" ऑर्डर नंबर एटी फोर...." असा पुकारा झाला आणि चटकन आपला मोबाईल आणि डिलिव्हरी बॅग सांभाळत गौरी पार्सल काउंटर कडे लगबगीने निघाली , काउंटर पुढील डिलिव्हरी बॉईज च्या गर्दीतून वाट काढत काढत ती काउंटर पर्यंत पोहोचली . काउंटर वर ' बाबुलाल अंकल ' स्वतः होते , त्यांच्याकडे हा पार्सल काउंटर सांभाळायची खास जबाबदारी होती, कारण हे
"मधुबन प्युअर् वेज" संपूर्ण शहरात प्रसिद्ध होतं , हॉटेल मध्ये जेवायला येणाऱ्या खवय्यां प्रमाणेच पार्सल मागवणाऱ्या लोकांची संख्या ही भरपूर असायची, त्यामुळे इथे सतत फूड डिलिव्हरी करणाऱ्या मंडळींची मंदियाळी असायचीच . गौरीला पुढे आलेलं पाहून बाबुलाल नी हसतमुखाने तिच्या मोबाईल वरील ऑर्डर नंबर आणि पदार्थांची यादी तपासून लगेच पॅकेट तिच्या स्वाधीन केलं आणि आपुलकीने विचारपूस करीत विचारलं " कैसी हो बिटिया ?? सब ठीक है !?"
" जी अंकल .. सब बढिया...! " असं नेहमीचं उत्तर देत देत तिने पॅकेट तिच्या बॅगेत ठेवलं ..
" आज मौसम कुछ ठीक नहीं लग रहा ...कभी भी पानी बरसेगा.. जल्दी जल्दी काम खतम करके घर जाओ ..." आभाळा कडे पहात त्यांनी वडिलकीच्या नात्याने गौरीला सल्ला दिला " गाडी संभलके चलाना हां ! " हे ही पुढे जोडलं...
" जी अंकल...ये लास्ट ही डिलिव्हरी हैं ...इसके बाद सीधे घर... धन्यवाद अंकल "
गौरी ने हसून उत्तर दिले आणि पायरी उतरून ती तिच्या बाईक कडे जाऊ लागली..
बाबुलाल ना गौरीचं खूप कौतुक वाटायचं ..कारण फूड डिलिव्हरी करण्याच्या ह्या पुरूषी मक्तेदारी च्या क्षेत्रात ती एकटी मुलगी होती . आणि हे अवघड आणि आव्हानात्मक काम ती लिलया पार पाडत होती. नेहमीच तिच्या." डिलिव्हरी " ह्या अचूक आणि वेळेवर असायच्या. ग्राहकांकडून तिच्या साठी चांगला अभिप्राय नोंदवला जायचा त्यामुळे तिचे वरिष्ठ ही खुश असायचे आणि अर्थातच यामुळे तिला दर महिन्याला चांगला इन्सेंटिव ही प्राप्त व्हायचा .
गौरी ने मोबाईल मध्ये ' डिलिव्हरी लोकेशन ' बघितले आणि हेल्मेट डोक्यावर चढवून गाडीचा स्टार्टर दाबला ..नक्की कुठे जायचं आहे ते तिच्या लक्षात आलं . हे ही तिचं एक वैशिष्ट्य होतं गुगल मॅप वर एकदा डिलिव्हरी लोकेशन पाहिलं की डोक्यात गूगल सर्च बसवल्या प्रमाणे कुठे ही परत न चौकशी करता ती ईप्सित स्थळी अचूक पोहोचत असे .त्यामुळे तिचे सहकारी आणि बॉस देखील तिला " गुगल गौरी " चिडवायचे.
सुमारे पंधरा मिनिटात ती लोकेशन वर पोहोचली .ती एक अपार्टमेंट होती, मोबाईल मध्ये फ्लॅट नंबर पाहून ती तिसऱ्या मजल्यावर गेली तर त्या फ्लॅट च दार थोडंसं उघडलेलच होतं आणि आतून मोठ मोठ्या आवाजात गाणी, गप्पा आणि तरुण मुलांचा आरडाओरडा ऐकु येत होता. तिने दारावरील बेल वाजवली तसं एका तरुणाने दार उघडले आणि गौरी ला पाहून दात विचकत तिला आपादमस्तक न्याहाळत आत मध्ये वर्दी दिली
"दिप्या... डिलिव्हरी आली रे ! मस्त आहे बघ गरम गरम" आणि खदाखदा हसायला लागला. तेव्हढ्यात आतून अजुन एक जण आला आणि गौरी ला पाहून म्हणाला " अरे वा.... एकदम परफेक्ट टाईम " ...गौरी ने पॅकेट त्यांच्या हातात सोपवून " सर ! गुड इवनिंग चारशे सत्तर रुपये द्या " असे सांगितले.
त्यावर तो पहिला तरुण निर्लज्ज पणे पुढे आला आणि "देतो की ..पैसे कुठे पळून चाललेत? या की तुम्ही पण पार्टी ला."
असं म्हणत त्याने चक्क गौरी चा हात पकडला. तसं त्याच्या तोंडातून दारूच्या वासाचा भपकारा भसकन तिला जाणवला आणि तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. एका हाताने त्याचा हात झटकून तिने दुसऱ्या हाताने त्या तरुणाला पूर्ण ताकतीने कानाखाली लगावली तसं आधीच दारूच्या आहारी गेलेला तो तरुण भेलकांडत सोफ्या पाशी जाऊन पडला. गौरीची दुर्गा झालेली पाहून दुसरा तरुण आपसूकच चार पावलं मागे सरकला.
"खबरदार जर अंगाला स्पर्श करायचा प्रयत्न केला तर. हात तोडून हातात देईन." असा इशारा तिने देताच आतून
"त्यातल्या त्यात समजूतदार दिसणारा एक तरुण पळत पळत दारात आला आणि हा ' प्रसंग ' पाहून चटकन खिशातून पाचशे ची नोट काढून तिच्या समोर धरली आणि
"वी आर वेरी सॉरी. मी यांच्या वतीने माफी मागतो. परत असं होणार नाही. वेरी सॉरी." अशी शरणागती पत्करली
गौरी ने तीस रुपये त्याला परत केले आणि अजुन ही धक्क्यातून न सावरलेल्या त्या पहिल्या तरुणाला " कुठल्याही मुलीला एकटं समजून फायदा घ्यायचा प्रयत्न करू नका .इथून पोलिसांना आणि आमच्या इमर्जन्सी केअर ला फोन केला तर बाराच्या भावात जाशील " असा सॉलिड इशारा दिला आणि खाडखाड पायऱ्या उतरायला लागली. गाडी पाशी येईस्तोवर मनात विचारांनी आणि आभाळात ढगांनी दाटी केली होती. कधी ही पाऊस जोरदार कोसळेल अशी परिस्थिती होती.
तिने चटकन मोबाईल काढला आणि घरी फोन केला...आणि " हो हो... शेवटचीच डिलिव्हरी होती ... येते पंधरा मिनिटात " असा निरोप देऊन ती गाडीवर बसली तोच तिच्या मोबाईल वर एक " फूड डिलिव्हरी नोटिफिकेशन " वाजलं , आता घरीच जायचं ठरलं असल्यानं ती डिलिव्हरी स्वीकारायची नाही हे तिने ठरवलंच होतं .तरी ही तिने एकदा लोकेशन कुठलं आहे हे तरी पाहू म्हणून फोन पाहिला तर तिला त्यात " सन्मित्र कॉलनी " चा पत्ता दिसला आणि एकदम डोक्यात विचार आला " अरे ही कॉलनी तर अगदी आपल्या घराजवळच आहे म्हणजे अगदी घरच्या वाटेतच ..... पण हॉटेल साठी मात्र जरा दहा मिनिट वाट वाकडी करून गुलमोहर रोड कडे जावं लागणार होतं. म्हणजे एकंदरीत सगळा मिळून वीस एक मिनिटाचा प्रश्न होता...
