मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

223. देवावर श्रध्दा असावी, अंधश्रध्दा नको?

         मे महिन्यातील रणरणत्या उन्हात ती चालत होती. कडेवर इवलंस मूल घेऊन उन्हाने आणि भुकेने काऊन रडणारं. आज शनिवार. शनीच्या मंदीरात अभिषेक करावा म्हणून घरातून लवकरच बाहेर पडली होती ती. पण मालकाच्या घरी जाऊन उचल घ्यायला उशीर झाला. मालक तेस चांगले पण देवा धर्माचा त्यांना टिटकारा. कितीतरी वेळ ते सांगत होते की असे अभिषेक, पूजा करुन काही होणार नाही. त्यापेक्षा हेच पैसे जमव. पोराला शिकव, मोठा कर. पण तिच्या डोक्यात एकच आवाज घुमत होता. देवळातल्या पुजाऱ्याचा.
     "माई, तुझा घरधनी खूप पुण्यवान माणूस, देवधर्म पाळणारा. पण तुमच्या घराला शनीची साडेसाती लागली. त्यामुळे देवदर्शनाला जाताना तो अपघातात गेला. आता तुझा एकुलता एक लेक वाचवायचा असेल तर लवकरात लवकर शनीची शांती करुन टाक. अभिषेक, पूजा केली की तुमच्या मागची शांती निघून जाईल." धनी गेला आता लेकरु गमवलं तर जगून काय करणार... म्हणून तिने ह्याच शनिवारी शांती करायची ठरवलं आणि त्यासाठी ती लगबगीने निघाली. मालकाने होय नाही करत मालकिणीच्या म्हणण्यावरुन 500 रुपये दिले होते. 250 रुपयांत पूजेसाठी सामान, अभिषेकसाठी दूध घेतलं, 250 पुजाऱ्याची दक्षिणा बाजूला काढून ठेवली. पोरगं दुधाची पिशवी बघून जास्तच कोकलायं लागलं. तसं तिनं पिशवी पदराआड दडवली. एक दिवस पोरगं उपाशी राहिलं तर मरणार नाही पण ही साडेसाती त्याचा जीव घेतल्याशिवाय कशी राहील...? पण पोरगं ऊन्हानं आणि भूकेने कळवळून रडत होतं. आईचं काळीज फाटत होतं. पण ती स्वत:च स्वत:ला दिलासा देत होती. ही शांती तुझ्यासाठीच करतेय रे लेकरा. पूजा झाली की प्रसाद खाऊ घालते आणि माझा बी शनिवार सोडते.
     एकदाचं मंदीर गाठलं. आतल्या नळावर तिनं हातपाय धुतलं. पोराच्या तोंडावरुन पाण्याचा हात फिरवला. एकदम थंडगार वाटलं. तिनं देवाला नमस्कार केला. पुजाऱ्याला आवाज दिला. पुजारी जेवत होता. पाटलांच्या घरुन आत्ताच शिधा आली होती. पुजाऱ्याने तिथूनच तिला सांगितलं, "माई, थोडा वेळ लागेल. देवाची विश्रांतीची वेळ आहे. अर्ध्या तासाने करु अभिषेक आणि पूजा. तोपर्यंत तू  आराम कर." तिने लेकराकडे पाहिलं. ते पार भेळकांडून गेलं होतं. तिच्या बी पोटात कावळे ओरडत होते. तिनं हात जोडून पुजाऱ्याला विनवणी केली, "लेकरु, लय भूकाजून गेलंय महाराज, पूजा झाली असती म्हणजी प्रसादाचं दोन घास त्याला खाऊ घातलं असतं." "अगं माई, तुझ्या लेकराच्या पाई मी देवाची झोप मोड करु काय? देवाच्या कार्याला थोडीशी कळ सोसावी लागते. थांबायचं असेल तर थांब नाहीतर पुढच्या शनिवारी ये." पूजारी ताटावरुनच तणतणला. तिने हात जोडले, "नाही महाराज, मी थांबते. देवाच्या झोपमोडीचं पाप माझ्या माथी कशाला?" अन् लेकरापाशी जाऊन बसली. ऊन उतरणीला लागलं होतं.
     दोन तास उलटून गेले होते. लेकरु भुकेने कासावीस होऊन झोपी गेले होते. देवाची झोप होईपर्यंत पूजाऱ्यानेसुध्दा वामकुक्षी घेतली. तिचा बी डोळा लागला होता. पुजाऱ्याने हाक दिली तशी तिला जाग आली. पुजाऱ्याने पूजेचे सामान घेतलं, अभिषेकाचं दूध घेऊन अभिषेक केला. उरलेले दूध देवासाठी ठेवून दिले. पूजेचा अर्धा नारळ तिला दिला. तिनेही भक्तीभावाने शनीला आणि पूजाऱ्याला नमस्कार केला आणि 250 रुपये व कवटीचा रुपया मिळून एकूण 251 रुपये दक्षिणा पूजाऱ्याच्या हातावर ठेवली. पुजाऱ्याने तिला प्रसाद दिला आणि शांती झाल्याचे सांगितले.
     प्रसाद घेऊन ती लगबगीने लेकराकडं गेली. लेकराला हाका मारल्या. हालवले पण ते मात्र थंडगार निपचित पडले होते. भुकेने आणि उष्माघाताने त्याचा बळी घेतला होता. तिने मोठ्याने टाहो फोडला. तिच्या हंबरड्याने मंदीराचा गाभाराही गलबलून गेला. पुत्रविहोगाच्या अतीव दु:खात तिनंही तिथेच प्राण सोडला.
     एक प्रश्न मात्र उरला तसाच अनुत्तरीत. शांती नेमकी कुणाची झाली? शनीची, पुजाऱ्याची की तिच्या लेकराची?... देवावर श्रध्दा असावी... अंधश्रध्दा नसावी.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...