शनिवार, २५ जुलै, २०२६

3067. सहजीवन

     सहजीवन कसं असावं? दोघांसाठी ते सहज असावं ! वारुणी जसजशी जुनी होत जाते तसतशी ती जास्तीत जास्त मॅच्युअर होत जाते. तसंच असावं सहजीवन आणि बहुतेक ते तसंच असतं. उलटणाऱ्या प्रत्येक वर्षा बरोबर ते आणखीनचं गहिरं होत जातं,व्हायला हवं ! केसांचा रंग जसजसा करडा होत जातो,किंवा केस डोक्यावरून फारकत घ्यायला लागतात,चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची नक्षी जसजशी आणखी जाळीदार व्हायला लागते,तसतशी मनाला वेढून बसलेल्या इगो, अहंकाराची पुटं गळायला लागतात. तशी ती गळायला हवीत, म्हणजे मग सहजीवन होतं आनंदयात्रा.! 
ॲरेंज्ड मॅरेज V प्रेमविवाह हा अनादी काळापासून चालत आलेला वादाचा विषय आहे. कदाचित अनंत कालापर्यंत संपणार नाही.
सहजीवन यशस्वी होणं अथवा अयशस्वी होणं हे सaर्वस्वी त्या दोन व्यक्तींवर अवलंबून आहे. लग्न अरेंज्ड आहे की प्रेमविवाह हा मुद्दा खरोखरच गौण आहे.
सहवासाने प्रेम वाढत जातं. जनावराशी सुद्धा सहवासाने माणसाला लळा लागतो मग आपल्या जोडीदाराविषयी ममत्व आणि प्रेम निर्माण होणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे.
अंगात रग असते, मस्ती असते, तेंव्हा जोडीदाराला कमी लेखणे, मिळेल तिथे अपमानित करणे अशा विकृत गोष्टीत आनंद शोधला जातो.
हे असं काही सगळ्यांच्या बाबतीत होतं अस नाही, पण थोड्याबहुत प्रमाणात हे असं होतं खरं.!
बरेचसे या अनुभवातून जातात.वय वाढल्यानंतर या गोष्टी किती हास्यास्पद होत्या हे ही समजतं.
शरीर वार्धक्याकडे झुकायला लागलं, अंगातली मस्ती कमी झाली की जोडीदाराची किंमत कळायला लागते.
त्यातून दुर्दैवाने एखादी दुर्धर व्याधी जडली तर सहृदयी आणि सुसंस्कृत जोडीदार लाभणं हा केवढा मोठा आधार आहे हे त्यातून जाणाऱ्यालाच समजते.
तिथे अरेंज्ड आणि प्रेमविवाह असा काही फरक पडत नाही.
दुर्दैवाने असा प्रसंग वैऱ्यावर ही न येवो.
आयुष्याची गाडी सामान्य गतीने फारसे खाचखळगे नसलेल्या रस्त्यावरून जात असता ही जोडीदाराची किंमत ज्यांना कळते ते भाग्यवान.!
इथेही अरेंज्ड आणि प्रेमविवाह यामुळे फारसा मोठा फरक पडत नाही.
प्रेमविवाहाची बाजू मांडणाऱ्या लोकांचा आवडता मुद्दा असतो की, अरेंज्ड विवाहामध्ये तीस चाळीस वर्षांच्या सहवासानंतर सुद्धा जोडीदाराचा स्वभाव कळत नाही.
त्याच्या मनात काय चाललय कळत नाही.
खरं तर अतिशय फोल आहे हा मुद्दा...
हे कोणत्याही जोडप्याच्या बाबतीत संभवतं.
त्यांचा दुसरा आवडता मुद्दा म्हणजे आयुष्यभर तडजोड करावी लागते.!
खरं तर या मुद्द्यातही काही दम नाही.
अशी ना तशी थोडीतरी तडजोड प्रत्येकालाच करावी लागते.
पु.ल.देशपांडे-सुनिताबाई, 
आनंदी गोपाळ-यशवंतराव 
वेणूताई-अप्पा बेलवलकर 
कावेरी-जयंत नारळीकर, 
मंगलाताई-गांधी 
बाबा आमटे-साधनाताई,
प्रकाश- मंदाकिनी,
ज्योतिबा-सावित्री] मेरी क्यूरी-पिअरे क्यूरी,
कवी अनिल-कुसुमावती,
लाल बहादूर-ललितादेवी,
नारायण-मूर्ती सुधा कुलकर्णी,
ही झाली उत्तुंग व्यक्तिमत्वांची उदाहरणं...
खूप लांबेल ही यादी पण, कुठेतरी थांबायलाच हवं...
यात दोन्हीही प्रकार आले.
माझ्यावर अन्याय होतो आहे,
माझ्याकडे हवं तेवढं लक्ष पुरवलं जात नाही,
आयुष्य म्हणजे केवळ तडजोडी पुरतं उरलय असं या जोडप्यांच्या मनात आलं असतं तर..!
मध्यंतरी लोकसत्तेत सहजीवन या विषयावरची लेखमाला वाचल्याचं स्मरतयं.
संजय मोने सुकन्या,परेश मोकाशी मधुगंधा कुलकर्णी आदि मान्यवरांनी आपलं प्रांजळ मनोगत व्यक्त केल्याचं आठवतय.
आता आपल्या आजूबाजूला जरी पाहिलं तरी अशी अनेक उदाहरणं सापडतील. 
माझ्या गणगोतातील दोन प्रातिनिधिक उदाहरणं.
पहिलं उदाहरण दोघेही सिनियर सिटीझन. 
चाळीस पन्नास वर्षांचं सहजीवन.
पती उच्चशिक्षित,सुसंस्कृत उच्चपदस्थ कर्तबगार रिटायर्ड.
पत्नी गृहिणी,सुगरण, सुशिक्षित,सुसंस्कृत, गृहकृत्यदक्ष,पती डॉमिनेटिंग, मुलांवर सुसंस्कार केले.मुलंही यशाच्या सर्व पायऱ्या चढत गेली.त्याचबरोबर आईवडिलांची मनापासून सेवा केली.वृद्धापकाळात त्यांना सांभाळले.
ही जोडी कायम एकमेकांच्या सहवासात राहिली.अगदी तू तिथे मी ! पत्नीच्या निधनानंतर अवघ्या महिना पंधरा दिवसात हे ही देवाघरी गेले.मुलगा सुनबाई,लेक जावई सुसंस्कृत पूर्ण काळजी घेणारे,प्रेमाने सांभाळणारे.
पण,पत्नीवियोगानंतर त्यांची जीवनेच्छाचं संपली.
अरेंज्ड मॕरेज...
दुसरं उदाहरण त्या मानाने अलिकडचं.
माझ्या भावाचंच..!
सख्खा नाही पण रिलेशनशिप सख्ख्यासारखेचं.
नवरा बायको दोघेही बँकेतून उच्च पदावरून रिटायर.
सुमारे चाळीस वर्षांचं सहजीवन.
दोघांच्या पत्रिकेत मृत्यू षडाष्टक योग.
चाळीस वर्ष होतील, उत्तम सहजीवन चालू आहे. रिटायरमेंट नंतर महानगरातील धकाधकीचं जीवन सोडून निसर्गाच्या सानिध्यात मजेत रहाताहेत. संसारातील कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली, दोन्ही मुलींना उच्चशिक्षित केले.एक संसाराला लागली दुसरीही लागेल. क्वचित प्रसंगी भांड्याला भांडही लागत असेल, आपापला ईगो व्यवस्थित संभाळून आहेत. पण एकमेकाशिवाय करमणार नाही.
प्रेमविवाह.!
सुरुवातीची वर्षं शारिरीक आकर्षणाची, मध्यम वयातील वर्षं एकमेकांना समजून घेण्याची आणि आनंदी सहजीवनाची.
उत्तरार्धाची वर्षं एकमेकांच्या आधाराची असतात.
मग पर्याय अरेंज्ड किंवा लव्ह कोणताही असो !
मात्र संध्याछाया भिवविती हृदया हा काळ एकमेकांचे हात घट्ट पकडण्याचा असतो.
"You are wonderful." सुप्रसिद्ध लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांचे आपल्या पत्नीला उद्देशून काढलेले अखेरचे उद्गार होते.
माझ्यावर अन्याय होत आहे,
मला दुर्लक्षलं जातयं,
केवळ तडजोडचं चालू आहे,
ही मनोवृत्ती टाळली आणि आपल्या जीवलगांसाठी थोड्या त्यागाची तयारी ठेवली तर जीवन आणि सहजीवन हा केवळ आनंद सोहळाच ठरतो.
असा आनंदसोहळा सर्वांचा व्हावा आणि प्रत्येकाची कहाणी सुफळ संपूर्ण होवो ! याचसाठी केला होता अट्टाहास..!


मुकुंद कुलकर्णी ©

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...