रोजचं टपाल द्यायला पोस्टमन आला नेहमीच्या वेळेला. मी दरवाजा उघडताच माझ्या हातावर एक जाडजूड पाकिट ठेवून म्हणाला,काका परदेशातून आलंय हे तुमच्या नावाने. तो निघून गेला. मी पाकीटावर लिहिलेले माझं नांव परत एकदा तपासून बघितले आणि बुचकळ्यात पडलो. पाठवणाऱ्याने स्वतःचं नांव लिहिले नव्हते. व्यवस्थितपणे सेलोटेप लावून बंद असलेले ते पाकीट मी उत्सुकतेने उघडलं. आतून बरीचशी कात्रणं बाहेर पडली. सोबत होते एक पत्र आणि ब्लॅंक चेक. ते सगळं बघितले आणि चटकन् जुना इतिहास डोळ्यासमोर आला. कौटुंबिक समारंभासाठी म्हणून बऱ्याच वर्षांपूर्वी मी कोल्हापूरला गेलो होतो. तिथल्या हाॅटेल वास्तव्यात मला भेटला होता विश्वजित. सहज बोलता बोलता त्याने त्याची कहाणी ऐकवली होती. त्याच्या जिद्दीला मी तिथल्या तिथे सलाम ठोकला होता. घरची बेताची परिस्थिती असताना देखील उच्च शिक्षणाची स्वप्नं बघणारा विश्वजित पहाटे उठून दूध टाकायला जायचा. नंतर ज्युनिअर कॉलेज करून ह्या हाॅटेल मध्ये वेटरचं काम करायचा. माझा मुक्काम तिथे ३-४ दिवस होता. वेळ काढून मी त्याच्या सोबत त्याच्या घरी जाऊन तो सांगत होता ती परिस्थिती त्याच्या नकळत तपासली होती. तिथून निघताना एक नक्की केले होते की ह्या होतकरू मुलाला जमेल तितकी मदत करायची. कोल्हापूर सोडताना मी त्याला माझ्या सहीचा तारीख न लिहिलेला पण जास्तीत जास्त. रुपयांपर्यंत असं लिहिलेला चेक दिला होता. खाली वाकून नमस्कार करून त्याने तो चेक स्विकारला. नंतर ३-४ वर्षच त्याने त्याची शैक्षणिक खबरबात कळवली आणि नंतर पत्रव्यवहार अचानकपणे बंद झाला होता. कात्रणं परदेशातील वर्तमानपत्रातून विश्वजितच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक यशाबद्दल आणि विविध संस्थांनी केलेल्या सत्काराच्या समारंभाची होती. तो कोणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झाल्याचं दिसून येत होते त्या सर्व कात्रणातून. मी उत्सुकतेने विश्वजितचं पत्र वाचायला सुरुवात केली
काका,
आज इतक्या वर्षांनी माझं पत्र बघून आश्चर्य वाटलं ना तुम्हाला. ते अगदी साहजिकच आहे. पण कोल्हापूर सोडून आधी तुमच्या मुंबईत आणि नंतर थेट अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर मी एक गोष्ट मनांत पक्की ठरवली होती ती ही की काहीतरी वेगळं बनून दाखवीन आणि नंतरच तुम्हाला संपर्क करीन. माझ्या कर्तुत्वाने मी आज जी उंची गाठली आहे इथे अमेरिकेत त्याची साक्षीदार असलेली वर्तमानपत्रातून संग्रहित केलेली कात्रणे सोबत पाठवीत आहे. ती बघितल्यावर तुमच्या लक्षांत येईल सगळं. तुम्ही दिलेला ब्लॅंक चेक मी मुद्दामच वटवला नाही. दोन चार दिवसांच्या ओळखीवर तुम्ही मला देऊ इच्छिणारी रक्कम तुमच्या दातृत्वाची उंची दाखवणारी होती. काका रियली हॅट्स ऑफ टू यु. मला तुमच्या दातृत्वापेक्षा माझं कर्तुत्व जास्त महत्वाचे वाटले आणि म्हणूनच मी शेवटचा पर्याय म्हणून मी तो चेक वापरायचा ठरवलं. अधिक कष्ट करू लागलो आणि चेक वटवण्याची वेळ माझ्यावर आणू दिली नाही. पदवीधर झाल्यावर मुंबई आय आय टी मध्ये प्रवेश मिळवला. कमीत कमी खर्चात तिथून शिकून बाहेर पडलो आणि शिष्यवृत्ती मिळवून इथे अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी पाऊल टाकले. इथे मात्र माझी निष्ठा, नियती, बुध्दीमत्ता आणि कर्तृत्व माझ्या मागे ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी एकत्रितपणे मला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. जगातील सर्वोत्तम सुखसोयी माझ्या पायाशी आज लोळण घेत आहेत. जागतिक पातळीवर कोट्यावधी डाॅलर्सची उलाढाल करणाऱ्या एका मोठ्या कंपनीचा मी मालक आहे. कोल्हापूरला तुमच्या सोबत घालवलेले काही तास आणि त्या दरम्यान आयुष्यात माणूस म्हणून आपल्याला सिध्द करताना कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे, कोणत्या गोष्टींचं भान ठेवणं आणि कोणत्या गोष्टींपासून लांब रहाणं गरजेचं आहे हे सगळं थोडक्यात का होईना तुम्ही मला समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले होते. काका त्याच सर्व गोष्टींच्या भक्कम पायांवर माझ्या आयुष्याची भक्कम अशी गगनचुंबी इमारत उभी आहे. ह्या सगळ्या प्रवासात लांबून का होईना पण तुमचे आशीर्वाद सतत माझी पाठराखण करत होते. तुमचा ब्लॅंक चेक म्हणजे आजवर जपून ठेवलेला माझ्या काळजाचा तुकडा आज परत तुमच्या हाती सुखरूप देत आहे. आता वेळ आली आहे त्या न वटवलेल्या ब्लॅंक चेक च्या ऐवजी माझ्या आयुष्याच्या बॅंकेची मास्टर की तुमच्या हवाली करण्याची. काका प्लीज नाही म्हणू नका. तुम्हाला अमेरिकेत यायचं आहे माझ्या घरी. माझी बायको आणि तुमची दोन चिल्ली पिल्ली नातवंडे तुमची आतुरतेने वाट बघत आहेत. फक्त तारीख कळवा तुमच्या सोयीची. मी स्वतः तुम्हाला न्यायला येणार आहे भारतात. अट एकच आहे माझी छोटीशी. तुम्ही अमेरिकेतून भारतात परत कधी जायचं ते मात्र मी ठरवणार आहे .तुम्ही नाही.
तुमचा
विश्वजित.
माझ्या ब्लॅंक चेकवर विश्वजितने आगळ्यावेगळ्या मायेने केलेली आदरयुक्त सही माझ्यासाठी खुप अनमोल आहे. आता अमेरिकेला जाण्यापासून माझी काही सुटका नाही येवढं मात्र खरं. पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज लगेचच करावा लागणार मला येवढं मात्र नक्की.
© सतीश बर्वे
२१.०८.२४.
टीप: माझा एक मित्र मध्यंतरी अमेरिकेला जाऊन आला. तो तब्बल ४ महिने तिथे राहिला. माझ्या माहितीप्रमाणे त्याचे कोणी नातेवाईक त्या देशात नव्हते. पण येवढं असूनही त्याच्या तिथल्या दीर्घ मुक्कामाची कहाणी त्याने ऐकवली आणि मला म्हणाला तु इतकं छान लिखाण करतोस तर माझ्या अनुभवावरून काही तरी लिही तु. मित्राच्या गोष्टीतल्या त्या मुलाची कहाणी थोडी वेगळी होती. म्हणून कथेच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून मी ही कथा लिहिली आहे. कथेच्या माध्यमातून येवढंच सांगायचे होते की योग्य व्यक्तीला योग्य वेळी केलेली मदत त्या व्यक्तीच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणते. प्रश्न येवढाच असतो की मदतीचं एक पाऊल आपण पुढे टाकतो का नाही हा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा