गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

233. सार्वजनिक/वयक्तिक जीवनात कसे वागावे?

 
Ø  तुमचे ध्येय निश्चित करा. मला काय करायचं, काय व्हायचंय, कुठे पोहचायचं, काय मिळवायचंय हे आज, आत्ता ताबडतोब ठरवा.
Ø  त्या दृष्टीने प्रयत्न करा. यासाठी कोणाची मदत होईल? कोण साथ देईल? कोणती पुस्तके वाचावी लागतील? कोणाचे सहकार्य घ्यावे लागेल या अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना भेटा त्या गोष्टी मिळवा.
Ø  काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, अहंकार, मोठेपणा सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा  पारंबी, ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे.
Ø  कोणावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. स्वत: करा.
Ø  मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही, ते नाही म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबूरीचा फायदा घेतात. स्वत:ला मजबूत करा, मजबूर नाही.
Ø  सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच तुमचे जास्त शत्रू असतात. हे लोक आतून गेम करतात. आणि कधीकधी बाहेरचे आणि ज्यांना आपण शत्रू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शत्रू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते विचार बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैत्री करा. मोठे पुढारी, नेते, संघटनेचे वरीष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात.
Ø  कोणाची जात-पात पाहू नका. कर्तृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. आपले माना.
Ø  जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरु माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करु नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला, रागावली, लाथाडले तरी त्याला सोडू नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेकजण आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा.
Ø  प्रत्येक गोष्टींचा तीन बाजूने विचार करा. 1. ही गोष्ट माझ्या हिताची आहे का? 2. हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना? 3. हे असंच का? या तिन्ही बाजूने विचार करा आणि वाटले समोरची व्यक्ती माझ्या भल्याचा विचार करते, यात त्याचा स्वार्थ नाही आणि यात माझा फायदा आहे तरच ती गोष्ट डोळे झाकून करा.
Ø  पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल.
Ø  फेसबूक, व्हाट्स ॲप यांचा वापर मर्यादित करा. टाईमपास करायला आयुष्य पडले आहे. आता करिअरकडे लक्ष द्या.
Ø  दारु पिण्यापुरते जवळ येणाऱ्या मित्रांना मोकळ्या बाटलीसारखे दूर फेका. मयत, दहावा, तेरावा आणि लग्न एवढ्यापुरतेच भेटणाऱ्या आणि संकटाच्यावेळी दूर जाणाऱ्या पाहुण्यांना, मित्रांना पायाजवळही उभे करु नका.
Ø  टीव्ही व चित्रपटात चांगले ते पहावे.
Ø  कोणाशी वाद घालू नका. नाही पटत तर सोडून द्या. पण फालतू वेळ घालवू नका.
Ø  रोज दहा ते तीस मिनिटे मोकळ्या हवेत चाला आणि हो! अगदी सुहास्यवदनाने.
Ø   रोज किमान दहा मिनिटे स्तब्धशांत राहा. एका जागी! शांत!
Ø   रोज ७ तास शांत झोप काढा. शांत झोपसुखाचा मूलमंत्र!
Ø  जगताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, स्फूर्ती, उत्साह आणि दिलदारी.
Ø  रोज थोडे तरी खेळा पण घाम गाळेपर्यंत.  मनोविनोदन होईल.
Ø  गेल्या वर्षापेक्षा मी थोडीतरी अधिक पुस्तके वाचीन असा निश्चय करा.
Ø   खूप मुबलक पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन!
Ø  फळे, फळभाज्या, पालेभाज्या असे शेतातले, बागेतले, डोंगरावरले पदार्थ रोज पोटात जाऊ देत. थोडे समुद्रातलेही! तन सुखी तो मन सुखी!
Ø   जरूर लक्षात घ्या की सकाळचा नाश्ता राजासारखा, जेवण राजकुमारासारखे नि रात्रीचे जेवण मात्र भिकाऱ्यासारखे असावे! म्हणजे काय राव? नाश्ता दमदमीत. दुपारची जेवण राजस; पण रात्रीचे जेवण मात्र अगदी अगदी थोडे, पुरते तेवढेच. कारण झोपेत कुठलीच शारीरिक हालचाल नसते.
Ø   रोज ध्यानधरणा करा. प्रार्थना करा. आपल्या धावपळीच्या, दगदगीच्या जीवनांत तेच एक इंधन आहे जे सुख-शांती-समाधान देईल.
Ø   जागेपणी स्वप्न बघा. त्याचा ध्यास घ्या. त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा.
Ø  खूप आनंदी राहा. हसून खेळून, मिळून मिसळून! आप चंगातो जग चंगा.
Ø   एक नियमच करून टाका. रोज मी किमान तीन लोकांच्या ओठांवर स्मितहास्य फुलवेन.
Ø   आपले चैतन्य, आपली बहुमोल ऊर्जा लोकांबद्दल वायफळ बोलण्यात, त्यांची कुचेष्टा करण्यात वाया घालवू नका.
Ø   ज्या गोष्टी आपल्या अखत्यारित नाहीत, ज्या परिस्थितीस तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल दुःख करीत बसू नका. त्यापेक्षा माझे वर्तमान कसे सुधारता येईल, ते पहा.
Ø   ७० वर्षांवरील वृद्ध माणसे आणि ६ वर्षांखालील छोटी मुले यांच्यासमवेत दिवसातील थोडातरी वेळ नियमित घालवा. वृद्धांना जगण्याची उमेद द्याल नि छोट्यांकडून ऊर्जा घ्याल!
Ø   हे जीवन फार छोटे आहे. दुसऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करण्याइतके खचितच मोठे नाही.
Ø   स्वतःचा फार गंभीरपणे विचार करू नका. इतरांना तुमची काही पडलेली नाही. ते तुमचा इतका विचार अजिबात करीत नाहीत.
Ø   भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. आपल्या जोडीदाराला त्याच्या भूतकाळातील चुकांसाठी टोकणे, चटकन लागेलसे बोलणे, टोचत राहणे सोडून द्या. त्यामुळे आपला जोडीदार पुन्हा पुन्हा दुखावला जाईल आणि आपले वर्तमान बिघडेल. त्याचे काय हो! सो? लॉक द पास्ट, एन्जॉय द प्रेझेंट!
Ø   रोज विद्यार्थी शाळेत जातात. जीवन ही आपली शाळा समजा. एनी प्रॉब्लेम? अहो तो बीजगणिताचा तास समजा. एखादा प्रॉब्लेम नाही सुटला तरी तास संपतो! संपते ना? पण त्यातून आपण काहीतरी धडा शिकतोच! तसेच जीवन आहे. काही समस्या सुटत नाहीत; पण त्यातून मिळालेल्या धड्याने आपण शहाणे होतो हेही नसे थोडके!
Ø  प्रत्येक वेळी तुम्हीच कसे जिंकणार? इतरांनाही थोडी संधी द्या .
Ø   दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना नको. त्याचे वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होऊ नका. तो आतून काय 'भोगतोय', काय 'सोसतोय' ते तुम्हास कोठे ठाऊक आहे?
Ø   क्षमाशस्त्र ज्याचे हाती त्यास काय तोटा? आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा!क्षमाशील झालात की सुखाची रांगोळी आपल्याच दारात!
Ø   दुःखाचे, तणावाचे दिवस आहेत? संपतील राजा! परिस्थिती कायम बदलत राहाते. लाल सिग्नल नंतर हिरवा येतोच की!  तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे! हे धरा मनी. पहाकसे आशादायी नि प्रसन्न वाटेल.
Ø   तुमचे कुटुंब तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. त्यांना प्राधान्य द्या.
Ø  काय वाटेल तो पसंग येवो! धैर्य सोडू नका. उठा, उत्तम वेश परिधान करा व धैर्याने जगास सामोरे जा.  तुमचा आत्मा सुखी आहे! मग तुम्ही दुःखी? का? कशासाठी? सुखी राहा.
Ø  कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठे नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत. त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करुन जेवढं जमेल, झेपेल एवढंच काम हातात घ्या.
Ø  त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरीष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदारा अंगावर घेऊ नका.  खर्च आटोपशीर ठेवावा.
Ø  तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणचा परिणाम कामावर होतो. आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देते.
Ø  स्वत:वर स्वत:च मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणरी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा.
Ø  
Ø  तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा. स्वत:साठी थोडातरी वेळ काढा.
Ø  जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
Ø  बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
Ø  गुलाबाला काटे असतात असे म्हणत रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उत्तम !
Ø  वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.
Ø  भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो. भविष्यकाळ आपणाला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो.
Ø  मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ.
Ø  ज्याच्याजवळ सुंदर सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो.
Ø  जखम करणारा विसरतो  पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
     Øज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरुन आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे.
Ø  Øमृत्यूला सांगाव ये ! कुठल्याही रुपानं ये पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर सांभाव लागेल.

        संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...