अखेर हो नाही करता करता तिने ऑर्डर स्वीकारली आणि " हॉटेल ग्रीन पार्क " कडे गाडी दामटली .एव्हढी डिलिव्हरी करून चांगला कस्टमर फिडबॅक मिळाला तर या महिन्याच इन्सेंटिव च टार्गेट पूर्ण होणार होतं..आणि दुसरे दिवशी ची तिने खास रजाही टाकली होती...त्यामुळे
थोडा फार उशीर झाला तरीही ठीक आहे या विचारात ती त्या ' रेस्टॉरंट ' जवळ पोहोचली , सुदैवाने तिला तिची ऑर्डर लगेचच मिळाली .पेमेंट ही ऑनलाईन झालं असल्यानं डिलिव्हरी द्यायची अन् सटकायच ...या विचारात ती पुन्हा एकदा गाडीवर स्वार होऊन कामगिरी वर निघाली.
सन्मित्र कॉलनी म्हणजे शहरातली उच्चभ्रू वर्गातील लोकांची कॉलनी , मोठ मोठ्या आलिशान बंगल्यां ची कॉलनी ... कॉलनी च्या गेट जवळ ती पोहोचली आणि अचानक धो धो पाऊस कोसळू लागला...आता कुठे ही आडोसा मिळणं अशक्य असल्याने ती तिच्या लोकेशन वर म्हणजे ' बंगलो नंबर आठ ' वर येऊन धडकली....इथवर येई पर्यंत मात्र या पावसाच्या सरींनी ती पुरती भिजली होती.बंगल्याच्या फाटका पाशी गाडी लावून ती आत जाऊ लागली..
बंगला एकदम मस्त होता..टुमदार दुमजली , बाहेर छान शी बाग फुलवली होती , दुसऱ्या मजल्यावर कसलं तरी ऑफिस दिसत होतं , " वर्तक इन्फोटेक " ची निऑन साईन चमकत होती .
बंगल्याच्या दारावर " माधवी वर्तक आणि महेश वर्तक - डायरेक्टर , वर्तक इन्फोटेक " अशी पाटी वाचत वाचत गौरी ने बेल वाजवली आणि आत मध्ये एक सुमधुर नाद वाजल्याचे तिच्या कानांनी टिपले.. पाच दहा सेकंदात साधारण पंचेचाळिशी च्या एका स्त्री ने दार उघडले आणि पॅकेट हातात घेऊन पूर्ण पणे भिजलेल्या गौरी ला पाहून " ओह ... तू तर पूर्ण भिजून गेली की " असे उद्गार काढले.." हो ना मॅडम अचानक आला पाऊस " हातातील पॅकेट त्यांच्या हातात देत गौरी ने उत्तर दिलं .
आता तिच्या हातातील पॅकेट घेऊन पटकन ते आत ठेवावं ? की एवढ्या पावसात वेळेवर डिलिव्हरी करणाऱ्या गौरीचे आभार व्यक्त करावे ? या मनस्थितीत माधवी असतानाच
" मॅडम ...प्लीज चांगला फिडबॅक द्या बरं ! " अशी गौरीची विनवणी तिच्या कानावर पडली
त्यावर प्रसन्न पणे हसून " येस ऑफकोर्स " हे उत्तर माधवी ने दिले ,आणि तेवढ्यात ढगफुटी झाल्याप्रमाणे वीजांचा कडकडाट झाला आणि कानठळ्या बसविणाऱ्या आवाजासहित आता पाऊस कोसळू लागला तसं तिला बाबूलाल अंकल चे शब्द आठवले आणि " ओह नो..." असं रडवेल्या सुरात तिने नाराजी व्यक्त केली.
माधवी पॅकेट ठेवायला आत जाण्यासाठी वळणार तेवढ्यात गौरी चा आवाज तिच्या कानावर पडला ..
" मॅडम एक रिक्वेस्ट करू का प्लीज "
" हो हो...बोल ना ! " आश्वस्त स्वरात माधवी उत्तरली
" दोन मिनिट फक्त...दोनच मिनिट माझा मोबाईल चार्ज करू शकते का ? बॅटरी पूर्ण संपली आहे , ह्या डिलिव्हरी चे कन्फर्मेशन पण द्यायचंय आणि घरी ही एक फोन करायचाय... पंधरा मिनिटात येते असं सांगून आता पाऊण तास झालाय ...काळजी करीत असतील " जीभ चावत गौरी बोलली..
" हो हो शुअर.... ये ना आत ये " दार पूर्ण उघडून तिला आत घेऊन जात माधवी ने उत्तर दिले.
आत येताच एकदम भानामती झाल्या प्रमाणे डोळे विस्फारून गौरी ते सुंदर घर पाहू लागला.. अतिशय नेटके पणाने सजवलेला भला मोठा दिवाणखाना , सुटसुटीत फर्निचर , छान रंगसंगती असलेले पडदे त्याला अनुरूप अशी प्रकाश योजना , पेंटिंग्ज .....
आणि नकळत तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले " वाह...क्या बात है एकदम टी वी सिरीयल सारखं घर आहे की ओ तुमचं ...मला तर खूप आवडलं " ..
तिच्या या उत्स्फूर्त प्रतिक्रियेवर हसत हसत माधवी ने तिला सोफ्यावर बसायला सांगून चार्जिंग चा पॉइंट दाखवला ....ती मात्र उभ्यानेच बॅगेतून चार्जर काढून फोन चार्जिंग ला लावू लागली तसं " अग गडबड नको करू ...बस खाली व्यवस्थित आणि मग चार्जिंग कर " असं म्हणत माधवी आत जाऊ लागली
" नको नको...मी पूर्ण ओली आहे ..सोफा खराब होईल " गौरी उत्तरली
" होऊ दे झाला तर ... बस तिथे आणि हे घे " तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत माधवी ने आदेश दिला..
" आणि हो...तुला फोन करायचा असेल तर माझ्या फोन वरून करू शकतेस तू " हे ही सुचवलं
" नाही .. नको मॅडम .. होईल सुरू फोन लगेच "सोफ्यावर बसत गौरी उत्तरली
तेव्हढ्यात माधवी ने आतून एक टॉवेल आणला आणि गौरी ला दिला " हे घे अंग कोरड कर "
" अहो राहू द्या मॅडम.. आपोआप होईन कोरडी.." गौरी ने टॉवेल घ्यायला नकार देत उत्तर दिलं
" अगं वेडी आहेस का ? आजारी पडशील अशी तर .. हे घे ! " थोडंसं दटावत माधवी ने तिला टॉवेल घ्यायला लावला आणि किचन मध्ये गेली
आत मध्ये तिला गौरीच फोनवरील बोलणं
ऐकु येत होतं
" हो अरे... अचानक खूप जोरात आला पाऊस.. शेवटचीच होती डिलिव्हरी ... हो जवळच आहे ... सन्मित्र कॉलनी मध्ये...
मी ठीक आहे... कस्टमर च्या इथूनच
बोलतीय.. हो हो आल्यावर एकत्र जेवण करू ...काळजी करू नको..येते मी पाऊस कमी झाला की ....."
तिचा संवाद संपता संपता माधवी आतून
वाफाळत्या कॉफी चे दोन कप घेऊन आली आणि गौरी ला कससच झालं
" अहो मॅडम कशाला उगीच...? तुम्ही त्रास करून घेताय ? " असं म्हणत ती उठून उभी राहिली..
" नो प्रोब्लेम...अगं तुला याची आवश्यकता आहे..घे गरम कॉफी तोवर पाऊस पण कमी होईल " तिच्या हातात कप देत माधवी ने उत्तर दिलं...कॉफी घेता घेता मग माधवी ने स्वतः च कुतूहल शमवायला सुरुवात केली
" कधी पासून करत्येस तू हा जॉब ? "
" आठ नऊ महिने झाले मॅडम... " गौरी ने कॉफी सिप करता करता उत्तर दिलं
" पण तुला ऑड नाही वाटत...आय मीन शक्यतो जेंट्स चा जॉब आहे हा.. सगळी कडे सतत फिरणं..गाडी चालवणं ...वगैरे " माधवी ने विचारलेल्या या प्रश्नाला गौरी बऱ्यापैकी सरावली होती. त्यामुळे तिने ही सराईत पणे उत्तर दिलं
" त्यात काय एवढं ? शेवटी कुठलं ही काम हे कामच असतं, मला ते नऊ ते पाच वालं ऑफिस काम नाही आवडत, मला फिरायला , नवीन नवीन लोकांना भेटायला आवडतं आणि मुख्य म्हणजे गाडी चालवायला खूप आवडतं " शेवटचं वाक्य जीभ चावत तिने बोलून टाकलं
" पण मग घरी चालतं तुझ्या हे ?? कोण कोण आहे घरी ?" माधवी चा पुढील प्रश्न तयारच होता
" मी आणि माझे मिस्टर ...! " कॉफीचा मोकळा कप टेबलवर ठेवत गौरी ने उत्तर दिलं..
" मिस्टर ???...म्हणजे तू मॅरीड आहेस ?
अगदी संतूर मधल्या मॉडेल सारखी आहेस की तू !" आश्चर्य चकित होत माधवी ने विचारलं.. कारण गौरी होतीच तशी पोरसवदां .. गोरी गोरी नाजूक, फार तर विशी बाविशी ची असावी तरतरीत नाक आणि तेजस्वी काळे डोळे आणि मनमोकळा स्वभाव त्यामुळे बोलण्यात कमालीचं स्पष्टवक्ते पण...
गौरीने मस्त पैकी लाजत उत्तर दिलं..." हो एक वर्ष झालं लग्नाला "
" पण मग तुझे मिस्टर ...त्यांनी अलाऊ केलंय तुला या जॉब साठी ?? ते काय जॉब करतात ?" माधवी चे प्रश्न सुरूच होते
त्यावर एकदम प्रांजळपणे तिने उत्तर दिलं " उमेश...? ते घरीच असतात , ते घर सांभाळतात ,आणि मी काम करते "
माधवी ला हे जरा विचित्र वाटलं..
" म्हणजे ?? "
" घरी ..स्वयंपाक करणे, घर आवरणे , भांडी घासणे वगैरे ते करतात "
आता मात्र माधवी ला पुढे काही सुचेना ..
आणि फार चौकशी करणं प्रशस्त ही वाटेना ...
त्यामुळे पुढे काही न बोलता तिने कॉफीचे मग आत नेऊन ठेवले....
" चला मॅडम येते मी...आता पाऊस बराच कमी झालाय " असं म्हणत ती बॅग, मोबाईल वगैरे सावरत उठली..
आणि माधवी चे मनापासून आभार मानले
" बरं गाडी व्यवस्थित चालव आणि सावकाश जा..." तिला दरवाजा पर्यंत सोडायला जात माधवी ने निरोप दिला आणि आत वळून जेवणाच पॅकेट उघडायला घेतलं..
तिला बराच वेळ गौरी च्या गाडीच्या स्टार्टर चा अर्धवट सुरू होऊन बंद होणारा आवाज कानी पडत होता .. बहुतेक गाडी सुरू होत नसावी. माधवी ने खिडकीचा पडदा बाजूला करीत बाहेर पाहिलं तर गौरी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करून करून वैतागलेली दिसली ..पण गाडी काही सुरू होत नव्हती ..
" काय ग? गाडी बंद पडली का ? तिच्या जवळ जाऊन माधवी ने विचारलं
" बघा ना... स्टार्ट च होत नाही ये " गौरी जराशी रडकुंडीला येत म्हणाली ..
" बहुतेक पावसामुळे असेल..एक काम कर गाडी आत मध्ये लावून , घरी फोन करून मिस्टरांना बोलावं घ्यायला...नंतर उद्या तुझी गाडी घेऊन जा "
माधवी ने सल्ला दिला
" नाही नको ...बघते सुरू होते का जरा प्रयत्न करून " गौरी ने उत्तर दिलं ..
आता घरी जायला इथून रिक्षा किंवा टॅक्सी देखील मिळणार नव्हती हे तिला ठाऊक होतं..
बराच वेळ प्रयत्न करूनही गाडी स्टार्ट होत नाहीये म्हणल्यावर गौरी आता हिरमुसली झाली होती ...
ते पाहून माधवी शांत पणे आत गेली आणि कार ची किल्ली घेऊन आली
" आता ऐक माझं , गाडी आत लावून टाक मी तुला तुझ्या घरी सोडते...पाऊस अजुन पूर्ण थांबला नाहीये " असा सल्ला दिला
" नको नको मॅडम ....आधीच मी तुम्हाला खूप त्रास दिलाय..प्लीज नको..." गौरी ला आता खूप अपराधी पणा वाटत होता... पण माधवी ने तिला समजावले " डोन्ट वरी ..काही होत नाही ऑलरेडी खूप लेट झालंय ..जास्त विचार करू नकोस तुझी बाईक आत लाव मी कार बाहेर काढते "
आता मात्र गौरीचा नाईलाज झाला आणि गाडी आत लावून ती चुपचाप माधवी च्या गाडीत बसली..." उद्या कधीही निवांत येऊन बाईक घेऊन जा..इथे सेफ आहे तुझी गाडी "
गाडी सुरू करीत माधवी म्हणाली ..
" उद्या नाही येऊ शकणार मी...उद्या सुट्टी घेतली आहे मी " गौरीने त्वरित उत्तर दिले
" ओह...सुट्टी ?? का ग ? काही विशेष "
माधवी ने सहजपणे विचारलं
" हो...उद्या लग्नाचा वाढदिवस आहे आमचा ..पहिलाच " लाजत लाजत गौरीने उत्तर दिलं
" वॉव ! क्या बात है... मग उद्या काय स्पेशल प्लॅनिंग ?? नवरा बायको कुठे पार्टी ला जाणार ??"
माधवी ने तिची खेचत तिला विचारलं..
" नाही कुठेच नाही ... घरीच थांबणार " गौरी ने उत्तर दिलं ...
गौरी ने तिच्या घराचा पत्ता आणि रस्ता सांगितला त्या प्रमाणे गाडी जाऊ लागली ..
बराच वेळ निशब्द गेल्यावर एकदम गौरी ने विचारलं " मॅडम... तुमचं घर खूप छान आणि मोठं आहे.. कोण कोण राहतं इथे ?"
त्यावर एक अल्पविराम घेऊन माधवी उत्तरली " अगं आमची एक सॉफ्टवेअर डेवलपमेंट कंपनी आहे .मुख्य ऑफिस राजीव गांधी आय टी पार्क मध्ये आहे ..
आणि इथे बंगल्याच्या वर अॅडमिन आणि एच आर ऑफिस आहे .एक मुलगा आहे तो अमेरिकेत शिकायला आहे आणि मिस्टर बिझनेस डेवलपमेंट च्या निमित्ताने नेहमी टूरवर असतात ... सो.. या एवढ्या मोठ्या बंगल्यात मी एकटीच असते बरेच दा " हे बोलताना तिने गौरी कडे हसून पाहिले .मात्र त्या हास्यात काहीसा उदासपणा आणि उद्विग्नता लपल्या सारखं गौरी ला वाटलं आणि ती निमूट पणे खिडकीतून बाहेर पाहू लागली...
दहा एक मिनिटात गौरीचे घर आले , एक बरीच जुनी अपार्टमेंट होती ती , गौरी गाडीतून उतरली आणि आतूनच माधवी ने " चलो... .बाय गुड नाईट " असा निरोप दिला ..पण " मॅडम चला ना वर दोन मिनिटे ..इथे पहिलाच मजला आहे ..
इथवर आला आहात तर उमेश ची ओळख करून देते " अशी आग्रही विनंती गौरीने केली..
" नको नको ..आज नको परत नक्की येईन मी " नम्रपणे नकार देत माधवी म्हणाली
" अहो चला ना प्लीज ...प्लीज..फक्त पाच मिनिटे " गौरीचे आर्जव ऐकुन अखेर माधवी ने नमतं घेतलं आणि गाडी पार्क करून निमूटपणे गौरीच्या मागे पायऱ्या चढू लागली... ' गौरी सारख्या छान बायको ला हा असा खडतर जॉब करायला लावून स्वतः घरात बसणारा हा उमेश कोण आहे ते ही पहायची उत्सुकता तिला होतीच ...'
पहिल्या मजल्यावर वर गौरीच घर होतं.दरवाजा अर्धवट उघडाच होता.
आत एका कॉट वर पांघरूण घेऊन उमेश पडला होता , हातात एक पुस्तक होतं.
तेव्हढ्यात माधवी ने तिच्या घराचं निरीक्षण करून घेतलं.. वन बी एच के फ्लॅट होता..छोटा पण नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला. घरातलं मोजकच समान ..संसार नवीन असल्याची ग्वाही देत होतं ...
" या ना मॅडम आत या ना " आग्रह करीत माधवी ला गौरीने आत आणलं .उमेश एकदम चमकून उठून बसला ..
" अरे असू दे ..असू दे... उमेश या माधवी मॅडम आहेत यांनीच खूप हेल्प केली आज..एव्हढा पाऊस होता म्हणून सांगू तुला. माझ्या मुळे यांना खूप त्रास झाला..आणि मॅडम हा उमेश.."
गौरीने एका दमात ओळखपरेड उरकली
आणि माधवी ला एकदम हसू आलं
" अगं हो हो... जरा सावकाश " हसू दाबत माधवी उद्गारली...
उमेश ने तिथूनच माधवी ला नमस्कार केला ." ट्युशन ची मुलं येऊन गेली का रे ?"
गौरी ने उमेश ला विचारलं ..
" हो ...पण आज पावसामुळं तीन चार जणांनी दांडी मारली " उमेश ने उत्तर दिलं.
" ट्युशन ?? कसले ??" माधवी ला प्रश्न पडला..
" हो मॅडम सांगायचच विसरले...उमेश एम एस सर्टिर्फाईड ग्राफिक्स डिझायनर आहे , आणि एक उत्तम चित्रकार देखील खूप छान चित्र काढतो ...त्यामुळे इथली आसपास ची बरीच मुलं त्याच्याकडे चित्रकला शिकायला येतात...."
तिथेच एका ड्रॉइंग बोर्ड वर रेखाटलेली चित्रं पहात माधवी च्या तोंडून "
ब्रिलीयंट" असे उद्गार बाहेर पडले
" ग्राफिक्स डिझायनर....पण मग जॉब का करीत नाही तुम्ही ? आय मीन सॉरी ह पण सध्या ग्राफिक्स डिझायनर ची खूप डिमांड आहे इंडस्ट्री मध्ये ...." आश्चर्य वाटून माधवी पुढे बोलली...
" हो..मॅडम बरोबर आहे आधी खूप प्रयत्न केले जॉब साठी पण फ्रेशर फ्रेशर म्हणून सगळ्यांनी रिजेक्ट केलं .. आणि आता शक्य नाही..." काहीसं खिन्न होत उमेश ने उत्तर दिलं..तो खिन्न पणा अन्
माधवी च्या चेहऱ्यावर पडलेलं कोडं पाहून गौरी चटकन विषय बदलत म्हणाली ..." बसा ना मॅडम तुम्ही ...
चहा करते पटकन. ..अरे उमेश तुझी चित्र दाखव ना मॅडम ला तोपर्यंत "
" अगं थांब... काही करू नको..मला अजून......" गौरी ला थांबवत माधवी हे वाक्य बोलताना मध्येच चमकून थांबली आणि तिचे डोळे विस्फारले .. ती झटकन उठून उभी राहिली .. जेव्हा तिला दिसलं की कॉट वरून उतरून चित्र दाखवण्या साठी उभा राहताना उमेश ने पलीकडे ठेवलेली कुबडी उचलली आणि लंगडत लंगडत तो कपाटाकडे जाऊ लागला...
" ओह ...आय एम सो सॉरी....पण हे ... काय झालं ... कधी ?"
माधवी आता पूर्ण पणे गोंधळून गेली
पण उमेश च्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित होतं आणि गौरीच्या चेहऱ्यावर खिन्नता...
मग तिनेच उलगडा केला...
" उमेश चा अॅक्सिडेंट झाला होता मॅडम नऊ दहा महिने झाले आता... "
डोळे पुसत गौरी पुढे बोलू लागली " मॅडम आमचं लग्न एका वर्षा पूर्वी झालं , प्रेम विवाह असल्याने दोघांच्या ही घरून विरोध होता...अजुन ही आहे .चांगली क्वालिफिकेशन असून ही उमेश ला जॉब मिळत नव्हता...मग नाईलाजाने ...मी आत्ता जो जॉब करते, तो आधी उमेश ने सुरू केला.. कशी बशी संसाराची गाडी रुळावर येऊ लागली होती...आणि ..
एके दिवशी असाच डिलिव्हरी देऊन घरी यायला निघाला असताना एम जी कॉलेज जवळ एका भरधाव कार ने त्याला उडवलं .... बराच वेळ तो त्याच अवस्थेत रस्त्याकडेला पडून होता...पण पाऊस होता आणि रस्ता बराच निर्मनुष्य ...खूप वेळ मदत मिळालीच नाही अखेर त्याच्या काही कलिग ना त्याने फोन केला...त्यांनी त्याला उचलून दवाखान्यात नेलं आणि त्यानंतर मला समजलं...बाकीच्या जखमा किरकोळ होत्या पण उजवा पाय मात्र गुडघ्या पासून.... " आता तिला पुढे बोलवेना ....
माधवी ने चटकन उठून तिच्या पाठीवर हात फिरवून तिला शांत केलं. थोडंसं सावरून मग गौरी बोलू लागली ... आता मात्र तिच्या आवाजात करारी पणा आणि एक जिद्द होती
" ह्या अॅक्सिडेंट मुळे उमेश चा जॉब तर गेला मॅडम ...पण त्याच्या कंपनीत विनंती करून तो जॉब पुढे कंटीन्यू करायचं मी ठरवलं...आधी उमेश सहित सगळ्यांचा खूप विरोध होता..पण मी माघार घेतली नाही...तशी मी खूप हट्टी आहे...
आणि मग आमचे रोल तेव्हापासून बदलले बघा...मी जॉब करते आणि उमेश घर सांभाळतो....सेम टु सेम...आणि हो ...उमेश एकदम फर्स्ट क्लास स्वयंपाक करतो बरं...तुम्ही जेवायला या आता "
शेवटचं वाक्य म्हणताना परत एकदा तिला डोळे पुसत हसावं लागलं
माधवी आता पूर्ण पणे...निशब्द झाली होती .गौरीची जिद्द आणि चिकाटी याचं कौतुक करावं ?का उमेश चा समजूतदार पणा आणि संयम वाखाणावा ?? तिला बसलेला धक्का पचवण्या साठी खुर्चीवर बसून पाणी प्यावं लागलं....
थोडा वेळ शांततेची तिघांना ही गरज होती...त्यानंतर माधवी बोलू लागली
" मला तर काय बोलावं हेच समजत नाही गौरी आणि उमेश ...तुमचं धैर्य..प्रेम आणि जिद्द...सगळ्याला माझा सलाम...
गौरी तुला मघाशी बोलले त्याप्रमाणे .... आमची आय टी कंपनी आहे आणि आम्हाला ग्राफिक्स डिझायनर आणि सॉफ्टवेअर डेवलपर ची गरज असतेच...
मी उमेश साठी खास जॉब ऑफर करू शकते जो तो घरूनच...म्हणजे वर्क फ्रॉम होम करू शकेल..."
उमेश आणि गौरी एकमेकांकडे अविश्वासाने पाहू लागले...तेव्हढ्यात माधवी पुढे बोलू लागली
" हां पण डोन्ट थिंक की मी काही उपकार किंवा फेवर करतिये... उमेश तुला एक ऑनलाईन टेस्ट द्यावी लागेल उद्या सकाळी , ती क्लिअर झाली तर ...मग मात्र माधवी तू तुझी गाडी घ्यायला माझ्याकडे येशील तेव्हा उमेश च ऑफर लेटर माझ्याकडून कलेक्ट करू शकतेस "
हसत हसत माधवी म्हणाली
उमेश आणि गौरी ने केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हात जोडले .." थॅन्क् यू मॅडम "
अगं याची काही गरज नाही गौरी...तुमच्या मध्ये असलेली जिद्द आणि ही आगळीवेगळी घडपड याची ही एक छोटीशी पोचपावती आहे....आणि एक लक्षात ठेव...आज उमेश ची खऱ्या अर्थाने " अर्धांगिनी " बनून साथ देते आहेस ...असेच दोघे एकत्र प्रेमाने रहा
ऑल द बेस्ट उमेश....
चलो...आता मी येते ...खूप लेट झालंय.."
असं म्हणत माधवी दारापर्यंत गेली आणि एकदम थबकून परत वळली आणि
म्हणाली " अरे हो...एक राहिलंच की !"
" काय मॅडम ?" दोघे ही एका सुरात विचारते झाले ..
" विश यू बोथ अ वेरी हॅप्पी वेडिंग अॅनीवर्सरी..." मस्त पैकी हसून माधवी ने शुभेच्छा दिल्या.
©® लेखक ~ सागर जोशी पुणे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा