तिने मुलासाठी तव्यावर एक अंड फोडून टाकलं. वरुन तिखट - मिठ भुरभुरवलं. कपाळावर जमा झालेला घाम, तिने उपड्या हाताने पुसला. तेवढ्यात बाजूच्या बर्नरवरच्या पातेल्याला, चहाच्या उकळ्या फुटल्या. तिने पटकन तो गॅस बारीक केला, आणि मनात म्हणाली ती..."हस मेल्या तू ही, माझी ही रोजची धांदल बघून". मुलासाठी घातलेलं हाफफ्राय तिने उलटलं. पुन्हा किंचित तिखट - मिठ भुरभुरवलं, नी तिने ते प्लेटमध्ये काढलं. त्याच तव्यावर दोन ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस ठेवल्या. त्यांच्या कडेने घरचं कढवलेलं तुप सोडलं. नवर्यासाठी असलेल्या चहाचा गॅस तसाच चालू ठेऊन, तिने चहाचं पातेलं चिमट्याने उचलंत चहा कपात गाळला. आणि त्या गॅसवर आता नवर्यासाठी, पोळी गरम करायला तवा ठेवला तिने. ह्या सगळ्यात पुन्हा कपाळावर जमा झालेला घाम, तिने परत उपड्या हाताने पुसला. तसाच हात खाली घेत, तिने नाक आणि ओठांच्या मध्ये गोळा झालेला घामही पुसला. अशा दोन पोळ्या भाजून, त्यावर तुप लाऊन... तिने त्या गॅसवरचा तवा बाजूला करत, आता त्यावर दूध तापवायला ठेवलं. नवर्यासाठी चहा आणि पोळ्या... मुलासाठी हाफफ्राय आणि ब्रेड स्लाईसेस, असं सगळं दोन हातांतून मॅनेज करत... ती बाहेर डायनिंग हाॅलमध्ये गेली.
ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन... TOI वाचत बसलेल्या नवर्यासमोर तिने, चहा आणि पोळीची प्लेट ठेवली. नवर्याने साधं बघितलंही नाही तिच्याकडे, पेपरमधून डोकं बाहेर काढून. स्कूलसाठी तयार होऊन... पोकेमाॅन कार्ड्सशी खेळत बसलेल्या मुलासमोर तिने, हाफफ्राय नी ब्रेड स्लाईसेसची डिश ठेवली. आणि तेवढ्यात तिचा तो दहा वर्षांचा मुलगा जोरात बोलला... "आईss u r stinking... य्याक्कsss". (तुझ्या अंगाला दुर्गंध येत आहे.) मुलाचं हे ऐकताच... पेपरमधून तोंड बाहेर काढून, नवर्याने तिच्याकडे आपादमस्तक पाहिलं. आणि काहीही प्रतिक्रिया न देता... पेपरची घडी घालून टेबलावर ठेवत, प्लेटमधल्या पोळीची घडी उघडू लागला तो. मघाचं ते एक शेलकी वाक्य बोलून, मुलगाही हाफफ्राय नी ब्रेड खाऊ लागला होता. दोघांकडेही आळीपाळीने बघत, ती उभी राहिली. पण आता त्या दोघांच्याही ब्रेकफास्टपेक्षा, ती अजिबातच महत्वाची नव्हती. आणि तेवढ्यात तिला आवाज आला, दूध जोमाने वर येत असल्याचा.
ती भर्रकन वळत किचनमध्ये पळाली. त्याच घाईत आत शिरतांनाच, तिची पायाची करंगळी किचनच्या चौकटीवर जोराने आपटली. एक तीव्र वेदना मस्तकात गेली तिच्या... पण त्याकडे दुर्लक्ष करुन, ती दूधाचा गॅस बंद करायला झेपावली. पण अशावेळी दूधाचा वेग, मिल्खा सिंह पेक्षाही जास्तच असतो. त्याप्रमाणेच एक अर्धी वाटी दूध खाली सांडलंच. शेगडीची जाळी, त्याची प्लेट, बर्नर... अशा गोष्टींवर अभिषेक करत करत, ते ओट्यावर येऊन पडलं. आता पुन्हा हे सगळं धुवून, साफ करणं आलं होतं. ती हताशपणे ते सगळं बघत, जागीच उभी राहिली. आणि तिला आठवलं, ते मघाचं मुलाचं वाक्य... 'u r stinking'... त्यावरचं ते नवर्याचं गप्प राहणं... धावत येतांना तिची आपटलेली करंगळी... आणि मस्तकातून उठलेली ती कळ. आता तिने तिच्या पायाच्या करंगळीकडे पाहिलं. इवलीशी अशी ती, इतर बोटांच्या मानाने अगदीच छोटीशी. त्यांच्यासमोर कदाचित अस्तित्वच नसलेली अशी. लाल झाली होती करंगळी, जोराने आपटल्यामुळे. आणि... आणि अचानक रडू लागली ती. हे तिला बोललं गेलेलं तेवढंच वेदनादायी होतं तिच्यासाठी, जेवढी वेदना तिच्या करंगळीला झाली होती. स्वतःची करंगळी आता तिला, स्वतःसारखीच भासू लागली... अगदीच केविलवाणी. इथे तिथे आपटून वेदना होणं, हेच जणू काही आपल्या अस्तित्वाचं प्रयोजन असलेली अशी.
तेवढ्यात "निघालो गं"... "आई बाय-बाय" अशा मागोमाग आलेल्या आवाजांनी, ती भानावर आली. पण आज काही तिला वाटेना, दारापाशी जावं रोजच्यासारखं. ती तशीच, तिथे आतच थांबून राहिली. अर्थातच ती बाहेर न आल्याचं, त्या दोघा बाप-लेकाला कदाचित जाणवलंही नव्हतं. कारण दरवाजा बंद झाल्याचाही आवाज आला होता तिला, अगदी लगोलग. ती तशीच हळूहळू चालत मग, त्यांच्या बेडरुममध्ये गेली. आणि ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर, उभी राहिली ती. कसेबसे एका पिनेत अडकवलेले केस... बर्याच महिन्यांत न केलेल्या आयब्रोज... डोळ्यांखाली आलेली पुसट काळी वर्तुळं... डोळ्यांतून वाहिलेल्या पाण्याने गालांवर ठेवलेले सुकलेले डाग... नाकाचा लाल झालेला शेंडा... मान अजूनही घामाने थबथबलेली... त्या घामानेच भिजलेला गाऊनचा गळा. तिच्या ह्या अशा एकंदर अवतारामुळे, तिच वैतागली स्वतःवर. तिने उजवा हात खांद्यापासून उचलून... त्या हाताच्या गाऊनची बाही, नाकापाशी नेली. आणि तिचा तिलाही उग्रसा दर्प आला. ती मनातल्या मनातच, नवर्याशी संवाद साधू लागली... "ह्या चाळीस डिग्रीजच्या तापमानात, सकाळचा स्वैपाक... तुझा नी मुलाचा डबा... तुमचा नाश्ता... आणि हातासरशी बारीक सारीक घासून टाकलेली भांडी, नंतर भांड्यांचा ढिग पाहून कामवालीची कटकट ऐकावी लागू नये म्हणून... हे एवढं सगळं करावं लागल्यावर, असाच अवतार होणार ना?... आणि का बरं मी चोवीस तास प्रेझेंटेबलच दिसलं पाहिजे?... अरे अंगाला पडलेले कष्ट, मनावर आपटून रिबाउंड होत दिसणारच ना शरीरावर?... हे असं सकाळी सहा वाजल्यापासून गॅससमोर उभं राहून, येणारच ना अंगाला घाम आणि मग त्यामुळे वासही?... आणि मुल व्हायच्या आधी... मला असं किचनमध्ये मी काम करत असतांनाच, कितीतरी वेळा उचलून नेलेलंस आत... त्यावेळी नव्हता का आला माझ्या अंगाला वास?... आज मला इतकं ऑफेंसिव्ह वाटलं असतांनाही, ते न कळून इतका तटस्थ राहिलास ते?".
खिन्न होऊन अंगातले त्राण गेल्यासारखे, ती ड्रेसिंग टेबल समोरच्या सीटीवर बसली. केसांची पिन काढली तिने, आणि मान जोरजोरात हलवली. तिचे खांद्यांपर्यत असलेले केस आता, आणिक अस्ताव्यस्त झालेले. काही दिवसांपुर्वी तिने अशाच केसांत एक सेल्फी काढून, तो फेसबुकवर प्रोफाईल म्हणून ठेवलेला. तेव्हा... 'व्वाॅव'... 'सुपर हाॅट'... 'वाईल्ड कॅट'... 'व्हाईब्रंट'... 'रॅव्हिशींग'... 'किलींग' अशा काय काय कमेंट्स आलेल्या, तिच्या फ्रेंडलीस्टमधल्या पुरुष मित्रांकडून... ज्यातल्या ९५% मित्रांना तिने प्रत्यक्षात बघितलेलंही नव्हतं. एकाने तर पुढे जाऊन तिला, 'अँजेलिना जोली' ही म्हंटलेलं. ते सगळं आठवून तिला हसूच आलं. आणि एक खट्याळ विचार आला तिच्या डोक्यात. तिने तिचे मोकळे केस जरा सेट केले. चेहर्यावर अगदी हलकासा, पावडरीचा पफ लावला. डिओ घेतला मारायला तिने पण... "फोटोत वास थोडीच येतो, हटा यार सावन की घटा"... असं जरा मोठ्यानेच बोलत, ती पुन्हा हसली. गाऊन गळ्यापासून थोडा खाली खेचत... तिच्या कॉलर बोनच्या दोनेक इंच खाली असलेला, ठसठशीत काळा तीळ दिसण्याची सोय केली तिने. कारण तिला बरोब्बर माहित होतं की, पुरुषांना थेट काही दिसण्यापेक्षा... अरे यार अजून जरा असं असतं तर?... ही फँटेसी जास्त थ्रील करते. मग तिने चेहर्यावर किंचितसा सेन्श्युअस भाव आणत, ओठांचा हलकासा चंबू करत फोटो काढला. कुठल्याशा ब्युटीऍपमध्ये जाऊन... त्या फोटोवर आवश्यक ते संस्कार घडवत, तिने तो फोटो फेसबुकवर प्रोफाईल म्हणून चिकटवला.
अगदी पुढच्याच मिनिटाला, तिचा मोबाईल नोटिफिकेशन्सच्या आवाजाने थडथडू लागला. पाचेक मिनिटांनी तिने फेसबुक वर जाऊन, फक्त फोटोला आलेले लाईक्स पाहिले. दिडशे लाईक्स होते, आणि पाऊणशे कमेंट्स आल्या होत्या. तिच्या मनात आलं... "ह्या पुरुषांना दुसर्यांच्या बायकांसाठी बरा वेळ मिळतो सकाळी सकाळी". पण तरीही... मनोमन चिक्कार सुखावली ती, घरी नाही पण दारी तिला असलेली किंमत बघून. पुन्हा जोरातच बोलली ती... "I m stinking right? and u didn't even bother to react on it... आता बघ जरा... अवघ्या पाच मिनिटांमध्येच, कितीजणांपर्यंत पोहोचलीये मी ते". आणि तेवढ्यात तिला व्हाॅट्सऍपवर नोटिफिकेशन आलं, नवर्याचा मेसेज आल्याचं. कपाळावर आठ्या आणत, भुवया वक्र करत, दोन्ही ओठ मुडपतच, तिने तो मेसेज वाचला.
"M so sorry dear for whtevr hppnd in the mrng... पण लेकाला शाळेत सोडतांना मी त्याला वाटेत समजावून सांगितलंय. त्यालाही खूप गिल्टी वाटलंय, किती ते तुला तो घरी आल्यावर कळेलच आणि खरंतर मी तुझ्यासमोर गप्पच राहिलो सकाळी, ते तुलाच जास्त फील व्हावं म्हणून... Bcoz I think u hv completely lost since last few years, and I want u to start taking care of urself... I want u to b looked as beautiful as u were... म्हणूनच मी बाहेरच्या टेबलवर असलेल्या, तुझ्या लॅपटॉप खाली 10k ठेवलेत... go to any parlour u want, and jst think abt ur own happiness only... आणि हो अजून एक... हे तू जे काही करशील, ते तुझ्या आनंदासाठी असेल... कारण मला त्यामुळे, काही फरक पडणार नाहीये. तू न्हाऊन आलेली असशील, की घामाने भिजलेली. मला तू कायम हॉटच दिसतेस... C u in the evening".
मेसेजनंतर दोन्ही डोळ्यांतून बदाम असल्याचे, अर्धा डझन इमोजीज होते. स्वतःशीच मान हलवत, ती किंचितसं हसली आणि तिने फोन बाजूला ठेवला. केस दोन्ही हातांनी गोळा करत, पुन्हा पिनेत अडकवले. गाऊन दोन्ही खांद्यांवरून मागे नेत, पुन्हा अगदी गळ्याशी आणला. आणि आरशात स्वतःकडेच बघतांना, पुन्हा भरून आलं तिला. थोड्याच वेळात ती उठली जागची... आणि बाहेर जाऊन, त्याने ठेवलेले ते पैसे उचलले तिने. तेवढ्यात तिला दिसलं लॅपटाॅपच्या शेजारीच... त्यांची फॅमिली मेडिक्लेम पाॅलिसी रिन्यू करण्यासाठीच्या, प्रिमियम भरण्यासंबंधीचं लेटर पडलेलं. ती थोडीशीच घुटमळली तिथे... आणि त्या दहा हजार रुपयांना ते पाॅलिसीचं लेटर गुंडाळत, त्यांना एकत्र रबर लावून... तिने ते आपल्या ड्राॅवरमध्ये ठेवलं. आपल्या प्रायोरीटीज विषयी असलेली नेमकी जाण, तिची ह्या मनःस्थितीतही शाबूत होती. ज्यामुळेच तिची बंडाची पावलं... या आधीही अगदी वेळोवेळी अडखळलेली, थांबलेली. ड्राॅवर निट बंद करुन... गॅलरीत गेली ती आंघोळीसाठी टाॅवेल घ्यायला, गुणगुणतच...
'रुके रुके से कदम.. रुक के बार बार चले
क़रार लेके तेरे दर से बेकरार चले..
रुके रुके से कदम.. रुक के बार बार चले'

-सचिन श. देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा