आबूंना जाऊन महिना होत आला पण अजूनही माझा विश्वास बसत नाही ते ह्या जगात नसण्यावर. आबू म्हणजे सर्वस्व होतं माझं. माझ्या आजोबांना मीच लहानपणापासून आबू ह्या नावाने हाक मारायला सुरुवात केली आणि तेच नाव शेवटपर्यंत कायम राहिले.
बाबा, काका आणि आत्या तिघांनाही त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे शिकू दिलं आणि मोठं करून त्यांच्या आयुष्यात भक्कमपणे स्थिर केले. पण यशस्वी डाॅक्टर झालेल्या बाबा आणि काकाला घरातला संवाद वाढवायला जमलंच नाही. जसजशी प्रॅक्टिस वाढत गेली तसतसे ते आबूंपासून दूर जायला लागले. पण मी आबूंपासून कधीच दूर झालो नाही. शाळेतल्या गंमती, काॅलेजच्या पायऱ्यांवर बसून केलेली मजा, मस्ती आणि नंतर व्यवसायातील यशस्वी गोष्टी आणि ताणतणाव आबूला सांगायला मी रोज संध्याकाळी उत्सुक असायचो. आयुष्य जगणं म्हणजे नेमकं काय हे आबूने व्यवस्थित माझ्या गळी उतरवले होते आणि म्हणूनच श्रीमंत घरातला मी लाॅंग ड्राईव्ह, वीकेंड पार्ट्या पासून कायम लांब राहीलो. माझ्या वेगळ्या विश्वात फक्त आबू अढळस्थानी होते. ते मला गंमतीने इन्व्हर्टर म्हणायचे. जेव्हा घरातील हक्काच्या व्यक्तींकडून त्यांच्या खोलीत संवादाचा प्रकाश पडायचा नाही तेव्हा मी त्यांच्या उशाशी बसून किंवा त्यांना त्यांच्या लाडक्या आरामखुर्चीत बसवून त्यांचा हात हातात घेत कितीतरी वेळ गप्पा मारत बसायचो. रोज रात्री झोपण्यापूर्वी कितीही उशीर झाला असला तरी मी आबूंच्या खोलीत जाऊन त्यांना नमस्कार करायचो. बऱ्याचदा माझी वाट बघून त्यांना डोळा लागलेला असायचा.
त्यांच्या हट्टाखातर घरातील सर्वांनी मला वेड्यात काढले तरी देखील मी काही महिन्यांपूर्वी त्यांना घेऊन कोकणातील त्यांच्या जुन्या घरी नेले होते त्यांच्या भावासोबत पंधरा दिवस रहाण्यासाठी. अर्थात त्याआधी त्या घरात बेड, कमोड आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध केल्यावरच. आबूंनी त्या घरात खुप जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक भिंतीला आणि प्रत्येक कोपऱ्याला त्यांच्या आठवणींचे कंदील त्यांनी पेटवले. ओसरीवर बसून केलेला अभ्यास, स्वयंपाकघरात पाटावर बसून केलेली जेवणं. त्यांच्या आईने केलेले गोड पदार्थ, त्यांच्या वडिलांचे शिस्तीचे वेड आणि त्यामुळे झालेल्या शिक्षा, घरात झालेली मंगल कार्ये आणि सणवार सगळ्या सगळ्याचे सातबारे त्यांनी डोळ्यांच्या नोंदवहीत नोंदवून घेतले. गावातील गणपती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी घसघशीत रक्कम तिथल्या विश्वस्तांच्या हाती सुपूर्द केली. आमच्या मोटारीतून आम्ही गावात फेरफटका मारून आलो. कोंकणातून परत मुंबईला येताना आबूंच्या चेहऱ्यावर समाधानापेक्षा काहीतरी वेगळं दिसलं मला. घरी सुरक्षित पोहोचल्यावर मी लगेचच आबूंना ह्या बाबतीत विचारले तर म्हणाले ह्या शनिवारी बोलू सविस्तरपणे. मला कधी एकदा शनिवार येतो असं झालं होतं.
शनिवारी सकाळी ब्रेकफास्टचा ट्रे घेऊन मी आबूंच्या खोलीत गेलो तर काय चक्क अंघोळ करून नवीन कपडे घालून बसले होते ते माझी वाट बघत. काय आबू, आज एकदम सकाळी हिरो बनून तयार झाला आहात. तसंच महत्वाचे काम आहे तुझ्याकडे. असं म्हणून त्यांनी कपाटातून एक हिरवं मोठं कापडी पाकिट माझ्या हातावर ठेवले.
हे काय आहे आबू? मी आश्चर्याने त्यांना विचारले. तुच उघडून बघ म्हणजे तुला खुलासा होईल. मी सावकाशपणे पाकीट उघडलं आणि आतले कागद बाहेर काढून चाळले आणि छातीत धस्स झाले. आबूंचे मृत्यूपत्र त्यात होते. आबू अहो हे काय? मी अजूनही धक्क्यातून सावरलो नव्हतो. ती कागदपत्रे परत आत ठेव आतील मजकूर न वाचता आणि ते पाकीट माझ्या कपाटात सर्वात वरच्या खणात ठेवून ये परत माझ्याजवळ बसायला.आधी ब्रेकफास्ट करु, ज्युस पिऊ आणि मग सविस्तर बोलूया. आज आबूंच्या डोळ्यांत नेहमी दिसणारे समाधान बिलकुल नव्हते. ब्रेकफास्ट संपवून मी आधाशासारखे आबूंच्या तोडांकडे बघत होतो. माझा हात हातात घेऊन तो थोडा वेळ थोपटला आबूंनी. त्यांच्या आवडीच्या भिमसेन जोशींचे अभंग अतिशय बारीक आवाजात त्यांनी मला लावायला सांगितले.
"राहुल, कोकणातून मॅट्रिक पास होऊन मुंबईला माझ्या वडिलांच्या मित्राच्या घरी राहायला आलो. सकाळी सरकारी काॅलेजात जायचो. घरातील कामे करायचो. जागेच्या अडचणीमुळे अंगणात झोपायला लागे. त्या परिस्थितीशी दोन हात करून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईत छोटासा दवाखाना सुरू केला. अल्पावधीत माझ्या हाताला गुण असल्याने रुग्णसंख्या वाढत गेली. पुढे नवीन मोठ्या जागेत स्थलांतर करत करत पसारा वाढला. पुढे तुझे बाबा आणि काका देखील डॉ झाल्यावर आपलं हाॅस्पिटल उभं राहिलं. यथावकाश मी माझी प्रॅक्टिस कमी करायला सुरुवात केली कारण तुझ्या आजीचे आजारपण. तिनं माझ्या प्रॅक्टिसच्या अगदी सुरुवातीच्या काळात मला आणि मुलांना खुप सांभाळून घेत संसार केला. आता तिच्या आजारपणात मी तिच्या सोबत जास्तीत जास्त वेळ असणं मला गरजेचे वाटले. माझ्या सततच्या सोबतीने तिने शेवटपर्यंत तिच्या आजाराशी दोन हात केले. आमच्या जुन्या आठवणी तिला लढण्याची हिंमत आणि शक्ती देत असतं असं ती नेहमी म्हणायची. पुढे ती गेल्यावर मात्र मी एकटा पडलो. आपल्या घरात तु एक सोडलास तर माझ्या अस्तित्वाची जाणीव दुर्दैवाने कोणालाही राहीली नव्हती हा धक्का मी नाही पचवू शकलो आणि तिथूनच माझ्या नकळत माझा परतीचा प्रवास सुरू झाला बहुतेक. पण घरातील इतरांनी केलेली चूक तु मात्र कधीच करू नकोस तुझ्या आईबाबांच्या बाबतीत. आज त्यांच्या विश्वात ते आकंठ बुडालेले आहेत. पण एक दिवस येईल त्यांच्याही आयुष्यात जेव्हा तुझी आणि तुझ्या बायको मुलांची गरज त्यांना लागेल. तेव्हा मात्र त्यांना कायम तुझ्यासोबत ठेव.
अरे ह्या वयात आम्हाला काही जास्ती नको असतं रे. फक्त बघावासा वाटतो तुमचा चेहरा, ऐकावासा वाटतो तुमचा आवाज, हवाहवासा वाटतो कपाळावर होणारा तुमच्या हाताचा स्पर्श आणि आमच्या सोबत घालवलेले थोडे क्षण. जरी येताना आणि जाताना आपण एकटे असलो तरी त्या दरम्यान अखंड सोबतीचा सुर्यप्रकाश आणि नात्यांची कोजागिरी पौर्णिमा प्रत्येकाला कायम हवी असते. तु रोज रात्री न चुकता मला भेटायला येतोस. माझ्या श्वासाच्या देवळातला तु पुजारी आहेस. तुझ्या स्पर्शाचा पाऊस माझ्या मनाच्या अंगणात रिमझिम बरसून जातो. आबू म्हणून तु मारलेल्या हाकेसाठी मी डोळ्यांत आतुरतेचे निरांजन रोज न चुकता लावतो. तुझ्या हाकेत दिवसभरात आलेले वाईट विचार परतवून टाकण्याची ताकद आहे. तुझ्यामुळेच आयुष्याच्या रणांगणावर मी जगण्याची लढाई पुऱ्या ताकदीने लढतो आहे. माझ्या हट्टाखातर मला तु कोकणातील आमच्या घरी नेऊन आणलंस तुझ्या आयुष्यातील पंधरा दिवस माझ्यासाठी देऊन. तुझ्या ऋणातून मुक्त कसं व्हायचं ते मला कळत नाही. म्हणूनच मृत्यूपत्रात मी तुझ्यावर खुप जबाबदाऱ्या टाकल्या आहेत त्या तुला माझ्या पश्चात कळतीलच. असं म्हणून आबू नंतर जेवायची वेळ होईस्तोवर बोलत राहिले. मध्ये मध्ये ते दमल्यासारखे वाटले म्हणून मी त्यांना बोलणं थांबवा म्हणालो पण त्यांनी नाही ऐकलं. जणू काही आजच्या आजच त्यांना मनांत ठरवलेलं बोलून टाकायचं होते.
दुपारच्या जेवणानंतर आम्ही त्यांच्या आवडीचा रमीचा डाव खेळलो. रात्री जेवण झाल्यावर त्यांनी माझी गाडी काढून लाॅंगड्राईव्हवर मला नेऊन आणायला लावलं. एकूणच काय सगळा शनिवार त्यांनी ठरवल्या प्रमाणे पार पाडला. गाडीत शांतपणे जुनं हिंदी चित्रपट संगीत ऐकता ऐकता मध्येच अचानक म्हणाले तुला मृत्युपत्राविषयी आणि ते कुठे ठेवलं आहे ते सांगून मी माझ्या मनावरचं ओझं दूर केले आहे. तितक्यात मी त्यांच्या तोंडावर हात ठेवून त्यांना म्हणालो, "बस आबू. आता पुढे काहीच बोलू नका. रात्री उशिरापर्यंत गाडीतून फिरून आम्ही दोघे घरी परतलो. आबूंना त्यांच्या खोलीत व्यवस्थितपणे सोडून मी झोपायला गेलो.
एरवी रविवारी सकाळी घरात सामसूम असते. त्यात परत कालचं उशिरा झोपणं होते. त्यामुळे खरंतर दहा अकरा वाजेपर्यंत उठायचं नाही असं ठरवून मी झोपलो होतो. सोनालीला देखील तशा सुचना दिल्या होत्या मी. पण अचानक खुप जणांचे आवाज कानांवर पडायला सुरुवात झाली. म्हणून मीच त्रासलेल्या चेहऱ्याने माझ्या पहिल्या मजल्यावरील बेडरुमच्या बाहेर येऊन खाली हाॅलमध्ये डोकावून पाहिलं आणि पोटात धस्स झाले. आबूंचा देह तिथे पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवला होता. आजवर अनेकदा ऐकले होते मी की जाणाऱ्या माणसाला जाण्याची चाहूल लागते. दुर्दैवाने माझ्या आबूंच्या बाबतीत तेच घडले होते. काल संबंध दिवस त्यांच्या इच्छेनुसार ते वागले आणि आज अखेर.....
© सतीश बर्वे
१९.०७.२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा