शनिवार, २५ जुलै, २०२६

3080. "जीव वाचवण्याचे प्रयत्न करू नका" म्हणणारे आमचे सर

 "डॉक्टर, कोड ब्लू ! कार्डियाक अरेस्ट!" नर्स जोरात ओरडली. हार्ट मॉनिटर वर सरळ रेष दिसत होती.
त्या दुपारी casualty  मध्ये आठही बेडवर सिरीयस पेशंट्स होते, खूप धावपळ चालू होती. 
"बाहेर व्हा सगळे! ताबडतोब" माझ्या सोबतचा इंटर्न डॉक्टर ओरडला. आम्ही दोघे पळतच त्या रुग्णापर्यंत पोचलो. सिस्टरांनी त्याच्या छातीवर मसाज सुरु केलाच होता, मी त्या रुग्णाच्या घशात श्वासासाठीची नळी घालण्याकरिता पोझिशन दिली. माझ्यासोबतच्या डॉ. अजयने सिस्टरांना इमर्जन्सी औषधे भरायला सांगितली, आणि रुग्णाच्या  छातीवर तो "कार्डियाक मसाज" करू लागला. एक एक क्षण मोलाचा होता आता. 
जवळच्या एका झोपडपट्टीतील तो पन्नाशीचा रुग्ण म्हणजे एका सराईत गुंडांचे वडील होते. दारू, तंबाखूने दशकानुदशके पोखरलेले त्यांचे शरीर आधीच जर्जर, त्यात त्यांनी काल खूप दारू पिलेली. त्या दिवशी सकाळीच त्यांना एक फिट आली आणि ते बेशुद्ध झाले होते. अनेक तास उशीर झाल्यावर त्यांना दवाखान्यात आणलं होतं, त्यांची शुगर कमी झाली होती, आम्ही त्यांना सलाईन सुरु केलं होतं. इतर तपासण्या चालू असतानाच हे घडलं होतं. 
जामिनावर बाहेर आलेला पेशंटचा तो गुंड  मुलगा, त्याचे मित्र आणि पाच-सहा नातेवाईक तिथेच थांबले होते. नगरसेवकांची त्यांच्यावर कृपा असल्याने त्यांना कोणी काही म्हणू शकत नव्हतं.  बोलण्यासाठीही आता वेळ नव्हता. आमचे सिनियर मेडिकल ऑफिसर डॉ. हजारे शांतपणे आमच्या शेजारी उभे राहून आम्हाला ऑर्डर्स देत होते, तसेच त्या पेशंटच्या नातेवाईकांना बाहेर जाण्याची सूचना करत होते. ते नातेवाईक तिथेच थांबून राहिले. 
पेशंटचे हृदय बंद पडल्यावर देण्यात येणारा हा इमर्जन्सी "कार्डियाक मसाज" दिसायला फार क्रूर आणि भयंकर दिसतो. छातीवर जोरजोरात दोन्ही हातांनी दाब द्यावा लागतो- हा दाब हृदयापर्यंत पोचण्याकरिता छाती कमीतकमी दोन-अडीच इंच दाबली जाणे आवश्यक असते, तसेच अतिशय भरभर, म्हणजे एका मिनिटात शंभर वेळा असे दाब दिले, तरच हृदय परत सुरु होण्याची शक्यता असते. यापेक्षा हळू, कमी दाब देऊन काहीच उपयोग नसतो. असा दाब देताना फासळ्या तुटू शकतात, पण हृदय सुरु करायचे असेल तर ही रिस्क घ्यावीच लागते. 
"इतना जोर मत लगाव ना डॉक्टर, हड्डी तुटेगी  ना उनकी.. दर्द होरा रहिंगा ना उनको" त्या पेशंटचा मुलगा ओरडत होता.
"आप जरा प्लीज बाहेर रुको" डॉ. हजारे त्यांना सांगत होते, पण ते तिथेच थांबले. 
"स्टॉप द सी. पी. आर. (हे प्रयत्न थांबवा)" डॉ. हजारे आम्हाला उद्देशून म्हणाले. 
अजय आणि मी दोघेही चकित झालो. सीपीआर थांबवा? कसं शक्य आहे?
आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवले. डॉ. हजारे तिथून निघून गेले.
शेवटचा उपाय म्हणून अजयने सरळ त्या रुग्णाच्या छातीतून हृदयाच्या आतपर्यंत सुई खुपसली, आणि ऍड्रेनॅलीन चा एक डोस दिला.
दोन-अडीच मिनिटे बंद पडलेलं ते हृदय परत धडधडू लागलं. पेशंटला आम्ही ताबडतोब आयसीयू मध्ये नेलं, तिथल्या डॉक्टरांना पेशंटचा ताबा देऊन आम्ही परत casualty  मध्ये आलो. आणखी एक जीव वाचवल्याचा अतोनात आनंद तर होताच, पण तो साजरा करायला वेळ कुणाला होता? पण मध्यरात्री चहाला जाताना मात्र अजय मस्त शिट्टी वाजवत होता " जीना इसीका नाम है..." 
चहा घेऊन आम्ही परत आलो, तेव्हा डॉ. हजारेंनी आम्हाला बोलावलं. त्यांना राग आलेला आम्हाला कळत होतं, पण ते शांतच होते आणि त्यांच्या चेहेऱ्यावर हसू देखील होतं. राग कसा "हॅन्डल" करायचा हे कळालेल्या मोजक्या संतांपैकी ते असावेत. 
"हे बघा, आपण भारतामध्ये आहोत. आपला समाज अत्यंत अशिक्षित, मागासलेला, अंधश्रद्ध आहे. एवढंच नाही, तर लोक बरेचदा नुसत्या शंकेच्या बळावर हिंसक हल्ले करतात, त्यांना जाब विचारणारं कोणी नाही. नाटकी रडारड, आरडाओरड हे आपल्या समाजाला, मीडियाला आवडणारे विषय आहेत. दवाखान्यात काहीही वाईट झालं की डॉक्टरला सरळ दोषी गृहीत धरून  मारहाण करणे हा  आपल्या निर्बुद्ध जमावांचा हक्क समजला जातो, त्याला समाजाचीच नाही, तर मीडियाची आणि  काही प्रमाणात कोर्टाचीही सहानुभूती मिळते. तुम्ही दोघांनी तुमचा जीव धोक्यात घातला. त्या पेशंटचं हृदय परत सुरु झालं नसतं तर? त्या नातेवाईकांनी तुम्हाला इजा केली, मारहाण केली,  तर तुमच्या पालकांना कसे वाटेल?"
"पण सर, आम्ही त्या पेशंटला वाचवायचा जीवापाड प्रयत्न करत होतो हे तर त्या नातेवाईकांना दिसतच होतं ना? त्यांना कळेलच ना आम्ही त्यांच्या रुग्णाच्या भल्याकरिताच हे करत होतो?" मी म्हणालो.
"असं तुम्हाला वाटतं. त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांना यातलं काहीही कळत नाही. आणि वर  ते अत्यंत अशिक्षित, हिंसक, उद्दाम आहेत. चांगलं काही झालं तर ते ठीक, पण वाईट झालं तर डॉक्टरांवर हल्ला करतात लोक. स्वतःचा जीव जपणे हेही तुमचं कर्तव्यच आहे. अशा पेशंटसाठी तुम्ही जीव गमावलात, तर पुढे हजारो रुग्णांचा जीव वाचवू शकाल का तुम्ही? डॉक्टरांनी कितीही चांगलं केलं तरी अख्ख्या डॉक्टर समाजाला दोष देण्यातच, आपल्या  चुका काढण्यातच आपल्या समाजाला धन्यता वाटते. याच डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे रोज हजारो रुग्ण वाचतात, ते कोणीही बघत नाही."
डॉ. हजारेंचं म्हणणं आम्हाला काही अंशी पटलं नव्हतं, पण ते अतिशय बुद्धिमान आणि सुस्वभावी होते, आम्हाला खूप मदत करत, म्हणून आम्ही वाद ना घालता " ओके सर, सॉरी" असं म्हणून वेळ मारून नेली. 
त्या रात्री casualty खूप बिझी  होती, पण माझ्या मनात घालमेल होत राहिली: एक सिनियर डॉक्टर पेशंटचा सीपीआर चालू असताना "जीव वाचवण्याचे प्रयत्न करू नका" असं कसं म्हणू शकतात?. 
सकाळी पाच वाजता डॉ. अजय त्याच्या रूमवर गेला, आणि मला relieve  करायला सात वाजता परतला. मी स्कूटर दामटत घरी जाऊन अंघोळ, नाश्ता करून नऊ वाजता दवाखान्यात परतलो.
Casualty अस्ताव्यस्त झाली होती, औषधे, सिरिंज, आयव्ही स्टँड्स सगळे इकडे तिकडे विखुरलेले. रक्ताचे डाग भिंतीवर, जमिनीवर दिसत होते. डॉक्टर लोक, दवाखान्याचा स्टाफ  आतबाहेर पळापळ करत होते. सगळे बेड्स् रिकामे होते, सगळ्यांवर काही ना काही सांडलेले, चादरी फाडलेल्या.
फक्त एकाच पलंगावर पेशंट होता: डॉ. अजय. रक्तबंबाळ झालेला होता तो. डोक्याला बांधलेली शुभ्र पांढरी बँडेजेस रक्तानं भिजून लाल भडक झालेली होती. सगळ्या शरीरावर चाकू-सुरीच्या जखमा तर होत्याच, पण हाताचं हाड देखील मोडलं होतं. बेशुद्ध अजयला कृत्रिम श्वास चालू केलेला होता. 
सुन्न होऊन मी तिथेच उभा राहिलो. काय बोलावं कळेना. इतक्या शांत, गुणी, सालस मुलाला आयुष्यात कुणी इजा करेल यावर विश्वास बसला नसता, पण सत्य डोळ्यासमोर होतं.
डॉ. अनिरुद्ध माझ्या खांद्यावर हात ठेवून रडत रडत बोलायला लागला, तेव्हा मी भानावर आलो. "त्या कालच्या काकांना याने कार्डियाक मसाज देऊन वाचवलं होतं ना, त्यांना आज सकाळी परत आयसीयूत हार्ट अटॅक आला आणि ते गेले.  त्या कालच्या मसाजमुळेच पेशंटला परत हार्ट अटॅक आला असं म्हणत त्यांचे सगळे नातेवाईक खाली आले आणि त्यातल्या  तिघा-चौघांनी अजय वर चाकू, लोखंडी सळ्यांनी हल्ला केला. त्याचं डोकं भिंतीवर आपटलं, त्याच्या हातापायावर नाचले ते! आपले हजारे सर अजयला वाचवायला गेले, तर त्यांनाही त्या जमावानं मारहाण केली. तेही आयसीयूत आहेत आत्ता. अजयचं बीपी थोडं वर आलं की त्याला पण ऑपरेशन थिएटर मध्ये घेणार आहेत. आम्ही तुझीच वाट पाहत होतो.. अजयच्या आईवडिलांचा काही फोन कॉन्टॅक्ट आहे का तुझ्याकडे?"
मी बॅगमधून डायरी काढली, आणि अजयच्या वडिलांना कलकत्त्याला फोन लावला. अजयला लोकांनी मारहाण केली यावर त्यांचा विश्वासच बसेना.
"का? कशामुळे? कसा आहे तो? शुद्धीत आहे का? आम्ही लगेच निघतोय. त्याच्या जवळच थांबा तुम्ही”.... त्याच्या वडिलांना जणू धापच लागली. काय सांगणार होतो मी त्यांना? ज्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी अजयने जीवापाड प्रयत्न केले त्या कृतघ्न नराधमांनीच अजयवर असा जीवघेणा हल्ला केला यावर त्यांचा कसा विश्वास बसला असता? डॉ. हजारे सरांचे शब्द माझ्या डोक्यात घुमत राहिले: "आपण भारतात आहोत!".
डॉ. अजय काही दिवसांनी पूर्ण बरा होऊन लंडनला गेला. आता तो तिकडेच असतो. त्याचे आई- वडील परवा चेक-अप साठी माझ्याकडे आले होते. निघताना काकांनी माझ्या डोक्यावर मायेचा हात फिरवला. भरभरून आशीर्वाद दिले. शेवटी म्हणाले, "बाळा, यापुढेही खूप लोकांचे प्राण वाचव,  पण स्वतःचाही जीव सांभाळ. त्या घटनेपासून मला आजतागायत नीट झोप लागत नाही".
त्या रात्री नेहमीसारखा गर्द निळ्याशार आकाशाकडे बघत मी एकटाच कॉफी पीत बसलो होतो, तेव्हा अशा अनेक घटना आठवल्या. भारतातल्या डॉक्टरांच्या नशिबी सुखाची झोप नाही, हे एक विदारक सत्य आहे. पेशंट वाचला तर एक शब्द चांगला ऐकायला मिळत नाही, पण एखादी गोष्ट बिघडली, तर चूक असो-नसो, डॉक्टरांच्या जीवावरच उठणारे जमाव, आणि त्यांना सहानुभूती दाखविणारा समाज, मीडिया, राजकीय नेते आणि कायदा हे सध्या भारतातील वैद्यक- व्यावसायिकांचं एक न संपणारं दुःस्वप्न आहे. एखाद्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालायचा असंच समीकरण झालं आहे. सर्वात दुःखदायक गोष्ट ही, की या अशा घटना जगभरात फक्त माझ्या मायभूमीत, भारतातच होतात आणि सहन केल्या जातात.  
गरीब-श्रीमंत, जात-पात असा कुठलाही भेदभाव न करता रोज लाखो लोकांचे जीव वाचवणारे हजारो डॉक्टर भारतात कुणालाच दिसत नाहीत का? 

डॉ. राजस देशपांडे
न्यूरॉलॉजिस्ट पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...