शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

1339. शतदा प्रेम करावे

 मुलांना शाळेत सोडलं, आणि सुलभाआजींना आज मात्र भेटायलाच जायचंच, हे ठरवलं. पाय घसरून त्या पडल्या होत्या. पायाला दुखापत झाली असं ऐकलं होतं आणि न राहवून माझी पावलं त्यांच्या घराकडे वळली. घरी गेले तर आजींनीच दार उघडलं. मला एकदम आश्चर्य वाटलं !
“या अशा अवस्थेत थोडा आराम करायचा ना काकू…!!” 
पर्स बाजूला ठेवत आणि सोबत नेलेली फळं टेबलवर ठेवत मी म्हणाले. मला बसायला सांगत त्या म्हणाल्या,
“अगं या वयात आता असंच होणार! काहीतरी दुखणार, खुपणार, पडणार. अशा बारीक सारीक तक्रारी चालायच्याच आता. त्याला काही इलाज नाही बघ. शरीर आहे, ते थकणारच. आता गुडघे पण काही काम देईना झालेत. 
“पण तुला सांगू का संगिता, माझी आता या शरीराची काही तक्रार नाही बघ. देवानं खूप आयुष्य दिलं आणि मी ते भरभरून घेतलं. त्याचा सदुपयोग झाला, असं मी म्हणेन. आता नव्वदी पार केली बघ. अजूनही कान आणि डोळे शाबूत आहेत. चांगल दिसतं, कानांनी चांगल ऐकू येतं. आणखी या वयात काय हवंय? देवानं एवढी चांगली वाचा दिलीय. त्यामुळे तर आपण आता बोलू शकतो न दोघी ! मग छोट्या छोट्या गोष्टीची तक्रार का करायची, नाही       का !”  त्यांचं बोलणं तसंही मला नेहमीच आवडायचं.
“खरं सांगू का संगिता, मी माझं आयुष्य खूप छान जगले बघ ! अगदी स्वतःशी प्रामाणिक राहिले. आता जगराहाटीनुसार काही घटना घडल्याही असतील आयुष्यात. पण त्या त्या त्या परिस्थितीनुसार घडल्या असणार. त्याबद्दल माझी देवाकडे काही तक्रार नाही. तुला सांगते संगिता, असं म्हणतात ‘माणसानं भूतकाळ विसरावा, म्हणजे आपला वर्तमान काळ सुखात जातो.’ पण मी मात्र भूतकाळ जगते हो ! काही सुखद घटनाही घडून गेल्याच ना ! त्या कशा विसरायच्या? मला आता त्याच आठवतात बघ. माझं बालपण पुसटसं आठवतं, पण काही आठवणी अजूनही ताज्याच आहेत. आमचं एकत्र कुटुंब. अगदी गाई गोठा असलेलं खेड्यातलं. पण सतत माणसांचा वावर असलेलं. अंगणातलं ते लिंबाचं झाड, त्याच्या उन्हाळ्यात पडणाऱ्या लिंबोळ्या, त्याच्या सावलीत केलेला अभ्यास, तिथेच केलेली भातुकली. शेणाचे मुखवटे करून लावलेलं बाहुला बाहुलीच लग्न, अंगणात उठलेल्या पंगती. सगळं आठवतं आणि त्याच अंगणात माझ्या लग्नाचा घातलेला मांडव…!!!”  
     आता मात्र मी सरसावून बसले. सुलभाकाकूंकडे आनंदाचं झाडच आहे, असं मला कायम वाटायचं. मी नेहमी घरी आले की त्या आठवणीत रंगून जायच्या आणि मी मला यातला कोणता ठेवा जपून ठेवता येईल, या कल्पनेत असायचे. काकू पुढं सांगू लागल्या.
“लग्न काय असतं, संसार काय असतो हे काही तेव्हा समजत नव्हतं. पण तो लाल पिवळ्या रंगाचा मांडव मात्र अजूनही आठवतोय. अंगणातच असलेल्या मेंदीच्या झाडाची पानं वाटून मला मेंदी काढली होती. खूप आनंदाचे दिवस होते बघ ते ! त्यानंतर संसारात तर बरीच उलाढाल झाली असेल, असं म्हणायला हरकत नाही ! कारण आता विस्मरण व्हायला होतं बघ. कुठचं काही आठवतं आणि हसू येतं. नातवंडं बघतात तोंडाकडे._‘आजी, आजी काय झालं??’ म्हणतात. पण काय सांगणार त्यांना त्या आठवणींमागचं गुपित ! मी फक्त हसते त्यांच्याकडे पाहून. मुलांना मात्र  हसरी आजी दिसते  आणि दिसायलाच हवी, नाही का?”
मी फक्त मान डोलावली.
“त्या काळात दुःखही आली असतील. पण मी नाही हो ते आठवत. बघ, बरं झालं ना. मला अशा गोष्टी आठवत नाहीत त्या ! म्हातारपण आलंय, हे समजून चुकलंय मला. मग रडत आणि कुणाला दोष देत का राहायचं? आपला जन्म सार्थकी लागला, हे काय थोडं आहे ! जगण्याची योग्य व्याख्या समजली म्हणजे झालं. शारीरिक व्याधींना मी अजिबात घाबरत नाही. मन मात्र मी नेहमी ताजं ठेवते, अगदी या दारातल्या तुळशीसारखं ! माझ्या मनात कायम या तुळशीबद्दल आदर वाटायचा तेव्हा. का कुणास ठाऊक पण आता मात्र खरा अर्थ कळतो हो. तिच्याकडे पाहिलं की मनही भरून येत उगीच ! पण तेही काही वेळा पुरतंच ! असंच तृप्त मनानं मरण आलं, तर आपण ‘जगलो’ असं म्हणता येईल ना गं आपल्याला !”
बोलताना मधेच त्यांना  धाप  लागली. मी पटकन त्यांना पाण्याचा पेला पुढे केला आणि मोकळा वारा आत यावा म्हणून खिडकी उघडली, तर किंचित हसून म्हणाल्या, 
“अगं, आता मला या बाहेरच्या हवेसोबत बोनस म्हणून हा भरलेला पंप मिळालाय” असं म्हणून त्यांनी तो तोंडाला लावला. सुलभा आजी बोलत होत्या, आणि मी मात्र त्याचा शब्द न शब्द मनात साठवत होते. म्हातारपण म्हणजे दुसरी बाल्यावस्था असते असं माहीत होतं  पण इथं तर त्या पलीकडे असणारी जगण्याची कला आज शिकत होते. त्यांच्याकडे पाहिलं आणि नकळत ओठांवर आलं.
‘या जन्मावर, या जगण्यावर 
शतदा प्रेम करावे…!’

— सौ. संगिता संजय वेताळ, पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...