शनिवार, २५ जुलै, २०२६

3019. पापणी

 सकाळीच कपाळाला खोच पडलेला इसम ओपिडीत आला होता. काल गतीरोधकावर पडल्यानं तिथला एक दगड लागून सदर जखम झाली होती. लोकांनी उचलून समोरच्या दवाखान्यात नेलं, चार टाके पडले. बाकी प्रथमोपचारासंह टीटी-वेदनाशामक-प्रतिजैवकं सगळं झालं होतं. आज तो ड्रेसिंग करण्यासाठी इथं आला होता. 
“कालचा दिवसच खराब होता-टाकेही चांगले घातले नाहीत. आता डाग दिसेल ब्ला ब्ला.” ड्रेसिंगच्या वेळी त्याची कॅामेंट्री निरंतर सुरू होती.
“जाऊ द्या, कुठल्याही अपघाताचा एक नियम असतो. जितकं लागलं ते कमी लागलं’ असं म्हणणं. उद्या अगदी साधं खरचटलं नसतं आणि थेट मेंदूला इजा झाली असती तर?” मी समजावण्याचा प्रयत्न केला.
“छ्याऽऽ राव..डाग पडेल कसं दिसेल ते?” त्यानं पुन्हा नाराजी व्यक्त केली.
“असं काही नसतं. शत्रुघ्न सिन्हाचं करिअर अश्या व्रणांमुळं व्हिलन म्हणून सुरू झालं आणि टॅलेंटच्या जीवावर ते हिरोही झाले” मी सोदाहरण स्पष्टिकरण दिलं.
“ते मोठे लोकं राव. हे कपाळावरच कसं दिसेल?” गड्याचं पालुपद काही संपेना शेवटी त्याला एक गोष्ट सांगितली, तिच तुम्हालाही सांगतो.
माणसाला निसर्गानं दिलेल्या देणग्यांची यादी करायची झाली तर आपण सहज म्हणतो,
”दोन हात,दोन पाय, बोलण्यासाठी जीभ,पाहण्यासाठी डोळे,ऐकण्यासाठी कान..”
पण या सगळ्यांपेक्षाही मोठी देणगी कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता.
      कल्पना करा. एका सकाळी तुम्ही जागं होता. सगळं ऐकू येतंय-सगळं दिसतंय-लोक बोलताय-डॉक्टर फिरताय-नातेवाईक रडताय आणि तुम्हाला त्यांचं प्रत्येक वाक्य समजतंय पण. तुम्हाला उत्तर देता येत नाही. हात हलत नाही.पाय हलत नाही. ओठ उघडत नाहीत. जीभ साथ देत नाही. तुमच्या आत विचारांचं वादळ धुमसतंय पण बाहेर मात्र मृत्यूसारखी शांतता. अशी शिक्षा एखाद्या माणसाला मिळू शकते यावर विश्वास बसणार नाही पण ही कल्पना नव्हे,तर वास्तव होतं. आणि त्या वास्तवाचं नाव होतं जिन डॅामनिक बौबी.
    बरं बौबी काय तुमच्या-आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस नव्हता तर फ्रान्समधील प्रतिष्ठित Elle या फॅशन मासिकाचा तो संपादक होता. ऐश्वर्य,प्रसिद्धी,सर्जनशीलता आणि समाजातील मानाचं स्थान जीवनानं त्याला सर्व काही भरभरून दिलं होतं. प्रत्येक दिवस नवीन लोक,नवीन कल्पना,नवीन स्वप्नं घेऊन उगवत असे पण नियतीला माणसाचे आखीव-रेखीव आराखडे फारसे आवडत नाहीत. ८ डिसेंबर १९९५ रोजी अचानक आलेल्या मेंदूविकाराच्या झटक्यानं त्याचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं.
     पुढचे वीस दिवस तो कोमात होता. डोळे उघडले तेव्हा त्याला वाटलं, ”मी वाचलो." पण काही क्षणांत त्याला जाणवलं ते म्हणजे शरीरातील एकही स्नायू त्याच्या आज्ञा पाळत नव्हता. तो फक्त जिवंत होता पण स्वतःच्या शरीरात कैद झाला होता.
वैद्यकशास्त्र या अवस्थेला लॅाक्ड-ईन सिंड्रोम म्हणतं; या विकारात मेंदूची जाणीव, बुद्धी, स्मरणशक्ती आणि भावना अबाधित राहतात परंतु शरीर जवळजवळ पूर्णतः निष्क्रिय होतं. रुग्ण सर्व काही समजत असतो पण स्वतःला व्यक्त करू शकत नाही. एखाद्या तुरुंगाची कल्पना करा. चार भिंती-लोखंडी गज-बाहेरचे जग दिसतं पण स्पर्श करता येत नाही. लॅाक्ड-ईन सिंड्रोम हा त्याहूनही क्रूर तुरुंगंय कारण त्यात भिंती विटांच्या नसतात तर त्या आपल्या स्वतःच्या शरीराच्या असतात. बौबीच्या शरीरात फक्त एकच गोष्ट जिवंत राहिली होती. त्याचा डावा डोळा आणि खरं तर फक्त एक पापणी.
      आपल्यासाठी पापणी लवणं ही इतकी सहज गोष्ट असते की आपण तिची दखलही घेत नाही पण बौबीसाठी तीच त्याची भाषा होती-तीच त्याची लेखणी होती-तीच त्याचा आवाज होता. भाषातज्ज्ञांनी त्याच्यासाठी एक विलक्षण पद्धत तयार केली. फ्रेंच भाषेतील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अक्षरांचा क्रम समोरून मोठ्यानं वाचला जाई आणि योग्य अक्षर आलं की बौबी एकदा पापणी लवत असे. मग पुन्हा अक्षरे-पुन्हा पापणी-पुन्हा अक्षरे-पुन्हा पापणी. एका शब्दासाठी कधी शंभराहून अधिक वेळा अक्षरं ऐकावी लागत. एका वाक्यासाठी तासन्‌तास जात. एका पानासाठी अनेक दिवस आणि एका पुस्तकासाठी असंख्य पापण्या. जगात हजारो लेखकांनी शाईनं पुस्तकं लिहिली-काहींनी टाईपरायटरवर-काहींनी संगणकावर-काहींनी स्मार्टफोनवर पण या एका माणसानं फक्त पापण्यांनी पुस्तक लिहिलं.
इतिहासात ही घटना अद्वितीय आहे.१९९७ मध्ये त्याचं आत्मचरित्र प्रकाशित झालं.”द डायव्हिंग बेल ॲंड द बटरफ्लाय’ हे शीर्षक निव्वळ सुंदर नाही; ते त्याच्या आयुष्याचं रूपकंय. 'डायव्हिंग बेल' म्हणजे समुद्राच्या अथांग तळाशी बुडालेली जड लोखंडी घंटा म्हणजे त्याचं निश्चल शरीर आणि 'बटरफ्लाय' मुक्त आकाशात विहार करणारं फुलपाखरू म्हणजे त्याचं मन. शरीर समुद्राच्या तळाशी अडकलं होतं पण मन? ते अजूनही आठवणींच्या बागेत फिरत होतं-ते समुद्रकिनाऱ्यावरील वाऱ्याचा स्पर्श अनुभवत होतं-ते बालपणात परत जात होतं-ते प्रेमात भिजत होतं-ते अजूनही स्वप्नं पाहत होतं. मानवी शरीराच्या मर्यादा विज्ञान मोजू शकतं पण मानवी मनाच्या मर्यादा? त्यासाठी अजून कोणतंही उपकरण बनलेलं नाही. बौबीनं जगाला हेच दाखवून दिलं; त्याचं शरीर हरलं होतं. पण त्याची कल्पनाशक्ती अजिंक्य होती. हे पुस्तक प्रकाशित झालं-जगभर त्याची चर्चा झाली-लाखो वाचकांनी ते हातात घेतल-अनेकांनी साश्रू नयनांनी ते पूर्ण केलं आणि नियतीनं पुन्हा एकदा क्रूरपणे स्मित केलं. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी. ९ मार्च १९९७ या दिवशी बौबी या जगातून निघून गेला. जणू त्यानं मृत्यूला एवढंच सांगितलं होतं,”जरा थांब रे..माझी गोष्ट अजून अपूर्णयं..ती जगापर्यंत पोहोचू तर दे..मग मी येतो..”
     आज डॉक्टर या केसचा अभ्यास न्यूरॉलॉजीच्या पुस्तकांत करतात. विद्यार्थी त्यातून लॅाक्ड-ईन सिंड्रोम समजून घेतात. पुनर्वसन तज्ज्ञ संवादाच्या नव्या पद्धती विकसित करतात. पण या केसचं खरं महत्त्व वैद्यकीय पुस्तकांच्या पलीकडंय. ती आपल्याला शिकवते की, शरीर हे माणसाचं संपूर्ण अस्तित्व नसतं, माणूस त्याच्या स्नायूंमध्ये राहत नाही. तो त्याच्या विचारांत राहतो-त्याच्या स्वप्नांत राहतो-त्याच्या आठवणींमध्ये राहतो-त्याच्या प्रेमात राहतो. आपण अनेकदा क्षुल्लक कारणांनी तक्रारी करत जगत असतो.
मोबाईल बंद पडला म्हणून दिवस खराब होतो. 
वाहतुकीत अर्धा तास अडकलो म्हणून चिडचिड होते.
एखादी संधी हुकली म्हणून आयुष्य संपल्यासारखं वाटतं.
आणि तिकडं..एक माणूस..ज्याच्याकडं फक्त एक पापणी होती त्यानं जगाला आशेचं पुस्तक लिहून दिलं. कधीकधी मला वाटतं निसर्ग माणसाला सर्व काही देतो तेव्हा त्याची ताकद दिसत नाही पण जेव्हा तो सर्व काही काढून घेतो आणि तरीही माणूस हसत राहतो तेव्हाच त्याची खरी उंची दिसते. बौबीनं हातांनी काही लिहिलं नाही-त्यानं पायांनी कुठं प्रवास केला नाही-त्यानं मंचावर उभं राहून भाषण केलं नाही पण एका पापणीच्या सूक्ष्म हालचालीतून त्यानं जगाला शिकवलं की आशा ही शरीराच्या स्नायूंमध्ये नसते;ती मनाच्या गाभाऱ्यात असते. आजही एखाद्या अतिदक्षता विभागात शांतपणं पडलेल्या रुग्णाकडं पाहताना मला बौबी आठवतो.  कदाचित तो रुग्ण काही बोलत नसेल पण त्याच्या आतही एखादं संपूर्ण विश्व धडधडत असेल- कदाचित त्यालाही काही सांगायचं असेल. कदाचित त्यालाही फक्त कोणीतरी त्याची एक पापणी समजून घ्यावी एवढीच इच्छा असेल. आणि म्हणूनच रुग्णाच्या शरीराकडं पाहण्यापूर्वी त्याच्या मनाकडं पाहायला शिकवणारी ही गोष्टये  एका संपादकाची-एका कैद्याची-एका योद्ध्याची आणि एका पापणीनं अमरत्व मिळवलेल्या लेखकाची.
कारण शेवटी इतिहास हातांनी लिहिला जातोच असं नाही 
कधी कधी तो एका पापणीनंही लिहिला जातो ! 

डॉ प्रज्ञावंत देवळेकर
#Doctors_Diary



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...