काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा फोटो बघितला. बघताक्षणी भावला मनाला आणि मग नकळत काळजात खोल कुठेतरी एक विचारधारा सुरू झाली. कितीही प्रयत्न केला तरी फोटोतल्या त्या दोघांच्या चेहेऱ्यांवरचे ते भाव माझा पिच्छा सोडत नव्हते; आणि मग हळूहळू मला त्या दोघांमधलं ते मूक संभाषण अगदी स्पष्टपणे ऐकू येऊ लागलं. तेच सगळं आज शब्दरुपात तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करते आहे. कदाचित काही जणांना माझं हे लिखाण म्हणजे कल्पनाशक्तीचा व्यर्थ विलास वाटेल, पण जोपर्यंत माझ्या मनातलं हे वैचारिक मंथन मी शब्दांत उतरवत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. म्हणून हा सगळा खटाटोप ! माझं हे लिखाण वाचून तुम्हांला नक्की काय वाटलं ते जरूर सांगा !
------------------------------------------------------------------------------------
खुप थकलोय गं.. शरीरापेक्षाही जास्त मनाने थकलोय ! समस्त पशु गणांचा अनभिषिक्त सम्राट म्हणवून घेण्यातही आता फारसं स्वारस्य उरलं नाहीये.
अगं, खरंच सांगतोय मी... तुझ्याशी खोटं बोलणं कधी जमतच नाही मला. आजपर्यंत एकदाही तसा विचारही नाही शिवला मनाला आणि मी जरी कितीही प्रयत्न केला ना तरी तुझ्यापासून काहीच लपवून ठेवता येणार नाही. कधीच ... कारण माझ्या डोळ्यांतून सरळ माझ्या हृदयाचा ठाव घेते तुझी नजर. तरीही आज माझ्या मनात साठलेलं सगळं मळभ तुझ्यासमोर मोकळं करावंसं वाटतंय. आणि माझी खात्री आहे – तू सुद्धा माझा प्रत्येक शब्द नेहेमीच्याच शांतपणे ऐकून घेशील. तुला आधीच सगळं माहीत असून सुद्धा !
रोज सकाळी उठून जेव्हा मी आपल्या गुहेतून बाहेर येतो ना, तेव्हा सकाळच्या थंड वाऱ्याच्या झोतात हळुवार लहरणारी माझी ही आयाळ मला तितक्याच हळुवारपणे इतर प्राण्यांपासून दूर , उंचावर – माझ्या अदृश्य सिंहासनावर नेऊन ठेवते. तिथून जेव्हा मी आजूबाजूला बघतो तेव्हा तू सुद्धा खूप लांब भासतेस मला माझ्यापासून. त्याच क्षणी मनात कुठेतरी काहीतरी निसटलेलं असतं. पण तरीही मी माझं राजेपण मिरवत, त्याचा डोलारा सावरत दिवसभर रानावनात येरझाऱ्या घालत राहतो; कधी कधी उगीचच – संध्याकाळ होण्याची वाट बघत, तर बऱ्याच वेळा इतर प्राण्यांच्या डोळ्यांत माझ्याविषयी दिसणारा भीतीयुक्त आदर पडताळून पाहण्यासाठी! माझा अहं सुखावतो अशावेळी !
पण म्हणतात ना, राजाचा मुकुट हा नेहेमी काटेरी असतो. इतरांना फक्त तो मुकुट आणि त्याबरोबर मिळणारा मानसन्मान दिसतो; पण तो धारण करणाऱ्यालाच जाणवतं काट्यांचं ते टोचणं आणि त्यामुळे होणाऱ्या त्या अदृश्य जखमा – मनावर उठणारे असंख्य ओरखडे!
मलाही वाटतं – इतर प्राण्यांसारखं दिवसभर रानावनात भटकावं, कधी शिकार शोधण्यासाठी तर कधी उगीचच मुक्त संचार करत सगळं रान पालथं घालावं. तुझ्याबरोबर गवतात नुसतंच निवांत पहुडावं. आपल्या छोट्या छोट्या निरागस बछड्यांची लुटुपुटुची भांडणं, त्यांच्या खोड्या बघत कृतार्थ व्हावं !
मलाही वाटतं – तुझ्यासाठी आणि आपल्या पिल्लांसाठी खूप कष्ट घ्यावे; तुमच्या आवडीची शिकार करुन आणावी. तुमच्या डोळ्यांत माझ्याविषयी दिसणारं प्रेम, अभिमान रोज नव्याने बघावा. आणि रोज दिवस मावळताना जेव्हा मी आपल्या गुहेच्या दिशेने येत असेन तेव्हा तिथेच आसपास तू दिसावीस. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली; अधीरतेने माझी वाट बघणारी. मला बघताच आपल्या बछड्यांनी माझ्या अंगाखांद्यावर उड्या मारत मला भंडावून सोडावं! बस्. एवढ्याच अपेक्षा आहेत माझ्या आयुष्याकडून ; इतकंच मागणं आहे! पण...पण हे शक्य नाही... कदापि शक्य नाही- याची जाणीव आहे मला. आणि याचं एकमेव कारण म्हणजे – मला परंपरागत मिळालेलं अनभिषिक्त सम्राट पद ! हो ना, या जंगलाचा राजा आहे ना मी... मग ‘ मी स्वतः रानावनात भटकून तुमच्यासाठी शिकार करुन आणणं ‘ – हे शोभत नाही माझ्या प्रतिमेला ! काही जणांना माझं ‘ शिकार न करणं ‘ इतकं खटकतं... की ते मला ‘ नाममात्र राजा ‘ म्हणतात. माझ्या समोर जरी मला मान देत असले तरी माझी पाठ वळताक्षणी कित्येक जण माझी चेष्टा करतात.
कधीकधी वाटतं, झुगारून द्यावा हा काटेरी मुकुट; करावा त्याग त्या अदृश्य सिंहासनाचा; जगावं एक सामान्य आयुष्य तुमच्या बरोबर ! पण… पण … हा एक शब्द माझी सगळी स्वप्नं, माझ्या सगळ्या अपेक्षा फोल ठरवतो. कितीही प्रयत्न केला तरी राजेपणाचं हे ‘ जू ‘ मानेवरून उतरवून ठेवता येत नाही. कारणं बरीच आहेत त्यासाठी. वर्षानुवर्षं चालत आलेले अरण्याचे कायदे आणि अलिखित नियम, इतर प्राण्यांच्या मान्यता आणि अपेक्षा आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणशील तर – वेगळी वाट चालण्यासाठी, आपल्या मनासारखं वागण्यासाठी जी बेदरकार, मनस्वी वृत्ती असायला हवी – तीच नाहीये बहुदा माझ्या ठायी ! हे असं पठडीतलं आयुष्य जगण्यात जी एक प्रकारची सुरक्षित भावना आहे ना ; तीच बरी वाटते मला. आणि म्हणूनच मग हे असं आयुष्य जगण्यासाठी जे जे अपेक्षित आहे ते सगळं करावं लागतं मला – मग भलेही मला ते पटो अथवा ना पटो !
पण हे सगळं मी कोणा कोणाला सांगणार? कसं पटवून देणार? मीं कितीही पोटतिडकीेने सांगितलं तरी कोण विश्वास ठेवेल माझ्यावर? कोणाला कळेल माझी ही द्विधा मनस्थिती; आणि त्यामुळे होणारी माझी ही घुसमट? म्हणूनच मी कोणालाच काही सांगत नाही… माझ्या वागण्याचं स्पष्टीकरण देत नाही. इतरांना पटणार नाही म्हणून… आणि तुला न सांगताही सगळं माहीत आहे म्हणून !
रोज सकाळी तू जेव्हा माझ्यासाठी, आपल्या पिल्लांसाठी शिकार करायला गुहेबाहेर पडतेस ना तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून येतो; पण पुढच्याच क्षणी मला स्वतःचीच लाज वाटते. माझ्या चेहेऱ्यावरचे ते ओशाळते भाव तुलाही लगेच जाणवत असावे, कारण त्यावेळचा तुझा तो एक अर्थपूर्ण कटाक्ष माझ्या दुःखी कष्टी मनाची समजूत घालतो, जणू काही तू मला धीर देत म्हणत असतेस – ‘ नको लक्ष देऊ इतरांकडे. जितकी तोंडे तितक्या वदंता. तू तुझ्या राजधर्माचं पालन कर; बाकीचं सगळं सांभाळायला मी आहे ना ! ‘ आणि म्हणूनच इतरांसमोर मान उंचावून चालणारा हा जंगलाचा राजा तुझ्यासमोर मात्र नेहेमीच अधोमुख होतो.
पण कशी गंमत आहे ना... त्या क्षणी सुद्धा तुझ्या आश्वासक स्पर्शाने तू माझं सांत्वन करतेस आणि पुन्हा एकदा समस्त पशुपक्ष्यांचा हा राजा त्याच्या राणी समोर नतमस्तक होतो; अगदी पूर्ण शरणागती पत्करून तिचं अधिपत्य मान्य करतो.
– समाप्त –

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा