो माझ्यावर प्रेम करु लागला. ईशानचं प्रेम माझ्यावर आणि आनंदीचं प्रेम ईशानवर. ईशान मला कधी भेटू नये म्हणून ती मला मारणार होती.  हे पण लगेच पोलिसांना कळलं आणि ते सर्वजण घराकडे निघतात. तिथे पोहोचल्यानंतर समजत की लग्न आनंदीच्या घरी आहे. मग लगेच ते आनंदीच्या घराकडे निघतात. तिथे सर्वकाही चालू असतं. ईशान आनंदीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. हे बघताच प्रिया जोरात ओरडते तेंव्हा
प्रिया : ईशान थांब.
सर्वजण प्रियाकडे पाहतात. तिला पाहून ही कोण... असा प्रश्न सर्वांचा मनात येतो.
ईशान : प्रिया.... तू इथे.
प्रिया : हो मी इथे आले कारण मी हे लग्न होऊ देऊ शकत नाही.
ईशानचे वडील : का? तू कोण आहेस की हे लग्न होऊ देऊ शकत नाहीस?
प्रिया : आनंदीला विचारा... ही घडी तुझीच आहे ना आनंदी.
आनंदी : ती घडी... मला काही माहीत नाही. ही कोण आहे, मी ओळखत नाही हिला.
प्रिया : हो. तू ओळखत नाहीस मला तर ह्या माणसाला तर ओळखू शकतेस ना.
तो माणूस समोर येतो. आनंदी त्या माणसाला पाहून घाबरते. तरी ती प्रियाला जोरात बोलते
आनंदी : हा कोण आहे हे मला माहित नाही. ही खोटं बोलत आहे कारण आपलं लग्न होऊ नये म्हणून
प्रिया : खोट मी बोलत नाही तर तू बोलतेस. प्रेमासाठी तू मला कायमचं मारणार होतीस पण का?
ईशान : प्रिया, आनंदी तुला मारणार होती. पण आनंदी तुला का मारेल?
प्रिया : कारण तुझं प्रेम आहे माझ्यावर ईशान आणि आनंदी तुझ्यावर प्रेम करत होती. मी आनंदीची मैत्रिण असूनसुध्दा तीने तुला माझ्याबद्दल काहीही सांगितलं नाही. मी तुला भेटलेली पर्स पाहून मला समजलं की तू माझ्यावर प्रेम करतोयस. मी ते पत्र पण वाचलं जे तू या पर्समध्ये ठेवलंस. तू तरी वाट पाहिलीस माझी पण मी भेटू नये म्हणून तुला आणि मला दूर ठेवले आणि मी इथे माझ्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आनंदीकडे आले तर तू मला मारण्याचा प्रयत्न केलास.
ईशान : आनंदी... प्रिया जे बोलतेय ते खरं आहे का?
आनंदी : नाही ईशान, ही खोटं बोलत आहे. तुला माझ्यावर विश्वास नाही ईशान?
प्रिया : आनंदी माझ्याकडे पुरावा आहे. तू कितीही जरी खोटं बोलत असचिल तर हा माणूस तर खर बोलेलच. सांग की तू असं का केलंस?
आनंदी : हा... ही जे म्हणतेय ते सर्व खरं आहे.
सर्वजण आनंदीकडे बघतात आणि त्यांना आनंदीचा राग येतो.
आनंदी : ईशानवर मी जीवापाड प्रेम करते. ईशानसाठी मी काहीपण करु शकेन. दहा वर्षाखाली ईशानला प्रियाची पर्स भेटली आणि ईशान प्रियाच्या प्रेमात पडला. मी प्रियाला फोटोत पाहून विचार केला. जर मी ईशानला प्रिया माझी मैत्रिण आहे म्हणून सांगितले असते तर ईशान माझ्या प्रेमाचा कधीच स्वीकार करणार नाही  आणि मी जेवढं होईल तेवढं प्रियाला ईशानपासून दूर ठेवलं. आणि मला कळलं की प्रिया भेटायला येणार आहे तर मी घाबरले की जर प्रिया आणि ईशान समोरासमोर भेटले तर ईशान माझा कधीच होऊ शकणार नाही म्हणून मी प्रियाला मारायचं ठरवलं पण. या माणसाला पैसे देऊन. पण हा दोन वेळा प्रियाला मारु शकला नाही आणि मग काल रात्री मी स्वत: कार घेऊन प्रियाचा अपघात केला तर प्रिया वाचली आणि...
प्रिया : आणि देवाने मला ईशानच्या हॉस्पिटलमध्ये आणलं. आनंदी ईशानने माझ्यावर खूप प्रेम केलं म्हणून देवाने मला इथेपर्यंत आणलं. जर तू मला आणि ईशानला दूर ठेवलं नसतंस तर मी तेंव्हाच ईशानला भेटले असते.
पोलिस अधिकारी : चला आनंदी. तुमची जागा आता कोठडीमध्ये असेल सहा महिने.
ईशानचे वडील : घेऊन जावा हिला. ही कोणाला मारण्यासाठी काहीही करु शकते तर ईशानवर कसं प्रेम करु शकेल?
ईशानची आई : आनंदी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता पण तू असं काही करशील असं मला वाटलं नव्हतं.
आनंदीची आई : अहो, असं कसं म्हणता तुम्ही सर्वजण आनंदीने काहीही केलं नाही.
आनंदी रडत खाली बसते. तिच्याकडे महिला पोलिस येतात आणि तिला घेऊन जातात. आनंदीच्या घरचे तिच्यामागे जातात. सर्व पाहुणे मंडळी जायला लागतात. राहुल ईशानकडे येतो.
राहुल : मला माफ कर ईशान... आज समजलं की खरं प्रेम काय असतं ते.
बघता-बघता सर्वजण जाऊ लागतात. प्रिया ईशानकडे बघून मागे फिरते.
ईशान : प्रिया... थांब... जे काही झालं ते विसरुन जा.
प्रिया : कसं विसरु ईशान..
ईशान : आज तरी मला बोलू दे.
प्रिया : काय...
 ईशान : मी तुझ्यावर प्रेम करतो प्रिया...
प्रिया : पण...
ईशान : पण काय...
प्रिया : मी पण ईशान तुझ्यावर प्रेम करते.
ईशान प्रियाकडे पळत जातो आणि तिला मिठीत घेतो. ईशानचे आई-वडील त्या दोघांच्याजवळ येतात.
ईशान: पण प्रिया तुझं लग्न...
ईशानचे वडील : अरे मी कधी कामाला पडणार. मी आहे ना प्रियाच्या आई-वडीलांना हे सांगायला.
     ईशान आणि प्रिया दुसऱ्या दिवशी प्रियाच्या घरी जातात आणि सर्व जे काही झालं ते सांगतात. ते ऐकत नसतात पण प्रिया आणि ईशानसाठी ते तयार होतात. मग काय विचार करता अशी प्रेम कथा पूर्ण होते जे कधी न भेटता पण प्रेम करतात. मग परत ईशान आणि प्रियाचं लग्न ठरतं आणि दोघेही लग्न करुन क्लिनिक चालू ठेवतात.

लेखक : डी. एम. पोपलाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...