घरातून बाहेर पडता पडता सेलफोन वाजला म्हणून सुलभाने पर्स उघडली आणि फोन हातात घेतला आणि फोनवरचे नाव पाहताच तिच्या चेहर्यावर स्मित आले कारण फोन तिच्या मैत्रिणीचा स्मिताचाच होता.
‘‘काय ग ? आज सकाळीच ? बँकेत गेली नाहीस का ?’’
‘‘अग बँकेतूनच बोलते. संध्याकाळी स्टेशनवर भेटतेस ?’’
‘‘हो, भेटूया. सहा वाजता ना ?’’
‘‘हो, नेहमीच्या जागेवर.’’
‘‘येते.’’
सुलभा झपझप पोस्टाच्या दिशेने चालू लागली. काल जमा केलेली सर्व कलेक्शन आरडी पोस्टात जमा करायची होती. आणि मग इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. काल एक पॉलिसी मिळाली होती ती ऑफिसमध्ये द्यायची होती. शिवाय तीन वाजता डेव्हलपमेंट ऑफिसर ज्योतीने मिटींग ठेवलेली आहे. ती मिटींग करुन साडेपाच पर्यंत बाहेर पडायचं आणि सहाच्या आधी विलेपार्ले स्टेशनवर नेहमीच्या जागी स्मिताला भेटायचं. ही एवढी कामं डोक्यात ठेवून सुलभा पोस्टात पोहोचली. रोजच्या प्रमाणे पोस्टाची कामे केली. मग इन्शुरन्स कंपनीत जाऊन आणि तीन ची मिटींग अटेंड करुन साडेपाचला बाहेर पडली. आणि झपझप स्टेशनच्या दिशेने चालू लागली. कधी एकदा स्टेशनवर पोहोचतो आणि स्मिताला भेटतो असे तिला झाले. खरतर स्मिता आणि ती सोमवारीच भेटल्या होत्या आणि आज शुक्रवार मध्ये फक्त चार दिवस झाले. पण त्या दोघींची कोल्हापूरातली बालवाडीपासूनची मैत्रि. दोघींची जोडी शाळा, कॉलेजात तशीच राहिली. सुलभा लग्न होऊन पार्ल्याला आली आणि स्मिता गोरेगांवात. सुलभा पोस्टाचे आणि इन्शुरन्सचे काम करायची आणि स्मिता बँकेत लागली. दोघीची एवढी मैत्रि की, संसारातल्या बारीक सारीक गोष्टीपण एकमेकांना सांगायच्या. आज काय एवढे अर्जंट काम काढल स्मिताने, असे मनात म्हणत सुलभा सहा वाजता विलेपार्ले स्टेशनवर पोहोचली. तेव्हा स्मिता नुकतीच तिथं आली होती आणि रुमालाने घाम पुसत होती. रेल्वेचा जिना उतरता उतरता सुलभाला स्मिता दिसली. तिला बघून सुलभाच्या मनात आले -‘‘काय परिस्थिती झाली स्मितूची किती देखणी ही, कोल्हापूरात असताना महाद्वार रोडला आपण फिरायला जायचो तेव्हा कोल्हापूरातील पोर मागून मागून यायची. स्मिताने सुलभाला पाहताच हात दाखवला तशी स्मिता तिच्या दिशेने पुढे आली. मग दोघी तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या टोकाला आल्या. ही दोघींची बोलण्याची जागा होती. इथे थोडी शांतता होती. सुलभा स्मिताला म्हणाली -
‘‘काय ग एवढ काम काढलस? सोमवारी तर भेटलो होतो ना ?’’
‘‘काय सांगायचं कप्पाळ ! माझ्या मागे एक एक टेन्शन आणि टेन्शन’’
‘‘काय झालं ?’’
‘‘तेजू कोणाबरोबर तरी फिरते अशी बातमी होतीच. काल माझ्या व्हॉटस् अॅपवर कोणीतरी दोघांचा फोटो पाठविला. तिच्याबरोबर एक दाढीवाला पुरुष, हिच्यापेक्षा वयानं बराच मोठा दिसत होता. शेवटी काल तिला खडसावलं. तेव्हा कळलं तो गोरेगांव स्टेशन जवळचा लोखंडाचा व्यापारी जमीर.’’
‘‘मुस्लिम आहे की काय ?’’ सुलभा ओरडली.
‘‘हो गं माझे विचार तुला माहित आहेत ना ? माझे आईबाबा होते संघाशी संबंधित, माझेपण विचार त्यांच्यासारखेच आणि तो वयानं पण पंधरा वर्षांनी मोठा.’’
‘‘बाप रे ! मग अभयला कळलं का ?’’
‘‘ तो असतो का घरी ? सकाळी टेबल टेनिस खेळायला बाहेर पडतो आणि सायंकाळी क्लबमध्ये ब्रिज खेळायला जातो. त्याच्या मॅचिस आणि टुर्नामेंटस. तो बेफिकीर बाप. आयुष्यात जबाबदारी कसली घेतली नाही त्याने. त्याला काय तो खांदे उडवित म्हणेल, ‘‘तिच लाईफ आहे ते. मी कोण लुडबुड करणारा?’’ असं म्हणून तो गाढ झोपेल. झोप माझीच उडाली गं सुलु.’’
‘‘खरं आहे गं स्मितू, हे वयच असं असतं. डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखी मुलं निर्णय घेतात. ती ठाम आहे का? मी तिच्याशी बोलून बघू?’’
‘‘बघ तुझं ऐकतेय का ते, मी निघते. घरी जाऊन जेवण करायचं आहे. दहा वाजल्यानंतर दोघं बाप लेक गिळायला येतील. त्यांना काहीतरी घालायला हवं ना? आणि परत उद्याचा माझा डबा - त्याची तयारी. जाते.’’
‘‘सांभाळून जा ग स्मितू, रस्ता सांभाळून क्रॉस कर. आजूबाजूच्या गाड्या बघ आणि मगच रस्ता ओलांड.’’
हो म्हणत स्मिता गेली आणि तिच्या पाठमोर्या शरीराकडे सुलभा पाहत राहिली. स्मिता दिसेनाशी झाली तशी ती घरी जायला वळली. आज खूप दगदग झाली म्हणून सुलभा ने रिक्षा केली. रिक्षावाल्याला पत्ता सांगितला आणि डोळे मिटून रिक्षाच्या पाठीवर टेकून बसली. आपल्या संसारापेक्षा तिला स्मिताच्या संसाराची आणि स्मिताची जास्त काळजी वाटत होती. बेजबाबदार नवरा, हाताबाहेर गेलेली एकुलती एक मुलगी कुटुंबासाठी नोकरी करण्याची गरज, नोकरी आणि संसार सांभाळता सांभाळता होणारी दमणूक कधी या स्मिताला विश्रांती मिळणार आहे कोण जाणे? त्यात आता तिच्या मुलीने तेजश्रीने घेतलेला निर्णय. पहिल्यापासून ही तेजश्री आपल्याला आवडत नव्हती. बेफिकीर मुलगी. आईच्या कष्टाचे आणि धावपळीचे काहीसुध्दा पडले नाही तिला. रिक्षा थांबवून सुलभा घरी आली. नवरा नऊच्या पुढेच येणार, कन्या विनयाचा पाच वाजताच फोन आलेला. आता थोडावेळ विश्रांती घेऊ. पोळ्या साडेआठनंतर केल्या तरी चालतील. असे म्हणत वॉश घेऊन, कपडे बदलून सुलभा बेडवर पडली. तिच्या मनात आले - यावेळी स्मिता काय करत असेल? गोरेगांवला उतरुन भाजी, बे्रेड घेऊन दोन किलोमीटर अंतर चालत असेल. तिला किती वेळा सांगितलं अगं स्टेशनवरुन रिक्षाने जा. पण कुटुंबासाठी पैसे वाचवायचे म्हणून चालत जाते. पुन्हा घर दुसर्या मजल्यावर. लिफ्ट नाही. घरी गेल्यागेल्या जेवणाची तयारी. बरं या दोघांना साग्रसंगीत जेवण हवं. अधुन मधून नॉनव्हेज हवं. दोघांची मदत शुन्य. सुलभाच्या अंगाचा संताप संताप झाला. आपला नवरा असा असता तर मी सरळ केला असता. पण स्मितू पडली गरीब गाय. स्वतः रडत बसेल पण नवर्याला बोलणार नाही. त्यात आता तेजश्रीने ठरविलेले लग्न. आपण आता उद्या फोन करावा. यावेळी कुठेतरी मित्राबरोबर नाहीतर मैत्रिणीबरोबर हुंदडत असेल असा विचार करता करता सुलभाचा डोळा लागला. दारावरची बेल वाजली तशी ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. तिचा नवरा राजन आला होता. तिने घड्याळ्यात पाहिले. साडेआठ वाजले होते.
‘‘आज लवकर ! मेनन ने लवकर सोडलं वाटतं’’
‘‘हो मेनन साहेब पण अंधेरीला जात होते त्यांनीच सोडलं’’
‘‘माझ्या पोळ्या करायच्या आहेत, वॉश घ्या तो पर्यंत जेवण वाढतेच.’’
हो म्हणत राजन कपडे बदलून वॉशरुममध्ये गेला तोपर्यंत सुलभाने गॅस पेटवून पोळ्या करायला घेतल्या. राजन बाहेर आला तो पर्यंत तिने ताटात जेवण वाढायला घेतले.
‘‘आज पोस्टात गेली होतीस का?’’
‘‘हो तर. आज खूप धावपळ, पोस्ट, एलआयसी, त्यात ज्योतीने मिटींग लावलेली आणि स्मितूचा फोन - स्टेशनला भेटायला ये म्हणून...’’
‘‘पण स्मिता सोमवारीच भेटलेली
‘‘भेटलेली पण आज पुन्हा भेटू म्हणाली. तिच्या पोरीने तेजूने लग्न जमवलयं म्हणे’’
‘‘आ ऽऽ कोणाबरोबर ?’’
‘‘आहे कोणी मुस्लिम, लोखंडाचा व्यापारी गोरेगांव स्टेशनजवळचा.’’
‘‘अरे बापरे, मग स्मिता - अभयची काय प्रतिक्रिया ?’’
‘‘स्मितूची झोप उडालीय बिचारीची, अभय काय बिन्धास्त माणूस, तुमच्या एकदम विरुध्द.’’
‘‘म्हणजे ?’’
‘‘तुम्ही अति काळजी करणारे, आपल्या विनूने स्वतः लग्न जमवल म्हणून ब्लड प्रेशर वाढवून घेतलंत. पण विनूने लग्न जमवलं ते उच्च शिक्षित, एमबीए झालेला, चांगल्या कुटुंबातील मुलाशी, आता बिपीन तुम्हाला मुलगा वाटतो.’’
‘‘अगं बाप हा असाच हळवा असतो. तो बाहेरुन फणसासारखा वाटत असला तरी’’
‘‘पण त्याला आहे ना अपवाद ! हा स्मितूचा नवरा अभय’’
‘‘अग त्याला पण वाटत असेल, बाहेरुन दाखवल नाही तरी.’’
‘‘कुठलं काय ? स्मितू सांगत होती उद्यापासून तो ट्रेकिंगला चाल्लाय चार दिवस भिमाशंकरला’’ सुलभाने दोघांचे जेवण घेतलं पण तिच्या डोळ्यासमोर होती स्मिता. कोल्हापूरातून ग्रॅज्युएट झाल्यावर स्मिता आणि मी नोकरीसाठी कसल्या कसल्या परीक्षा देत होतो तेवढ्यात मुंबईत सचिवालयात नोकरी करणार्या अभयचे स्मितासाठी स्थळ आले. मुंबईत जायला मिळणार म्हणून स्मिता लग्नाला तयार झाली. अभय होता पण देखणा. आम्ही तिच्या मैत्रिणी तिच्या भाग्याचा हेवा करत होतो. पण लग्नानंतर चार पाच महिन्या नंतर स्मिता आली ती निराश होऊन. तिच्यामते अभय अती आळशी, बेफिकीर माणूस होता. सचिवालयात नोकरीला होता पण त्याचे नोकरीत धड लक्ष नव्हते. सतत खेळ, ट्रेकिंग, मित्र मंडळी, पार्ट्या, पैसे किती खर्च करायचा त्याला मर्यादा नव्हती. एका वर्षानंतर स्मितूची बँकेत निवड झाली आणि तिचा पगार घरात यायला लागला तसा तो जास्तच बेफिकीर झाला. त्याच्या पार्ट्या वाढल्या. खर्च वाढले. त्याच दरम्यान सुलभाचे राजनशी लग्न झाले. राजन इन्शुरन्स कंपनीत नाकासमोर चालणारा, काटकसरी, संसारी. सुलभा पार्ल्यात आणि स्मिता गोरेगावला. सुलभा मुंबईत आली तशी दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. स्मिताची बँकेची नोकरी होती. मग स्टेशनवर भेटणे सुरु झाले. मग सुलभाचे बाळंतपण आले. कोल्हापूरात न्यू महाद्वार रोडवर चिपलकट्टी हॉस्पिटलमध्ये विनया झाली. सुलभाची काळजी घ्यायला स्मिता कोल्हापूरात हजर होती. मग बारसं करुनच मुंबईला गेली. एका वर्षाने स्मिताचं बाळंतपण. पुन्हा चिपलकट्टी हॉस्पिटल. तेजश्रीचा जन्म.
तेजश्रीच्या बारशाला अभय आला नाही हे सर्वांना खटकलं. सुलभाची विनया दोन वर्षाची झाली आणि सुलभाने पोस्टल एजन्सी घेतली. एलआयसीचे काम करु लागली. मॅच्युअल फंड एजन्सी घेतली. सुलभाचा नवरा राजन तिला सहकार्य करणारा. रविवारी सुट्टी असेल तेव्हा सुलभाला मदत करणारा. प्रसंगी पोस्टाचं कलेक्शन आणणारा. स्मिताचा नवरा सतत बाहेर, स्पोर्टस, मित्र, ट्रेकिंग. वयाच्या चाळीसाव्या वर्षी स्मिताच्या नवर्याने - अभयने नोकरी सोडली आणि टेबल टेनिसचा ट्रेनर म्हणून गोरेगांव स्पोर्टस क्लबमध्ये नोकरी पकडली. मग पहाटे उठून जाणे, दुपारी येणे, दुपारी भरपूर झोपणे, संध्याकाळी जाणे, रात्रौ उशिरा येणे, मग खेळाच्या स्पर्धा कधी इथे, कधी तिथे. मग जय पराजय, पार्ट्या, बाहेर खाणे, पैसे उडविणे हे सुरुच. यात स्मिताची खूप ओढाताण झाली. नवरा सतत बाहेरगावी म्हणून तेजश्रीचे लाड झाले आणि तिच्या अभ्यासात दुर्लक्ष झाले.
जेवता जेवता सुलभाच्या डोळ्यासमोर सर्व येत होते. स्मिता मग नर्व्हस होत गेली. सतत आपल्या विचारात राहू लागली. त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला. केस गळू लागले. सुलभाच्या एक लक्षात आले. गेली काही वर्षे स्मितू स्वतःच्या विमा पॉलिसीज काढू लागली आहे. आपण तिला म्हणायचो अग सगळ्या पॉलिसी स्वतःच्या नावान्ो कशाला काढतेस? काही तेजूच्या नावाने काढ, अभयच्या काढ. तिचे म्हणणे - तिला स्वतःचे काही खरं वाटत नाहीय. अभयला नोकरी नाही, आपल्यामागे तेजूला काही कमी पडायला नको.
रात्री झोपताना सुलभाने मनाशी ठरविले, उद्या तेजूला काय ते विचारायचे. दुसर्या दिवशी तिने तेजश्रीला फोन लावला. तिचा फोन कशासाठी हे तिने ओळखले असावे.
‘‘काय ग मावशी, आई काही बोलली वाटतं?’’
‘‘काय ?’’
‘‘माझ्या लग्नाचं’’
‘‘होय बाई, काहीतरी घाईघाईत निर्णय घेऊ नकोस तेजू’’
‘‘मावशी, मला समजतं आता मी तेवीस वर्षाची आहे. तुमच्या टिपीकल मिडलक्लास लोकांचे रडगाणं मला सांगू नकोस.’’
‘‘अग पण त्याचा धर्म ?’’
‘‘मी एवढ्यात लग्न करीन असं नाही गं मावशी, सुरुवातीला मी रिलेशनमध्ये राहीन, तो आवडला तर मग लग्न.’’
‘‘अगं बाई असलं काहीतरी बोलू नकोस. मी काय, तुझी आई काय? आम्ही कोल्हापूरातल्या साध्या मुली गं, असले संस्कार आमच्यावर नाहीत.’’
‘‘पण मी कोल्हापूरातली नाही ना? मी मुंबईतल्या अभय कानविंदेंची मुलगी आहे. माझा बाबा बघा कसा फॉरवर्ड विचाराचा आहे. नाहीतर तुम्ही ....’’ असं म्हणून तेजश्रीने फोन ठेवला. सुलभाने तेजश्रीला पुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला पण तिने फोन उचललाच नाही.
आज काही काम नव्हतं म्हणून सुलभा घरातच थांबली. तिने चादरी, बेडशीटस् धुवायला काढल्या. दहा वाजायला आले. दारावरची बेल वाजली म्हणून दार उघडलं तर बाहेर स्मिता.
‘‘अगं स्मितू ! फोन न करता आलीस ? नशिब मी आज घरी होते. ये आत.’’
‘‘होय फोन करायचं पण विसरले. हल्ली विसरायला होतं गं. वय झालं का आपलं?’’
अगं वय कसलं, अजून पन्नाशी नाही आली.’’
‘‘मग अस का होत? काल भाजी घ्यायला विसरले, अभयचे कपडे इस्त्रीला द्यायचे विसरले. त्यावरुन सकाळी सकाळी अभय चिडला. घरची कामे जमत नसतील तर नोकरी सोड म्हणाला.
‘‘आणि काय करु म्हणाव? टाळ घेऊन भजन करावं का ? स्मितू तू फार साधी मुलगी गं. त्याचा फायदा घेतो हा अभय आणि त्याचे पाहून तेजू. जगात एवढं साध राहून चालत नाही बाई. माती मऊ दिसली की जो तो खणू पाहतो. हाता तुझा अभय . नोकरी सोडून दे म्हणाला, आपण नोकरी आधीच सोडली. मग घर खर्च कसा करणार ? मोठा सावकार लागून गेला तो. बेफिकीर माणूस. स्मितू तुला वाईट वाटेल म्हणून जास्त बोलत नाही, नाहीतर....’’
‘‘बोलून का उपयोग आहे का सुलु? ’’
‘‘आज बँकेत नाही गेलीस’ ?’’
माझं कशात लक्ष लागत नाही गं...तेजूशी बोललीस काय ?’’
‘‘बोलले बाई, ती मला काय सरळ उत्तर देते त्याच्याशी रिलेशन मध्ये राहणार म्हणे. मग वाटलं तर लग्न करीन म्हणते. मी तुमच्यासारखी मुळमुळीत नाही म्हणाली. अभय कानविंदे सारखी स्मार्ट बापाची मुलगी आहे म्हणे
हे असं रिलेशन वगैरे आपण याचा विचार तरी केलेला का गं सुलु ?’’
‘‘आपण जुन्या संस्कारातल्या मुली गं.... आपले नवरे राम आणि आम्ही सिता. पण आपणच सितेची भूमिका निभावतो म्हणून अभय सारख्यांच फावतं.
"जाऊ दे सुलु ! मला कंटाळ आला आहे तोच तोच विषय बोलून. मी आज मुद्दाम आले होते. माझ्या इन्शुरन्स पॉलिसीज किती रकमेच्या आहेत ते पहायला.
"आज काय अचानक ? तरी पण तू म्हणते आहेस तर पाहू. सुलभाने कॉम्प्युअर उघडला आणि स्मिताच्या सर्व पॉलिसीज, हप्ते चेक केले.
‘‘एकंदर एक कोटी पंचेचाळीस लाखाच्या पॉलिसीज आहेत ग स्मितू.’’
‘‘आणि नॉमिनीज वगैरे, केवायसी ?’’
‘‘नॉमिनीज बहुतेक अभय कानविंदे, काहीवर तेजश्री कानविंदे. केवायसी अपटूडेट केलेल्या आहेत.’’
आणि मॅच्युअल फंड.
‘‘तीन फंड हाऊस मध्ये तुझी एसआयपी सुरु आहे. त्याची आजची किंमत अंदाजे सोळा लाख आहे.’’
आणि शेअर्स ?
‘‘तुझ्या शेअर्सची आजची किंमत सहा लाख पन्नास हजार आहे. पण हे सर्व आजच का पाहते आहेस तू स्मितू ?’’
‘‘तसं नाही गं. नवरा म्हणतो ना नोकरी सोड म्हणून समजा नोकरी सोडली तर किती रक्कम मिळेल याचा अंदाज घेत होते.’’
पण तुझ्या या इन्शुरन्स पॉलिसीज चालू आहेत बरं का ? एवढ्यात त्याचे पैसे मिळणार नाहीत िंकवा एकदम कमी मिळतील. हा तुझ्या पश्चात वारसांना आत्तासुधा मिळतील. ’’
‘‘झालं तुझे इन्शुरन्स फंड वगैरे? किती दिवसात तुझ्या केसांना तेल घातलं नाही. सुलभाने स्मिताला पुढे बसवलं आणि ती तिच्या केसांना मालीश करु लागली.’’
‘‘सुलू केव्हा केव्हा मला वाटतं आपण लग्न केलेल्या मुली फक्त आपला नवरा, मुलं यांचीच काळजी घेतो. पण आपली माहेरची माणसं आई, बाबा, भाऊ, वहिनी, भाचरं यांचा पण विचार करायला हवां. आपली आई नऊ महिने पोटात वाढविते. आई-बाबा किती प्रेमाने संगोपन करतात. भाऊ प्रेम देतो, संरक्षण देतो, पण आपण जेव्हा अर्थार्जन करतो तेव्हा आपला संसार पाहतो. माहेरच्या मंडळींना गरज असेल तर आपण त्यांना मदत करायला नको ?
‘‘करायला हवीच बाई ! तू आता ही नोकरी करतेस, तू पण तुझ्या भावाचा श्यामूचा काहीतरी विचार कर. ’’
तेल घालून केस विंचरल्यावर सुलभाने गरम पाणी काढले आणि स्मिताला आंघोळ करायला सांगितली. आंघोळ झाल्यावर दोघी जेवायला बसल्या. सुलभाने तिच्याशी कोल्हापूरातील मैत्रिणींच्या आठवणी जागवल्या. दामले सरांची नक्कल केली. पाटील बाईंचे विनोद सांगितले. स्मितापण हसली. दोघाrही झटपट ओटा, भांडी आवरली आणि बेडरुममध्ये आल्या. सुलभा म्हणाली, स्मितू थोडी झोप आता. पूर्वी कोल्हापूरात असताना मी तुला थोपटायचे ना ? तशी आज थोपटते आणि सुलभा हळू आवाजात गाणं म्हणू लागली आणि स्मिताला झोप लागली. सुलभा पण झोपली. तासा दिडतासाने स्मिताला जाग आली.
‘‘सुले किती दिवसात अशी गाढ झोपली नाही गं !’’
‘‘मी थोपटल ना स्मितू राणीला म्हणून गाढ झोप बरं का ’’
‘‘होय बाई सुले, तू म्हणजे माझी आईच आहेस. चल निघते आता.’’
‘‘जा ग सावकाशीनं दुपारची वालाची उसळ आहे ती देऊ का डब्यातून ?’’
‘‘दे, तेजुला फार आवडते वालाची उसळ.’’ सुलभा स्वयंपाक घरात डबा भरायला गेली तो पर्यंत स्मिताने फोनवर कुणाचे फोन, मेसेज आलेत का हे पाहू लागली. फोनवरचे मेसेज वाचता वाचता एकदम रडू लागली.
‘‘काय हे ? आता काय करायचं मी ?’’
सुलभा बाहेर आली तर स्मिता रडते आहे.
‘‘अग काय झालं?’’
‘‘वाच हा तेजूचा मेसेज’’ स्मिताने रडत रडत मोबाईल सुलभाला दाखवला. सुलभाने मेसेज वाचला, तेजश्रीने लिहिलं होतं -
‘‘मी आज रात्री घरी येत नाही, जहाँगिर बरोबर बाहेर जात आहे. ’’
‘‘आता काय करायचं गं सुले? हे आपले संस्कार का ? मला नाही सहन होत आता.’’
‘‘आता काय करणार बाई, मनाची तयारी करायला हवी. काळच तसा आलाय.
सिनेमातल्या आणि मालिकेतल्या नट्या काय काय करतात ते या मुली पाहतात. ते आदर्श त्यांचे. तू शांत हो पाहू.
कितीतरी वेळ स्मिता रडत राहिली आणि सुलभा तिला थोपटत राहिली. संध्याकाळ होत आली तशी स्मिता उठली, तिनं तोंड धुतलं आणि ‘‘येते गं सुले’’ असं म्हणत तिने पायात चप्पल घातले.’’
सांभाळून गं स्मिते, मी येऊ का घरापर्यंत?’’
‘‘नको बाई, किती दिवस माझ्यासाठी रडणार तू. शेवटी मलाच तोंड द्यायला हवे. येते. अस म्हणत स्मिता बाहेर पडली . सुलभा गॅलरीत उभी राहिली. लांब पर्यंत चालणारी स्मिता तिला दिसत राहिली. मग हळू हळू गर्दीत गडप झाली.
विषण्ण मनाने सुलभा घरात आली. तिचे मन काळजीने आणि दुखःने भरुन गेले होते. तिला स्मितूची काळजी वाटत होती. आपल्या एकुलत्या एक मुलीने आपल्या पेक्षा दहा वर्षांनी मोठ्या पुरुषाबरोबर रात्रौ बाहेर झोल आणि तसा मेसेज आईला करणे ह किती दुखःचे आणि त्रासाचे. सुलभाच्या मनात आलं. काळ किती बदललाय कोल्हापूरला असताना आम्ही वर्गातल्या आणि शेजारच्या मुलांबरोबर बोलायचो नाही. आता गळ्यात गळे घालून सगळीकडे मुल-मुली फिरतात. काळ बदललाय. तिने कन्येला विनयाला फोन केला. तिला आत्ता स्मितू मावशी येऊन गेल्याचे सांगितले. हॉलमध्ये येऊन तिने टिव्ही लावला आणि कार्यक्रम पाहत राहीली. टिव्ही पाहता पाहता तिचे डोळे मिटू लागले. हॉलमध्ये कोचवर कधी ती झोपली हे तिलाच कळले नाही. दरवाजाच्या बेल वाजत राहिली त्याने तिला जाग आली. तिने घड्यात पाहिले साडेसात वाजत होते. यावेळेस कोण आले ? असे पुटपुटत तिने टिव्ही बंद केला आणि दरवाजा उघडला. बाहेर राजन होता.
‘‘अरे, आज एवढे लवकर ? मेनन सध्या तुमच्यावर खूष दिसतो.’’ ती हसत हसत म्हणाली.
‘‘नाही, नाही मी मुद्दाम आलो. स्मिताचा अॅक्सिडेंट झालाय गोरेगांवला, एसव्ही रोडवर’’
‘‘काय !’’ सुलभा किंचाळली.
‘‘आत्ता ती पाच वाजता येथून घरी गेली.’’
‘‘इथे आली होती काय ? तिच्या भावाचा कोल्हापूरहून मला फोन आला. रस्ता क्रास करताना म्हणजे हिचीच चूक सिग्नल नसताना ही क्रॉस करत होती म्हणे, टॅक्सीने उडवले’’
‘‘पण आता कसं आहे ?’’ सुलभा किंचाळत बोलली.
राजन चाचरत चाचरत तिची नजर चुकवत म्हणाला,
‘‘श्यामू म्हणाला बरं आहे म्हणून पण डोक्याला मार लागलाय. अॅडमिट केलंय, आपण निघायला हवं.’’
सुलभा रडायलाच बसली. राजनने तिचा ड्रेस आणून दिला.
‘‘चल चल घाल हा ड्रेस, मी उबर मागवतो.’’
सुलभाने रडत रडत ड्रेस बदलला आणि खाली उभ्या असलेल्या उबर मध्ये दोघे बसले. संध्याकाळच्या सुमारास मुंबईतील रस्त्यावर गर्दी त्यामुळे उबर हळूहळू चालत होती. शेवटी रात्रौ नऊ वाजण्याच्या सुमारास उबर भगवती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये गर्दी. राजनने सुलभाच्या हाताला धरुन तिला अॅक्सिडेंट विभागाकडे नेले. राजन व सुलभा आत जाताच त्याठिकाणी आधीपासून आलेली स्मिताची बँकेतील मंडळी तसेच बिल्डींगमधील मंडळी पुढे आली. स्मिताची बँकेतील जवळची मैत्रिण कल्पना रडत रडत पुढे आली. सुलभाच्या गळ्यात पडून- ‘‘गेली ग स्मिता आपली !’’ म्हणून आक्रोश करु लागली. तिच्या सोबतीच्या अनेक स्त्रियांनी पण हुंंदके देत रडायला सुरुवात केली. राजनला स्मिताच्या निधनाची कल्पना होतीच तरी तो भांबावून गेला. आता स्मिताला कसे सांभाळावे याचा तो विचार करत होता पण सुलभा शांत होती. कदाचित ती बधीर झाली असावी. हा आक्रोश तिच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता. कुणीतरी स्मिताचा मृतदेह बाजूच्या पोलीसांच्या खोलीत असल्याचे राजनला सांगितले. राजन सुलभाच्या हाताला धरून त्या खोलीत गेला. संपूर्ण झाकलेला तो देह आणि बाजूला बसलेले अभय, तेजश्रीला पाहून सुलभा ‘‘स्मिते’’ म्हणून जोरात किंचाळली आणि बेशुध्द झाली.
आठ दिवसानंतर....
गेले आठ दिवस सुलभा पार्ल्याच्या जोशी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. गेल्या आठ दिवसात तिने अन्नाचा कण पोटात घेतला नव्हता. सलाईनमधून थोडंफार व्हिटामिन जात होतं तेवढंच. तिच्या अवतीभवती राजन, त्यांची मुलगी विनया, जावई बिपीन उभे होते. एक नर्स खास सुलभासाठी बाजूलाच होती. सुलभाला थोडावेळ शुध्द येत होती सर्वांकडे पाहता पाहता तिचे डोळे भरुन येत होते आणि ओठातून स्मितू, स्मितू असे हलकेच शब्द बाहेर पडत होते. विनया तिच्या तोंडात दूध घालू पाहते पण ती हाताने चमचा दूर लोटत होती. सर्वजण मोठ्या काळजीत होते. डॉक्टर्स म्हणत होते काहीतरी करा आणि त्यांच्या पोटात दूध, अन्न जाऊ द्या. विनयाने ठरविले आता गप्प बसून चालणार नाही. दुपारी बारा वाजता सुलभाने डोळे उघडले, ती आजूबाजूला बघत होती. पुन्हा तिचा चेहरा रडवेला झाला. तेव्हा विनया आईला म्हणाली -
‘‘आई, स्मितू मावशी गेली ती परत येणार नाही पण तुझं काय चाल्लयं? तुला बाबांचा विचार आहे ना? तू जगली नाहीस तर बाबांनी काय करायचं? मला माझी नोकरी आहे, संसार आहे. त्यांना तुझ्याशिवाय कोण आहे? तू गेल्यावर त्यांनीपण विष घ्यायचं का?’’
विनयाचं हे बोलण ऐकून सुलभा गप्प झाली. हळूच तिने नवर्याकडे पाहिलं. अर्ध्यातासाने तिने विनयाकडे दूध मागितलं. थोड्यावेळाने मोसंबी रस घेतला. दुसर्या दिवसापासून सुलभा सावरली. थोडथोड खाऊ लागली.
पंधरा दिवसानंतर विनया आईला म्हणाली, -‘‘आई स्मिता मावशीचे इन्शुरन्स, म्युच्युअल फंड डिटेल्स तुझ्याकडे असेल ना?’’
‘‘हो, तिच्या नोकरीतले फंड वगैरे सोडून, सर्व गुंतवणूक माझ्याकडेच आहे. खरं तर त्या दिवशी तिने आपली सर्व गुंतवणूक, इन्शुरन्स वगैरे पाहिलं, त्यावरील वारस वगैरे पाहिलं. मी तिला म्हटलं होत ही विमा रक्कम तुझ्या पश्चात तुझ्या वारसांना मिळणार एवढ्यात नाही. पण मला काय माहित तिने एवढी कोटीच्यावर रक्कम नवर्याला, मुलीला ठेवून ती गेली. मी तिला म्हणत होते अग सर्वच पॉलिसी तुझ्या नावावर कशाला? ती म्हणायची, मला माझी खात्री वाटत नाही. मला काय माहित एवढ्यात स्मितू जाईल म्हणून.’’
‘‘ते जाऊदे आई, एकदा जाऊन आणि अभय काकाला आणि तेजूला भेटून त्यांच्या सर्व पॉलिसीज, फंड वगैरे देऊन येऊया.’’
‘‘नाही तरी ती मंडळी त्याचीच वाट पाहत असतील. काही काम ना धंदा. आता या पैशावर मजा करा म्हणावं.’’
‘‘आई, दोघही तुझी चौकशी करत असतात.’’
‘‘या पैशासाठी करत असतील. तिच्याबद्दल कुठलं आलयं त्यांना प्रेम?’’
‘‘आई असं बोलू नकोस. शेवटी अभय काका तिचा नवरा होता आणि तेजश्रीला तिने जन्म दिला होता.’’
‘‘हो ग हो मला माहिती आहे म्हणूनच मी गप्प आहे. नाही तर....’’
‘‘आई, मी अभय काकाला विचारते मग आपण जाऊया.’’
‘‘पण विनया स्मितूनंतर त्या घराच काय झालं असेल ते मला पाहावणार नाही. ती नोकरी सांभाळून घरदार व्यवस्थित ठेवायची, यांना जमणार आहे का ते?’’
‘‘जर घर व्यवस्थित नसेल ना तर आपण दोघी त्यांच घर लावून देऊ. पण आता जायलाच हवं.’’
दोन दिवसांनी विनया आणि सुलभा गोरेगांवला स्मिताच्या घरी गेल्या. सुलभा मनात म्हणत होती स्मितू नंतर घर अस्ताव्यस्त पडलं असेल, कचरा तरी काढतात की नाही कोण जाणे? खरं तर या दोघांची तोंड पाहू नयेत असं वाटतं, पण एकदा स्मिताची गुंतवणूक त्यांच्या ताब्यात द्यायची आणि संबंध संपवायचा. दोन मजले चढून ती दोघं वर पोहोचली. तेजश्री वाटच पाहत होती. सुलभाने आत पाऊल टाकताच पहिल्यांदा स्मितूचा मोठ्ठा फोटो हार घातलेला दिसत होता. ती फोटोतली स्मितू हसत होती. कदाचित लग्नातील फोटो इनलार्ज केला असावा. सुलभाने हॉलमध्ये नजर टाकली सर्वकाही व्यवस्थित होते. कोचवरच्या गाद्या, उश्या व्यवस्थित लावलेल्या होत्या. सुलभा गॅलरीत गेली तिला माहिती होते या ठिकाणी स्मिताची छोटी बाग आहे. तिथे नवीन झाडे आणि व्यवस्थित झाडांना पाणी घातलेले होते. सुलभा स्वयंपाकघरात शिरली. सर्व भांडी स्टँडवर व्यवस्थित अडकवलेली, गॅस शेगडी व्यवस्थित पुसलेली, ओटा धुतलेला. सुलभा घर बघत होती. तिच्या मागे विनया आणि तेजश्री येत होत्या. सुलभाने बेसीन पाहिलं, स्वच्छ होतं. वॉशिंग मशिनला व्यवस्थित कव्हर घातलेलं होतं. प्रिâज उघडून बघितला, भाजी, अंडी, फळ व्यवस्थित ठेवलेली होतं. बाथरुम उघडला. स्वच्छ होता, साबण वगैरे जागच्या जागी होतं.
‘‘कामाला कोण येत?’’ सुलभाने विचारलं.
‘‘नाही मावशी, सर्व मी आणि बाबाच करतो. तेजश्री उद्गारली.’’
‘‘मग जेवण, भांडीकुंडी ?’’
‘‘जेवण चुकतमाकत करतो, अजून व्यवस्थित जमत नाही. पण जमेल. थोडफार पुस्तकात बघून, युट्युबवर बघून.’’
‘‘आणि बाजार, भाजी वगैरे?’’
‘‘ते बाबा आणतो.’’
‘‘मग स्पोर्टस् क्लबला केव्हा जातो ?’’
‘‘ते सोडलयं त्याने’’
‘‘का?’’
‘‘त्यात फारसे पैसे मिळत नाहीत. आणि सतत दौरे असतात बाहेरगावी आणि आता बाबाने जॉब घेतलाय. सोमवारपासून हजर होणार.’’
‘‘कुठे ?’’ विनयाने आणि सुलभाने एकदम विचारले.
‘‘ब्रोकर्स ऑफिसमध्ये, बाबाचं सीएस झालेलं त्यामुळे त्याला पटकन नोकरी मिळाली ती पण मालाडला, जवळचं आहे.’’
‘‘आणि तू काय करणार आहेस?’’
‘‘माझा आता कॉलेजचं शेवटचं वर्ष, ते पूर्ण करीन मग बघू कदाचित बाबासारखं सीएस करेन.’’
एवढ्यात बाहेर गेलेला अभय आला. त्या दोघीना बघून खुश झाला. सुलभा किती वर्षांनी अभयला पाहत होती. मागे कधी यायची तेव्हा तो क्लबमध्ये गेलेला असायचा.
‘‘खूप धक्का बसला ना तुला? आठ दिवस बेशुध्द होतीस अस समजलं’’ अभय म्हणाला.
‘‘धक्का बसणारचं, आमची मैत्री होती तशीच ! कोल्हापूरात असताना सतत दोघी बरोबर असायचो. वर्गात शिक्षक ‘‘त्या दोघी’’ कुठे गेल्या असे विचारायचे.’’
‘‘खरंच अशी मैत्री विरळाच आजकाल’’ अभय म्हणाला.
‘‘स्मितू गेली म्हणजे माझ्या शरीराचा अर्धा भाग लुळा पडला असच मला वाटतं. त्या शेवटच्या दिवशी ती माझ्याकडे आली होती. मला कल्पना न देता तणावाखाली होती. खूप दिवसांनी मी तिच्या केसांना तेल लावलं. केस विंचरुन दिले. मग तिने गरम पाण्याची आंघोळ केली. आम्ही जेवलो आणि मी तिला थोपटून थोपटून झोपवलं. कोल्हापूरात असताना झोपवायची तशी. सुलभा जुन्या आठवणीत रमली.
‘‘तिच्या सर्व विमा पॉलिसीज, म्युच्युअल फंड, शेअर्स ही सर्व गुंतवणूक किती आहे ? तसेच नॉमिनीवगैरे बरोबर आहे ना याची तिने खात्री करुन घेतली. तिच्या पॉलिसीज बघून मी तिला म्हटलं - अग हे पैसे तुला नाही तुझ्या वारसांना मिळणार, मला काय कल्पना त्या पॉलिसीज एवढ्यात ड्यू होतील. अभय, तेजू स्मितू गेली पण तुम्हाला कोट्याधिश बनवून गेली. या तुमच्या पॉलिसीज, फंड डिटेल्स, शेअर्स तुमच्या ताब्यात घ्या आणि मला मोकळं करा. एवढ्यासाठीच मी आले होते.
तेजश्री - मावशी खरं आम्हाला नको हे पैेसे. आईच्या बँकेतून मिळणारा फंड खूप झाला आमच्यासाठी. आम्ही पैसे मिळवू. एवढे दिवस ऐतखाऊ सारखं जगलो आता स्वाभिमानाने जगू.’
अभय - जो पर्यंत ती व्यक्ती आजूबाजूला असते, तो पर्यंत तिची किंमत नसते. स्मिता गेली तेव्हा लक्षात आलं, आम्ही खर्या अर्थाने अनाथ झालो. आम्ही तिला गृहित धरले. ती नोकरी करणार, घरातले सामान आणणार, जेवण बनवणार, कपडे ईस्त्रीला पाठवणार, गुंतवणूक करणार. सुलभा हे सर्व आम्हाला नकोच. स्मिता म्हणत होती कोल्हापूरातल्या शाळेची इमारत पडायला आलीय. त्यासाठी पैसे जमवणं सुरु आहे. हे पैसे त्यासाठी वापरुया.
सुलभा - कोल्हापूरच्या शाळेसाठी पैसे जमवणे सुरु आहे हे खरे, पण ती जबाबदारी दोन हजार माजी विद्यार्थ्यांनी घेतलीय. त्यात पाहिजे तर या पैशातील पाच लाख घेऊया. पण बाकी पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील. कारण तिची तशी इच्छा होती.
तेजश्री - मावशी आई गेल्यानंतर मामा-मामी आले होते. खूप रडला गं श्यामू मामा. त्याची लाडकी ताईना गं ती. मावशी, मामाचे कोल्हापूरातील घर तीन-चार पिढ्यांचे जुने. मी मागे पाहिले तेव्हा फार जीर्ण झाले होते. आईची इच्छा होती मामाला घर बांधून द्यायचं. त्याची घर बांधण्याची परिस्थिती नाही. मला वाटते की, आईच्याच पैशातून मामाला घर बांधून देऊ. मजबूत, पुढिल तीन पिढ्यांनी काळजी करता नये.
सुलभा - स्मितू माझ्याशीपण हे बोलली होती. खरंच चांगली कल्पना आहे. आपण ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या आईवडिलांना, भावांना मदत करायलाच हवी. तुझ्या श्यामू मामाला गरज आहे. मला वाटतं यातून पन्नास लाख रुपयात ते घर बांधता येईल. आणि वर दोन ब्लॉक्स बांधले तर त्याचे भाडे मामाला मिळेल.
तेजश्री - पण मावशी या सर्व पैशांच्या देवीघेवी तुलाच करायला हव्यात. तुला एकदम यातून मोकळं होता येणार नाही. आम्ही फक्त सह्या करायला येणार.
सुलभा - हो, ग हो. माझं पिल्लू ते. तुला सोडून कशी जाईन मी ?
अभय - सुलभा, तुझ्या मनात एक विचारायचं असेल तेजूचं लग्न ? ते तुला तेजूच सांगले.
तेजश्री - मावशी आईची बँकेत मैत्रीण होती कल्पना, आईची इच्छा होती कल्पनाचा मुलगा विराज याच्याशी माझं लग्न व्हाव, तो चांगला सीए आहे. आणि वडिलांच्या फर्ममध्ये काम करतोय. पण माझ्या डोक्यात खुळ भरलं होतं. मी वेळीच सावरले पण आईच्या अपघाताचे मोल देऊन. विराजशी लग्न ठरते आहे माझे. तेजश्री रडत रडत सांगत होती.
सुलभा - रडू नकोस तेजू, ती असताना हे सर्व झाले असते तर ती समाधानी झाली असती. तिच्या डोक्यातील वादळे कमी झाली असती. पण.
अभय - आणि सुलभा लग्न फक्त वीस पंचवीस जवळच्या लोकांमध्येच आणि ते पण सहा महिन्यानंतर तो पर्यंत आम्हाला पण सावरु दे. आणि कन्यादान तुला आणि राजनला करायचं आहे. नाही म्हणून नकोस. स्मिताला असेल तिथून समाधान वाटेल.
‘‘ठिक आहे’’ सुलभा डोळे फुसत म्हणाली. मी आले होते तुमचे सर्व व्यवहार तुमच्या हाती देऊन त्यातून मोकळी होण्यासाठी पण तुम्ही दोघांनी मला पुन्हा अडकवलंत याच्यात. पण तिच्यासाठी हे मला करावचं लागेल. कारण आमची जोडी होतीच तशी.
- प्रदिप केळूसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा