धूळ भरलेले पाय...
पावसाने भिजलेले टाळ...
ज्ञानोबा-तुकाराम चा अखंड गजर...आणि त्या गजरात मिसळलेले सेल्फी स्टिकस आणि handicams..
कोणी ड्रोन उडवत होते.
कोणी "Day 3 of Wari Vlog" म्हणत कॅमेऱ्यासमोर बोलत होते तर कोणी वारकऱ्यांना थांबवून पुन्हा चालायला सांगत होते.
"काका... एकदा टाळ वाजवत या बाजूने या."
"मावशी... कॅमेऱ्याकडे बघून जर हरी विठ्ठल म्हणा."
"भाऊ, हा शॉट व्हायरल जाणार !"
आणि तरीही.
त्या सगळ्या गोंधळात खरे वारकरी मात्र शांतपणे विठ्ठलाच्या नावात चालत होते. त्यांना कोण बघतंय याची पर्वा नव्हती...
कारण ते फक्त एका नजरेसाठी चालत होते... विठोबाच्या.
संध्याकाळी मुक्काम झाला. एका वडाच्या झाडाखाली एक सतरा-अठरा वर्षांचा मुलगा बसला होता.
अंगावर साधा धोतर, पाय धुळीने माखलेले मात्र चेहऱ्यावर विलक्षण तेज.
एक रिल्स स्टार त्याच्याजवळ आला.
"भाऊ... तुझा लूक भारी आहे.
एक रील करू या?"
"काय होणार त्याने"
मुलगा मंद हसला.
"लाखो व्ह्यूज...?
"त्याने विठ्ठल भेटतो का?" मुलगा बोलला.
रिल्स स्टार थोडा गोंधळला.
"नाही... पण वारी जगभर पोहोचते."
मुलगा म्हणाला,
"वारी जगभर पोहोचायला हरकत नाही.
पण आधी ती स्वतःच्या मनात पोहोचली पाहिजे.
तू वारी दाखवतोयस...
की स्वतःला?"
तो प्रश्न ऐकून आजूबाजूचे काही तरुणही तिथे जमले.
रिल्स स्टार पुन्हा म्हणाला,
"मग फोटो काढणं, व्हिडिओ करणं चूक आहे का?"
मुलगा शांतपणे म्हणाला,
"चूक मोबाईलमध्ये नाही...
चूक हेतूमध्ये असते. जर कॅमेरा विठोबाला दाखवत असेल...
तर ती सेवाच आहे.
पण जर प्रत्येक फ्रेममध्ये विठोबा आणि वारीपेक्षा स्वतःचाच चेहरा मोठा दिसत असेल...तर ती सेवा नसते...तो स्वार्थ असतो."
बाजूला उभा असलेल्या एकाने विचारले "मग वारकरी आणि रिल्स स्टार यांच्यात फरक काय?"
मुलगा हसला.
"वारकरी विठ्ठलाला भेटायला निघतो.
रिल्स स्टार अल्गोरिदमला भेटायला.
वारकरी नामाचा जप मोजतो.
रिल्स स्टार लाईक्स मोजतो"
सगळे शांत झाले.
काहींच्या हातातले मोबाईल नकळत खाली आले.
रिल्स स्टारने हळू आवाजात विचारलं,
"मग मी काय करू?"
मुलगा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,
"रील बनव...
कोणी नाही म्हणत.
पण अशी बनव...
की लोक तुझ्यावर नाही...
विठोबावर प्रेम करतील.
तुझ्या चेहऱ्यामुळे नाही...
तर विठ्ठलाच्या नामामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येईल.
लक्षात ठेव...
वारी ही स्वतःला दाखवण्याची जागा नाही...
स्वतःला विसरण्याची जागा आहे."
म्हणत तो मुलगा उठला दोन पावले चालला.
मागून कोणीतरी मोठ्याने विचारलं,
"अरे... नाव तरी सांग !"
तो थांबला.
आकाशाकडे पाहिले.
ओठांवर हलकंसं स्मित उमटले.
"हवं असेल...तर 'ज्ञाना' म्हणा."
तो पुढे चालत राहिला.
क्षणातच वारकऱ्यांच्या गर्दीत तो दिसेनासा झाला.
बराच वेळ कुणीच काही बोललं नाही.
काही वृद्ध वारकऱ्यांचे डोळे मात्र पाणवले होते. कारण तेच जाणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा