सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

1329. ठरवल्याप्रमाणे

     त्या दोघांच नवं घर. नवकोरं म्हणता येणार नाही कारण आधी कोणीतरी तिथे राहयचं पण तरी घराचं नवेपण टिकून होतं. तसं साधं घर, चार प्रशस्त खोल्या वर गच्ची. गच्चीत जायला बाहेरून काढलेला गोल गोल जिना. नंतर ती तो आत घेणार होती आणि तो हो म्हणाला होता. सध्या दिवस असे की ती म्हणेल त्याला तो बिनादिक्कत हो म्हणायचा. त्याला कारणच तसं होतं तिने हट्ट केला म्हणून हे घर झालं असं त्याला वाटायचं. कानेकोपरे ओळखीचे व्हायचे होते पण दारं खिडक्या सरावाची झालेली. घरा भोवती चौफेर तारेचं कूंपण होतं त्याला ती लक्षमण रेषा समजायची. तो दिवस भर कामा निमित्त घराबाहेर असायचा आणि ती दिवसभर घराभोवती गोल गोल फिरायची. भीती अशी कधी वाटलीच नाही त्याला कारणही होतं आधीचे घर सोडून जाताना साईबाबांची भली मोठी तसवीर विसरून किंवा ठेऊन गेले होते तिला त्यांची सोबत वाटायची. हे घर घेताना होतं नव्हतं ते सगळं कामी आलं होतं, आधी होतच काय म्हणा. पण जे होतं ते ही तिच्या साठी त्याने पणाला लावलं आणि शहरापासून लांब, निर्जन सुनसान प्रदेशात हे एक्कलकोंड घर घेतलं. इथे आल्यापासनं मुगाच्या खिचडी शिवाय दुसरं काही दोघं जेवले नव्हते. चहा सुद्धा दोनदाच पण घरात जे काही शिजेल ते ती भक्तीभावाने साईंसमोर ठेवायची म्हणायची अत्ता हे गोड मानून घ्या. तुमच्या आशिर्वादाने घर भरलं की ताट्भरून नैवेद्य दाखवेन. तो हसायचा म्हणायचा इतका लळा नको लाऊस ही तसबीर आपली नाहीये. आज ना उद्या कोणी न्यायला येईल आणि आपल्याला ती द्यावी लागेल इतकी सूंदर तस्बीर उगाच कोण सोडेल? आणि अशीच तसबीर आणायचा हट्ट अत्ताच धरू नकोस घराचा हप्ता जाऊन दोनशे तीनशे तसबीरीवर घालणं सध्या शक्य नाही. त्याच्या कष्टाची तिला कल्प्ना नव्हती असं नाही. आणि मुळात ती खूप शहाणी आहे या वर त्याचा विश्वास होता. खरतर तिच्या वरचा विश्वास एव्हढीच त्याच्या आयुष्याची मिळकत होती आधार होता. तो मनोमन प्रार्थना करायचा आता एक दीड महिना होऊन गेला आता कोणी ती तसबीर मागायला येऊ नये. दिवसभर ती एकटीच असते तिला तेव्हढीच सोबत. तो परिसर असा की गच्चीत उभं राहिलं की थेट जेमतेम नजरेच्या टप्प्यात येणारं स्टेशन दिसायचं. तुरळक माणसं उतरायची आणि त्यातूनच घराकडे येणारा तो दिसायचा ही लगेच साईना वर्दी द्यायची हे आले हो. साईना ती कधी कधी मामंजी म्हणायची त्याला ते आवडायचं नाही. आज ना उद्या कोणीतरी ही तसबीर न्यायला येणार याची त्याला खात्री होती. हल्ली तिची भीड जराचेपली होती घर साईंच्या हवाले सोडून खुशाल ती अवती भवती फिरायची पण त्यामुळे तोंडल्याचे, कच्च्या करवंदाचे, घोसावळ्याचे बेवारशी वेल तिला सापडले आणि खिचडी मधे ते डोकावायला लागले. दोघे असे त्या घरात रुळत असतानाच एक दिवस लांब स्टेशनापाशी ट्रेन थांबली आणि तुरळक गर्दीतून तो घराकडे येताना तिला दिसला ती खाली जायला वळणार तेव्हढ्यात त्याच्या मागून एक इसम तिला त्याच वाटेवरून येताना दिसला. हा घरात शिरला तसा तो ही घरापाशी घुटमळला. दोघानी विचारपूस केली तो जरा अवघडूनच घरात आला .तो उगाच हसत म्हणला कसं वाटतय इथे? आम्ही पण छान रमलो होतो पण येणं जाणं जिकरीचं व्हायला लागलं. त्याने ओळखलं हा साईंची तसबीरच मागायला आलाय. तरी आलेला इसम काहीबाही बोलत राहिला तिने लिंबूसरबत दिलं आणि त्याने येण्याचं कारण विचारलं.
     तो अवघडत म्हणाला माझ्या आईचा जीव अडकलाय इथे. साईंची तसबीरना? असं काहीतरी तो बोलणार तेव्हढ्यात तो अजीजी करत म्हणाला माझी एक विनंती आहे. दोन दिवस माझ्या आजारी आईला ठेऊन घ्याल क? म्हणाला तशी आजारी आहे ती या घाराचा ध्यास घेतलाय. जाण्याआधी दोन दिवस राहीली तर शांतपणे डोळे मिटेल. ती वेळच तशी होती की तिला नं सांगता घर विकावं लागलं. अत्ताचं घरही छान आहे भर वस्तीत आहे पण ग्लानीत असलेल्या आईला हेच घर आठवत राहतं. ही म्हणाली दोन दिवस ठेऊन बघा त्याना बरं वाटेल दोघानी एकमेकांकडे बघितलं दोघांच्या डोळ्यात होकारच होता दोघं हो म्हणाले. आणि दुसर्‍य़ाच दिवशी तो आणि त्याची बायको आजारी आईला ्घेऊन घरी आले. आई ग्लानीत होती पण ती दोघं आवर्जून गच्चीत गेली. मागच्या अंगणात गेली तिथेअंगणात लावलेली तुळस जगली नाही म्हणून ती हळहळली.त्यांचा पाय निघता निघत नव्हता..जाताना म्हातीरीची औषधं, केस पेपर पथ्यपाणी सांगून ती दोघं निघाली त्याने त्याचा मोबाईल नंबर दिला नव्या घराचा पत्ता सांगितला पण साईंच्या तसबीरीची आठवण कुणलाच झाली नाही. रात्री त्याचा फोन आला म्हातारी ग्लानीतच होती. म्हातारी जरा सावध झाल्यावर तिने तिला गरम गरम दुध पाजलं, मग पेज दिली. दोन दिवसात येणारा तो आठवडा झाला तरी आईला न्यायला फिरकला नाही. त्याचा फोनही बंद, दिलेला पत्ता खोटा. मग ज्याच्या कडून घर घेतलं त्या एजंटकडे चौकशी केली तो म्हणाला ते दोन्ही भाऊच होते आई नव्हतीच. ही सगळी चौकशी आजीच्या नकळत चाललेली. मग कळून चुकलं आपण फसवले गेलो. म्हातारीजवळ विषय काढला तो पर्यंत ती बर्‍यापैकी सावरली होती म्हणाली काय तो प्रकार माझ्या लक्षात आलाय. माझ्या एकुलत्याएका मुलानी बायकोच्या सांगण्यावरूनमला घराबाहेर फेकली.
     हे म्हणाले घरचा पत्ता सांगा आम्ही तुम्हाला घरी नेतो आजी म्हणाली त्यापेक्षा मी पंढरपूरला जाते. जिथे माझी गरज नाही. जिथे माझी अडचण होते तिथे जाण्यापेक्षा मी पंढरपूरला जाईन तिथे माझं माहेर आहे माझा भाऊ तिथला वतनदार आहे.ती म्हणाली त्याचा पत्ता सांगा आपण त्याच्याशी संपर्क साधू. आजी हासत म्हणाली अगं माझ्या भावाचा पत्ता त्रिभुवनात सगळ्याना माहीत आहे विठोबाचा पत्ता विचारतेस? या वयात निराधार झालेल्या बाईला एका दगडाच्या मुर्तीबद्दल इतका भरवसा? तो ही पोटच्या पोराने असा दगा दिल्यावर? दोघाना अष्चर्य वाटलं आणि पून्हा म्हणून या बाईला जा असं सांगायचं नाही असं दोघानी ठरवलं. त्या बाईचा पायगूण म्हणा नाहीतर दोघांच्या चांगूलपणाचं फळ म्हणा त्या घराला बरकत येत गेली तो ज्यांचा व्यवसाय बघत होता त्यांच्या मुलाने इंटरेस्ट नाही सांगितल्यावर त्या मालकाने सगळा व्यवसाय याच्याच हवाली केला. जिथे तो नोकर होता तिथला तो मालक झाला म्हातारीच्या आग्रहावरून दोघानी चांस घेतला आणि त्याना गोड गोंडस मुलगी झाली.म्हातारीच्या सांगण्यावरून तिचं नाव साधना ठेवलं.
    शेवटी सूखीची भीती वाटायला लागते तसं त्या म्हातारीचं झालं. म्हणाली तुम्ही जा म्हणायच्या आधीच मी माझा मुक्काम हलवते. पण आम्ही तुम्हाला जा म्हणू असं तुम्हाला का वाटलं? दोघानी कळवळून विचारलं. म्हातारी म्हणाली पोटच्या पोरानं बोचकं उचलावं तसं मला उचलून इथे आणून पटकलं. मग तुमच्याकडून तरी मी जास्त अपेक्षा का करू? तुम्ही मला का ठेऊन घेतलत? ती म्हणाली माहीत नाही. साईनी ठरवल्याप्रमाणे आम्ही इथे आलो हे घर घेणं आमच्या अवाक्याबाहेरचं होतं पण साई इथे येऊन बसले आणि बोटाला धरून आम्हाला घेऊन आले तुमच्या चालाख मुलानी आम्हाला हेरलं आणि खडा टाकून बघितला तो फिट बसला असं त्याला वाटलं पण तुमची सोय ही साईनीच केली. तुम्ही होतात म्हणून मी आई व्हायचं धाडस केलं. नाहीतर या निर्जन परिसरात मी काय करू शकले असते ?
     आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निदान तुमचा भाऊ तरी पंढरपूरचा वतनदार आहे पण आम्हा दोघाना कोणीच नाही. तुम्हला तुमच्या मुलानी टाकलं याला त्याच्या आईने. तो चार वर्षांचा असताना याची आई याला यादोंकी बारात दाखवायला घेऊन गेली आणि टाँकीजच्या अंधारा्चा फायदा घेऊन ती पळून गेली. शेजारच्या सीट्वर एक वाण्याचं कुटूंब होतं त्यानी सांभाळलं याला. त्यांची मुलं मोठी झाल्यावर हा तिथून बाहेर काढला गेला. चाचा असे पर्यंत आम्ही भेटायला जात होतो आणि माझं म्हणाल तर मी अनाथ आश्रमातच वाढले समाजाच्या मदतीवर. हे आपलं घर असं आहे आपण तिघं वेगवेगळ्या दिशेने आलो आणि साईनी आपल्याला या एका छता खाली ठेवलं. कारण आपण खेळ मांडायच्या आधीपासून तो आपली वाट बघत इथे तिष्ठ्त बसून होता. साधना खरी आपल्या गोष्टीची सुरुवात आहे जी तुमच्यामुळे शक्य झाली. आजी आपल्याला जमली नाही ती परतफेड पुढे साधना करेल.

@चंद्रशेखर गोखले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...