एकदा एका छोट्याशा रेल्वे स्थानकावर गाडी येऊन थांबली. प्लॅटफॉर्मवर गडबड वाढली होती. कोणी उतरायच्या घाईत होते, कोणी चढत होते, तर काही लहान मुले पाणी, चहा आणि खाण्याच्या वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करत होती. त्यांच्यात एक बारीकसा, निरागस मुलगाही होता. त्याच्या खांद्यावर एक छोटासा माठ लटकलेला होता आणि तो मोठ्याने हाक मारत होता, “पाणी घ्या… थंड पाणी…!”
त्याच वेळी डब्यात बसलेल्या एका श्रीमंत सेठाची नजर त्या मुलावर पडली. सेठाने मोठ्याने हाक मारली,
“अरे मुला, इकडे ये!”
मुलगा धावत आला आणि म्हणाला, “हो सेठजी?”
सेठ म्हणाले, “एक ग्लास पाणी दे.”
मुलाने तत्परतेने माठातून ताजे पाणी भरून ग्लास पुढे केला. तेव्हा सेठाने विचारले, “किती पैसे?”
हमुलगा नम्रपणे म्हणाला, “पंचवीस पैसे, सेठजी.”
सेठाने भुवया उंचावत विचारले, “पंधरा पैशांत देशील का?”
हे ऐकताच मुलगा हलकेच हसला, ग्लासातील पाणी परत माठात ओतले आणि काहीही न बोलता पुढे निघून गेला. त्याच डब्यात एक महात्माही बसले होते. त्यांनी हा संपूर्ण प्रसंग पाहिला. मुलगा का हसला, याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्या हसण्यात जणू काहीतरी गूढ सत्य दडलेले होते. महात्म्यांची उत्सुकता वाढली. ते ताबडतोब गाडीतून उतरले आणि त्या मुलामागे गेले.
“बाळा, जरा थांब,” त्यांनी आवाज दिला.
मुलगा थांबला आणि आदराने म्हणाला, “बोला महाराज.”
महात्म्यांनी विचारले, “तू आत्ताच हसलास का? सेठाने तुझ्याशी घासाघीस केली, तरी तू काही बोललास नाहीस.”
मुलगा म्हणाला, “महाराज, मला हसू यासाठी आले की सेठजींना खरंच तहान लागलेली नव्हती.”
महात्म्यांनी आश्चर्याने विचारले, “असं का वाटलं तुला?”
मुलगा म्हणाला, “महाराज, ज्याला खरोखर तहान लागलेली असते, तो कधी पाण्याची किंमत विचारत नाही. तो आधी पाणी पितो, तहान भागवतो आणि नंतर पैसे किती द्यायचे ते विचारतो. पण जो आधीच भाव करतो, त्याची तहान खरी नसते.”
हे उत्तर ऐकून महात्मे गहन विचारात पडले. एका छोट्या मुलाने किती मोठा जीवनसत्य सांगितला होता.
ते हसून म्हणाले, “बाळा, तू तर फार मोठे तत्त्वज्ञान सांगितलेस.”
मुलगा म्हणाला, “महाराज, हीच गोष्ट आयुष्यालाही लागू होते. ज्यांना खरोखर काही मिळवायचे असते. ज्ञान, ईश्वर किंवा यश - ते वादविवादात वेळ घालवत नाहीत. ते थेट आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतात. पण ज्यांची इच्छा खरी नसते, ते केवळ चर्चेत आणि शंकांमध्ये अडकून राहतात.”
महात्मे मुलाच्या उत्तराने खूप आनंदित झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि मनात विचार केला की सत्य आणि ज्ञान हे वयावर अवलंबून नसते; ते कुणाकडूनही मिळू शकते.
त्या दिवसानंतर महात्म्यांनी आपल्या शिष्यांनाही हेच शिकवले की जीवनात खरी तहान असणे अत्यंत आवश्यक आहे.
जर ईश्वरप्राप्तीची खरी ओढ असेल, तर कोणतीही अडचण माणसाला रोखू शकत नाही. खरंच, जर देव नाहीत तर त्यांचे स्मरण का करायचे? आणि जर ते आहेत, तर मग चिंता कशाची? जीवनात आपण जे काही गमावतो, ते अनेकदा आपल्या अज्ञानामुळे गमावतो; आणि जे काही मिळवतो, ते ईश्वरकृपेनेच मिळते. मनुष्याचा जन्म आणि मृत्यू त्याच्या हातात नसतात; पण जीवन कसे जगायचे हे मात्र पूर्णपणे त्याच्या हातात असते. म्हणून जीवन प्रेम, आनंद, सेवा आणि भक्तीने भरून टाकावे. जीवनाची सुरुवात रडण्याने होते आणि शेवट इतरांच्या रडण्याने. पण या दोन्ही टोकांमधील काळ जर आपण हसत, प्रेम, सेवा करत आणि ईश्वरभक्तीत घालवला, तरच ते जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी आणि सार्थक ठरते.
बोध
ज्याची इच्छा खरी असते त्याला मार्ग सापडतो आणि ज्याची तहान खरी असते, तो ध्येयापर्यंत नक्की पोहोचतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा