शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

1322. अनामिका

    आज जरा अस्वस्थच होता रोहन. घड्याळाच्या काट्यांना यथोचीत मान देत, ठरल्यावेळीच कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला खरा तो. पण तरीही त्याला आज जरा उदासच वाटत होतं. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीमागे, तिचं माहेरचं घर जसं भकास वाटतं. तशीच ती कूंद सकाळ रोहनला त्याच्याच कार्पोरेट भाषेत सांगायचं झालं तर, 'Goddamn Low' फिल करवत होती. बरं कारणही असं काही खास नव्हतंच. आणि त्याला जे वाटतंय तेच कारण होतं का? याबद्दलही तो खरंतर साशंकच होता. 
     तर झालं होतं असं की गेल्या दोन महिन्यांपासून अगदी अचूक अन् नियमीतपणे येणारा 'Good Morning' मेसेज, आज काही त्याला आला नव्हता. हो. एका अननोन नंबरवरुन व्हाॅट्सअॅपने येणारी ती 'शुभ सकाळ' ची पहिली थाप, आज काही त्याच्या मोबाईलच्या दारावर पडली नव्हती. रोहनचं स्वगत चालू होतं स्वतःशीच. "हेच कारण असावं का खरंच आपल्याला उदास वाटण्यामागचं? पण मी तर गेल्या दोन महिन्यांत साधी तसदीही घेतली नव्हती. तो नंबर कोणाचा आहे हे पडताळून पाहण्याची. रादर सुरवातीचे दोन - तिन दिवस तर मी दखलही घेतली नव्हती बिलकुलच त्या मेसेजेसची. पण हळूहळू मला जाणवायला लागलं होतं, त्या मेसेजेस मधील नाविन्य. व. पुं. अथवा लिंकनची एखादी क्लासिक ओळ, किंवा भटांचा वा गुलजारचा एखादा जिवघेणा शेर, आणि खाली लिहिलेलं 'शुभ सकाळ' नाहीतर 'Good Morning'. सोबतीला एक फुलांचा गुच्छ, एका मिटल्या जिवणीने हसणार्‍या आरक्त गालांच्या इमोजीच्या साथीने. कलासक्त आहे पण ती जी कोणी व्यक्ती आहे. बाई आहे की बुवा कोणास ठाऊक. असो. नसेल जमलं आज. निघालं असेल काही दुसरं काम अचानकच". असं स्वतःला ऐकू येईल इतपतच, मोठ्याने समजावत स्वतःलाच रोहनने तो विचार मनातल्या मनात, हातात नसलेल्या डस्टरने पुसला. नी कामाकडे वळला तो. 
     दुसर्‍या दिवशीही तोच प्रकार. पुन्हा तिच अस्वस्थता. अन् तेच पुन्हा स्वतःलाच समजावणं. तिसर्‍या दिवशीही तेच, अन् चौथ्या दिवशीही मेसेजची अनप्लॅन्ड लिव्ह. आता मात्र रोहन अस्वस्थ होऊ लागलेला. इतके दिवस न मानणार्‍या त्याच्या मनानेही, एव्हाना शिक्कामोर्तब केलं होतं. त्याच्या उदासी मागच्या करेक्ट कारणावर. आज अनायसे दुसरा शनिवार होता. आॅफिसला सुट्टी होती आणि त्यातून बायकोला सुट्टी नव्हती. त्यामूळे मोकळा वेळ होता रोहनकडे आज, 'ACP प्रद्युम्न' बनण्यासाठी. आज ह्या गोष्टीचा छडा लावायचाच हे पक्क ठरलं होतं त्याचं. त्याने तो नंबर पहिला सेव्ह केला मोबाईलमध्ये 'अनामिका' ह्या नावाने. हे मेसेजेस पाठवणारी व्यक्ती ही कोणी बाईच आहे. असं स्वतःच्याच मनाशी टेन्टेटिव्हली ठरवत. पण नंबर सेव्ह करुनही अनामिकाचा डि. पी. काही दिसत नव्हता. हे असं डि. पी. नी प्रोफाईल रिकामा ठेवणारी लोकं अजिबात आवडत नसत रोहनला. 'ताकाला येऊन भांड लपवणे' ह्या वाक्प्रचाराशी इमान राखणारी लोकं असं म्हणे तो अशांना. जरासा खट्टूच झाला होता रोहन आणि त्याच्या मनात आलं. फोनच मारावा का डायरेक्ट? पण त्याचच त्याला जाणवलं की, हे ऊगिच 'डेस्पो' झाल्यासारखं वाटेल. मग त्याने ठरवलं मेसेजच टाकावा. आणि त्याने मेसेज टाकला. "Missing ur msgs nw a days.. hp all is well at ur side". मेसेज सेंड झाला. दोन टिका आल्या आणि पुढच्याच मिनिटात त्या ब्लू ही झाल्या. त्या निळ्या टिका बघून रक्ताभिसरण वाढून आपलं रक्त अधिक लाल झालं की काय? असं वाटून गेलं रोहनला. आणि तो वाट पाहू लागला उत्तराची. दहा - पंधरा मिनिटं स्क्रिनवर डोळे गाडलेले ठेऊनही कुठलंच उत्तर येईना बघून रोहन उठतच होता की, त्याच्या व्हाॅट्सअॅप वर अनामिकाचा मेसेज आला. "Can we meet at my home? शक्य असेल तुम्हाला तर आजच". आणि त्याच्या उत्तराची वाटही न बघता, खाली पुर्ण पत्ताही दिला गेला. रोहन थोडासा चरकलाच. कानशीलं तापली त्याची. धडधड बाहेर ऐकू येईल इतकी वाढली. असं कसं कोणाला भेटायला जायचं? आणि ते ही घरी? छे छे. नकोच ती ब्याद. पण भेटायला काय हरकत आहे. निदान बाहेर कुठेतरी. एखाद्या बागेत वगैरे". रोहनच्या विचारांचं आता, उधळलेलं घोडदळ झालं होतं. मनाशी बराचवेळ द्वंद्व खेळून झाल्यावर, रोहनने मेसेज टाईप केला. "नक्की भेटूया. पण घरी नको. बाहेर कुठेतरी. उपवनला मे बी. तुम्ही कॅडबरीला रहाता मी पाचपाखाडीला. दोघांनाही सोयीस्कर पडेल उपवन. आज संध्याकाळी ५ वाजता भेटू". थरथरत्या बोटांनी टाईप केलेला मेसेज. अखेर कुलदेवतेचं नाव घेऊन रोहनने पाठवलाच. दुसर्‍याच मिनिटाला त्याच्या मोबाईल स्क्रिनवर थम्ब्स-अपच्या तीन खूणा आल्या होत्या. 
     अपण खरे जसे आहोत तसंच जायचं. उगिचच सठी सहामासी कपाटाबाहेर निघणारा पार्टी वेअर घालण्यात मतलब नाही. नी अॅलर्जीकडे दुर्लक्ष करत, केल्विनचा 'आॅब्सेशन' पर्फ्युम वगैरेही मारुन जायची गरज नाहीये. हे आधिच बजावून ठेवलं होतं रोहनने स्वतःला. 'अचपळ मन माझे, न आवरे आवरीता' म्हणत म्हणतच. ठरल्याप्रमाणे रोहन जिन्स नी कुर्ता घालून, पायात सॅन्डल्स अडकवून, हलकासा डेनीम चा ड्युओ सवयीने कपड्यावरच मारुन. पावणेपाचला उपवनला पोहोचला. एक पुरुषी आवाज खणखणला पाठमोर्‍या रोहनच्या कानाशी, खांद्यावर हलकेच ठेवलेल्या हाता जोडीने. "एक्स्क्यूज मी. तुम्हीच मिस्टर रोहन गोखले का? मी कपिल...कपिल सरदेसाई". रोहनने मागे वळून बघितलं. एक उंचा पुरा, दणकट अंगकाठीचा, रुबाबदार. साधारण चाळीशीचा वाटणारा असा कपिल सरदेसाई, तोंड भरुन हसत उभा होता. "आपण त्या बाकावर बसूया का?". कपिलच्याच पुढच्या प्रश्नाने भानावर आला रोहन. नी कसानूसा होकार भरत कपिलच्या मागोमाग चालत त्या बाकावर जाऊन बसला. सिलिंगला टांगलेलं मोठ्ठालं झुंबर, जमिनीवर पडून जेवढा आवाज येईल. तेवढ्याच आवाजाचं काहितरी फुटलं होतं रोहनच्या आत, कपिलला बघून. 
      "Let me introduce myself again... m Kapil Sardesai... having my own business of Import - Export... बर्‍याचवेळा बाहेर फिरतीवरच असतो मी. माझ्या या व्यापामुळे आणि त्यामुळेच वेळ नाही देऊ शकलो मी तिला. लक्षातच नाही आलं माझ्या की ती एकटी पडत चाल्लीये. गुंतत चाल्लीये बाहेर कोणाच्यात. जेव्हा कळलं खूप चिडचीड झाली. आदळआपट केली. मोडतोड केली घरी. हात ही उगारला तिच्यावर. आर्थिकदृष्ट्या स्वतःला सिक्युअर्ड करण्याच्या नादात मी विसरलो की हक्काच्या प्रेमाबाबतीत मी किती इनसिक्युअर्ड झालोय ते. ती खूप रडली त्या दिवशी. तशीच झोपी गेली. मोठी चाहती होती ती तुमच्या लिखाणाची. तुमच्या फेसबूक वरच्या लिखाणांचं, अभिवाचन केलं होतं तिने स्वतःच्या आवाजात स्वतःसाठीच. सेव्ह केलं होतं ते स्वतःच्या मोबाईलमध्ये, नी सतत ते ऐकत बसायची ती. तुमच्या कुठल्याशा प्रोफाईल पिक्चरची, प्रिंट काढून घेतली होती तिने. तुमच्याशी मग गप्पा मारत बसे ती तासन् तास मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्यावर. तिच्या एकटेपणाचे सोबती होते तुमचे लेख, तुमच्या कविता अन् तुमचा तो फोटोही. एक नवरा म्हणून मला निश्चितच हे सगळं काळजी करायला लावणारं होतं. पण मग मी एक माणूस म्हणून विचार केला आणि तिचं हे असं, आपलं आपणच मन रमवणं मला पटलं. मुल - बाळ नाही. नवरा महिन्यातले पंधरा - वीस दिवस बाहेर आणि जवळ असला तरी कार्गो, शिपमेंट, बिल आॅफ एक्स्चेंज, लेटर आॅफ क्रेडिट, बॅन्क गॅरन्टी असल्या निरस जंजाळात अडकलेला आणि तिला तर साहित्याची प्रचंड आवड. पु.ल., व.पु., शं.ना., रणजित देसाई नी अशा कैक साहित्यिकांवर तिचं अतोनात प्रेम आणि ह्यांच्याबद्दल वाटणारं भरभरुन बोलायलाच कोणी नाही जवळ. मग दुसर्‍या दिवशी ती उठायच्या आधी, मीच तिला तुमचा बर्‍याच खटपटी अंती मिळवलेला फोन नंबर दिला. तिला म्हणालो की करत जा ह्यांना मेसेजेस. मारत जा गप्पा ह्यांच्याशी. हो मोकळी तुझ्या आवडत्या व्यक्तीसोबत तुझ्या लाडक्या व्यक्तींवर, विषयांवर चर्चा करुन. प्रचंड आनंदली होती ती. बर्‍याच दिवसांनी आम्ही मिठीत होतो मग एकमेकांच्या. त्या दिवसापासूनच तिने तुम्हाला, 'गुड माॅर्निंग' चे मेसेजेस करायला सुरुवात केली. खूप वाट बघायची ती तुमच्या रिप्लायची. पण तुम्ही कधीच उत्तर दिलं नाहीत. हिरमुसायची ती. पण तरिही नेटाने मेसेजेस पाठवत राहिली ती तुम्हाला. कधी ना कधी तुमचा रिप्लाय येईल ह्या आशेवर. आज ना उद्या तुमच्याशी गप्पा होतील साहित्यावर, ह्या अपेक्षेत. पण शेवटपर्यंत काही तुमचा रिटर्न मेसेज आलाच नाही. हो शेवटपर्यंतच. तिच्या शेवटपर्यंत. चार दिवसांपुर्वीच ती गेली हे जग सोडून. गेली ती सोडून तिच्याबरोबर असूनही, कधीच नसल्यासारख्या मला आणि नसूनही कायम तिच्याबरोबर असणार्‍या तुम्हालाही.. हो... she was suffering from Leukemia, n was at last stage of it... she was only 35... too young to die obviously. पण तरीही ती खूप प्रसन्नपणे गेली. आजूबाजूला ठेऊन तिची आवडती पुस्तकं, तुम्ही लिहिलेल्या लेखांची तिने काढलेली टिपणं, आणि तुमचा फोटोही. फक्त एकच हलकीशी खंत जाणवली मला तिच्या चेहर्‍यावर कधीच तुमच्याशी गप्पा न मारु शकल्याची आणि त्यासाठी तुमचं भेटणं आवश्यक नव्हतंच कधी तिच्यासाठी. तिला आस लागून राहिली होती, तुमच्याकडून येणार्‍या फक्त एका उत्तराची. आपण आज जसे दिसतो तसेच लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे, असं ती म्हणे. म्हणूनच तिने तिचा आधीचा फोटो कधीच ठेवला नाही डि. पी. किंवा प्रोफाईल म्हणून, जेव्हा ती नितांत सुंदर होती आणि आत्ताचा हा डोक्याचे, भुवयांचे केस गेलेला. त्वचा करपलेला फोटो. ती तरी कसा बरं ठेवणार होती". 
     कपिल थांबला बोलायचा. पण रोहनचे डोळे मात्र थांबतच नव्हते भरुन वहायचे. एक रिकामेपणा आला होता त्याच्या मनातून भरुन. अगदी तिच्याच रिकाम्या डि. पी. सारखा. कपिलने एक घट्ट मिठी मारली रोहनला. "On her behalf"... एवढंच अस्पष्टसं बोलून चालू पडला तो. रोहन जागच्याजागी थिजून बसला होता अजूनही. 'तिचं' नाव मात्र कपिलने सांगितलं नव्हतं की रोहननेही विचारलं नव्हतं शेवटपर्यंत. रोहनसाठी ती कायमच डि. पी. नसणारी नाव नसणारी  'अनामिका'च राहणार होती, गुलजारला व्हाॅट्सअॅप स्टेटसमध्ये ठेवणारी.

'ज़िन्दगी यूँ हुई बसर तनहा
काफ़िला साथ और सफ़र तनहा
अपने साये से चौंक जाते हैं
उम्र गुज़री है इस कदर तनहा'

---सचिन देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...