शनिवार, २५ जुलै, २०२६

3062. नालायक

     वेदांग त्याच्या बंगल्याच्या लॉनवरील आरामखुर्चीत बसून ताजे वर्तमानपत्र वाचत मॉर्निंग टी चा आनंद लुटत होता. वर्तमानपत्रातील बातम्या वाचता वाचता डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याचे आउट हाऊसमध्ये होणाऱ्या हालचालींवर लक्ष होते. हायकोर्टातील केसेस हाताळण्यातील नावाजलेला वकील म्हणून वेदांग प्रसिद्ध होता. त्याच्याकडे आलेला पक्षकार कधीच नाराज होऊन जात नसे. हात घालेल तेथे यशच यश होतं ! वकिली व्यवसाय सांभाळता सांभाळता इतरही बऱ्याच क्षेत्रात वेदांगने शिरकाव केला होता. गुंदेचांबरोबर त्यांच्या एका कंस्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये केलेली मोठी गुंतवणूक. ललवाणी यांच्या फास्ट फूड आऊटलेटच्या चेनमध्ये केलेली वीस टक्‍क्‍यांची घसघशीत भागीदारी. सगळीकडून लक्ष्मीमातेचा वरदहस्त वेदांगवर कायम होता !! भरीस भर म्हणजे शेअर बाजारात वर्षानुवर्षे केलेली गुंतवणूक आता त्याला कित्येक पटीने रिटर्न देत होती. लॉनच्या टोकाशी असलेल्या आऊट हाऊसच्या दरवाजातून कोणीतरी बाहेर पडले तसा वेदांग सावध झाला. वर्तमानपत्राच्या आडून त्याने तिकडे नजर टाकली. डॉक्टर शर्मा त्यांची बॅग संभाळत निघाले होते. त्यांच्या मागे वत्सलाबाई, वेदांगच्या मातोश्री धीम्या गतीने चालत होत्या. त्या दोघांच्यात काहीतरी बातचीत झाली. डॉक्टर निघून गेले तरी वत्‍सलाबाई तशाच स्तब्धपणे उभ्या होत्या.
"बाबांचं दुखणं वाढलेलं दिसतंय..." मनातल्या मनात वेदांग पुटपुटला.
वेदांगला लॉन मध्ये बसलेला पाहून वत्सलाबाई त्याच्याकडे येण्यास निघाल्या. आईला आपल्याकडे येताना पहाताच नकळत वेदांगच्या कपाळावर सूक्ष्म आठ्यांचं जाळं पसरलं. वत्सलाबाई वेदांग शेजारी येऊन उभ्या राहिल्या. वर्तमानपत्रातून डोके बाहेर काढत वेदांगने आईकडे नजर टाकली. वत्सलाबाईंचा गोरा व देखणा चेहरा म्लान दिसत होता. डोळ्यांवर सूज होती. बहुधा बराच वेळ रडल्या असाव्यात. वेदांगच्या कपाळावरील आठ्यांचे जाळे आणखीनच दाट झाले.
"काय म्हणाले डॉक्टर ?" आईकडे न बघताच वेदांगने विचारले. वत्सलाबाईंनी काहीच उत्तर दिले नाही. मात्र त्यांनी दिलेला दबका हुंदका बरंच काही सांगून गेला. थोडावेळ पूर्ण शांतता पसरली.
"आई मला त्यांना भेटण्याचा आग्रह करू नकोस. तुला माहित आहे मी द्वेष करतो त्या माणसाचा !"
तीव्र स्वरात आईकडे न बघता वेदांग उदगारला.
"लहानपणीच्या त्या कटू आठवणींनी अजूनही रात्री-बेरात्री मला भयभीत होऊन जाग येते. रस्त्यावर डस्टबिन बॅग च्या पिशव्या विकण्यासाठी मी जीवाचा आटापिटा करतोय असं वाटून, महिन्यातून एकदा तरी मी दचकून उठतो. इतरांकडे भले लहानपणीच्या सुखद आठवणी असतील, माझ्याकडे मात्र लहानपणीच्या नको असलेल्या कटु आठवणीच आहेत.
तुला आठवतंय आई ? भल्या सकाळी तू बाबांना चुकवून दिलेला जेवणाचा डबा घेऊन मी सायकलीला पिशव्यांचे गठ्ठे बांधून त्या विकण्यासाठी बाहेर पडत असे ... का ? तर आमच्या पिताश्रींची मर्जी ... नापास झालो म्हणून दिलेली शिक्षा ... वैऱ्यालाही असा बाप ना मिळो ..."
वत्सलाबाईंनी दिलेल्या हुंदक्यांनी वेदांग बोलता-बोलता थांबला. समोरच्या टीपॉयवर ठेवलेला चहाचा कप उचलून त्याने तोंडाला लावला. मात्र गरम समजून घेतलेल्या चहाच्या घोटाचा गारढोण स्पर्श होताच आणखीनच वैतागून त्याने कप पुन्हा टीपॉयवर आपटला.
"त्यांचं ते निर्दय वागणं सोसून शेवटी स्वकर्तुत्वाने मी मोठा झालो. रग्गड पैसा कमावला. त्यांच्या आयुष्यभराच्या कमाई इतकी रक्कम तर मी वर्षात मिळवतो."
अहंकाराने ओतप्रोत भरलेल्या आवाजात वेदांग म्हणाला.
" नशिबानेही अगदी लहानपणापासून मला कायम साथ दिली. मला आठवतंय.. मी सातवीत पुन्हा नापास झालो आणि बाबांनी माझं जेवण बंद केलं.
" तुझं तू कमाव आणि मग जेव ! रोज कमीत कमी तुझ्या जेवणाइतके पैसे जर कमावून आणले नाहीस तर त्या रात्री तुला उपाशी झोपावं लागेल."
बाबांनी दिलेला दम मला आजही आठवतोय.
"हे पाचशे रुपये घे ... त्याच्यातून तुला धंदा करायचा आहे. या पैशातून जेवढे पैसे कमावून आणशील तेव्हढ्याचचं खाणं तुला मिळेल !"
भांडवल म्हणून शंभराच्या पाच नोटा माझ्या अंगावर फेकत बाबा गरजले होते. खूप विचार करून मी डस्टबिनला लागणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या विकण्याचा व्यवसाय निवडला. रस्त्यावर चौकामध्ये सिग्नलला उभ्या असणाऱ्या वाहनांवरील लोकांना मी या पिशव्या विकत असे. शंभर वाहनांमध्ये एखादा वाहन चालक या पिशव्या घेई. दिवसभर उन्हातान्हात फिरून मी थकून जात असे. पैशांची खरी किंमत कळली ती तेव्हा.  कधीकधी बिलकुल धंदा होत नसे , मात्र अशा वेळी एक सद्गृहस्थ नेहमी येऊन माझ्याकडील सर्व पिशव्या विकत घेत असे. तो कोण होता कोण जाणे !! मी नशीब म्हणतो ते यालाच. "
बोलता-बोलता वेदांग जुन्या आठवणींमध्ये रमून गेला होता. वत्सलाबाईंनी पुन्हा एकदा हुंदका दिला आणि वेदांग भानावर आला.
"नको इतकं दुःख करूस आई त्या माणसासाठी ! तुला तरी काय सुख दिलं ग बाबांनी? तुझी कुठलीही हौस-मौज त्यांनी कधी पुरवलेली मी पाहिली नाही. मी तर म्हणेन त्यांच्या जाण्याने मोकळे होऊ आपण सगळेच." आईकडे पाहात वेदांग तीव्र स्वरात म्हणाला.
"बस कर वेदांग ..."
वत्सलाबाई ओरडून म्हणाल्या आणि वेदांग आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला.
"तुला काय माहित तुझ्या बाबांनी मला सुख दिले की दुःख ? एवढा रस कधी घेतला होतास तू आमच्यात ? तुझे बाबा काय होते, कसे होते ते तुला कधीच कळले नाही आणि कळणारही नाही. तू सातवीत दुसऱ्यांदा नापास झालास तेव्हा तुझ्या वर्गशिक्षकांनी बाबांना भेटायला बोलावले होते.
"सॉरी टू से वसंतराव पण तुमचा मुलगा नालायक असून पूर्णपणे वाया गेला आहे. तो सुधारण्यापलीकडे आहे. नुसती हुशारी कधीच कामाची नसते. त्याला मेहनतीची जोड असेल तरच विद्यार्थी यशस्वी होतो. वेदांगवर चांगले संस्कार करण्यात तुम्ही कमी पडला आहात. यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास आम्हाला त्याला शाळेतून काढून टाकावे लागेल." कडक शब्दात तुझ्या वर्गशिक्षकांनी बाबांना सुनावले होते. पायात मणामणाच्या बेड्या अडकल्यासारखे तुझे बाबा घरी आले.
"वत्सला.... आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. वेदांगच्या भविष्यासाठी आता प्रेम बाजूला ठेवावं लागणार आहे. आजपासून त्याचे सगळे लाड बंद !! मी त्याला त्याचा कर्दनकाळ बाप वाटलो तरी हरकत नाही. पण परिस्थितीची जाणीव त्याला झालीच पाहिजे."
बाबांनी कठोर पावले उचलली. तुझे जेवण बंद झाले. कष्ट करून कमावून आणलेस तरच तुला जेवायला मिळू लागले. तुझ्यात हळूहळू बदल झाला. पैशाचे आणि शिक्षणाचे महत्त्व तुला कळायला लागले. मघाशी तू म्हणालास की मी बाबांना चुकवून तुला जेवणाचा डबा देत होते.  नाही वेदांग. तुझ्या बाबांच्या सांगण्यावरूनच तो डबा तुला मिळत होता !! कधी कधी तुझा वाईट दिवस असायचा. जेवणाइतकेही पैसे तुला मिळायचे नाहीत. मग तुला उपाशी झोपायला लागायचे. त्या रात्री तुझे बाबाही उपाशीच झोपायचे वेदांग. तू म्हणालास कोणी एक भला मनुष्य तुझ्या पिशव्या विकत घ्यायचा. तो कोण होता कोण जाणे. तो तुझ्या बाबांचा मित्र होता वेदांग आणि तुझ्या बाबांच्या सांगण्यावरून आणि बाबांच्या पैशांनी तुझ्याकडील पिशव्या विकत घ्यायचा."
आवाक होऊन वेदांग आईचे बोलणे ऐकत होता.
"का केलं हे तुझ्या बाबांनी ? तुझ्या भविष्यासाठी. तुला आत्मनिर्भर बनवण्यासाठी. तो या खडतर परीक्षेतून जर पास झाला तर आयुष्याच्या परीक्षेत कधीच नापास होणार नाही वत्सला ...."
तुझे बाबा मला म्हणायचे.
"मोठा वकील होईल तो ! यशश्री त्याच्या पावलांचे चुंबन घेईल ! पण त्यासाठी आपल्याला ही खडतर परीक्षा देणं भाग आहे. मला माहित आहे, तो माझा कायम द्वेष करेल वत्सला. पण हा द्वेषच त्याला प्रगती करण्यासाठी उद्युक्त करेल."
काळजावर दगड ठेवत तुझे बाबा माझ्याशी बोलायचे. हे सगळं मी तुला कधीच सांगितले नाही कारण तुझ्या बाबांनी तसं वचन माझ्या कडून घेतलं होतं. पण आज तुझे बाबा त्यांच्या शेवटच्या घटका मोजत आहेत आणि त्याच वेळी तू तुझ्या मनात असलेली त्यांच्याबद्दलची गरळ माझ्यापुढे ओकत आहेस. किती कृतघ्न आहेस रे तू. स्वतःच्या जन्मदात्यालाही न समजू शकणारा तू. नालायक होतासचं. पण अजूनही नालायकच आहेस आणि माझ्यासाठी यापुढेही नालायकच असशील." 
वेदांगकडे तिरस्कारयुक्त नजरेने पाहात वत्सलाबाई म्हणाल्या आणि त्याच्याकडे पाठ करून त्या घराकडे जाण्यासाठी वळल्या. आवाक झालेला वेदांग स्वतःचे अश्रू आवरू शकत नव्हता. तीरासारखा तो आऊट हाऊस कडे धावला.
"बाबा मला माफ करा. मी तुमचा मोठेपणा जाणू शकलो नाही."
     मृत्यूशय्येवरील बाबांचे पाय पकडत वेदांगने टाहो फोडला.  मात्र आयुष्यभर मुलाच्या प्रेमासाठी आसुसलेला तो महान बाप कधीच सर्व भौतिक जाणीवांच्या पलीकडे पोहोचला होता.

© मिलिंद अष्टपुत्रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...