दोनेक पेशंट झाले आणि “नेक्स्टऽऽ…” म्हणत मी बेल दाबली.
आतला पेशंट औषधांची चिठ्ठी हातात घेऊन बाहेर गेला,
बाहेरच्या पेशंटची फाईल ऑलरेडी टेबलवर येऊन पडली होती. मी ती उघडणारच इतक्यात बाहेरून आवाज आला…
“रोम रोम भाईयों...!”
दोन सेकंद शांतता… मग दुसरा आवाज,
”अभी मजा आयेगा ना भिडू…!”
तिसरा, “रुको जरा… सब्र करो…!”
मी दाराकडे पाहिलं.
पुन्हा… ”क्या बात है सर…!”
पुन्हा…
“ख…त…म…!”
मग…
“टेक्नॉलॉजिया…!”
आणि अचानक…
“लेकिन… एक सेकंड…!”
माझ्या लक्षात आलं, बाहेर भांडण झालेलं नाही. कुणी बोलतही नाहीये. फक्त वेटिंग एरियात बसलेले चार-पाच लोक मोबाईलवर रील्स पाहत होते…
कोणाच्याही कानात इअरफोन नाहीत. प्रत्येकाचा मोबाईल पूर्ण आवाजात आणि त्या सगळ्या आवाजांची एक अशी भेळ झाली होती की, एखाद्या डीजेनं मेंदूवर सरळ हल्लाच चढवला होता.
अजून मी या धक्क्यातून सावरत नाही तोच…
“प्यारी समझ गयीऽऽ…”
आणि त्यानंतर…
‘टे टे टे टे टे… टि टि टि टॅ… टे टे टे टे टे… टि टि टि टू टॅऽ… टॅऽऽ टॅऽऽऽ… टॅडडिट्टूटिडडिट्टूटिटिडीटीटॅऽऽऽऽ…’
माझ्या हातातलं पेनही दोन सेकंद थरथरलं.
काही वर्षांपूर्वी वेटिंगमध्ये बसलेले लोक वर्तमानपत्र वाचायचे, काही मासिकं चाळायचे, काही एकमेकांशी बोलायचे… कुणी दुसऱ्या पेशंटशी ओळख काढायचा, डॉक्टर कसे आहेत, याची चौकशी करायचा. एखादं मूल भिंतीवरच्या शरीररचनेच्या चार्टकडं बघून प्रश्न विचारायचं…
आणि आता?
दहा माणसं बसलेली असतात पण तिथं एकही माणूस नसतो; सगळे कुठेतरी दुसरीकडे गेलेले असतात!
कुणी दुबईतल्या फूड ब्लॉगरसोबत, कुणी अमेरिकेतल्या प्रँक व्हिडिओमध्ये, कुणी कोरियन स्किनकेअरमध्ये, कुणी क्रिकेटच्या रीलमध्ये, कुणी राजकारणात, तर कुणी कट-कारस्थानात… आणि बाकी सगळे त्या ‘टे टे टे…’ च्या तालावर मेंदूचा ताबा गमावत असतात.
आपल्याला वाटतं आपण रील्स पाहतो… पण खरं काय घडतं? रील्स आपल्याला पाहत असतात…
तुम्ही कुठं थांबलात? कशावर हसलात? कुठं दोन सेकंद जास्त पाहिलं? कुठं लाईक केलंत? कुठं स्क्रोल केलंत…? सगळं पद्धतशीरपणे नोंदवलं जातं. मग अल्गोरिदम म्हणतो,
‘याला हसू आवडतं…’
‘याला भांडण आवडतं…’
‘याला भीती दाखवा…’
‘याला कटकारस्थान दाखवा…’
‘याला डॉक्टर दाखवा…’
‘याला बाबा दाखवा…’
‘याला मांजर दाखवा…’
आणि मग…
तुमचा मोबाईल तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखू लागतो!
पूर्वी बाजारात वस्तू विकल्या जायच्या आणि आता लक्ष विकलं जातं. जगातली सर्वात मोठी चलनप्रणाली आता पैसा नाही… ती आहे– ‘Attention Economy!’
तुम्ही एका रीलवर जितका वेळ थांबता, तितका कुणीतरी श्रीमंत होत असतो… आणि तुम्हाला वाटतं, ‘मी फक्त पाच मिनिटं मोबाईल पाहिला!’
खरं म्हणजे तुमच्याकडून ही पाच मिनिटं विकत घेतली गेलेली असतात!
एकदा गंमत म्हणून मी ओपीडीत मोजलं, तेव्हा आढळलं… एका पेशंटनं खुर्चीवर बसल्यापासून आत येईपर्यंत चार मिनिटं वाट पाहिली, त्या चार मिनिटांत त्यानं अठ्ठावीस रील्स पाहिल्या. चार मिनिटं, दहा शहरं, आठ राज्यं, बारा देश, तीन ग्रह-्, एक आकाशगंगा, कितीतरी चेहरे, अठ्ठावीस आवाज, अठ्ठावीस भावना, अठ्ठावीस वेळा मेंदूला डोपामिनचा छोटासा धक्का…!
मग लोक म्हणतात, “डॉक्टर, हल्ली ना सारखं विसरायला होतं. पुस्तक वाचायला लक्षच लागत नाही, सारखा थकवा येतो. उल्हासच वाटत नाही…”
लागणार कसं? ज्याला दर आठ सेकंदांनी नवीन खेळणं दिलं जातं, तो पाच मिनिटं भानावर का थांबेल?
कधीकधी मी मुद्दाम सीसीटिव्ही स्क्रीनवर वेटिंग एरियात पाहत बसतो…
आई-मुलगा दोघंही मोबाईलमध्ये. नवरा-बायको दोघनही मोबाईलमध्ये. मित्र शेजारी बसलेले… पण गप्पा मात्र मोबाईलशी.
कदाचित आजची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे, आपण जगाशी जोडले गेलो आणि एकमेकांपासून तुटलो!
सगळे तो एवढंसं डबडं हातात घेऊन अंगठा वर-खाली करत असतात. त्यांच्या डोळ्यांसमोर प्रत्येक दहा सेकंदांनी नवं विश्व जन्माला येतं आणि मरतं.
एका मिनिटात पाच विनोद, दोन रेसिपी, एक मोटिवेशन, तीन डान्स, दोन राजकीय भांडणं, एक डॉक्टर, एक बाबा, दोन मांजरी, एक एलियन आणि शेवटी ‘Follow for more…’
आपल्या मेंदूची एक सवय असते… त्याला नवीन गोष्ट आवडते. प्रत्येक नवीन रील म्हणजे एक छोटंसं बक्षीस. मेंदूत डोपामिनचा हलका फवारा उडतो… म्हणून पुढची रील… पुढची… आणखी पुढची… आणखी…
आणि नकळत अर्धा तास संपतो!
हीच तर सोशल मीडिया कंपन्यांची कमाल आहे. त्यांना तुमचा ‘वेळ’ हवा असतो आणि वेळ विकत घेण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे तुमचं लक्ष चोरून नेणं.
पूर्वी व्यसन म्हणजे दारू, सिगारेट, तंबाखू…
आणि आता…?
अंगठा!
होय… अंगठ्याचं व्यसन! हा आजार अंगठ्यापासून सुरू होतो आणि हळूहळू लक्ष, वेळ, संवाद, वाचन, शांतता आणि शेवटी स्वतःशी राहण्याची क्षमता गिळून टाकतो!
एखादा माणूस एक तास मोबाईलवर रिल्स स्क्रोल करत बसतो; त्या एका तासात फोनची बॅटरी साधारण १०–२०% कमी होते.
स्क्रीन सतत चालू, इंटरनेट सुरू, प्रोसेसर सतत व्हिडिओ डिकोड करत असतो, स्पीकर, कंपनं, नोटिफिकेशन्स… सगळं मिळून ऊर्जा खर्च करत असतात…
पण या प्रक्रियेत फक्त फोनची बॅटरीच संपते का?
तर नाही…
त्याच वेळी माणसाचीही एक ‘बॅटरी’ हळूहळू रिकामी होत असते. फरक एवढाच की फोनमध्ये टक्केवारी दिसते आपल्यात दिसत नाही!
मानवी मेंदू शरीराच्या वजनाच्या फक्त २% असला तरी तो शरीरातली जवळपास २०% ऊर्जा वापरतो. ही ऊर्जा मुख्यतः ग्लुकोज आणि ऑक्सिजनच्या स्वरूपात वापरली जाते…
रिल्स पाहताना आपण ‘आराम’ करतोय असं वाटतं… पण प्रत्यक्षात मात्र मेंदू सतत काम करत असतो.
प्रत्येक १०–३० सेकंदांनी नवीन दृश्य, नवीन चेहरा, नवीन संगीत, नवीन माहिती, नवीन भावना आणि प्रत्येक नवीन कन्टेन्टवर मेंदूला पुन्हा लक्ष केंद्रित करावं लागतं. याला ‘Attention Switching Cost’ म्हणतात. प्रत्येक बदलाची एक किंमत असते.
‘रिल्स’ हे आपल्या मेंदूतल्या Reward Prediction System साठी खास डिझाईन्ड असतात…
पहिली रिल मजेदार असते. दुसरी कदाचित त्याहून चांगली… तिसरी कंटाळवाणी… चौथी अप्रतिम…
हा अनिश्चित बक्षिसांचा खेळ मेंदूला सतत पुढची रिल पाहायला भाग पाडतो. यामुळं डोपामिनचे वारंवार छोटे स्पाईक्स येतात आणि परिणामी साध्या गोष्टी कमी रोमांचक वाटू लागतात. अभ्यास, वाचन, काम, चिंतन, मनन यांमध्ये रस कमी होतो. संयम घटतो. मेंदूला सतत नवीन उत्तेजना हवीशी वाटते…
‘रिल्स’मध्ये एका तासात १५० ते ३०० व्हिडिओ सहज पाहिले जाऊ शकतात… म्हणजेच एका तासात मेंदू शेकडो वेळा विषय बदलतो.
ही प्रक्रिया लक्ष केंद्रित करण्याच्या नैसर्गिक क्षमतेवर परिणाम करू शकते, म्हणूनच नंतर पुस्तक वाचायला बसल्यावर दोन पानांनंतर मोबाईल हातात घेतला जातो.
प्रत्येक ‘रिल’नंतर नकळत मेंदू निर्णय घेतो… पुढं स्क्रोल करायचं? लाईक करायचं? शेअर करायचं? सेव्ह करायचं?
कमेंट करायची?
प्रत्येक निर्णय अगदी सूक्ष्म असला, तरी दिवसाच्या शेवटी त्यांची बेरीज मोठी होते!
एका तासात आपण पाहतो– अपघात, कॉमेडी, प्रेरणादायी भाषण, दुःख, लग्न, युद्ध, प्रवास, श्रीमंती, फिटनेस, राजकारण…
प्रत्येक व्हिडिओ वेगळी भावना जागवतो. हसणं, मत्सर, राग, भीती, आश्चर्य-करमणूक… मेंदूला प्रत्येक भावनेशी जुळवून घ्यावं लागतं.
भावनिक गिअर इतक्या वेगानं बदलणं, हीसुद्धा ऊर्जा खर्च करणारी प्रक्रिया आहे.
विशेषतः रात्री रिल्स पाहिल्यास स्क्रीनचा प्रकाश ‘मेलाटोनिन’ची निर्मिती कमी करू शकतो. उत्तेजक कन्टेन्टमुळं मेंदू शांत होण्यास वेळ लागू शकतो. झोप उशिरा लागणं किंवा झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते… त्यामुळं दुसऱ्या दिवशी मानसिक ऊर्जा आणखी कमी जाणवते.
एक तास रिल्स पाहताना बहुतेक वेळ मान पुढं झुकलेली, खांदे ताणलेले, डोळ्यांचा सतत स्क्रीनवर ताण, पापण्यांची उघडझाप कमी, बसून राहिल्यानं हालचाल कमी… यामुळं डोळे कोरडे पडणं, मान-खांद्याचा त्रास आणि शारीरिक जडत्व वाढू शकतं.
हे सगळं किलोकॅलरीमध्ये मोजणं कठीण आहे… कारण प्रश्न फक्त ‘कॅलरीं’चा नाही. पण एक तास रिल्सनंतर अनेकांना डोकं जड झाल्यासारखं जाणवणं, कामाला बसायची इच्छा नसणं, लक्ष विचलित होणं, काहीच न करताही थकल्यासारखं वाटणं… यालाच मानसिक आणि भावनिक ऊर्जा कमी झाल्याचा अनुभव म्हणता येईल.
आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा इसम रोज अर्धा किलोमीटरची पोस्ट लिहितो, कमेंट करतो आणि हे सगळं मोबाईलवर करतो… हा मग आपल्यालाच हे फुकटचं ज्ञान?
एक तास रिल्स स्क्रोल करणारा आणि एक तास मोबाईलवर एखादं पुस्तक वाचणारा किंवा लेख लिहिणारा दोघांच्याही फोनची बॅटरी जवळपास सारखीच कमी होईल… पण त्यांच्या मेंदूची ‘बॅटरी’ मात्र अगदी वेगळ्या प्रकारे वापरली जाईल!
रिल स्क्रोल करतांना मेंदू सतत विचारतो,
‘पुढची रिल कशी असेल…?’
‘आणखी काही मजेदार आहे का…?’
आणखी… आणखी…आणखी…
ही प्रक्रिया मेंदूला सतत नवीन उत्तेजनांच्या शोधात ठेवते.
वाचन करताना मात्र एखादा चांगला लेख, पुस्तक किंवा संशोधन पेपर वाचताना मेंदूची प्रक्रिया पूर्णपणे बदलते.
तो माहिती जोडतो. जुन्या आठवणी जाग्या करतो. नवीन संकल्पना तयार करतो. प्रश्न निर्माण करतो. निष्कर्ष काढतो… याला ‘Deep Processing’ म्हणतात. इथंही ऊर्जा खर्च होतेच पण ती गुंतवणूक असते.
लिहिताना तर अजूनच वेगळं घडतं… लेखन म्हणजे मेंदूसाठी जिम. कारण त्यात एकाच वेळी अनेक विभाग काम करतात… आठवण, भाषा, तर्क, कल्पनाशक्ती, भावना आणि नियोजन. यामुळं न्यूरॉन्समध्ये नवीन जोडणी मजबूत होतात यालाच ‘Neuroplasticity’ म्हणतात.
आर्थिक भाषेत सांगायचं तर…
रिल्स म्हणजे खर्च,
वाचन म्हणजे गुंतवणूक
आणि लेखन म्हणजे भांडवल निर्मिती!
समजा तुमच्या खात्यात रोज ₹१००० जमा होतात आणि जर दिवसभर फक्त खर्चच केला तर रात्री शिल्लक कमी राहील… पण त्याच पैशातून एखादा व्यवसाय सुरू केला, तर पुढं त्यातून उत्पन्न निर्माण होईल.
मेंदूची ऊर्जाही तशीच आहे… वाचनानंतर कसं वाटतं? होय, डोळे थकू शकतात. मान दुखू शकते… पण अनेकदा मन शांत होतं. विचाराच स्पष्टता येते. काहीतरी नवीन शिकल्याचं समाधान असतं!
लेखनातही ऊर्जा खर्च होते… पण त्याच वेळी अर्थ, समाधान आणि सर्जनशीलतेची ऊर्जा पुन्हा निर्माणही होते. इट्स लाईक रिचार्ज!
अगदी एका वाक्यात सांगायचं तर, रिल्स तुमचं लक्ष खाऊ शकतात, वाचन तुमचं लक्ष घडवतं, लेखन तुमचा विचार घडवतं!
सरतेशेवटी, मोबाईल हा हातातील एक साधन आहे. त्यावर तुम्ही एक तास न थांबता रिल्स पाहू शकता किंवा एखादं उत्तम पुस्तक वाचू शकता किंवा आयुष्य बदलणारा लेख लिहू शकता.
तीनही गोष्टींसाठी स्क्रीन तोच, बॅटरी तीच, वीज तीच… फरक फक्त एवढाच–
पहिल्या प्रकारात फोन स्मार्ट असतो आणि वापरणारा निष्क्रिय…
आणि दुसऱ्या प्रकारात फोन स्मार्ट असतो, पण वापरणारा अधिक स्मार्ट होत जातो!
म्हणून प्रश्न ‘स्क्रीन टाईम किती?’ हा नाही…
खरा प्रश्न आहे, ‘त्या स्क्रीन टाईमनं तुमच्या मेंदूत काय निर्माण केलं…? क्षणिक उत्तेजना की दीर्घकालीन क्षमता?’
- डॉ प्रज्ञावंत देवळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा