शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

1335. पुण्याई

 रात्री बाराचा गजर होताच, तात्या हळूच उठले आणि आपल्या प्रिय पत्नीच्या म्हणजेच माईंच्या कानात हळुवारपणे ‘Happy Birthday to You...’चं गाणं तालात म्हणू लागले. 
माई दचकून जाग्या झाल्या व म्हणाल्या, “इश्श्य, हे काय नविन खुळ आता ! आपण असा रात्री अपरात्री वाढदिवस साजरा करतो का कधी? तुमचं आपलं काहीतरीच !” 
“अहो जे कधीच नाही केलं, ते कधी करूच नये असं कुणी सांगितलंय? आज आमच्या राणीसाहेब ६२ वर्षांच्या पूर्ण झाल्या पण अजूनही २६ च्याच वाटतात, म्हणून ह्यावेळी नवं surprise देऊ म्हटलं!” 
ह्यावर पुन्हा एकदा “इश्श्य” म्हणत माई झकास लाजल्या. 
“आहाहा! हे तुमचं ‘इश्श्य’ ऐकलं की अजूनही अंगावर हजारो रोमांच उभे राहतात” असं म्हणून आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये तात्या खळखळून हसले. 
“बरं बरं, गप्पा नंतरही होतील. आधी केक कापा, मुहूर्त टळायला नको!” असं खट्याळपणे म्हणत तात्यांनी हात धरून माईंना खुर्चीत बसवलं. छोटासा सुंदर केक, बाजूला तितकाच लोभस गुलाब गुच्छ व माईंना मनापासून आवडणारा सुगंधित कुंदाच्या फुलांचा नाजूक गजरा बघून माई स्तिमीतच झाल्या. क्षणार्धात तो गजरा तात्यांनी माईंच्या अंबाड्यात अगदी सहजपणे माळला. केकवर अगदी सुरेख सजावट केलेली होती. माईंना आवडतो तसाच कमी आईसिंग असलेला एगलेस केक, त्यावर सुबक मेणबत्ती लावून ठेवलेली होती. फुंकर मारून मेणबत्ती न विझवता माईंनी तशीच ती बाजूला काढून ठेवली. पण घरात भरलं गोकुळ असताना, असं दोघांनीच केक कापून आनंद साजरा करायला माईंचं हळवं मन काही तयार होईना. तात्यांच्या ते लक्षात आलंच म्हणून ते स्वतःहूनच म्हणाले, 
“एवढ्या रात्री मुलांना नको त्रास द्यायला…चला कापा पाहू केक.” 
माई म्हणाल्या, “अहो पण मुलांना काय वाटेल?” 
तात्यांनी कपाळाला हात लावला व म्हणाले, “लग्नानंतर कित्येक वर्षं आई-अप्पांना काय वाटेल ह्यात गेले, आता मुलांना काय वाटेल ह्यात चाललेत. अहो काही क्षण केवळ ‘आपले’ म्हणूनही जपावेत…!” असं म्हणून तात्यांनी डोळे मिचकावले. माईंनी पण आनंदानं केक कापला व पहिला घास तात्यांना भरवला. केकची देवाण घेवाण झाल्यावर मग तात्यांचा मोर्चा माईंसाठी आणलेल्या स्पेशल गिफ्टकडे वळला.  नाजूक कलाकुसर असलेला सलवार सूट व गर्भरेशमी सुंदर साडी बघताक्षणी माईंच्या मनात भरले. तशा माई म्हणाल्या, 
“साडी तर सुरेखच आहे; तुम्हाला भारी बाई कळतं ह्यातलं. पण हा सलवार सूट?”  
त्यावर तात्या म्हणाले, “आता जेजुरीला जायचंय ना आपल्याला? मग तेव्हा हा सूट घाला की प्रवासात. आतापर्यंत खूप ऐकलं तुमचं. आता मात्र नाही चालणार. अहो हसा, खेळा हौस करा. तुमची नाही तर निदान आमची तरी ! आणि हो, हौशीला जस मोल नसतं ना, तसं वयही नसतं बरं का !”  तात्यांच्या प्रेमळ दटावणीपुढं कधी नव्हे ते माई शांत राहिल्या.
दुसऱ्या दिवशी तात्यांसकट त्यांचा मुलगा अभय, सून  ऋतुजा व नात आद्या ह्यांनीही अगदी मनापासून माईंचा वाढदिवस साजरा केला. सगळ्यांचं त्यांच्यावरच प्रेम व माया बघून त्यांचे डोळे पाणावले. ह्या घरगुती छोट्याश्या कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था नेहमीप्रमाणेच रघूनं अत्यंत शिताफीने केली होती. रघू म्हणजे, माईंकडे बऱ्याच वर्षांपासून काम करणाऱ्या सखूबाईंचा मुलगा. निराधार सखूबाईंच्या अकाली मृत्यूनंतर नातेवाईकांनी क्रूरपणे झिडकारलेल्या निरागस रघूचा माई व तात्यांनी पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला. घासातला घास खाऊ घालून त्याला मोठं केलं. त्याची अभ्यासातली गती पाहून त्याला चांगलं शिकवलं देखील.  आजच्या काळात रक्ताचे नातलग देखील पाठ फिरवतात. सख्खे सख्ख्याला विचारत नाही अशावेळी मोठ्या मनाच्या तात्या व माईंनी एका निराधार पोराला जीव लावून वाढवलं हे त्यांचं ऋण रघूही कधीच विसरला नाही. माईंना व तात्यांना लहानपणापासूनच शक्य ती मदत तो करत असे. अभ्यासाबरोबरच घरादारातलं खूपसं काम तो अगदी उत्तमरीत्या व चोख पार पाडत असे.  माईंच्या संस्कारात वाढलेलं हे निष्पाप पोर देखील त्यांच्या अभयप्रमाणंच नम्र व गुणाचं होतं. स्वतःच्या मेहनत, कष्ट व हुशारीच्या जोरावर त्यानं स्वतःचा कॅटरिंगचा बिझनेस सुरू केला होता, जो दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालला होता. आठवडाभरापूर्वीच एका चांगल्या घरातली सुरेख व सुस्वभावी मुलगी पाहून माई व तात्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं होतं. रघूच्या आईची, सखूबाईंची जेजुरीच्या खंडोबावर नितांत श्रद्धा होती. जेजुरीला जायची तिची अनिवार इच्छा मनातल्या मनातच राहिल्यानं ह्या नव्या जोड्याला जेजुरीला न्यायचा बेत तात्या व माईंनी आखला होता. तसंच रघू व त्याच्या नव्या नवरीनंही तात्या व माईंना एक सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. अभय व ऋतुजाही त्यात सहभागी होते. वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर रघू सगळ्यांना गाडीत बसवून बाहेर घेऊन गेला. छोट्याशाच पण एका आकर्षक रेस्टॉरंटपुढं गाडी थांबली. ‘कुठं आणलंय या पोरानं एवढ्या तातडीनं’ असं काहीसं कुजबुजत तात्या व माई गाडीतून उतरले, तसा रघू पुढं झाला व म्हणाला, 
“माई, तात्या, हे तुमच्या मुलाचं रेस्टॉरंट. तुम्हीच माझे खंडोबा व म्हाळसाई. तुम्हीच माझे मायबाप व तुम्हीच माझं सर्वस्व आहात ! जगात जसं आपल्याच लोकांना परकं करणारे अधम आहेत, तसंच परक्याला पोटाशी कवटाळून आपलंस करणारे तुमच्यासारखी देवमाणसंही अजून शिल्लक आहेत. म्हणूच एवढ्या मोठ्या जगात एकटा पडलेला हा रघू आज भिकारी, गुंड, बदमाश किंवा गुन्हेगार न बनता एक योग्य माणूस बनू शकला व जीवनात हा क्षण पाहू शकला. आज माईचा वाढदिवस म्हणून आजच्या मंगल दिवशी तुम्हा दोघांच्या हातून तुमच्याच असलेल्या ह्या रेस्टॉरंटचं उद्घाटन होऊ द्या व मला धन्य करा !” 
एवढं बोलून रघूला रडूच फुटलं. तसं माई व तात्यांनी त्याला हृदयाशी धरलं. तेवढ्यात तात्या व माईंचं लक्ष रेस्टॉरंटच्या नावाच्या पाटीवर गेले त्यावर ‘माई-तात्यांची पुण्याई’ अशी सुवर्ण रंगात कोरलेली अक्षरं सूर्यासारखी चमकत होती. ते बघताच तात्या व माईंचं अंतःकरण उचंबळून आलं. डोळ्यांना आलेला पूर ते आवरूच शकले नाहीत. अत्यंत मनापासून त्यांनी रघूला शुभाशिर्वाद दिले.

 रुपाली पुराणिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...