तीन वर्षांपूर्वींची गोष्ट. जून महिन्यातली ती एक प्रसन्न सकाळ होती. मी नेहमीसारखी कन्नड वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्याच दिवशी ‘एसएससी’चा निकाल जाहीर झाला होता. आतल्या पानांवर उत्तीर्ण झालेल्यांची यादी छापली होती, तर वरच्या पानावर गुणवत्ता यादीत छापलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो झळकत होते. जवळजवळ अख्खं पानच त्यानं व्यापलं होतं. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांबद्दल मला नेहमीच अपार कौतुक वाटत आलंय. गुणवत्ता यादीत नाव येणं, हे केवळ माणसाच्या बुद्धिमत्तेचंच निदर्शक आहे, असं नाही; तर विद्यार्थ्यांनं हे यश मिळवण्यामागे त्याची किती अपार मेहनत आहे, किती दृढनिश्चय आणि प्रयत्नशीलता आहे, हेही दिसून येतं. मी स्वतः एका प्राध्यापकांच्या घरात वाढलेली आहे. माझी ही पार्श्वभूमी आणि माझा स्वतःचा अध्यापन क्षेत्रातला अनुभव, या दोहोंमुळं माझी ही मनोभूमिका झालेली आहे. त्या दिवशी वर्तमानपत्रात आलेल्या त्या सगळ्या फोटोंमधून एका मुलाच्या फोटोनं माझं लक्ष वेधून घेतलं. माझी नजर त्यावरून हटेना. तो तसा अशक्त, नाजूक दिसत होता. पण त्याच्या डोळ्यांत जी काही चमक होती ती मंत्रमुग्ध करणारी होती.
त्या मुलाविषयी आणखी जाणून घ्यायची इच्छा मला झाली. त्याचं नाव होतं– हनुमंतप्पा. त्याचा गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक आला होता. त्याच्याविषयी एवढंच काय ते मला कळलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दुसऱ्याच दिवशी परत एकदा त्याचा फोटो झळकला. या खेपेला त्याची मुलाखतही छापलेली होती. मी उत्सुकतेनं ती वाचली. तो एका हमालाचा मुलगा होता आणि एका खेड्यात राहत होता. त्याच्या वडिलांची मिळकत दिवसाला फक्त चाळीस रुपये होती; त्यामुळंच त्याला पुढं शिकणं शक्य नव्हतं, असं त्यानं मुलाखतीत म्हटलं होतं. हनुमंतप्पा पाच मुलांमधला सर्वात मोठा. घरात मिळवते फक्त वडील. ते लोक आदिवासी जमातीचे होते. ह्या इतक्या हुशार मुलाविषयी हे ऐकून मला वाईट वाटलं. आपल्यातले बरेच जण, आपापल्या मुलांना खाजगी शिकवण्यांना नाहीतर क्लासला पाठवतो. त्यांना संदर्भ ग्रंथ, गाईड्स वगैरे आणून देतो. त्यांना चांगल्या चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी झटतो. खर्चाचा जरा सुद्धा विचार करत नाही. पण रामपुरा गावात राहणाऱ्या हनुमंतप्पाची गोष्टच वेगळी होती. माणसाला लागणाऱ्या काही जीवनावश्यक गोष्टी देखील त्याच्या वाट्याला आल्या नव्हत्या आणि तरी त्यांनं एवढं उज्ज्वल यश मिळवलं होतं. हातात वर्तमानपत्र तसंच धरून मी त्याचाच विचार करत बसले होते, तेवढ्यात माझी नजर शेजाऱ्यांच्या अंगणातल्या आंब्याच्या झाडावर पडली.
ते झाड ताजतवानं दिसत होतं. नुकती उमललेली पालवी. त्यावर चमकणारे दवाचे थेंब. झाडावर लटकणाऱ्या कैऱ्या. लवकरच त्या पिकणार होत्या. झाडापलीकडे थोड्याशा अंतरावर एका कुंडीत एक लहानस रोपटं होतं. माझ्या मनात आलं, गेले कितीतरी दिवस एवढंच आहे. जरा सुद्धा वाढलेलं नाही ! ती सकाळची शांत वेळ होती. हवा गार आणि स्वच्छ होती. माझे विचार जणू मोकाट सुटले होते. एवढ्यात घरात प्रेशर कुकरची शिट्टी मोठ्यांदा वाजली आणि त्या शांततेचा भंग झाला. मी भानावर आले. अर्धा तास लोटला होता. वर्तमानपत्रातल्या त्या मुलाखतीत हनुमंतप्पाचा पत्ता दिलेला होता. आता मात्र जास्त वेळ न दवडता मी लगोलग एक पोस्ट कार्ड घेऊन त्याला एक पत्र लिहून टाकलं. मी दोनच ओळी लिहिल्या होत्या.
‘माझी तुला भेटायची इच्छा आहे. तू बंगलोरला येऊ शकशील का?’
एवढ्यात माझे वडील सकाळचा फेरफटका मारून घरी परतले. ते अत्यंत व्यवहारी विचारसरणीचे आहेत. त्यांनी माझं ते पत्र वाचलं आणि ते म्हणाले,
“इतक्या लांब यायचं तर भाडेखर्चाचे पैसे तरी कुठून आणणार तो? तो इथं यावा असं तुला वाटतंय ना? मग तू भाड्याचे पैसे त्याला पाठवून दे. शिवाय जरा बरे कपडे विकत घेण्यासाठी आणखीही थोडी रक्कम पाठव.”
मग मी पत्रात अशी पुष्टी जोडली– ‘मी तुला भाडेखर्च तसंच कपडे विकत घ्यायला पैसे पाठवेन.’
त्यानंतर चारच दिवसांनी त्याचं पत्र आलं. दोनच ओळींचं. पहिल्या ओळीत त्यानं माझ्या पत्राबद्दल आभार मानले होते व दुसऱ्या ओळीत बंगलोरला येऊन मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी तातडीनं त्याला पैसे पाठवले व माझ्या ऑफिसचा तपशीलवार पत्ताही कळवला. अखेर तो आमच्या ऑफिसात येऊन ठेपला.
तो एखाद्या बावरलेल्या वाट चुकलेल्या वासरासारखा दिसत होता. कदाचित ही त्याची बंगलोरला येण्याची पहिलीच खेप असावी. तो अत्यंत नम्र होता. त्यानं स्वच्छ शर्ट पॅन्ट घातली होती. केसांचा नीट विंचरून व्यवस्थित भांग पाडलेला होता. डोळ्यात तीच चमक आताही होतीच.
मी लगेच मुद्द्याचंच बोलले. “तू मिळवलेल्या शैक्षणिक यशामुळं आम्हाला फार आनंद झालाय. तुला पुढं काही शिकायची इच्छा आहे का? तुझ्या शिक्षणाचा खर्च आम्ही करायला तयार आहोत. तू तुला हवा तो अभ्यासक्रम निवड. अगदी कुठलाही !”
तो गप्पच राहिला. माझे एक वरिष्ठ सहकारी शेजारी उभे होते ते हसून मला म्हणाले,
“बिट्स आणि बाईटच्या (संगणकाच्या) वेगानं नको जाऊस अशी... तू जे काही सुचवतेयस, ते त्याच्या नीट पचनी पडू दे आणि त्यावर विचार करून आज संध्याकाळपर्यंत त्यानं आपल्याला सांगितलं तरी चालेल !”
अखेर हनुमंतप्पा जेव्हा घरी जायला निघाला, तेव्हा त्यानं हळू आवाजात पण ठामपणे सांगितलं.
“मॅडम, बेल्लारीच्या टीचर्स ट्रेनिंग कॉलेजला जाऊन पुढला अभ्यासक्रम करायचा माझा विचार आहे. आमच्या गावच्या सर्वात जवळचं कॉलेज तेच आहे.”
मी ते लगेच मान्य केलं. पण त्याच्या मनात खरोखर याहून वेगळा दुसरा कुठला अभ्यासक्रम आहे का, ते पाहण्यासाठी त्याच्याशी आणखी थोडा वेळ बोलले. त्यानं अगदी दुसरा कोणताही अभ्यासक्रम निवडला, तरी त्याची फी भरायला आम्ही तयार आहोत, ही गोष्ट त्याला पुरेशी स्पष्ट करून सांगितली. पण त्याचा निर्धार पक्का होता. आपल्याला पुढं काय करायचंय, हे त्याचं ठरलेलं होतं.
“मग मी तुला दर महिन्याला किती पैसे पाठवू? त्या कॉलेजला वसतीगृहाची सुविधा आहे का?” मी विचारलं.
त्यावर “सर्व माहिती कडून तपशीलवार कळवतो”, असं त्यानं सांगितलं.
दोन दिवसानंतर परत एकदा आपल्या वळणदार हस्ताक्षरात त्यानं कळवलं. त्याला महिन्याला साधारणपणे तीनशे रुपये लागणार होते. तिथं एक खोली भाड्यानं घेऊन, आपल्या आणखी एका मित्राच्या सोबतीनं राहण्याचा त्याचा बेत होता. एकूण खर्च कमी यावा म्हणून ते दोघं घरीच स्वयंपाक करणार होते. मी लगेच सहा महिन्यांच्या हिशोबाने अठराशे रुपये त्याला पाठवून दिले. माझा ड्राफ्ट पोहोचताच त्यानं ताबडतोब पत्रानं त्याची पोच दिली आणि आभारही मानले.
असेच दिवस गेले. एक दिवस अचानक आठवण झाली. हनुमंतप्पाला पुढच्या सहा महिन्याचे पैसे पाठवायचे होते. मी पुन्हा एकदा त्याला अठराशे रुपयाचा ड्राफ्ट पाठवून दिला. त्याचीही पोच देणारं पत्र उलट टपाली आलं. आश्चर्याची गोष्ट अशी की पत्रासोबत त्यानं पाकिटातून काही पैसेही पाठवले होते!
‘मॅडम,’ त्यानं लिहिलं होतं. ‘तुम्ही पुढच्या सहा महिन्यांचे पैसे मला पाठवून दिलेत, हा तुमचा चांगुलपणा. पण गेले दोन महिने मी बेल्लारीत नव्हतो. आधी महिनाभर आमच्या कॉलेजला सुट्टी होती आणि नंतरचा महिनाभर संप होता. तेव्हा हे दोनही महिने मी घरीच होतो. या काळात माझा खर्च तीनशे रुपयांहून कितीतरी कमी झाला. त्यामुळे मी माझ्या खर्चातून वाचलेले तीनशे रुपये तुम्हाला परत पाठवत आहे. त्याचा कृपया स्वीकार करावा.’
मी थक्क झाले ! इतकी गरीबी आणि तरी एवढा प्रामाणिकपणा?
मी हनुमंतप्पाला खर्चासाठी जे पैसे पाठवत होते, त्याचा हिशोब त्यानं मला द्यावा अशी अपेक्षा माझी मुळीच नव्हती. आणि हे त्यालाही ठाऊक होतं आणि तरीही त्यानं उरलेली रक्कम परत पाठवून दिली. विश्वास बसणार नाही पण हे खरंय !
एक गोष्ट मात्र मी अनुभवातून शिकलेय. सचोटी, प्रामाणिकपणा ही काही कुण्या एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नव्हे. त्याचा शिक्षणाशी किंवा श्रीमंतीशीही संबंध नाही. ती कोणत्याही विद्यापीठात शिकवली जात नाही. अनेक माणसाच्या ठायी ती हृदयातून फुलून आलेली असते. या साध्यासुध्या खेडवळ मुलाच्या प्रामाणिकपणावर कशी आणि काय प्रतिक्रिया द्यावी, तेच मला समजेना. ईश्वरानं या हनुमंतप्पावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर आपलं कृपाछत्र नेहमीच ठेवावं, अशी मी मनोमन प्रार्थना केली.
- सुधा मूर्ती
- (अनुवाद : लीना सोहोनी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा