शनिवार, २५ जुलै, २०२६

3004. ती

   त्याला ती फार आवडायची. ती काही त्याच्या वयाची नव्हती. चांगली पंधरा वीस वर्षानं मोठी होती ! चाळीशीपल्ल्याडच्या आत्मविश्वासाचं सौंदर्य चेहराभर पसरून ती जेव्हा हसायची ना, तेव्हा तो अगदी वेडावून जायचा! स्वतःचं वय विसरून हरखून जायचा तिच्यात. पाहत रहायचा तिच्याकडे.  तिच्या हास्याचे ओघळणारे मोती खरंतर वेचायचे असायचे त्याला, पण हिंमत नाही व्हायची. तो निमूटपणे तिचं ते हसू मनाच्या बटव्यात जमा करत रहायचा. ती मोठ्या पोस्टवर. एका अख्ख्या डिपार्टमेंटची एचओडी. तो पंचविशीचा उंबरठा ओलांडलेला इंजिनिअर. आता आता तर हातपाय मारणं सुरुच झालंय. अजून कितीतरी लांबचा प्रवास बाकीय ! तिच्यासोबत नेहमी डिपार्टमेंटच्या दोन चार जणी असतात‌च. त्यामुळं ऑफिसात गेलं तरी फक्त दर्शन होतं. ‘बोलणं कधी होणार काय माहीत?’ असं वाटत असतानाच ‘उद्या मॅडम हाफ डे नं जाणार आहेत’ हे त्याच्या कानावर पडलं.
‘जेवणाच्या सुट्टीतच निघेल ती ! काही करून उद्या गाठायलाच हवं.’ त्याचा निर्धार पक्का झाला. 
दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठला. चकाचक झाला. मस्त स्काय ब्लू कलरचा शर्ट घातला. काळी ट्राऊझर. मॅचिंग टाय बांधली. डिओ फवारला. कधी नव्हे ते फाऊंडेशन लावलं. कोणीतरी मागं म्हटलेलं, 
‘तिला चाफा आवडतो !’
‘अरे चाफा तर आपल्या सोसायटीतच आहे.’ म्हणत तो दोन मजले खटखट शूज वाजवत खाली उतरला. वॉचमनला सांगून चाफा काढून घेतला आणि घरून आणलेल्या डब्यात भरला. झाकण लावण्याआधी वाकून चाफ्याचा गंध नाकातून आत खोलवर उतरवून घेतला.
‘काय आवड असते ना काहींची !’ म्हणत त्यानं वॉचमनला ‘थॅंक्यू’ म्हणत गेटबाहेर पाऊल टाकलं.
मनाचं मोरपीस आज ट्रेननं जायला अनुमती देईना. कसं देईल? ट्रेनच्या गर्दीत कपड्यांची वाट लागली असती सगळी. त्यानं ॲप काढून कॅब बुक केली. “एसी फुल करो.” असं ऐटीत सांगून कॅबमध्ये बसला. ऑफिसच्या दिशेनं कॅब दामटवायला लावली.
‘राजा माणूस’ असल्यासारखं फिलिंग येत होतं त्याला. भेटीच्या हुरहुरीत पहिलं सेशन संपून लंच टाईम झाला. टिफीन न खाता तो चाफ्याचा डबा घेऊन धावतच ऑफिसच्या एन्ट्रन्सजवळ येऊन उभा राहिला. ती आली. नेहमीसारखीच रुबाबात. तिला मिळणारा आदर पाहून त्याला उगाचच भारी वाटत होतं. डोअरकिपरनं दरवाजा उघडून तिला कडकडीत सॅल्युट केला. त्याच्या छातीत धडधडलं. त्यानं त्याही परिस्थितीत समोरच्या काचेत स्वतःला पाहून घेतलं. ती काही फुटांवर आली तसा तो घाबरून पिलरमागे लपला. ‘चिल् ब्रो, अभी नहीं तो कभी नहीं...’ म्हणत स्वतःला चिअर अप केलं आणि भसकन् तिच्या समोर येत उभा राहिला. 
पुढं येणाऱ्या वॉचमनला तिनं हातानंच थांबायला सांगितलं. 
“काय रे? असा काय वाट अडवून उभा राहिलास?” तिनं हसत विचारलं.
“मॅडम?”
“हं. बोल..”
“तुम्ही फार छान आहात !”
“मला माहितीये.”
“मॅम, तुम्हाला आवडतो म्हणून चाफा आणलाय...” त्यानं डब्याचं झाकण उघडून डबा तिच्यासमोर धरला. तिनं त्यातली दोन फुलं काढून कानाजवळ खोवली. त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांचे काठ भरले होते. ती थोडी पुढे झाली. दोन्ही हातात त्याचा चेहरा पकडला. टाचा उंच करत त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या डोळ्यातही पाणी तरळलं. 
“तुझी आई दिसते ना माझ्यात तुला?” 
त्याच्या गालावरून हात फिरवत तिनं विचारलं.
“हं... पण तुम्हाला कसं कळलं?”
“पंकजनं सांगितलं आणि तुझ्या नजरेतही दिसतं ते !” 
“तुम्हाला माहिती होतं?”
“हं... मी याच क्षणाची वाट पाहत होते !” तिनं डोळे पुसत म्हटलं. पर्समधलं चॉकलेट काढून त्याला दिलं आणि त्यानं न राहवून तिला घट्ट मिठी मारली. घशातून एकच हुंदका निघाला त्याच्या. तिनं त्याच्या पाठीवरून हात फिरवत मोकळं होऊ दिलं त्याला. 
त्याची आई अशीच होती. हॉस्पिटलमध्ये नर्स होती. अशीच दिसायची. अशीच हसायची. नजरेतला करारीपणा आणि रागही असाच. त्याची नजर वाचता यायची तिला. ऑन ड्युटी एकदम अशीच शूजचा टॉक टॉक आवाज करत चालायची. तो दहा वर्षांचा असताना ॲक्सिडंटमध्ये गेली. तो तेव्हापासून आईच्या वयाच्या बाईत ‘आई’ शोधत फिरतोय. मॅडम त्याला अगदी आईचं दुसरं रूप भासल्या होत्या !
गेले वर्षभर तो मॅडमला भेटायचा, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता. आज भेटला, बोलला आणि पंधरा वर्षं तग धरून असलेला बांध फुटला. नाक आणि डोळे पुसत तो बाजूला झाला.
“मी एवढी भीतीदायक आहे का रे? तुला वर्ष लागलं माझ्यासमोर यायला?” ती गोड आवाजात म्हणाली.
“नाहीऽऽ मॅडम… ते…”
“राहू देत. काही बोलू नकोस. आता मी निघते. घाईत आहे जरा. येत्या रविवारी घरी ये जेवायला. निवांत गप्पा मारू. साहेबांना सांगते, ‘आता आपल्या राजला दादा पण आहे.'' ती त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाली आणि जायला वळली. 
“हो मॅडम, थॅंक्यु मॅडम.” म्हणत त्यानं एक स्वतःभोवती गिरकी मारली. 
“सुजय.” मॅडमनी कारमध्ये बसण्याआधी आवाज दिला. 
“येस मॅम.” म्हणत तो तिच्याजवळ जाऊन उभा राहिला.
“कान कर इकडे.” 
त्यानं वाकून कान तिच्या चेहऱ्यासमोर नेला. 
“मला चाफा आवडतो. पण हा नाही, तर सोनचाफा. तू आणलास तो चाफाच आहे पण तो देवचाफा !” तिने हसत त्याच्या कानात सांगितलं. त्यानं हसून मान डोलावली. ती गाडीत बसली आणि त्याला बाय करून निघून गेली. 
‘मॉं... हे तुझंच दुसरं रूप आहे. येस्, ही तूच आहेस. आपली आवड माझ्या कानात सांगणारी...ही तूच आहेस !’
‘सुजय, डफर कुठला. तुला देवचाफा आणि सोनचाफ्यातला फरक कळत नाही? आता रविवारी दादर मार्केटमधून ताजा चाफा घेऊन जा.’ त्यानं स्वतःला सूचना केल्या.
‘आता मला तुला गमावून चालणार नाही आई ! लव्यू आई, लव्यू सो मच.’ म्हणत त्याने फ्लाईंग किस हवेत सोडलं आणि स्वतः भोवती पुन्हा एक गिरकी मारली.  
समोर दिसणारा छोटासा दगड शूजच्या टोकानं लांब उडवला आणि शीळ घालतच ऑफिसमध्ये घुसला.

- सौ. वर्षा विशाल ठुकरुल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...