पाच वर्षांची आनिका आरशात बघत होती. वर्गातील अनेक मुलांचा एक तरी दात पडला आहे अन् आपले मात्र सारे दात अजूनी भक्कम आहेत याचा तिला राग आला होता.
नुकतीच भारतातून तिची आजी आली होती. नातीचं व आजीचं मेतकूट नेहमीच छान जमायचं! आजीची मऊ साडी, तिच्या कानातील लाल खड्याचं चमचमणारं कानातलं आनिकाला फार आवडायचं!
“आजी, हा दात कधी पडेल ग? टूथ फेअरी नक्की येईल ना?”
आजी गोंधळली.. तिनं टूथ फेअरी गुगल केलं. हा काय बाई नवा प्रकार.. पुटपुटत!
मग आजीच्या ज्ञानात भर पडली ! अमेरिकेत पहिला दात पडला की टूथ फेअरी घरी येते. मुलं झोपलं की ती उशीखाली एखादी छानशी भेट ठेवून जाते.
अनिका आजीजवळ येऊन बसली.”आजी, केटीला टूथ फेअरीनं २५ डॅालर दिले. ॲंड्रयु ला टेनिस रॅकेट दिली. निशा गॅाट ए रिंग.. आणि जेनीला पाच डॅालर्स!” आजी शांतपणे ऐकून घेत होती..
चार दिवसांनी आनिकाला खालचा एक दात हलतोय असं वाटलं..ममा, माझा दात हलतोय” ती इतक्या जोरात ओरडली की ममा धावत आली.
“आनि, दाताच्या मागं लागून हलवत बसू नको. पडायचे तेव्हा पडतील.” आईनं एक घाव दोन तुकडे केले.
आनिका एवढासा चेहरा करून गप्प बसली. कधी पडेल हा दात? टूथ फेअरी येईल का? मला आवडणारा चमचमणाऱ्या लाल खड्यांचा नेकलेस घेऊन येईल का?
बाबा घरी येताच आनि त्यांना हलणारा दात दाखवू लागली.
“अरे वा! ग्रेट आनि!” बाबा कपडे बदलायला गेले.
आजी व अनिका फिरायला गेल्या होत्या..
“आनि, टूथ फेअरीनं तुला काय आणावं असं वाटतयं?”
“लाल खड्यांचा नेकलेस!” आनिकाच्या चेहऱ्यावर त्या कल्पनेनेच केवढा आनंद दिसत होता..
“तिला काही कारणांमुळे तो नेकलेस मिळाला नाही तर?किंवा तिनं फक्त पैसे दिले तर?” आजी अंदाज घेत होती.
“अंऽऽऽ इटस् ओके, आय गेस!” अनिकानं मनाची तयारी केली.
“आनि बाळा, आपण एखादी गोष्ट हवीच म्हणून बसलो ना आणि ती मिळाली नाही की खूप वाईट वाटतं. मी पण लहान असताना मला छूमछूम आवाज करणारे पैंजण हवे होते माझ्या वाढदिवसाला..पण मिळाल्या काचेच्या बांगड्या! मला खूप वाईट वाटलं होतं..आईनं सांगितलं की बाबांजवळ आत्ता पैंजण घेण्याएवढे पैसे नाहीत. मी खूप रडले..पण त्यापुढील वाढदिवसाला आईनं मला चांदीचे पैंजण घेतले बरका..पण त्यानंतर तिचं सोन्याचं कानातलं मलातरी कधी दिसलं नाही!”आजीनं अपेक्षाभंग कसा टाळायचा हे थोडक्यात सांगितलं..
“अग आजी, टूथ फेअरीकडे जगातल्या प्रत्येक मुलासाठी पैसे असतात..माहित्यै?”आनिकाचा निरागस चेहरा बघून आजी गप्प बसली..
मधे काही दिवस गेले आणि एक दिवस जेवताना आनिकाचा दात पडला.. रक्त येत होतं. आईनं तिला घाईनं बाथरूम मध्ये नेलं. चुळा भरल्या. आनिकानं आरशात बघितलं.. खालच्या दाताच्या ओळीत ती मोकळी जागा विचित्र दिसत होती..”आऽऽऽऽ शी!! कसलं दिसतय हे! कधी येईल नवा दात?” तिनं आईकडे बघितलं. दात पडल्यावर केवढा आनंद होईल असं वाटलं होतं पण तसं काहीच झालं नाही..
त्या दिवशी झोपण्यापूर्वी आजी तिला जवळ घेऊन गोष्ट सांगत होती. “आनि, बदल ॲक्सेप्ट करणं लहान मुलांनाच काय पण मोठ्यांनाही अवघड जातं. आत्ता कसलं दिसतय हे दात नसलेले भोक असं वाटलं तरी बघ चार दिवसात तुला त्याची एवढी सवय होईल की ते दिसणार सुद्धा नाही!”आनिकानं होकारार्थी मान हलवली.
“आजी, काल काय झालं स्कूल मध्ये माहित्यै? रीना लॅास्ट हर टूथ. आणि टूथ फेअरी गेव हर नथिंग. खूप सॅड झाली होती रीना.. मग मिस ब्राऊन सेड - रीना तू व तुझे आई बाबा दोनच महिन्यांपूर्वी इंडियाहून अमेरिकेत आलात ना.. ते टूथ फेअरीला कुणी कळवलेलं नाही! म्हणून तिनं तुला भेट नाही दिली.. सो वी मेड ए नेकलेस फॅार हर.. मिस ब्राऊननं मोती, दोरा वगैरे सगळं दिलं. टूथ फेअरी मला जर विसरली तरी मी म्हणेन ,”इट हॅपन्स! एवढ्या मुलांना भेट द्यायची आहे! मला विसरली वाटतं”आनिकाच्या डोळ्यातील समंजसपणा बघून आजीचे डोळे भरून आले..
“सूनबाई, लाल खड्यांचा नेकलेस आणला आहेस ना!” आनिका झोपाताच आजीनं विचारलं!
सूनबाई गडबडली.
“ओ माय गॅाड! अशी कशी विसरले मी? आता रात्र झाली आहे. दुकानं बंद झालीत. आता फक्त पैसे ठेऊ तिच्या उशीखाली.” लेक बायकोवर खेकसला,” हाऊ डिड यु फरगेट? मला तरी सांगायचं. त्यांचा वाद सुरू झाला व आजी आपल्या खोलीत निघून गेली.
सकाळ झाली. आनिका उठली. घाईनं तिनं उशीखाली काही आहे का बघण्यासाठी उशी उचलली. बघते तर काय..चक्क लाल खड्यांचा नेकलेस टूथ फेअरी देऊन गेली होती! शिवाय दहा डॅालर्स पण तिनं दिले होते..
आनिका उड्या मारत बाहेर आली. लाल खड्याचा नेकलेस तिनं आई बाबा आजीला दाखवला. आई बाबा चकित होऊन एकदा नेकलेसकडे व एकदा आजीकडे बघत होते..
“स्कूल बस वर टोनी आहे ना.. तो फार दुष्ट आहे. There is no such thing as tooth fairy म्हणतो. आज त्याला सांगेनच की टूथ फेअरी नक्की आहे..Tooth Fairy exists..तुम्ही जर हट्ट केला नाही आणि झालेला बदल ॲक्सेप्ट केला तरच ती तुमच्या मनात काय आहे ते ओळखून ती भेट आणत असते!”
आई बाबा आश्चर्याने आनिकाचं बोलणं ऐकत होते.. आनिका आत जाताच मुलगा-सून “थॅंक्स आई” म्हणाले! “बघ आईनं रात्रभर दिवा बंद केला नाही म्हणून कटकट केलीस मला. ती नेकलेस वगैरे सुरेख बनवते. ती कला आहेच तिच्याजवळ..” लेक बायकोजवळ पुटपुटला..
आनिका तयार होऊन बाहेर आली. चमचमणाऱ्या लाल खड्यांचा नेकलेस पांढऱ्या ड्रेसवर सुरेख दिसत होता..स्कूल बस येण्याची वेळ झाली होती..
“बाय ममा ! बाय आजी !अरे..आजी तुझं कानातलं घातलं नाहीस आज?” जाताजाता आनिकाला जाणवलं.
“हो ग ! कुठं ठेवलं कुणास ठाऊक” आजीनं बाय केलं.
लहान वयात न मिळालेल्या पैजणांनी शिकवलेला धडा की नंतर मिळालेल्या पैजणांनी दिलेली शिकवण का स्वतःच्या आईची आठवण यामुळे आजीचे डोळे भरून आले का आनिकाच्या टूथ फेअरीवरील विश्वासाला तडा गेला नाही म्हणून तिचे डोळे भरून आले हे मात्र कुणालाच कळलं नाही.
© ® ज्योती रानडे
2026 JyotiRanade. All rights reserved
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा