शनिवार, २५ जुलै, २०२६

3010. वारसा

 "कोर्टात जिंकलेला खटला, आयुष्यात हरवलेली माणसं परत आणू शकत नाही."
नागपूरच्या शहराच्या मध्यभागी एक प्रशस्त घर उभे होते. त्या घराने अनेक पिढ्या पाहिल्या होत्या. त्याच्या ओसरीवर चार भाऊ - रमेश, सुरेश, गणेश आणि दिनेश. लहानपणी दिवसभर खेळायचे. त्यांच्या मागे धावणारी त्यांची एकुलती एक बहीण. उन्हाळ्यात आंब्याच्या झाडावर चढणं, दिवाळीत फटाके उडवणं, गल्लीतल्या मुलांशी एकमेकांसाठी भांडणं. त्या घराने त्यांच्या बालपणाचा प्रत्येक क्षण आपल्या भिंतीत जपून ठेवला होता.
काळ बदलला.
लग्नं झाली. संसार वेगळे झाले. चार दुकानं चार भावांनी सांभाळली; पण राहायला प्रत्येक जण वेगळ्या घरात गेला. आई आधीच गेली होती. म्हातारे वडील मात्र दुसऱ्या क्रमांकाच्या मुलगा सुरेशकडे राहत होते. एके दिवशी वृद्धापकाळ, एकटेपणा आणि कदाचित भावनिक ओढ यामुळे वडिलांनी संपूर्ण वडिलोपार्जित घराचं बक्षीसपत्र सुरेशच्या नावावर करून दिलं. त्या एका सहीने घराच्या भिंतींना तडे गेले. भावंडांचे दोन गट पडले. 
एका बाजूला रमेश आणि गणेश.
दुसऱ्या बाजूला सुरेश आणि दिनेश.
नाते संपलं. फोन बंद झाले. सण-उत्सव बंद झाले. नातवंडांनीही एकमेकांच्या घरी जाणं बंद केलं.
शेवटी रमेश आणि गणेश यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.
Gift Deed Cancellation. Partition. Separate Possession.
कोर्टात कागद बोलू लागले.
वकिलांचे युक्तिवाद सुरू झाले.
लहानपणी एकमेकांना "दादा" म्हणणारे आता न्यायालयात "प्रतिवादी क्रमांक २" आणि "फिर्यादी क्रमांक १" म्हणून ओळखले जाऊ लागले.
हा धक्का वृद्ध वडिलांना सहन झाला नाही.
एका सकाळी त्यांचं हृदय थांबलं.
कोर्टात त्यांचा मृत्यू दाखल झाला.
घरी त्यांच्या फोटोला हार पडला.
आणि खटल्यात.
आणखी एक पक्षकार वाढला.
बहिण.
जिच्या राखीला चारही भाऊ हात पुढे करायचे, ती आता कोर्टात स्वतःच्या वारसाहक्कासाठी उभी होती.
मी त्या बहिणीचा वकील होतो.
फाईल माझ्या टेबलावर होती.
कायदेशीरदृष्ट्या हा खटला अनेक वर्षे चालू शकला असता. पुरावे, साक्षी, तज्ज्ञ, अपील. पंधरा-वीस वर्षे सहज गेली असती.
एका दिवशी मी सर्व भावंडांना माझ्या कार्यालयात बोलावलं.
फाईल बाजूला ठेवली.
आणि शांतपणे विचारलं.
"तुम्ही नक्की जिंकायचं काय आहे?"
सगळे गप्प.
मी पुन्हा म्हणालो...
"हे घर?"
"की तुमचं हरवलेलं बालपण?"
कोणाच्याही डोळ्यात माझ्याकडे पाहण्याचं धैर्य नव्हतं.
मी पुढे म्हणालो...
"समजा कोर्टाने घराचे पाच तुकडे केले. तर कोणाला ओसरी मिळणार? कोणाला देवघर? कोणाला अंगण? कोणाला मुख्य रस्ता? पुन्हा नवीन खटले सुरू होतील."
थोडा वेळ शांतता होती.
मग मी एकच प्रस्ताव मांडला.
"घर विकून टाका. प्रत्येकाला त्याचा कायदेशीर हिस्सा द्या. खटला संपवा."
प्रथम विरोध झाला.
वाद झाले.
आरोप झाले.
जुन्या जखमा पुन्हा उघडल्या.
पण शेवटी.
सर्वांनी मान डोलावली.
अवघ्या एका महिन्यात त्या घराची विक्री झाली.
ज्यांच्या हसण्याने घर भरून जायचं.
त्यांनीच त्या घराच्या चाव्या एका अनोळखी माणसाच्या हातात दिल्या.
प्रत्येकाच्या बँक खात्यात त्याचा हिस्सा जमा झाला.
सगळ्यांनी पैसे घेतले.
आणि
आयुष्यभराची दुष्मनीही.
कोणी मागे वळून पाहिलं नाही.
त्या जुन्या घराने मात्र कदाचित शेवटचा प्रश्न विचारला असेल...
"मी तुम्हाला वाढवलं...पण तुम्ही मला विकताना एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही?"
त्या दिवशी मला जाणवलं.
कोर्ट खटले संपवू शकतं.
पण नाती जोडण्याचा अधिकार कोणत्याच न्यायालयाकडे नसतो.
माणूस आयुष्यभर संपत्ती जमवतो. पण मृत्यूनंतर सर्वात मोठा खटला बहुतेक वेळा त्या संपत्तीवरच सुरू होतो.
म्हणून -
वेळेत विल (Will) करा.
तो योग्य पद्धतीने अनुभवी वकिलामार्फत तयार करून घ्या.
मूळ विल सुरक्षितपणे वकिलाकडे ठेवा.
विश्वासू वकिलाला Will Caretaker / Executor म्हणून नियुक्त करा, जेणेकरून तुमच्या निधनानंतर तुमची इच्छा तंतोतंत अंमलात येईल आणि तुमच्या मुलांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागू नयेत.
लक्षात ठेवा -
"वारसा म्हणून मालमत्ता द्या. पण वारसा म्हणून वैर देऊ नका."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...