गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

236. प्रवास कंदीलाच्या प्रकाशात

       शिक्षणसेवक, उपजिल्हाधिकारी ते आयुक्त... प्रवास कंदिलाच्या प्रकाशात !  होतकरू व हुशार विद्यार्थ्यांसाठी गरिबी ही प्रेरणा, तर सातत्यपूर्ण अभ्यास हा यशाचा मूलमंत्र आहे. अल्पसंतुष्टता मानू नका. प्रयत्नांनी सर्वच शक्‍य होते. एखाद्या गोष्टीचा ध्यास यशोशिखराकडे नेतो. जीवनात "टर्निंग पॉइंट' आल्याशिवायही यशस्वी होत येत नाही. या "टर्निंग पॉइंट'कडे सकारात्मक दृष्टीने बघाल, तरच यशाची गोड फळे चाखता येतात. शिक्षणसेवक ते उपजिल्हाधिकारीपदापर्यंत आणि तेथूनही पुढे महसूल आयुक्तपदापर्यंत पोहोचलेल्या तीस वर्षीय युवा प्रवीण चव्हाण यांचा हा सल्ला.
      मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील प्रवीण चव्हाण प्रसिद्धीपासून लांब राहणारे व्यक्तिमत्त्व. केवळ तीस वर्षांच्या वयात विविध पदांच्या आठ पोस्टिंग मिळविलेल्या चव्हाण यांचा हा प्रेरणादायी प्रवास केवळ थक्‍क करणारा. प्रवीण बारावी उत्तीर्ण झाले. चांगले गुण मिळाल्यानंतरही डॉक्‍टर किंवा इंजिनिअर होऊ शकत नव्हतो. वडिलांचे छत्र हरपलेले. लहान भाऊ आणि बहिणीचे शिक्षण, आईची कुटुंब चालविण्यासाठीची धडपड, अशा अवस्थेत "डीएड'चा निर्णय घेतला. विसाव्या वर्षीच शिक्षणसेवक झाले. मेहुणबारेपासून बारा किलोमीटरवरची जिल्हा परिषद शाळा मिळाली. तांड्यावर मुले यायची; पण खिचडी खाऊन पसार व्हायची. पालकांची समजूत काढली. शंभर टक्‍के उपस्थिती वाढविली. तीन हजार पगारांत घर चालत होते. जात पडताळणीसाठी जळगावला जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे विजय सिंघल जिल्हाधिकारी होते. त्यांच्या नावाची पाटी होती. त्याखाली लिहिलेले होते "आयएएस'. प्रथमच "आयएएस' काय असते, याचा उलगडा झाला  आयुष्यातला 'टर्निंग पॉइंट' चव्हाण घरी आले. शाळेत जायचे पण डोळ्यासमोरून ती पाटी जात नव्हती. अनेकांना भेटले. त्यांनी हे आपले काम नाही, असे सांगितले. काहींनी प्रोत्साहन दिले. चाळीसगावच्या तहसीलदारांनी एकदम वरचा विचार करण्यापेक्षा "एसटीआय'सारख्या परीक्षा दे मग पुढचा विचार कर असे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्यासाठी "टर्निंग पॉइंट' ठरले. पहिल्याच प्रयत्नात "एसटीआय' परीक्षा पात्र झाले. काहींनी सल्ला दिला, पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले, पदावर रुजू होऊ नकोस. पुढचा अभ्यास कर. दरम्यानच्या काळात शाळेत जाणे, घरी परिस्थितीवर मात करण्यासाठी दहावीच्या मुलांचे क्‍लास घेणे सुरूच होते. तेव्हा वीज भारनियमन फार होते. आई कंदिलाचा लख्ख प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करी. माझ्याजवळ बसून अवतीभवती त्रास देणाऱ्या रातकिड्यांना फटकारायची. पुढे डेप्युटी सुप्रिटेंडंट झाले. ते पदही स्वीकारले नाही. नायब तहसीलदार झाले. त्या पदालाही एक्‍स्टेंशन दिले. अभ्यास सुरूच होता. सहाय्यक आयुक्त झाले. उपजिल्हाधिकाऱ्यांची नोकरी न स्वीकारता "यूपीएससी'च्या परीक्षेची तयारी केली. त्याच वर्षी "आयएसएस' व "आयपीएस' समकक्ष पदावर रेल्वे विभागात "आयआरएस' झाले. दिल्ली, लखनौला सेवा केली. 2014 मध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाले. आता नागपूरला महसूल आयुक्‍त म्हणून कार्यरत आहेत.
      जिल्हाधिकारीपदाची परीक्षाही दिली असून, तिचा निकाल अद्याप बाकी आहे. श्री. चव्हाण देशभर मार्गदर्शनपर सेमिनार चालतात. अवघ्या दोन वर्षांत दीडशे सेमिनार झाले. लहानपणी प्रवीण मेहुणबारेवरून विमान जायचे तेव्हा टक लावून पाहायचा. आज तो देशभर विमानातून प्रवास करीत, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांत स्फुल्लिंग चेतवीत आहे. आईने थंडीच्या दिवसांत माझ्याकडून शाल मागितली. पण पैसे नव्हते. आजपर्यंत मला सत्कारापोटी दीडशेवर शाल मिळाल्या, मिळत आहेत. शाल दिसली की आईची आठवण येते. प्रत्येक शाल तिला देतो. तिनेही सांभाळून ठेवल्या. शिका, अभ्यास करा. क्षण अन्‌ क्षणाचा विचार करा. आईवडिलांचा आदर करा. वृद्धांमध्ये बसा, गप्पा मारा. ते जगात कसे जगायचे, हे शिकवितात.
 - प्रवीण चव्हाण, महसूल आयुक्‍त, नागपूर
 
- सचिन ठाकूर (एम.पी.एस.सी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...