मध्यंतरी माझी बनियन एव्हढी फाटली होती की त्यातल्या कोणत्याही छिद्रातून माझं डोकं आरपार चाललं जायचं आणि घातल्या नंतर पाठीवर पोटावर तव्याच्या आकाराचे आणि रंगाचे गोल चिकटवल्या सारखे वाटायचे. मी बायकोला बऱ्याच वेळा म्हटलं की नवीन बनियन घेऊन येवूया का. आता तुम्हाला वाटेल, बनियन घ्यायसाठी बायको कशासाठी हवी आणि विचारायला कशाला हवं. पैसा तर आपण कमावतो ना, मग काय बनियन नाही घेऊ शकतं स्वतःसाठी. बरोबर हाच विचार मी एकदा केला होता. आणि स्वतःच गेलो होतो दुकानात.
मला तो प्रसंग आणि दिवस चांगलाच आठवतो.
दुपारची वेळ होती आणि दहीहंडीचा दिवस होता. सुट्टी होती म्हणून मी एकटाच गेलो होतो. दुपारची वेळ असल्याने गर्दीच नव्हती. मीच एकटा कस्टमर होतो. म्हणून माझं अगत्याने स्वागत झालं.
एक बनियन दो. मी नेहमी दुकानदारांशी हिंदीतच बोलतो.
कोनसे नंबर का. त्याने विचारलं.
पता नहीं. आप ही देखलो ना. मी त्याला सांगितलं.
ठीक हैं... असं म्हणतं त्यानं शर्टाची कॉलर मागे करून नंबर पाहायचा प्रयत्न केला. पण जिथं नंबरचा टॅग लिहिलेला असतो तिथं आता फक्त दोरीसारखा एक धागा शिल्लक होता. त्यामुळे त्याला नंबरच कळेना.
साब नंबर नहीं दिख रहा हैं l नंबर लेके आवो.
वो नंबर कहा मिलता हैं...? माझा निरागस प्रश्न.
आपका कोई पुराना बनियन होगा ना, उसपर लिखा होगा. त्याने समजावून सांगितलं.
पुराने बनियन तो नहीं हैं l एक बनियन था उसका तो हमने पायपुसणा किया हैं और एक बनियन हैं उसके कपडे में हम गरम गरम बनाई हुई रोटीया रखते हैं l मी त्याला सत्य परिस्थिती सांगून टाकली.
बिना नंबर के कैसे दु फिर. दुकानदाराने अगतिकपणे विचारलं. मी त्याला सांगितलं की अरे बाबा मला योग्य बसेल असं तूच दे ना.
साहेब, माप चुकलं तर एकतर मोठं होतं नाहीतर लहान होतं. आता तोही मराठीत बोलायला लागला होता. मग त्याने दुकानातल्या एका नोकराला विचारलं की यांना कोणत्या नंबरच बनियन लागेल.
नोकराने माझं सगळ्या बाजूने निरीक्षण केलं. पण बराच वेळ विचार करूनही त्याला निर्णय घेता येईना. एक एक बनियन तो काढायचा. माझ्या अंगाला लावून पाहायचा. नंतर नकारार्थी मान हलवायचा. पण त्याचं समाधान होतं नव्हतं. तो म्हणाला, साहेब असं वरून माप घेणं जमत नाहीये त्यापेक्षा तुम्ही शर्ट काढून माप घेऊ द्या म्हणजे काही प्रॉब्लेमच येणार नाही.
अच्छा, म्हणजे ट्रायल रूम मध्ये जाऊन घालून पाहू का...? मी सरळ आवाजात विचारलं, आता यात हसण्यासारखं काही नव्हतं. पण तो फिस्स करून हसला. साहेब, इथं तुमच्याशिवाय कोणीच नाही. कशाला ट्रायल रूम वगैरे पाहिजे. त्या पेक्षा इथेच शर्ट काढा आणि लगेच बनियनच माप घेता येईल.
आता त्याचं म्हणणंही काही चुकीचं नव्हतं म्हणा आणि दुकानात माझ्या शिवाय दुसरं कोणी नव्हतं त्यामुळे मी एक एक करून गुंड्या काढून शर्ट काढला.
माझ्या अंगातल्या बनियनची अशी काही भयंकर अवस्था असेल असं दुकानदाराला अजिबात कल्पना नव्हती. माझं ते उडदाच्या पापडाच्या आकाराच्या छिद्रांची जाळी असलेलं बनियन पाहिल्यावर दुकानदाराला क्षणभर गरगरल्यासारखं झालं. एक नोकर तर फिफी करत हसतं सुटला.
साहेब, फारच फाटले आहे हो, बदलवून टाका ना. नवीनच घ्या हो. अक्षरश: कलिंगड आरपार जाईल एवढे मोठे छिद्र पडले आहेत. आता फक्त गळ्याभोवती दोरी आणि बाह्या लटकता आहेत. बनियन फाटकं आहे हे मला मान्य होतंच ना. मी नाही कुठं म्हणतं होतो. पण त्याच वर्णन इतकं बारकाईने करण्याची काही गरज नव्हती. त्यात पोट एकदम हातगाडी सारखं पुढे आलेलं दिसत होतं. आणि पोटावरच्या पट्ट्याला न जुमानता गणपती सारखं पुढे लोंबलेलं होतं. हेही मला मान्य होतं, की माझं पोट इतकं पुढे आहे की ऑफिस मध्ये, मे आय कम इन म्हटलं की, अगोदर पोट आत शिरतं त्याच्या मागे मी जातो. मी वैतागलो त्याच्यावर आणि वैतागून म्हणालो, लवकर दे रे बाबा.
साहेब, ते जुनं बनियन काढून टाका. लगेच नवीन घालून घ्या.
मी बनियन काढून टाकणारच होतो, नेमकं त्याचं वेळी एक गोविंदाच पथक दहीहंडी फोडायला त्या दुकानासमोर आलं. जोरजोरात वाजा वाजत होता. दहीहंडी तिथंल्या चौकातच बांधलेली होती त्यामुळे एखादं गोविंदाचं पथक दहीहंडी फोडायला आलं की दुकानातली सगळी माणसं तो सोहळा पाहायला दुकानाच्या बाहेर येऊन उभी राहायची. आता ही तसंच झालं. सगळेजण दुकानाच्या बाहेर येऊन उभे राहिले.
मी पण बाहेर येवून उभा राहिलो. जोरजोरात बँड वाजत होता. लोकं नाचत होते. त्या गोंधळात लक्षातच आलं नाही की आपण त्या फाटक्या बनियन वरच उभे आहोत. त्या गडबडीत कोणीतरी वरून गोविंदा पथकातला मेंबर समजून माझ्या अंगावर पाण्याची बादली ओतून मला भिजवून टाकलं. एका ने लगेच मला त्यांच्यात ओढलं आणि आम्हाला मध्ये उभं ठेऊन लेझीमवाले नाच करायला लागले. एकाने येवून मला गुलाल फासून दिला. मी काही सांगण्याचा प्रयत्न करत होतो.
पण त्या, गोविंदा आला रे आला या गाण्याच्या तालावर बेभान होवून नाचणाऱ्या लोकांच्या गोंधळात माझाच आवाज मला ऐकू येत नव्हता. मग मलाही तशाच अवस्थेत नाचण्याखेरीज पर्यायच राहिला नाही. मी बेभान होवून नाचायला लागलो.त्या दिवशी ज्यांनी ज्यांनी मला नाचतांना पाहिलं ते कित्येक दिवस बेशुद्ध होते म्हणतात. दोरीवरच्या उड्या मारतात तसा मी फाटक्या बनियन वर नाचत होतो.
बऱ्याच वेळ नाचून झाल्यावर त्या लोकांनी दहीहंडी फोडायसाठी रिंगण केलं. माझ्या देहयष्टीकडे बघून त्यांनी मला सगळ्यात खालच्या थरावर ठेवलं. नुसत्या फाटक्या बनियन मध्ये फक्त पॅन्ट वर मी त्या गोंधळात ओढलो गेलो होतो. माझा शर्ट त्या दुकानातच राहिला होता. पण माझं कोणी ऐकूनच घेतं नव्हतं. दोन तीन वेळा प्रयत्न केल्यावर आमच्या लोकांनी दहीहंडी फोडली. मग काय विचारता, हाऽऽ गोंधळ उडाला. नुसता जल्लोष आणि नाच. त्या पथकाचा जो मुख्य होता त्याने जाऊन बक्षीस घेतलं. त्या गडबडीत बराच उशीर झाल्याने दुकानदार दुकान बंद करून निघून गेला होता.
तोंडाला गुलाल, अंगात ते ऐतिहासिक बनियन, खाली फक्त पॅन्ट आणि अंग पूर्ण भिजलेलं अशा अवस्थेत मी स्टेशन ते घर कसा चालतं आलो मलाच माहित.
त्या फाटक्या बनियन मुळे आणि गुलालामुळे लालभडक झालेलं तोंड पाहून रस्त्यावरची भुंकणारी कुत्री पण भुंकायचं विसरून नुसतीच आ करून बघायची आणि जिवाच्या आकांताने दूर पळून जायची. कसाबसा घरी पोहोचलो. बेल वाजवली. दार उघडलं गेलं आणि बायकोने याऽऽऽ असं ठासून सांगत आत घेतलं.
मी घरी आल्याचं समजल्या बरोबर सगळी बिल्डिंग आमच्या घरी जमा झाली. जो तो अभिनंदन करत होता. माझ्या लक्षातच येईना काय झालं ते. मग सेक्रेटरीने सांगितलं की दहीहंडीचा लाईव्ह प्रोग्राम टीव्ही वर दाखवत होते. आणि त्यात मी त्या बनियन मुळे एकदम चमकून दिसतं होतो.
खरंच लाज आणली तुम्ही मला. अहो, अगोदर सांगितलं असतं की मी दहीहंडी फोडायला जाणार आहे तर ते एव्हढं फाटकं बनियन घालून का गेला होता. कसही करून तुम्हाला माझं नाव खराब करायचंच असतं. बायकोच स्वगत सुरु झालं. मी तिला समजावयाचा खूप प्रयत्न केला पण ती काही ऐकूनच घेतं नव्हती.
इतका मनस्ताप झाल्यावर मी नंबर घेतला बनियनचा आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच दुकानात जाऊन त्या नंबरच बनियन घेऊन आलो.
काय साहेब, तुम्ही गोविंदाच्या ग्रुप मधले होता, आम्हाला सांगितलंच नाही असं म्हणून त्याने माझा शर्ट आणि नवीन बनियन दिलं.
मी घरी आल्यावर ते घालणार होतो तर बायको म्हणाली, कोरा कपडा डायरेक्ट अंगावर घालत नसतात. आधी धुवून घ्या. मग ते धुवायला टाकलं.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ऑफिस मधून घरी आल्यावर बनियन घालायला गेलो. घातल्यावर लक्षात आलं की पोटापासून छाती पर्यंत जवळ जवळ सहा इंच बनियन आटून गेलं होतं. फारच भयंकर वाटतं होतं हो ते. सगळं पोट उघडं पडलेलं होतं.
तुम्हाला खरंच काही कळत नाही का हो. जरा वाढत्या अंगाचं आणलं असतं तर काय झालं असतं. हिचा पट्टा सुरू झाला. तेव्हढयात बेल वाजली.
आणि अय्या जिज्जूsss, असा आवाज आला. ओळखलंत ना बरोबर, होय तीच, हिची ती आमच्या लग्नात गुलाबी साडी नेसलेली मामेबहीण आमच्या घरी आली होती. माझा तो पट्यापट्याचा पायजमा आणि त्यावर सहा इंच उघडं पडलेलं पोट आणि त्यावर वरतून सहा इंच छाती झाकलेलं बनियान पाहून ती जी खी खी करून हसायला लागली की विचारूच नका.
बायको तिला, ये ना ग आत असं म्हणून तिच्यासाठी चहा टाकायला आत गेली.
जीजू हे काय ब्लाउज घातल्यासारखं घातलंय हो तुम्ही. पण तुम्हाला काहीही शोभतं बरं का. पण माझ्या सोबत एक सेल्फी काढा ना प्लीज. असं म्हणून तिने दोनचार फोटो काढले देखील.
नंतर जेव्हा ते फोटो बायकोला व्हाट्सअप केले, तेंव्हा बायकोने जी बडबड केली ती सांगण्या सारखी नाहीये.
तुम्हाला सांगून ठेवते याच्या पुढे कधीही बनियन आणायला एकटं जायचं नाही. मी येत जाईन तुमच्यासोबत, बायको म्हणाली.
कळलं का आता, की बनियन घ्यायला मी नेहमी बायकोला का सोबत घेऊन जातो ते.
वाचकांसाठी विशेष सूचना : माझं लिखाण हे पुर्णपणे काल्पनिक असते. त्याचा कोणाशीही काय पण माझ्याशीही संबंध नसतो. सत्य आणि तथ्य या पासूनही ते तसे दूरच असते. अगदी निव्वळ तर्कहीन आणि बुध्दी गहाण ठेवून मी ते लिहीत असतो. त्यामूळे त्यातून तर्कसंगतता किंवा काही जीवनाविषयक अर्थ, शक्यता किंवा अशक्यता वगैरे शोधण्याचा प्रयत्न अजीबात करु नये. तसा तो सापडणार तर नाहीच. घटकाभर करमणूक म्हणून वाचा आणि सोडून देत जा. सकाळी सकाळी आपल्या सर्व विवंचना दूर होऊन क्षणभर आपल्या चेहऱ्यावर हसू पसरलं तर माझ्या लिहिण्याचा हेतू सफल झाला असं मला वाटेल.
दत्ता जोशी, अंबरनाथ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा