आज जवळ जवळ सहा महिने झाले होते आनंदचा अपघात होऊन. सहा महिन्यात बरंच काही अनुभवलं होतं. रस्ता पार करत असताना चुकीच्या दिशेने येणाऱ्या कार ने त्याला उडवलं होतं. अपघातातून रिकव्हर व्हायला सहा महिने लागले होते त्याला. त्या काळात कामिनीच्या स्वभावाचे वेगळेच पैलू त्याला पाहायला मिळाले होते. दिसायला सुंदर व हुशार असलेली कामिनी थोडीशी गर्विष्ठ होतीच पण असतो एकेकाचा स्वभाव म्हणून तो सांभाळून घेत होता.
करियर करायचं म्हणून लग्नाला ५ वर्ष झाले तरी तिने अजून मुलाबाळासाठी तयारी दाखवली नव्हती. एक दोन वेळा त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा फंडा होता की वेळेत मुलं झाली की आपण सक्षम व कार्यरत असतानाच ते शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि उरलेला कार्यकाळ आपण आपल्यासाठी जगू, कमवू नी मग निवृत्तीनंतर आयुष्याच्या उतार काळात ना आपण त्यांच्यावर डिपेंड राहू ना ते आपल्यावर.. जास्त उशीर झाला तर आपण निवृत्त झालो तरी मुलं अजून शिकतच असतील आणि मग सेवानिवृत्तीचा निधी त्यांच्या शिक्षणावर खर्च होईल आणि मग ते सेटल होई पर्यंत आपण कफल्लक होऊन त्यांच्या आधारावर जगायची अपेक्षा धरू. ती वेळ आपल्याला आणायची नाहीये. हे सर्व प्रवचन ऐकायची तिची तयारी नव्हती. आणि तिचं मन मोडायची त्याची इच्छा नव्हती.
पण गेल्या काही महिन्यांपासून मात्र ती जास्तच चिडचिड करायची, कधी कधी वाटेल ते बोलायची, त्याच्याशी लग्न करून तिच्या पदरी निराशाच पडली आहे. आर्थिक चणचण, एक सर्वसाधारण आयुष्य याच्याशिवाय तो तिला काहीच देऊ शकला नव्हता, त्यात हे असं आयुष्यभर राहील तर कसं होईल. हे ती त्याच्या तोंडावर बोलून दाखवत होती.खरं आहे तिचं ह्या अशा एकदम जबाबदाऱ्या वाढल्यावर थोडीफार चीड चीड होणारच पण काही दिवसात मी बरा झालो की सगळं व्यवस्थित होईल अशी समजूत तो मनाची घालायचा. तो आता बऱ्यापैकी रिकव्हर झाला होता आणि येत्या सोमवार पासून कामावर जाण्याच्या तयारीत होता. तिचे आणि त्याचे दोघांचे आई वडील त्यांच्याकडे आले होते.
आणि मग त्या दिवशी तिचा फोन वाजत असताना, "अरे, मी काम करतेय तर कमीत कमी तो फोन तर उचल " असं मधून ती ओरडली म्हणून त्याने फोन घेतला. कॉल तर स्पॅम कॉल होता पण फोन ठेवताना आलेला एक मेसेज दिसला. नोटिफिकेशन ड्रॉपडाऊन मध्ये तो पूर्णच वाचता आला होता. आणि त्याच्या काळजाचं पाणी झालं. तिच्या बदलेल्या वागण्याचा अर्थ त्याला उमगला होता. तेवढ्यात कामिनी धावतच आली आणि पटकन त्याच्या हातातून फोन ओढून घेतला. आधी तिने मेसेजस बघितले. त्यात तो ही मेसेज होता पण अनरेड दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं.
"स्पॅम कॉल होता." तो एवढंच बोलला. खरं तर त्याला त्या मेसेज बद्दल बरंच बोलायचं होतं पण आता सगळ्यांसमोर त्याला तो विषय काढायचा नव्हता.
"सोमवार पासून पुन्हा रुजू होतोयेस तर देवीचे दर्शन घेऊन या असं दोघांच्याही घरचे म्हणायला लागले तसे तो कामिनीला घेऊन ३० -४० किमी वर असलेल्या त्यांच्या कुलदेवतेला जाऊन आला. वाटेत त्याने तिच्याशी त्या मेसेज चा काहीही विषय काढला नाही. त्यात तिथे योगायोगाने त्यांचे फॅमिली फ्रेंड्स भेटले आणि मग गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. परत येताना बाईक चा टायर पंक्चर झाला त्यामुळे धक्का मारत दुकानापर्यंत आणून पंक्चर काढला आणि मग त्या डोंगराळ ओसाड रस्त्यावर जीव मुठीत धरून दोघे परत आले तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. थकलेले दोघे गाढ झोपून गेले. बरं दुसऱ्या दिवशी रविवार होता.
दुसऱ्या दिवशी कामिनीला जरा कण कण वाटत होती. म्हणून ती पडून राहिली. त्याचे आईवडील सकाळी निघून गेले तर तिच्या आईने त्यांचा स्वयंपाक बनवला व सगळे जेवून ते दुपारी गेले. कामिनीने कसेबसे २ घास खाल्ले आणि ती पुन्हा जाऊन झोपली. आनंद ही झोपून गेला संध्याकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा चेहरा, गाल , हात, पाय सगळे ताणल्यासारखे वाटत होते म्हणून तिने आरशात जाऊन पाहिलं तर पूर्ण शरीराला सूज आलेली होती. तिने आनंदला उठवले त्याने पण पाहिलं आणि त्याच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला. त्याने काही गोळ्या सांगितल्या त्या कामिनीला त्याने आणून दिल्या. कामिनी स्वतःची हालत पाहून रडत होती, त्याने तिची समजूत घातली आणि गोळ्या दिल्या. ती आज कसल्याच मनस्थितीत नव्हती.
दुसऱ्या दिवशी आनंदने तिला उठवले नाही, जाताना फक्त तिला रजा घे सांगून तो ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी तो परत आला तेव्हा कामिनी मध्ये काहीही फरक पडलेला नव्हता. तो तिला दवाखान्यात घेऊन गेला तिथे त्यांनी तिला काही दुसरे औषधं दिली आणि मग सुरु झालं आजारांचं सत्र. कोणी तिला वॉटर रिटेन्शन ची औषधं दिली,कोणी काही टेस्ट्स सांगितल्या. आश्चर्य असं की टेस्ट्स मध्ये काही निष्पन्न व्हायचं नाही. मग दुसरा डॉक्टर दुसरी ट्रीटमेंट असं सुरु झालं. सुंदर असणारी आणि त्याचा अतिशय गर्व असणारी कामिनी आता सुजेमुळे बेढब आणि विद्रुप दिसायला लागली होती. आनंद तिला सतत धीर देत होता. घरी ती किती दिवस थांबणार होती म्हणून तिला तिच्या ऑफिसला सोडत असे आणि परत येण्यासाठी त्याने तिला रिक्षा लावून दिली होती. घरी एकटी राहून ती वेडी तरी झाली असती किंवा काहीतरी करून तरी घेतलं असतं. एव्हाना तिला आता चालायला पण त्रास व्हायला लागला होता. मध्यंतरी काही दिवस ती घरातल्या एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाण्यासाठी ५-१० मिनिटे घ्यायची. त्याची मग वेगळी ट्रीटमेंट सुरु होती. त्यातून बरी झाली पण स्वभाव अतिशय चिडचिडा झाला होता. साध्या साध्य कारणांवरून ती घरभर वस्तू फेकत असे. आनंद तिला एक शब्द न बोलता निमूटपणे त्या उचलून घेत असे. महिनोंमहिने जात होते. एक नाहीतर एक सतत तिच्या मागे व्याधी लागलेली असायची. अवघ्या एक दिवसाचाही उसंत तिला मिळत नव्हती. आनंद मात्र तिच्या मागे खंबीर उभा होता. तिचं मन रमवायचा प्रयत्न करत राहायचा. आजारपणामुळे की औषधांमुळे पण तिचे लांबसडक केस गळून अवघे वीतभर उंचीचे राहिले होते.
कामिनी स्वतःकडे पाहून ढसाढसा रडायची. आनंद ने जवळ घेतलं की तिला बरं वाटायचं.
"आनंद, मी यातून बारी होईल ना रे, कधी होईल रे ?"
"डोन्ट वरी, आपण याच्यातून नक्की बाहेर येऊ. हे काय या औषधांनी बघ तुझ्यात किती बदल झालाय, रिकव्हर होतोयेस तू." असं काहीबाही सांगून तो तिचं मन रमवायचा.
तिला आता डायबिटीस आणि बीपी दोघेही डिटेकट झाले होते. त्यात आता हातावर लाल चट्टे दिसायला लागले होते. लोकल स्पेशालिस्ट पासून मुंबईच्या मोठमोठ्या हॉस्पिटल्स पर्यंत चकरा झाल्या होत्या. एंडोक्रिनॉलॉजिस्ट काय, नेफ्रोलॉजिस्ट काय? ऑन्कोलॉजिस्ट काय? ज्यांची कधी नाव देखील ऐकली नव्हती अशा डिपार्टमेंट्सला भेटी द्याव्या लागल्या होत्या. प्रत्येक जण औषधं द्यायचे, त्यांच्या टेस्ट्स करायचे तर त्या नॉर्मल यायच्या. मग ते पुन्हा कुठलातरी दुसरा स्पेशालिस्ट रेफर करायचे . पुन्हा तो परत सुरुवात करायचा.
पाण्यासारखा पैसे वाया जात होता. फरक काही पडत नव्हता आणि आता ती तिच्या सगळ्या दुखण्याचं खापर आनंदवर फोडत होती की तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. यातून तिला कसं बाहेर काढता येईल याचच विचार त्याच्या डोक्यात फिरत राहायचा. तिच्या गोळ्या औषधं नियमित देऊन तिला अक्षरशः बाळासारखं निजवावं लागायचं. कधी कधी ती रात्रभर रडत बसायची, तिची समजूत घालत बसायचा. तिला समजवत, डोक्यावरून हात फिरवत त्याने कित्येक रात्री जागून काढल्या त्याची गिनतीच नव्हती. त्यांचे आई वडील येऊन जाऊन असायचे, ते तरी बिचारे काय करू शकणार होते. पण आनंदचं मात्र कौतुक वाटायचं की एवढं सहन करूनही हा हसतमुख कसा असू शकतो.
अशी तीन वर्ष गेली. म्हणतात ना नशीब केव्हा आणि कसे बदलेल सांगता येत नाही. एक दिवस त्याचा एक मित्र त्याला म्हणाला की ज्या अर्थी कामिनी वाहिनीच्याच्या टेस्ट्स मध्ये काहीच दिसत नाही पण त्यांचा आजार पण बरा होत नाहीये जर त्याचा विश्वास असेल तर त्यांनी बाहेरचं काही असेल तर बघितल तर चालेल का?
हतबल झालेला आनंद त्याला म्हणाला की तिला बरं करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मित्राने त्याला सांगितलं की तो एका व्यक्तीला ओळखतो जो व्यवसाय म्हणून हे काम करत नाही पण काही सिद्धी त्याला पिढिजात प्राप्त झाल्या आहेत, त्याची वेळ घेतो. मित्र गेल्यानंतर आनंदच्या लक्षात आलं की कामिनीच्या डायबिटीसच्या काही गोळ्या मिळत नव्हत्या म्हणून तो तिला पण फिरवून आणू म्हणून दोघेही बाहेर पडले. बरेच मेडिकल पहिले पण त्या काही मिळाल्या नाहीत. बर प्रिस्किप्शन लिहून देणारा डॉक्टर मुंबईचा होता आणि तो काही फोन उचलत नव्हता. आता काय करावं असा विचार करत असतानाच त्याच्या लक्षात आलं की आपल्या बाजूच्या कॉम्प्लेक्स मध्येच एक नवीन डायबिटीस क्लिनिक उघडलंय. तिथे जाऊन विचारू तर खरं असं म्हणून फाईल घेऊन ते डॉ. वर्तकच्या क्लिनिक मध्ये आले. क्लिनिक नवीन असलं तरी पेशंट बरेच होते. चवकशी केल्यावर कळलं की त्या डॉक्टरांचं हे दुसरं क्लिनिक होतं पाहिलं शहरच्या दुसऱ्या भागात आहे.
बराच वेळ वाट पाहिल्यावर यांना बोलावलं गेलं. डॉ. वर्तक मध्यमवयीन व्यक्ती होते. बारीक कापलेले केस, थोडी दाढी, त्यांच्या केबिन मध्ये पसारा होता पण धूळ नव्हती. नेमप्लेट वर बऱ्याच डिग्र्यांची बाराखडी लिहिलेली होती. आसपास बरीच सर्टिफिकेट्स, पुरस्कार घेतानाचे फोटो फ्रेम मध्ये लावलेले होते. आनंदने त्यांना तिच्याबद्दल कल्पना दिली आणि यायचं कारण सांगितलं. त्यांनी आधी आनंदने दिलेली फाईल चाळली आणि बाजूला ठेऊन दिली. मग कामिनीला विचारलं काय होतंय. त्यांच्या बोलण्यात जी सौम्यता व आत्मविश्वास होता त्याने आनंद व कामिनी दोघेही प्रभावित झाले होते. कामिनी बोलायला लागली. तिने तिचे सगळे दुखणे त्यांना सांगितले. तब्ब्ल अर्धा तास ती बोलत होती. मध्ये आनंदने बोलायचं प्रयत्न केल्यावर डॉक्टरांनी त्याला हातानेच शांत बसवून तिलाच बोलू देण्याची खूण केली.
सगळं ऐकल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट्स त्यांच्याचकडच्या काही उपकरणांवर केल्या आणि आनंदला सांगितलं की उद्या तुमच्याकडे एकजण येऊ टेस्ट्स साठी ब्लड सॅम्पल्स घेऊन जाईल. आनंदला वाटलं घ्या आता हे साहेब पण या त्या टेस्ट्स करून आता त्यांचं मीटर डाऊन करताहेत की काय? डॉक्टरांनी त्याला स्पष्ट सांगितलं की त्यांना तिच्या जुन्या रिपोर्ट्स शी काही घेणं देणं नाहीये. त्यांनी तिच्या सगळ्या गोळ्या औषध बंद करायला सांगितली व स्वतःच्या नवीन लिहून त्या घ्यायला सांगितल्या. कामिनीला बाहेर जायला सांगून त्यांनी आनंदला सांगितलं की " शी इज गोइंग इन डिप्रेशन, यु निड टू बी व्हेरी केअरफूल. मी त्याची पण गोळी लिहून दिली आहे. बीपी ची पण बदलली आहे. ट्रस्ट मी. मी तिला नक्की बरी करेन." पुन्हा त्यांनी कामिनीला आत बोलावून तिला म्हणाले "तू पूर्वी कशी दिसत होतीस त्याचा काही फोटो आहे का तुझ्याकडे?" नव्हताच. पण आनंदने लगेच फेसबुक वरून तिचा आजारपण यायच्या आधीच फोटो त्यांना दाखवला. डॉक्टर स्मित हास्य करत म्हणाले "माझ्यावर विश्वास ठेवा मी तिला पुन्हा तशीच करून दाखवतो. त्यांच्या बोलण्यात जबरदस्त आत्मविश्वास होता. दोघे समाधानाने घरी परत आले व मोठ्या अपेक्षेने त्यांनी त्यांची नवीन औषधे सुरु केली.
आनंदच्या मित्राचा फोन आला की तो त्या बाबाशी बोलला होता आणि त्यांना त्याने उद्याच बोलावले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याचा मित्र व हे दोघे सोहन दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीकडे गेले. एका एक मजल्याच्या जुन्या इमारती मध्ये पहिल्या मजल्यावर दोन घरं होती. मित्राने एका घरात डोकवुन काही विचारले व त्या दोघांना घेऊन तो शेजारच्या घरात शिरला. घर नव्हतंच ते घरात एक मंदिरच बनवलेलं होतं. वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटो, मुर्त्या काही वाटोळे दगड, मध्यभागी एक दगडी शिवलिंग ठेवलेलं होतं. कोपऱ्यात पितळेचे त्रिशूल, काही तांब्या पितळेचे हातातले कडे असं काही काही ठेवलेलं होतं. सप्तशृंगी देवीच्या फोटो समोर एक समई लावलेली होती.
दाराशेजारी एक चटई अंथरलेली होती त्यावर तिघे बसले. आनंदच्या मनात आता धाकधूक व्हायला लागली की आपण करतोय ते बरोबर आहे का? त्याने बुवाबाजीच्या बऱ्याच घटना ऐकल्या होत्या आणि तो कधी त्यात पडेल असं त्याला स्वप्नात ही वाटलं नव्हतं. पण कामिनी साठी तो तिथे ही पोचला होता. या सोहन दादा विषयी मग त्याने माहिती काढली होती तेव्हा कळलं की या क्षेत्रातील ते एक मोठं प्रस्थ होतं तो हे व्यवसाय म्हणून करत नव्हता. फार क्वचितच गोष्टी हातात घ्यायचा. पण वेळ पडल्यावर मोठे मोठे तांत्रिक मांत्रिक त्याचा सल्ला घेत असत.
कोपऱ्यात खुर्चीवर एक तिशीतला एक गोरा, स्मार्ट तरुण जीन्स व टीशर्ट घालून मोबाईलवर काहीतरी पहात होता. असेल कोणीतरी म्हणून ते सोहन दादा यायची वाट पाहायला लागले.
अचानक तो मुलगा उठला आणि आनंदकडे पाहून हसत म्हणाला "काही मनात किंतु परंतु ठेऊ नकोस. तू देवीच्या दरबारात आहेस. ती निराश करणार नाही" असं म्हणून त्याने एक काळ्या रंगाचे घोंगडी खाली अंथरली आणि त्यावर बसला.
"आम्हाला सोहन दादांनी आज बोलवले होते. आहेत ना ते? " आनंद म्हणाला
समोरचा मुलगा छान हसला आणि म्हणाला " हो आहे ना. मीच सोहन शेट्टी. वाटत नाही ना? आय एम अ सॉफ्टवेअर प्रोफेशनल. बरेच मोबाईल अँप्स मी बनवले आहेत. तसा आमचा व्यवसाय वेगळाच आहे. आपल्या विभागातले काही उडुपी हॉटेल्स व बार आमचेच आहेत. पण आमच्या कडे पिढीजात ही देणगी आली आहे. माझ्या आजोबांना दृष्टांत झाला व ते गरजूंवर मंत्र तंत्र उपचार करायला लागले, त्यांच्यानंतर माझ्या वडीलांकडे हे काम आलं आता वयाच्या पंधराव्या वर्षी मला दृष्टांत मिळाला आणि हे काम मी करतो. हा व्यवसाय म्हणून करत नाही फार गरज असेल तरच आम्ही हे काम हातात घेतो. हे मंदिर माझ्या आजोबांच्या हातचं आहे. त्या दिवशी या अनिलने तुमच्याबद्दल जिवतोडून सांगितलं आणि म्हणून त्याच्या आग्रहाखातर मी तुम्हाला बोलवलं. तुम्ही खाली आले तेव्हा मी गॅलेरीतच उभा होतो. मी ताईकडे पाहिलं अन मनाशीच समाधान वाटलं की बरं झालं मी तुम्हाला बोलावून घेतलं."
तो डोळे बंद करून काहीतरी पुटपुटला आणि मग कामिनीला त्याने समोर येऊन बसायला सांगितलं. त्यानंतर त्याने हातावर काहीतरी द्रव चोळलं आणि सगळीकडे एक मंद सुगंध पसरला. नंतर त्याने तिला हात पुढे करायला सांगून तिच्या उजव्या हाताचा अंगठा हातात धरला आणि पुन्हा काहीतरी पुटपुटला. कामिनीने डोळे लावून घेतले तसा तो म्हणाला "ताई मला पहिल्यापासून सांग हा त्रास पहिल्यांदा झाला तेव्हा पासून. मला तुझा भाऊच समज आणि मोकळेपणाने बोल."
कामिनी भारावल्यागत बोलायला लागली ते देवीच्या दर्शनाला गेले तेव्हापासून सगळं सांगितलं. काय काय त्रास होत होता, काय इलाज केले ते सगळं. मध्येच ती मोठ्याने श्वास घ्यायची. मध्येच अतिशय हळू आवाजात बोलायची.
"कुठे झाडाखाली पारावर बसलेलं आठवतं का? " - सोहन दादाने विचारले.
"हो गाडीचा पंक्चर काढत होते तेव्हा दमून थोड्या दूर कोपऱ्यात असलेल्या एका झाडाखाली दगडावर बसले होते."
ठीक आहे म्हणत त्याने तिचा अंगठा सोडला तशी ती भानावर आली.
त्याने मग दुकानातून एक पाण्याची बाटली मागवली, तिला ते पाणी मंत्रून दिलं. तिला सांगितलं की ते पाणी तिला आठवडाभर पुरवायचं आहे आणि ते प्याल्यावर कितीही मळमळ झाली, कसतरी वाटलं तरी पाणी पिणं थांबवायचं नाही. एका आठवड्याने त्याने आनंदला बोलावलं. कामिनी नसती आली तरी चाललं असतं.
"ताई मी तुझ्यासाठी देवीला अर्ज करणार आहे. मला विश्वास आहे की देवी आपल्याला निराश करणार नाही. तुलाही विश्वास ठेवावा लागेल. आज तुला एक मजला चढायला आनंदच आधार घेऊन तब्ब्ल २० मिनिटं लागलेली मी पहिली पण विश्वास ठेव पुढल्या १४ दिवसात तू स्वतः पायऱ्या चढून वर येशील कोणाचाही आधार न घेता."
आनंदने सहाजिकच प्रशन केला किती फी द्यायची. सोहन दादा म्हणाला "अहो मला जी काही देणगी मिळाली आहे ती देवाने दिलीय आणि त्या विश्वाच्या निर्मात्याला आपण काय देणार? आणि राहिला प्रश्न माझा तर मला देव दयेने पोटापुरते व्यवस्थित मिळतं आहे. तुम्ही फक्त माझ्याने ताई बरी होऊ दे एवढीच प्रार्थना करा."
ते तिघे बाहेर पडले तशी सोहन दादाची बायको समोर आली. तीही चांगली शिकली सवरलेली व देखणी दिसत होती. सोहन दादा ने यांचा परिचय करून दिला तसं तिने हसतमुखाने नमस्कार केला आणि ते बाहेर पडले. जाताना सोहन दादा कामिनीला हळूच म्हणाला "ताई, तुझा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपले शेवटी आपलेच असतात आणि बाहेरचे ते बाहेरचेच असतात." कामिनिने फक्त त्याच्या कडे चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिथून ते बाहेर पडले. त्या आठवड्यभरात कामिनीच्या तब्येतीत फरक पडायला लागला होता. डॉक्टरांची औषधे ही काम करत होती. कामिनी रात्री शांत झोपायला लागली होती.
आठवड्याने जेव्हा आनंद सोहन दादाकडे पोचला तेव्हा त्याने त्याला काही मोहरीचे दाणे मंत्रून दिले आणि ५ दिवस दिवसातून ३ वेळा कामिनीवरून ओवाळून अगणित टाकायला सांगितले. आणि मग तिला घेऊन यायला सांगितलं. आनंदने आठवडाभर सुट्टी टाकली आणि मग न चुकता तो तसं करायला लागला. त्याच्या लक्षात आलं की मोहरी ओवाळून टाकली की त्याच्या स्वतःच्या अंगातलं सगळं त्राण निघून जायचं. पुढचे दीड दोन तास तो मलूल होऊन पडून राहायचा. त्याच्यात उठायची ताकद रहात नव्हती. २ दिवसानंतर तर तिच्यावरून मोहरी ओवाळून टाकल्यावर होणारी स्वतःची अवस्था आठवूनच घाबरूनच जायचा. पण तो कामिनी साठी सगळं करत होता. इकडे तिच्यात दिवसेंदिवस फरक पडू लागला होता. यात डॉक्टरच्या औषधांचा गुण होता की सोहन दादाच्या बाहेरच्या गोष्टींवरचा इलाज होता ते कळेना पण ती सुधारत चालली होती. पाच दिवसानंतर जेव्हा ते पुन्हा सोहन दादा कडे गेले तेव्हा कामिनी स्वतःच कोणाचा आधार न घेता त्याच्या इमारतीच्या पायऱ्या चढून वर गेली.
सोहन दादाने त्यांना पाच दिवसात काय झाले ते विचारले तेव्हा आनंदने त्याला मोहरी उतरवल्यावर त्याची होणारी अवस्था सांगितली. अचानक कामिनीने तिला शेवटच्या रात्री पडलेलं स्वप्न सांगितलं की ते सगळे त्याच सोहन दादाच्या मंदिरात होते आणि एक पांढऱ्या साडीतली बाई तिच्या शेजारून निघून तिच्याकडे पहात पहात समोरच्या देवीच्या फोटोत विलीन होऊन गेलेली तिला दिसली.
सोहन नुसता हसला आणि म्हणाला की "मला हे ठाऊक होतं पण मी तुला सांगितलं नाही. खरं तर हे द्वंद्व होतं कामिनीतल्या नेगीटिव्हिटी व आनंद मधल्या पॉसिटीव्हिटी मधलं. मोहरी ओवाळणं हे फक्त तिच्यातल्या त्या वाईटाला चेतवून देण्याचं निमीत्त होतं. जाऊ द्या तुम्हाला नाही कळणार त्या गोष्टी. पण एक आहे की ताई आता एकदम ओके झाली आहे. आता जे काही शारीरिक नुकसान आहे ते औषधाने काही काळात बरं होऊन जाईल. ते तुम्ही वेळेवर घ्या आणि आता ती नाही आली तरी चालेल. असे म्हणून तिच्या हाताला दादाने एक ताईत बांधला. आणि त्याला खूप धन्यवाद ते तिथून निघून आले. कामिनीला खरंच खूप छान वाटायला लागलं होतं.
इकडे डॉ. वर्तक यांच्या हाताचा गुण चांगला येत होता. दर आठवड्याला बोलवणारे डॉक्टर आता तिला तीन महिन्यातून किंवा सहा महिन्यातून एकदा चेक अपला बोलवायला लागले. आता त्यांनी बोलावणं पण बंद केल होतं. चौथं वर्ष संपेपर्यंत कामिनी जवळ जवळ पहिल्या सारखी दिसायला लागली होती. तिचा आत्मविश्वास पुन्हा यायला लागला होता. पुढच्या सहा महिन्यात ती एकदम नॉर्मल झाली आणि मग रुपाबरोबर तिचे गुण ही परत यायला लागले. ती हळू हळू पुन्हा आनंद ला कमी लेखायला लागली होती. काहीवेळा तर त्याने आधीच व्यवस्थित तिच्याकडे लक्ष दिले असते तर तिला एवढे दिवस बरे व्हायला लागले नसते असं बोलू लागली होती.
त्या दिवशी सकाळी पण त्याचाशी वाद घालून आणि त्याला वाट्टेल ते बोलून ती ऑफिसला निघून गेली. आनंदने फक्त एक स्मित हास्य दिलं आणि मान खाली घातली. संध्याकाळी परत आल्यावर पाहिलं तर आनंद बहुतेक अजुन आलेला नव्हता. घरात शिरल्यावर तिला टेबल वर एक खाकी मोठं पाकीट ठेवलेलं दिसलं. तिने उघडून पाहिलं तर आत काही पेपर्स होते व एक पत्र होतं.
आनंद ने लिहिलेलं
" प्रिय कामिनी,
मला माहित्ये की तुला माझ्याबरोबर संसार करणं अवघड जातंय. तुला भौतिक सुखाच्या ज्या अपेक्षा आहेत त्यात मी कमी पडतोय. पैसा कोणाच्या नशिबात किती असावा हे कोणाच्या हातात नसतं त्यामुळे इतरांच्या मानाने मी कमी असलो तरी इतर काहींच्या मानाने आपली परिस्थिती अतिशय उत्तम आहे.
मी राहुलचे आणि तुझे मेसेजस वाचले होते. माझ्या अपघाताला तू सहा महिन्यात इतकी कंटाळलीस की मला सोडून जायची तयारी केली होतीस राहुल बरोबर? काय मेसेज होता राहुलचा की सहा महिन्यात तो ऑस्ट्रेलिया हुन परत येऊन मग तुला घेऊन जाणार होता. मला वाटत होतं की परिस्थिती मुळे व एकटीवर सर्व जबाबदारी पडल्यामुळे तुझी चिडचिड होत असेल, मी परत जॉईन झाल्यावर ती बदलेल. मला काय माहिती होतं की तुझ्या आयुष्यत मला आता स्थानच राहिलेलं नव्हतं. खरं तर मीच निघून जाणार होतो तेव्हाच पण प्रारब्ध पण कसं असतं बघ ज्या दिवशी मी तुझ्या आयुष्यातून निघून जाण्याचा विचार केला नेमकी त्याच दिवसापासून तू आजारी पडलीस. तू कशीही वागलीस तरी माझं तुझ्यावरचं प्रेम तुला त्या परिस्थितीत सोडून जाण्याइतकं निष्ठुर नव्हतं. गेली चार वर्ष तुला कोणाचीतरी, आधाराची, प्रेमाची नितांत गरज होती आणि मी तुला तसा सोडून जाणार नव्हतो.
आता तुझं रूप, तुझा आत्मविश्वास तुला परत मिळाला पण त्याच बरोबर माझ्याबद्दलचा दुःस्वास ही. आता तुला पुन्हा मी निरुपयोगी वाटू लागलो त्यामुळे मी आता तुझ्या आयुष्यातून जात आहे. आता पर्यंत जे मी राहिलो ते माझं तुझ्यावर निस्सीम प्रेम होतं पण आता जो जातोय तो माझा स्वाभिमान आहे. प्रेमाचं कर्तव्य मी पार पाडलं पण आता माझा स्वाभिमान जपायची वेळ झाली आहे.
सोबत डायव्होर्स चे पेपर्स आहेत. माझ्या सह्या मी केल्यात तुझ्या करशील तर ठीक नसशील करणार तरी मी काही आता परतणार नाहीये. घर माझ्या नावावर जरी असलं तरी तुझ्यासाठी ठेवतोय. पण ज्या दिवशी इथे तुझ्याबरोबर इतर कोणी राहायला आलेलं दिसेल त्या दिवशी मी अधिकाराने माझ्या घराची चावी घेऊन जाईल. काळजी घे स्वतःची. ती आता तुलाच घ्यावी लागणार आहे. btw राहुलने दोन वर्षपूर्वीच लग्न केलं ऑस्ट्रेलिया मधलीच भारतीय मुलगी आहे. त्यांना नुकतंच बाळ ही झालंय. तुझा असूनही तुझा नसलेला
आनंद."
शॉक्ड झालेली कामिनी धावतच आत गेली. कपाट उघडून पाहिलं आतमध्ये आनंदचे कपडे नव्हते, त्याच्या चपला, शूज काहीच नव्हतं. आनंदचं पत्र हातात धरून कामिनी विमनस्क अवस्थेत बसून राहिली.
---अमोल पाटील ----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा