"लाज वाटते मला तुझी,माझी आई आहेस सांगायची खरच लाज वाटते मला कायम ह्या अशा अवतारात,फाटक्या मळकट कपड्यात का वावरतेस अशी. ह्यापुढे निदान मी सोबत असताना तरी ही अशी बावळटासारखी येऊ नकोस. खरच खूप लाज वाटते गं." साक्षी अती रागात अक्षरशः किंचाळून बोलत होती. मोठ्याने ओरडत असल्याने आवाज शेजारील चार घरात ऐकू जात होता. न राहवून शेजारच्या राधा मावशी दारात येऊन उभ्या राहिल्या.
"तू ही अशी घाणेरड्या अवतारात राहतेस. अगदी बावळटासारखी. म्हणूनच तेव्हा बाबांना पण तू आवडेनाशी झाली असणार आणि म्हणूनच सोडून गेले ते तुला." साक्षी अजूनही तोंडाला येईल ते वचावचा बोलत होती. मालती (साक्षीची आई) मात्र कोपऱ्यात बसून होणारे शाब्दिक वार झेलत होती. अश्रू ओघळत होते. अन मनात विचारांचे वादळ वेगाने घोंघावत होते.
"बाबा पण ना. गेले निघून पण जाताना मला पण घेऊन गेले असते तर काय झाले असते. तुझ्यासोबत ह्या घाणीत सोडून गेले." दारात उभ्या असलेल्या राधा मावशींनी साक्षीचे बोलणे ऐकले. इतका वेळ शांत असलेल्या राधा मावशी आता मात्र पुढे सरसावल्या.
"साक्षी,खूप बोललीस पुरे कर आता.आई आहे ती तुझी अस वाटेल तसं बोलताना जरा विचार करत जा काय वाटत असेल तिला त्याचा"
"मावशीआजी तिला काय वाटेल ह्याचा विचार करूनच इतके दिवस गप्प होते पण आता मला नाही सहन होत. कसा हा अवतार हिचा.किती वर्ष त्याच त्या साड्या.फाटक्या,मळक्याशी.लाज वाटते. शरीराची नुसती हाडं उरली आहेत. मस्तपैकी खावं, व्यवस्थित राहावं, चांगले कपडे वापरावे. काही काहीच कस कळत नाही हिला. माझ्या मित्र-मैत्रिणींचे आई-वडिल कसे अगदी रुबाबदार आणि ही अशी एखाद्या भिकारणीसारखी."
"साक्षी,हे काय बोलतेस तू. अक्कल आहे का तुला? ही तुझी आई अशी राहते त्याची लाज वाटते तुला, पण कधी विचार केलास का की आपली आई अशी का राहते?" राधा मावशी ओरडल्या.
"जाऊ दे मावशी लहान आहे ती. नाही कळत तिला काही." मालती अश्रू पुसत म्हणाली.
"नाही मालती गप्प बसून नाही चालणार आता, हिला कळायला हवं आता सार काही.."राधा मावशी शांत होत म्हणाल्या.
"साक्षी, बस इथे आणि नीट ऐक ही तुझी आई आहे ना. माझ्या बालमैत्रिणीची मुलगी. मालती लहान म्हणजे जेमतेम ५ वर्षांची असताना तिची आई वारली. वडिलांनी मालतीचे संगोपन व्यवस्थित व्हावं म्हणून दुसरे लग्न केले पण जी स्त्री मालतीची आई बनून घरात आली. त्या स्त्रीने हिचे हाल करायला सुरवात केली. मालतीचे बाबा कामानिमित्त बाहेर असायचे. ते घरी असले की सावत्र आई व्यवस्थित वागायची. पण घरात नसताना मात्र मालतीचे प्रचंड हाल करायची. सावत्र आईला दोन मुलगे झाले. त्यांच सगळं मालतीच करायची. दिवस सरत गेले मालती १५ वर्षांची झाली आणि एक दिवस मालतीचे बाबा पण अपघातात गेले. सावत्र आईला मालती नकोच होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने लगेचच मालतीच लग्न एका ४५ वर्षाच्या पुरुषाशी लावून दिले आणि बजावले की, आता पुन्हा कधीही इथे परतून येऊ नकोस. मालती सासरी गेली. नवरा खूप दारू प्यायचा. मारहाण करायचा. लग्नानंतर काही महिन्यांनी मालतीला दिवस गेले. मुलगाच व्हायला हवा अस तुझे बाबा सारखे बजावत राहत आणि तिच्या त्या अवस्थेतही तिला प्रचंड मारहाण करत. कधी सिगारेटचे चटके तर कधी हातात जे काही असेल त्याने मारायचा तो राक्षस तिला. आजूबाजूला कोणाकडे जायचे नाही. कोणाशी बोलायचे नाही अस तुझ्या बाबांनी सांगूनच ठेवले होते मालतीला. बिचारी मालती सार काही मुकाट्याने सहन करत होती. काही दिवसांत तुझा जन्म झाला. मुलगी झाली म्हणून तुझे बाबा चवताळून उठले. मालतीला पूर्वीपेक्षा जास्त मारहाण करू लागले. दारू पिण्याचे प्रमाणही वाढले. व्यसनामुळे कामावरूनही काढून टाकण्यात आले तुझ्या बाबांना. तुला कधी त्या माणसाने प्रेमाने साधं उचलून घेतले नाही. उलट दारू प्यायला पैसे नाहीत म्हणून चक्क एका रात्री तुला उचलून घरातून निघाला. का माहित आहे? तुला विकण्यासाठी. पण तेव्हा मात्र मालतीने त्याच्या तावडीतून तुझी सुटका केली. तुझ्या बापाने तेव्हा मालतीला कायमचं घराबाहेर काढलं. कारण त्याला तू नको होतीस. अन मालती तुला सोडायला तयार नव्हती. खर तर स्वतःलाही नीट सांभाळता न यावं इतकं कमी वय होत तिच पण त्या वयात तिच्यावर तुझी सारी जबाबदारी आली. सावत्र आईने सांगितलेच होते परतून येऊ नको म्हणून. तरीही मालती तिथे गेलीच पण आईने हाकलवले. मालती रडली. पोटाची खळगी भागवण्यासाठी हात पसरले दिसेल त्याच्यासमोर. कारण तिला जगायचे होते तुझ्यासाठी पण तिला अस सर्वांसमोर हात पसरणे आवडत नव्हते. पण नाईलाजाने ते करणे भाग होते. अशातच एक दिवस मालती माझ्या नजरेस पडली. मी ओळखले तिला, ती मात्र मला ओळखत नव्हती. मी माझी ओळख सांगितली. किती रडली होती, किती आक्रोश केला होता तिने तेव्हा. सारकाही सांगितले तेव्हा तिने मला ऐकून खूप वाईट वाटले. मला स्वतःचे मूल नाही. पण त्या क्षणी मालतीला मी माझी मुलगी मानले. तिला आणि तुला इथे घेऊन आले. माझ्या घरात जागा नाही म्हणून शेजारी असलेल्या माझ्या घरात राहू दिले. मालतीला मी जरी मुलगी मानले तरी तिला तुझी जबाबदारी तुझा खर्च माझ्यावर लादायचा नव्हता. आणि म्हणूनच मग तिने काम करायला सुरुवात केली. तुला माझ्याकडे ठेऊन त्या मोठाल्या इमारतीत दोन घरची जेवणं करू लागली. तू थोडी मोठी झालीस शाळेत घालण्याची वेळ आली. रोजच्या खर्चात तुझ्या शिक्षणाचा खर्च वाढणार होता आणि तिला तुला खूप शिकवायचे होते म्हणून तिने अजून काम करण्याचा निर्णय घेतला. मुलांना शाळेच्या बस पर्यंत सोडायला आणि आणायला जाण्याचे कामही ती करू लागली. तू अजून मोठी झालीस. तुझ्या गरजा वाढल्या. तुझ्या गरजा भागवण्यासाठी स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करू लागली ती, कारण तुझ्या भविष्यासाठी पैसा जमवायचा आहे ना तिला. अग किती त्रास सहन केला आहे तिने आजवर, तिच्या अंगावर हे डाग बघ जरा."
साक्षीने मालतीच्या शरीराकडे पाहिले. शरीरावर असंख्य काळे निळे डाग होते.
राधा मावशी पुढे म्हणाल्या,"पाहते आहेस ना ह्या खुणा, तुझ्या बापाने दिलेल्या वेदना आहेत ह्या ज्या शरीरावर पसरल्या आहेत अश्या स्वरूपात. ज्या दिसत आहेत. पण तिच्या मनावर ह्याही पेक्षा मोठ्या जखमा खोलखोलवर वसल्या आहेत. ज्या ती कधीही कोणालाही दाखवत नाही. तू मुलगी आहेस तिची अन ती तुझी आई. तुझ्यासाठी राबते आहे ती, तू सुखी राहावीस म्हणून अन तू. तू मात्र तिचा विचार न करताच काहीही तोंडाला येईल ते बोलते आहेस. अगं अशा आईची लाज वाटूच कशी शकते तुला, उलट तुला अभिमान वाटायला हवा तिचा की ती तुझी आई आहे. तू समजून घ्यायला हवं तिला अन तूच अशी वागतेस. विचार कर तिच्या मनाला काय वाटत असेल."
राधमावशीचे बोलणे ऐकून साक्षीला आपण चुकलो हे कळून चुकले. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ती पुढे झाली आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली.
"आई, माफ कर गं मला चुकले मी. ह्यापुढे तुला कधीही काही बोलणार नाही. खूप केलंस तू माझ्यासाठी आणि अजूनही करतेच आहेस. वचन देते तुला आई. शिकेन खूप मोठी होईन आणि तुला नक्कीच सुखात ठेवेन. फक्त एकदा माफ करशील ना मला."
मालतीने साक्षीच्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि म्हणाली, "बाळा नाही रागवले ग मी तुझ्यावर. अशी रडू नकोस. चल अश्रू पुसून टाक आणि हस बघू."
साक्षी हसली, आईला घट्ट मिठी मारली. राधामावशीला फार बरे वाटले. आता साक्षी स्वतः शिकत असतानाही आसपासच्या लहान मुलांची शिकवणी घेते. स्वतः कमवते आहे. आईच्या डोईवरचा भार कमी व्हावा म्हणून तीही धडपडते आहे. अन अभिमानाने सर्वांना "ही माझी आई" म्हणून सांगते आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा