आज सकाळचा प्रसंग... भावोजी शाळेत गेले होते, आणि प्रणवची ऑफिसला जायची लगबग सुरु होती. तयार होऊन तो खोलीबाहेर आला. देवाला आणि आम्हां दोघींना नमस्कार केला. त्याने अंगात नुकताच खरेदी केलेला नवीन टी-शर्ट घातला होता. वहिनी पटकन् त्याला म्हटली, "अरे, आज नवीन शर्ट का घातलास? शनिवारी नवीन कपड्यांची घडी मोडू नये, बुधवारी मोडावी. बुधवारी नवीन कपडा अंगात घातला ना... की बुधी बुधी, नवं नवं मिळत राही.. असं आमची आजी सांगायची."
काकूच्या बोलण्यावर छानसं हसून प्रणवने काकूचा गालगुच्चा घेतला आणि तो घराबाहेर पडला. तो गेल्यावर दोघींनी याच विषयावर जुन्या आठवणींना उजाळा दिला. झालं, तो विषय तिथंच संपला आणि आम्ही कामाला लागलो. हातांनी कामं सुरू होती, पण सकाळच्या गोष्टीनं माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं.
घडी मोडणं... लहानपणी याचं किती अप्रूप होतं! नव्या कोऱ्या कपड्याची घडी मोडणं... ही काही नुसती कृती नव्हती बरं का, तर त्यालाही महत्त्व होतं. खरं तर तेव्हा वरचेवर कपडे खरेदी केले जात नव्हते. सणावारी, वाढदिवसाला किंवा एखाद्या विशिष्ट कार्यक्रमाच्या निमित्तानं नवीन कपडे मिळायचे. त्यामुळे त्याचं कौतुक वाटायचं.
वडिलांनी फ्रॉक आणला, की हातात घेऊन मी तो हलकेच गालावरून फिरवायचे. ती घडी छातीशी कवटाळून कितीतरी वेळ तशीच बसून राहायचे. मग डोळे मिटून हळूच त्याचा वास घ्यायचा, आणि तो गंध मनात साठवून ठेवायचा. माझी अशी ब्रह्मानंदी टाळी लागलेली बघून आई ओरडायची, "हातातला तो फ्रॉक आधी ठेवून दे बरं. आत्ता घालायचा नाहीये तो."
काहीशी हिरमुसली होऊन नवीन फ्रॉक कधी घालायला मिळेल, याची वाट बघत राहायचे. सण समारंभ किंवा वाढदिवसानिमित्त नवीन कपडे घेतले असतील, तर कधी घालायचा हा प्रश्नच नसायचा. पण जेव्हा सहज फ्रॉक आणला जायचा, तेव्हा चांगला दिवस बघून विशेष करून बुधवारी घडी मोडण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम असायचा.
आई देवासमोर पाट मांडायची.. मग त्यावर फ्रॉकची घडी उलगडून ठेवायची. देवाला हळद कुंकू वाहून पुसटसं कुंकू फ्रॉकलाही लावायची. शेजारी मला उभं करून देवाचं स्मरण करायला सांगायची आणि म्हणायची, "देवा तुझी कृपा अशीच राहू दे रे बाबा. माझ्या लेकीला असेच नवनवीन कपडे नेहमी मिळोत."
यात काहींना अंधश्रद्धा वाटेल, तर काहींना खुळचटपणा. पण मला मात्र यामागे कृतज्ञतेची भावना जाणवते. अंगात घालायला नवा कपडा मिळतोय तो 'त्याच्या' कृपेने, मग आभार मानायला हवेत ना..
देवासमोर माथा टेकल्यावर नवा फ्रॉक अंगात घालायचा, वडिलांना - आईला नमस्कार करायचा. आणि मग पायातले पैंजण छुमछुम वाजवत घरभर फिरायचं... एकदम भारी वाटायचं.
साडीची घडी मोडण्याची पद्धत तर आणखीन निराळी... साडी पूर्णपणे उलगडून आई निऱ्या घालायची. त्या निऱ्यांवरून हात फिरवून साडीला चापूनचोपून सारखं करायची... म्हणजे साडीतला करकरीतपणा जाऊन मऊपणा येतो. मग साडीला गाठ घालायची. साडीची ती पोटली पाटावर ठेवून हळद-कुंकू वाहून प्रार्थना करायची. ह्यावरुन मला आठवतंय, की त्यावेळी बायका आपल्या नवीन साड्या एकमेकींना घडी मोडण्यासाठी देत.
बहिण, वहिनी, मैत्रीण कधी कधी शेजारणीलाही नवी साडी नेसायला दिली जायची. त्यात एक प्रकारचा आपलेपणा होता, मायेचा ओलावा होता. खरं तर त्यावेळी वर्षभरात एखाददुसरी साडी घेतली जायची. एरव्ही त्याच त्या साड्या आलटून पलटून आणि लग्नकार्यात खास ठेवणीतली साडी नेसली जायची. कुणालाही त्याचं वैषम्य नसायचं आणि अशा परिस्थितीत आपली नवीकोरी साडी दुसरीला घडी मोडायला द्यायची... ह्यासाठी मनाची श्रीमंती आणि मोठेपणा हवा!
थोडं समजायला लागल्यावर 'घडी मोडणं' याचा आणखीन एक कंगोरा अप्पांनी सांगितला होता. ते म्हणाले की काही माणसं कोऱ्या कपड्यासारखी असतात. अगदी ताठ, एकही सुरकुती नसणारी.. चेहऱ्यावर कोणतेही भाव नसणारी.. परीटघडी घातलेली. अशा माणसांना हाताळणं म्हणजे कौशल्याचं काम. त्यांच्या अंगातील कडकपणा जाऊन मुलायमपणा येण्यासाठी त्यांची घडी मोडता आली पाहिजे. हे अवघड काम संवादातून साध्य होतं. बोलण्यानंच माणसाची घडी मोडते आणि हळुवारपणा येतो.
असं हे घडी मोडणं.. मग ती कपड्यांची असो वा माणसांची... अलगद हातानं उलगडायची म्हणजे कोणतीही चुण राहत नाही. 'घडी'चा डाव... एका घडीत जमणारा अन् एकदा जमला की सहज म्हणता येतं, जीवनात ही घडी अशीच राहू दे....
✍🏻..भावना-विवेक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा