शनिवार, २५ जुलै, २०२६

3077. ​पोराटोरांचे काम !

     'अभ्यंकर अँड सन्स ज्वेलर्स' हे शहरातील सर्वात मोठे सोने, चांदी व हिऱ्यांचे दुकान होते. तशी त्या शहरात इतर ८-१० ज्वेलर्सची दुकाने होती; पण त्यांचा व्यापार मर्यादित स्वरूपात चाले. अभ्यंकर अँड सन्सच्या इतर शहरांत पाच शाखा होत्या. मात्र, केवळ व्यवसाय महत्त्वाचा नव्हता, तर अभ्यंकर अँड सन्सचे मालक श्री. अनंत अभ्यंकर हे समाजातील एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. ते सामाजिक मदत आणि दानधर्म करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या ट्रस्टतर्फे अनेक शाळा व कॉलेजेस सुरू केली होती.
​      दोन महिन्यांपूर्वी अभ्यंकर अँड सन्स ज्वेलर्सच्या शहरातील मुख्य दुकानावर दरोडा पडल्याची बातमी आली. अंदाजे ५० लाखांचे दागिने पळविले गेले होते. सर्व वर्तमानपत्रांत व इतर माध्यमांत ही बातमी प्रसिद्ध झाली होती. जवळच्याच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस ठाण्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी आपले सर्व हातखंडे वापरले; परंतु दोन महिने होत आले, तरी गुन्हेगार पकडले गेले नव्हते आणि तपासालाही गती मिळत नव्हती. ​दुकानाचे मालक श्री. अनंत अभ्यंकर पोलीस आयुक्तांना वारंवार फोन करून विचारणा करत होते. ते स्पष्टपणे सांगत होते, "माझे फार मोठे नुकसान झालेले नाही; पण 'काळ सोकावतो' या नियमानुसार याचा योग्य तपास होणे गरजेचे आहे." हे सर्व पाहून पोलीस आयुक्तांनी ही केस गुन्हे अन्वेषण शाखेकडे (Crime Branch) सोपवली. नुकतीच बदली होऊन आलेल्या इन्स्पेक्टर कदम यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आला. कठीण केसेस सोडवण्यात कदम साहेबांचा हातखंडा होता, त्यासाठी त्यांना यापूर्वी शासकीय पुरस्कारही मिळाले होते. ​कदम साहेबांनी सर्वप्रथम त्या पोलीस ठाण्याला भेट दिली, जिथे या गुन्ह्याची नोंद झाली होती. तेथील इन्स्पेक्टर शिंदे ही केस हाताळत होते. त्यांनी केसची सर्व कागदपत्रे, पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज कदम साहेबांना दाखवले. तसेच आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती दिली. कदम साहेबांनी आवश्यक ते पुरावे आपल्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यास सांगितले.
​     सर्वात आधी कदम साहेबांनी दरोड्याच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात चोरी करणाऱ्यांपैकी केवळ एकाच व्यक्तीची आकृती चित्रित झाली होती. काही कॅमेरे बंद असावेत, असा त्यांनी विचार केला. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने डोक्यापासून कमरेपर्यंत गोणपाटासारखा बुरखा घातल्यामुळे त्याचा चेहरा अजिबात दिसत नव्हता. त्याचे इतर साथीदारही असावेत, जे सीसीटीव्हीच्या कक्षेत आले नसावेत, असा अंदाज कदम साहेबांनी बांधला. दरोड्याच्या वेळी रात्र असल्याने दुकानात अंधार होता, ज्यामुळे फुटेजमध्ये फारसे काही स्पष्ट दिसत नव्हते. दरोडेखोराच्या हातातील टॉर्चच्या प्रकाशातील हालचालींशिवाय तपासाच्या दृष्टीने उपयुक्त असा कोणताही ठोस पुरावा तिथे नव्हता. ​कदम साहेबांनी नंतर आपला मोर्चा अशा गुन्हेगारांकडे व टोळ्यांकडे वळवला, जे पूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून बाहेर आले होते. याशिवाय अशा गुन्ह्यांची पार्श्वभूमी असणाऱ्या विविध टोळ्यांशी त्यांनी संपर्क साधला. पोलिसांचे खबरी (ज्यांना आता 'पोलीस मित्र' म्हटले जाते), जे गुन्ह्यांचा शोध घेण्यात अचूक माहिती देतात, त्यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. मात्र, इतके प्रयत्न करूनही कदम साहेबांच्या हाती काहीच लागले नाही. सर्वांनी एकच सांगितले, "आमच्या लोकांचा या दरोड्यात हात नाही. ही नक्कीच एखादी नवखी टोळी असावी." यामुळे कदम साहेब थोडे निराश झाले. शेवटी त्यांच्या 'गणेश' नावाच्या एका खास खबऱ्याने माहिती दिली, "अशा गुन्ह्यांमधील तज्ज्ञ असलेला 'बैजू दादा' सध्या साकीनाका पोलीस कोठडीत बंद आहे. त्याची अशा गुन्ह्यांची मोठी टोळी आहे. त्याला बऱ्याच टोळ्यांची माहिती असते. त्याच्याकडून काही सुगावा लागतो का ते बघा."
​कदम साहेब तातडीने साकीनाका पोलीस चौकीत हजर झाले. तेथील प्रभारी अधिकाऱ्याला आपली ओळख सांगून त्यांनी कामाचे स्वरूप स्पष्ट केले. अधिकाऱ्याने बैजू दादाला बाहेर काढून एका शेजारच्या खोलीत आणले, जिथे कदम साहेब वाट पाहत होते. कदम साहेबांनी बैजूला दरडावून विचारले, "खरं सांग, तुझ्याच माणसांनी अभ्यंकर ज्वेलर्सवर दरोडा टाकला ना?" त्याच्याकडून खरी माहिती मिळवण्यासाठी त्यांनी मुद्दाम हा डाव टाकला होता. त्यावर उसळून बैजू म्हणाला, "साहेब, खोट्या आरोपात मला आणखी अडकवू नका! मी जरी आत असलो, तरी बाहेरच्या सर्व घडामोडी माझ्यापर्यंत पोहोचतात हे खरे आहे. पण असले पोरकट दरोडे माझी गँग कधीच टाकत नाही. मी खात्रीने सांगतो, हे 'पोराटोरांचे काम' आहे! साहेब, आम्ही काय दरोड्यासाठी गोणपाटाचा बुरखा घालणारे भिकारडे आहोत काय? एवढी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. आणि ५० कोटींच्या मालाने भरलेल्या दुकानातून केवळ ५० लाखांचा माल घेऊन पळणारी आमची गँग एवढी दरिद्री नाही!"
​कदम साहेब मनातल्या मनात हसले. सभ्य जगात जसे डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांसारखे व्यावसायिक स्वतःची आचारसंहिता (Ethics) पाळतात, तसेच गुन्हेगारी जगातही स्वतःचे काही नियम व अहंकार असतो, हे पाहून त्यांना नवल वाटले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून हा दरोडा नवख्या लोकांनीच केला असावा, यावर कदम साहेबांचे मत पक्के झाले होते; आणि बैजू दादानेही त्यावर 'पोराटोरांचे काम' म्हणून शिक्कामोर्तब केले होते. बैजू दादाकडून यापेक्षा जास्त माहिती मिळणार नाही हे समजून त्यांनी त्याला प्रभारी अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले आणि ते तिथून निघाले.
​कदम साहेबांनी आता ठरवले की, ज्या ठिकाणी दरोडा पडला त्या घटनास्थळाची पुन्हा एकदा बारकाईने पाहणी करावी. त्यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांसह 'अभ्यंकर अँड सन्स'च्या ज्वेलर्स दुकानात प्रवेश केला. दुकान आतून खूप मोठे होते आणि तिथे कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी व हिऱ्यांचे दागिने होते. दरोडेखोरांनी एवढ्या मोठ्या दुकानातून फक्त ५० लाखांचाच माल का नेला, याचे कदम साहेबांना आश्चर्य वाटले. बैजू दादाचे शब्द त्यांच्या मनात रूंजी घालत होते—"एवढ्या मोठ्या दुकानातून फक्त ५० लाखांचा माल पळवायला आम्ही काही दरिद्री नाही... हे पोराटोरांचे काम आहे!" दुकानाच्या मॅनेजरने माहिती दिली की, त्यांच्याकडे अशी १० ते १५ कपाटे (शोकेस) आहेत आणि त्यात कोट्यवधींचा माल आहे; पण चोरट्यांनी केवळ एकाच कपाटातील माल चोरला. त्यामुळे नुकसान तसे कमी झाले होते, पण 'काळ सोकावू नये' म्हणून मालकांनी गुन्हा नोंदवण्यास सांगितले होते.
​कदम साहेबांनी विचारले, "दरोडेखोर नेमके कुठून आत घुसले?" मॅनेजरने मागच्या बाजूला बोट दाखवून सांगितले, "बाथरूममधील जाळी असलेल्या खिडकीचे ग्रील व काच तोडून ते आत शिरले." ती बाथरूमची खिडकी दुकानाच्या मागील बाजूस होती. कदम साहेबांनी आतून खिडकीची तपासणी केली. ती खिडकी एवढी लहान होती की, त्यातून केवळ एखादा सडपातळ माणूसच आत घुसू शकत होता. एखादा धट्ट्याकट्ट्या शरीराचा माणूस तिथून आत येणे निव्वळ अशक्य होते. 
​कदम साहेब लगेच दुकानाच्या बाहेर पडून मागच्या बाजूला गेले. त्या संपूर्ण इमारतीच्या पाठीमागे सुमारे हजार स्क्वेअर फुटांचे मैदान होते; परंतु तिथे प्रचंड अस्वच्छता आणि झाडीझुडपे वाढलेली होती. इमारतीतील लोक त्या जागेचा वापर दुचाकी पार्किंगसाठी करत होते. तिथे मधोमध आठ-दहा स्कूटर्स उभ्या होत्या आणि रात्रीच्या वेळी तिथे वॉचमनही नसायचा. कदम साहेबांनी अंदाज लावला की, याच बाजूने बाथरूमची खिडकी तोडून दरोडेखोर आत शिरले असावेत. कदम साहेब आपल्या पथकासह आजूबाजूच्या झाडीत काही संशयास्पद पुरावे मिळतात का, हे शोधत होते. तेवढ्यात एका सहकाऱ्याने हाक मारली, "साहेब, दरोडेखोराने वापरलेला बुरखा सापडला आहे!" सर्वांनी जवळ जाऊन पाहिले, तर तो बुरखा म्हणजे धान्य भरण्यासाठी वापरले जाणारे चक्क एक प्लास्टिकचे गोणपाट (पोते) होते. पोत्याच्या बंद असलेल्या भागावर दोन डोळ्यांच्या जागी दोन छिद्रे पाडली होती आणि दोन्ही बाजूंना हात बाहेर काढण्यासाठी भोके पाडून त्याचा वापर बुरख्यासारखा केला गेला होता. कदम साहेबांना दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आठवले, ज्यामध्ये एक सडपातळ माणूस याच गोणपाटाचा बुरखा घालून चोरी करत होता. ते स्वतःशीच हसत पुटपुटले, "असा बुरखा वापरणे म्हणजे बैजू दादा सांगत होता तेच खरे आहे... हे नक्कीच पोराटोरांचे काम आहे!"
​इतक्यात त्यांना पोलिसांच्या श्वानपथकाच्या (Dog Squad) अहवालाची आठवण झाली. आपण अद्याप इन्स्पेक्टर शिंदेंना याबद्दल विचारले नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने शिंदे साहेबांना फोन लावला आणि विचारले, "गुन्ह्याच्या दिवशी श्वानपथकाने शोध घेतला होता का? त्यांचा अहवाल काय सांगतो?" तेव्हा शिंदे साहेबांनी सांगितले, "श्वानपथकाचा कुत्रा आधी इमारतीमागच्या मैदानात गेला. तिथून तो तडक एक-दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या 'समाधान सोसायटी'च्या चौथ्या मजल्यापर्यंत गेला; पण तिथे घुटमळला आणि पुन्हा खाली आला. आमचा अंदाज आहे की, दरोडेखोरांनी आधी त्या इमारतीत चोरी करण्याचा प्रयत्न केला असावा, पण तिथे जमले नसल्याने ते परतले असावेत. आम्ही तिथल्या रहिवाशांना विचारले, पण कोणालाही कसलाच आवाज ऐकू आला नाही." शिंदे पुढे म्हणाले, "पण चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या 'प्रकाश' नावाच्या एका कॉलेज विद्यार्थ्याने सांगितले की, तो रात्री अभ्यास करत असताना १२ ते १ च्या सुमारास त्याने पाऊलवाज ऐकले. घाबरून त्याने आतूनच दबक्या आवाजात विचारले, 'कोण आहे?' त्यानंतर दोनच मिनिटांत तीन-चार लोक खाली उतरून जात असल्याचा आवाज त्याला आला. घाबरल्यामुळे तो लगेच झोपी गेला." यावर कदम साहेबांनी विचारले, "हा प्रकाश कसा आहे? सडपातळ की जाडजूड?" त्यावर शिंदे म्हणाले, "नाही हो, अगदी किरकोळ शरीराचा कॉलेजला जाणारा मुलगा आहे." कदम साहेब हसून म्हणाले, "उद्या आपल्याला या 'प्रकाश'ची भेट घ्यायची आहे. तुम्हीही माझ्यासोबत चला."
​दुसऱ्या दिवशी कदम साहेब आणि शिंदे साहेब थेट 'समाधान बिल्डिंग'मधील चौथ्या मजल्यावरील प्रकाशच्या फ्लॅटवर गेले. घर अत्यंत लहान होते. घरात पाऊल ठेवताच कदम साहेबांच्या लक्षात आले की, या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एका जुन्या लाकडी खुर्चीवर एक गृहस्थ बसले होते. शेजारच्या खोलीत एक महिला कॉटवर पडलेली होती, त्या सतत खोकत होत्या. बहुधा त्या प्रकाशच्या आजारी आई असाव्यात. इन्स्पेक्टर शिंदेंनी विचारले, "प्रकाश कुठे आहे?" वडिलांनी उत्तर दिले, "साहेब, येईलच आता. जवळच बाजारात गेला आहे." असे म्हणत त्यांनी दोन प्लास्टिकच्या खुर्च्यांकडे बोट दाखवून त्यांना बसण्याची विनंती केली. ते बोलू लागले, "मी प्रकाशचा वडील. आपण त्या दरोड्याच्या चौकशीसाठी आला असावा. प्रकाश सांगत होता की, त्या रात्री त्याने घराबाहेर पावलांचे आवाज ऐकले होते; पण आम्ही दोघे आतल्या खोलीत झोपलो असल्याने आम्हाला काहीच कळाले नाही." कदम साहेब मनात म्हणाले, 'कमाल आहे! संपूर्ण इमारतीत केवळ प्रकाशलाच तो आवाज ऐकू आला.' कदम साहेबांनी प्रकाशबद्दल कॉलेजमधून आधीच माहिती काढली होती. तो कॉलेजमधील अत्यंत हुशार पण गरीब विद्यार्थी होता; परंतु सहा महिन्यांपूर्वी फी भरण्यास पैसे नसल्याने त्याला कॉलेज सोडावे लागले होते.
​तेवढ्यात प्रकाश बाजारातून परतला. पोलिसांना घरात पाहून तो चांगलाच दचकला. तो प्रचंड घाबरल्याचे कदम साहेबांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही. त्यांना त्याची चौकशी करायची होती, पण घरात आई-वडिलांसमोर ते योग्य वाटले नाही. म्हणून त्यांनी त्याला संध्याकाळी ५ वाजता पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.
​प्रकाश वेळेवर ५ वाजता पोलीस ठाण्यात हजर झाला. शिंदे आणि कदम साहेबांनी त्याला एका बाजूच्या खोलीत नेले. कदम साहेबांनी विचारले, "तुला इथे का बोलावले आहे, हे समजले असेलच?" तो फक्त "होय" एवढेच म्हणाला. कदम साहेबांनी थेट त्याच्यासमोर दुकानाबाहेरील झाडीत सापडलेला गोणपाटाचा बुरखा ठेवला. तो बुरखा पाहताच प्रकाश पूर्णपणे हादरला. आपण पकडले गेलो आहोत याची जाणीव होऊन त्याला रडू कोसळले. कदम साहेबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने म्हटले, "बाळा, जे काही खरे आहे ते सांगून टाक. कायद्याचे हात खूप लांब असतात, कोणीही त्यातून सुटू शकत नाही. संपूर्ण समाधान बिल्डिंगमध्ये केवळ तुलाच चोरांच्या पावलांचे आवाज ऐकू आले, तेव्हाच माझा तुझ्यावर संशय बळकट झाला होता."
​प्रकाशने डोळे पुसले आणि शांत होत म्हणाला, "साहेब, मी सर्व सांगतो. मी कॉलेजमधील अत्यंत हुशार विद्यार्थी होतो. मी अभियंता (Engineer) होण्याचे स्वप्न पाहिले होते; पण गरिबीने मला गुन्हेगार बनवले. बाबा काम करत असलेल्या कंपनीच्या मशीनमध्ये त्यांच्या हाताची बोटे कापली गेल्याने त्यांची नोकरी सुटली. नोकरीत असताना त्यांनी घर घेण्यासाठी बँकेचे कर्ज काढले होते, जे अजून अर्धेही फिटले नव्हते. त्यातच आईला कॅन्सर असल्याचे निदान झाले. घरात येणारा पैशांचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. बँकेचे कर्ज, आईचे उपचार आणि माझी फी... हा सर्व खर्च कसा भागवणार? मी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला; पण एवढा मोठा आर्थिक भार पेलणे किरकोळ नोकरीतून शक्य नव्हते. बँकेचे लोक हप्त्यांसाठी सतत तगादा लावत होते. शेवटी आम्ही आईचे दागिने गहाण ठेवण्याचे ठरवले; पण थकीत कर्जामुळे बँक मदत करेल की नाही, याची खात्री नव्हती. म्हणून आम्ही दागिने विकण्याचा विचार केला. त्यासाठी आम्ही दोन-तीन वेळा अभ्यंकर अँड सन्सच्या दुकानात गेलो. तिथे दागिन्यांनी भरलेली ती कपाटे पाहून माझ्या मनात विचार आला की, आईच्या दागिन्यांचे एवढे किती पैसे मिळणार? आणि ते तरी किती दिवस पुरणार? या तरुण वयात मी आई-वडिलांना मदत करू शकत नाही, याचे मला अतीव दुःख होत होते. सुरुवातीला माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले; पण माझ्या जाण्याने ते कायमचे उध्वस्त झाले असते, कारण मीच त्यांचा एकमेव आधार होतो. मग माझ्या डोक्यात विचार आला की, मी माझ्या बुद्धीचा वापर करून तिथल्या एखाद्या शोकेसमधील दागिने चोरले, तर आमच्या सर्व अडचणी दूर होतील. तिथेच माझ्या मनात चोरीचे बीज रोवले गेले. मी दुकानाचा अभ्यास केला आणि योजना आखली. मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी असल्याने दुकानातील सायरन आणि सीसीटीव्ही सिस्टीम निकामी केली. सायरन तर मी बॉक्समधूनच बंद केला होता. सीसीटीव्ही टाळण्यासाठी मी तो गोणपाटाचा बुरखा बनवला. बाथरूमच्या खिडकीतून आत शिरून मी चोरी केली. साहेब, आता तुम्हाला समजले असेलच की तुमचे ट्रॅकर डॉग समाधान बिल्डिंगमध्ये माझ्या घरापर्यंत का आले होते. मी शिंदे साहेबांना जी पावलांच्या आवाजाची गोष्ट सांगितली होती, ती खोटी होती."
​कदम साहेबांनी त्याला विचारले, "पण तो चोरलेला माल कुठे आहे?" प्रकाश म्हणाला, "तो अजूनही घरी सुरक्षित आहे. साहेब, मला जेवढी गरज होती, तेवढ्याच दागिन्यांवर मी हात मारला; पण कृत्य केल्यानंतर मला जाणीव झाली की मी खूप मोठा गुन्हा केला आहे. कौटुंबिक संकटामुळे गोंधळून गेल्याने माझ्याकडून हे पाऊल उचलले गेले. मी ते सर्व दागिने सुरक्षित ठेवले आहेत आणि ते मला अभ्यंकर सरांना परत करायचे आहेत. ते आमच्या कॉलेजचे मुख्य ट्रस्टी आहेत. मी कॉलेजमध्ये असताना त्यांच्या हस्ते अनेकदा पारितोषिके घेतली आहेत. ते मला एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखतात. ते नक्कीच मला माफ करतील. माझी आपल्याला विनंती आहे की, माझ्यावर कारवाई करण्यापूर्वी मला माझी चूक कबूल करून त्यांचे दागिने त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची आणि माफी मागण्याची एक संधी द्यावी. त्यांनी जर मला माफ केले नाही, तर आपण हवी ती कारवाई करा."
​प्रकाशचे हे आत्मकथन आणि त्याच्या कुटुंबाची बिकट परिस्थिती ऐकून दोन्ही पोलीस अधिकारी भावुक झाले. शिंदे साहेब त्याला म्हणाले, "ठीक आहे, उद्या आम्ही तुझ्या घरी येतो. तू चोरलेला माल एका बॅगेत भरून तयार ठेव. आपण स्वतः अभ्यंकर साहेबांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेऊ. ते माझ्या परिचयाचे आहेत, मी त्यांची वेळ घेतो. तू त्यांना सर्व परिस्थिती मनमोकळेपणाने सांग. त्यांनी जर तक्रार (FIR) मागे घेतली, तर आम्ही ही केस बंद करू; अन्यथा आम्हाला कायद्यानुसार माल जप्त करून तुझ्यावर कारवाई करावी लागेल."
​त्यानुसार दुसऱ्या दिवशी शिंदे आणि कदम साहेब प्रकाशच्या घरी गेले. चोरलेला सर्व माल एका बॅगेत भरून ते प्रकाशला घेऊन अभ्यंकर सरांच्या कार्यालयात पोहोचले. प्रकाशला बाहेर थांबवून दोघांनी केबिनमध्ये जाऊन अभ्यंकर सरांना सर्व प्रकार थोडक्यात सांगितला. अभ्यंकर सरांनी प्रकाशला आत बोलावले. आत येताच प्रकाशला रडू कोसळले. त्याने हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि आपली सर्व कौटुंबिक परिस्थिती सांगून माफी मागितली. तो म्हणाला, "सर, मला माफ करा. मी खूप गोंधळून गेलो होतो. गरिबीमुळे माझ्याकडून हे चुकीचे पाऊल उचलले गेले, म्हणूनच मी कॉलेजही सोडले होते. मी चोरलेले सर्व दागिने जसेच्या तसे परत आणले आहेत. मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप होत आहे, आपण देणार ती शिक्षा मला मान्य आहे."
​अभ्यंकर सरांनी दोन्ही इन्स्पेक्टर्सकडे पाहिले आणि म्हणाले, "हा आमच्या कॉलेजमधील सर्वात हुशार मुलगा आहे, मी याला ओळखतो; पण याने कॉलेज का सोडले हे मला माहित नव्हते."
​त्यांनी प्रकाशकडे पाहत गालातल्या गालात हसून म्हटले, "चूक करणाऱ्यापेक्षा ती प्रामाणिकपणे कबूल करणारा अधिक हिंमतवान असतो. प्रकाश, मी तुला माफ केले आहे. मी आजच आपल्या कॉलेज ट्रस्टला सांगून तुझी पदवी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शिष्यवृत्ती मंजूर करतो. तुला एकही रुपया फी भरण्याची गरज नाही. उद्यापासूनच कॉलेजला जाणे सुरू कर." त्यांनी विचारले, "तुझ्या वडिलांचे बँकेचे कर्ज किती बाकी आहे?" प्रकाशने सांगितले, "सुमारे ७-८ लाख रुपये असेल." त्यावर अभ्यंकर सर म्हणाले, "ते कर्ज मी फेडून टाकतो. असे समजतो की, चोरीला गेलेल्या दागिन्यांची पूर्ण वसुली झालीच नाही. आमच्या ज्वेलर्सच्या पाच शाखा आहेत, अशा चोऱ्या-दरोडे आणि फसवणुकीचे प्रकार व्यवसायात होतच असतात. बऱ्याचदा पोलीस गुन्हेगाराला पकडतात, पण माल परत मिळत नाही. इथे तर तू स्वतःहून सर्व माल परत केला आहेस."
​ते पुढे म्हणाले, "मी तुझ्या वडिलांना आमच्या ट्रस्टच्या एका शाळेत शिपाई म्हणून नोकरी देतो, जेणेकरून तुमच्या घराचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालेल. तसेच, मी लायन्स क्लबचा सदस्य असल्याने आमच्या क्लबच्या हॉस्पिटलमध्ये तुझ्या आईच्या कॅन्सरवर मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात उपचार करण्याची व्यवस्था मी करतो." त्यानंतर अभ्यंकर सर दोन्ही अधिकाऱ्यांकडे वळले आणि म्हणाले, "मी माझी तक्रार (FIR) मागे घेत आहे. गरज पडल्यास मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोलेन, ते माझे मित्रच आहेत. या मुलाला जर अटक झाली आणि बातमी पसरली, तर त्याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होईल. ह्याने आपली चूक मान्य केली आहे. तुम्ही आणलेला हा माल माझ्या मॅनेजरकडे सुपूर्द करा, मी त्याला फोन करून सांगतो."
​प्रकाशने डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आणून अभ्यंकर सरांच्या चरणांना स्पर्श केला. तिघांनीही सरांचे आभार मानून त्यांचा निरोप घेतला.

​लेखक: पी.बी.बुगदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...