शनिवार, २५ जुलै, २०२६

3084. आपूलकी

      आई गेल्यानंतर बाबांच्या मनातली सर्वात मोठी भीती. पत्नीच्या निधनानंतर गावातील ते छोटंसं घर अगदी ओसाड झालं होतं. आयुष्यभर सोबत चालणारी साथीदार अचानक निघून गेली आणि घरात फक्त शांतता उरली. भिंती होत्या, आठवणी होत्या. पण माणूस नव्हता. एक दिवस शहरात राहणाऱ्या मुलाचा फोन आला. बाबा आता तुम्ही एकटे राहायचं नाही. सामान बांधा. तुम्ही आमच्याकडेच राहायला या. हे ऐकून बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. पण आनंदापेक्षा त्यांच्या मनात एक वेगळीच भीती घर करून बसली होती. माझ्यामुळे मुलाला आणि सुनेला त्रास तर होणार नाही ना? सून माझा राग तर करणार नाही ना? वृद्ध माणूस घरात आला की ओझं वाटतं म्हणतात. संपूर्ण प्रवासभर त्यांच्या मनात हाच विचार सुरू होता. ट्रेन स्टेशनवर पोहोचली. मुलगा हसतमुखाने धावत आला. बाबा किती वाट पाहत होतो तुमची. त्याने बाबांच्या हातातील बॅग स्वतः घेतली आणि प्रेमाने त्यांना गाडीत बसवलं. घरी पोहोचल्यावर दारात सून आरतीचं ताट घेऊन उभी होती. या बाबा तुमचं घर आहे हे. तिच्या त्या एका वाक्याने बाबांच्या मनावरील थोडा भार हलका झाला. घरात गेल्यावर त्यांना त्यांची स्वतंत्र खोली दाखवण्यात आली. खोली इतकी सुंदर सजवली होती की बाबा काही क्षण नुसतेच पाहत राहिले.
     एका भिंतीवर त्यांच्या पत्नीचा मोठा फोटो लावला होता. फोटोसमोर छोटासा दिवा आणि ताजी फुलं ठेवली होती.बाबांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. सून हळूच म्हणाली. आई आता आपल्यात नाहीत. पण त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या सोबत राहतील. त्या दिवशी जेवणाच्या ताटात बाबांच्या आवडीचे सगळे पदार्थ होते. पुरणपोळी, वरणभात, भेंडीची भाजी, ताक.  बाबा आश्चर्यचकित झाले. 
अगं तुला माझ्या आवडी कशा माहीत ?
सून हसली. आईंनी मला सगळं सांगून ठेवलं होतं.
तरीही बाबा प्रत्येक गोष्टीत संकोच करत होते. पाणी ही स्वतः उठून घ्यायचे. कपडे स्वतः धुवायचा प्रयत्न करायचे. त्यांना वाटायचं. सुनेला त्रास नको. पण सुनेला ते कधीच आवडलं नाही. ती प्रेमाने म्हणायची. बाबा तुम्ही आयुष्यभर सगळ्यांसाठी केलंत. आता आमची वेळ आहे. बाबांना अचानक पत्नीचे शेवटचे शब्द आठवले.
ऐका हो.. माझ्यानंतर मुलाकडे राहायला जाल तेव्हा सुनेला कधीही परकी समजू नका. तिला मुलगी समजून वागा. प्रेम दिलंत तर प्रेमच परत मिळेल.
त्या आठवणीने बाबांचं मन भरून आलं. त्या रात्री मुलगा बाबांच्या खोलीत गेला.
बाबा हळूच म्हणाले. बाळा मला इथे राहून काही त्रास तर होणार नाही ना ?
मुलाने बाबांचा हात हातात घेतला. बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा. जर कधी माझ्या बायकोमुळे तुम्हाला दुःख झालं. तुमचा अपमान झाला. किंवा तुमच्या डोळ्यात अश्रू आले. तर सर्वात आधी मी तिलाच विचारेल. कारण माझे बाबा माझ्यासाठी सर्वात आधी आहेत. हे ऐकून बाबांच्या डोळ्यात समाधान उतरलं. पण मुलगा फक्त बोलून थांबला नाही. तो काही दिवस शांतपणे निरीक्षण करू लागला. तो मुद्दाम ऑफिसला गेल्यासारखा करायचा. पण मध्येच घरी यायचा. कधी सी.सी.टीव्हीतून पाहायचा. कधी दाराबाहेरून ऐकायचा.
माझी पत्नी खरंच बाबांची मनापासून काळजी घेते का ? आणि प्रत्येक वेळी त्याला एकच दृश्य दिसायचं. सून वेळेवर औषध द्यायची. त्यांच्या सोबत बसून गप्पा मारायची. फिरायला घेऊन जायची. त्यांना कधीच एकटं वाटू द्यायची नाही. मुलाच्या मनात पत्नीबद्दलचा आदर आणखी वाढला. एक दिवस गप्पा मारताना मुलाला कळलं. बाबांना तरुणपणी फोटोग्राफीची खूप आवड होती. पण संसारासाठी त्यांनी स्वतःचे सगळे छंद सोडले होते. 
     दुसऱ्याच दिवशी मुलगा एक सुंदर कॅमेरा घेऊन आला. बाबा पुन्हा सुरुवात करा. कॅमेरा हातात घेताच बाबांच्या चेहऱ्यावर कित्येक वर्षांनी निरागस हसू उमटलं. ते रोज बाहेर जाऊन झाडं, पक्षी, सूर्यास्त, मुलं खेळताना असे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपू लागले. त्यांच्या आयुष्याला पुन्हा एक अर्थ मिळाला. एका संध्याकाळी त्यांनी सुनेचा आणि मुलाचा एक सुंदर फोटो काढला. फोटो पाहताना ते हसून म्हणाले. मला वाटायचं माझी सून मला स्वीकारणार नाही. पण आज मला मुलगी मिळाली आहे. सुनेने पुढे होऊन त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. बाबा मुली जन्माने नसतात. प्रेमाने बनतात. त्या दिवशी बाबांनी पत्नीच्या फोटोसमोर हात जोडले आणि हळूच म्हणाले. तुझं ऐकलं म्हणून आज मी एकटा नाही.
तात्पर्य :-
सासू - सासरे हे ओझं नसतात. ते आपल्या आयुष्याची मुळं असतात. त्यांना प्रेम, आदर आणि आपलेपणा दिला तर ते घराला आशीर्वाद देतात आणि सून जर मुलगी झाली. तर घर खरंच स्वर्ग बनतं.  
❓जर उद्या तुमचे आई-वडील तुमच्यासोबत राहायला आले, तर त्यांना फक्त घर मिळेल. की खरंच आपलेपणा ? 
ही कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा, कदाचित एखाद्या वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यांत आज आशेचा एक किरण जागा होईल.

संकलन - अवधूत सावंत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...