शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

1321. हृदयांतर

     टळटळीत दुपारची वेळ.सगळीकडे शुकशुकाट होता, जो तो सावलीची जागा पाहून निवांत टेकलेला नाहीतर वातानुकूलित ऑफिसमध्ये रमलेला. रमाकांत जोशी सावकाश हातातील छत्री सांभाळत चालत चालेले होते. खांद्यावर एक शबनम, पायात साधीशी चप्पल, किंचित चुरगळलेला शर्ट आणि पांढराशुभ्र पायजमा. कोरड पडलेल्या घशाला आता ओला करणे गरजेचे होते. अजून थोडेसे अंतर चालत जायचे होते, त्याशिवाय थांबता येणार नव्हते. खरंतर जिथे जायचे होते, ती पंचतारांकित इमारत आता नजरेच्या टप्प्यात होती, दूरवरून त्याचे भव्य काचेचे प्रवेशद्वार दिसत होते. जवळच्या बाटलीतील थोडेसे पाणी पिऊन त्यांनी बाटली परत शबनममध्ये ठेवली. खिशातून रुमाल काढून कपाळावर,मानेवर आलेला घाम टिपला आणि डोळे बारीक करून दूरवरून दिसणाऱ्या दाराकडे ते पाहू लागले. "जायला तर पाहिजेच..."असे स्वतःशीच जरासे मोठ्याने म्हणत त्यांनी परत चालायला सुरुवात केली. भव्य प्रवेशद्वाराजवळ आल्यावर ते एक-दोन मिनिटे थांबले. मनात अजून हो का नाही, पक्के ठरत नव्हते. आत जावे का परत फिरावे अजून कळत नव्हते. दाराजवळच विचार करत उभे असताना कोणीतरी दार उघडून बाहेर आले आणि सोबर थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर आली. क्षणभर फार फार शीतल वाटले आणि तो गारवा अजून अनुभवावा, म्हणून ते दारातून आत आले. आत आल्यावर, आतील भव्यता पाहून परत त्यांना समजेना कि आपण इथे कशाला आलो आहोत, काय बोलायचे आहे, नक्की कुठे जायचे आहे. नकळतपणे समोर दिसणाऱ्या गोलाकार टेबलवर बसलेल्या चार मुली त्यांना दिसल्या आणि ते पुढे आले. जसे म्हणून ते पुढे आले, समोर बसलेल्या गौरवर्णी सुंदर मुलीने त्यांच्याकडे पहिले आणि विचारले "How May I Help You ?"  
"My name is Ramakant Joshi. I want to meet CEO of the company Mr. Anupam Agarwal." एका झटक्यात त्यांनी सांगितले. समोरील मुलीला त्यांनी असे उत्तर देणे नक्कीच अपेक्षित नसावे.
"Do you have an appointment today?" तिने साशंकपणे विचारले.
"No, I don't have appointment with Mr. Anupam Agarwal today. But as per his last statement, I don't need to take any appointment to meet him any time. Can you please convey my name to him?" अतिशय शांतपणे रमाकांत जोशींनी उत्तर दिले आणि त्याहीपेक्षा शांतपणे शेवटचा प्रश्न विचारला.
बहुतेक दिलेल्या उत्तरावरून, अनपेक्षित वाटणाऱ्या समोरील माणसाकडून इंग्लिशमध्ये आलेले प्रत्त्युत्तर ऐकून ती जास्त काही बोलली नाही. "Please have a seat, I will convey your name and message to him" असे म्हणून तिने नम्रपणे त्यांना सोफ्यावर बसण्यास विनंती केली.
पंधरा-वीस मिनिटे गेली असावीत. बसल्याजागीच अति दमल्यामुळे आणि उन्हाच्या काहिलीमुळे रमाकांत जोशींनी डोळे मिटले. आवाजाच्या  गलक्यामुळे जाग आली तसे ते हडबडले. इमारतीच्या आत जाणाऱ्या मोठ्या पॅसेजमधून अनुपम अगरवाल स्वतः चालत येत होते. त्यांच्या मागे-पुढे भरपूर माणसे होती. समोरच्या टेबलवर बसलेल्या चारही मुली उभ्या राहून त्याच दिशेने पाहत होत्या. सोबत बसलेले चार-पाच लोक पण गडबडून उभे राहिले आणि त्या दिशेला पाहायला सुरुवात केली. जसे अनुपम अगरवाल पुढे आले तशी टेबलच्या मागे उभी असलेली ती मागशचीच मुलगी लगबगीने पुढे आली आणि आश्चर्यचकित होऊन सरांकडे पाहू लागली. त्यांनी डोळ्यानेच "कुठे" असे विचारले तसे तिने सोफ्यावर बसलेल्या रमाकांत जोशींकडे बोट दाखवले आणि ती पुढे येऊ लागली. तिला हातानेच "थांब" अशी खूण करत स्वतः अनुपम अगरवाल पुढे झाले आणि झटक्यात रमाकांत जोशींच्या खाली वाकून पाया पडले.
आजूबाजूची सगळीच माणसे अजूनही या कृतीने स्तब्ध झालेली होती.
बाबा, आत जाऊन बोलूयात का? कधी आलाय? मला आधीच का नाही फोन केला?" असे प्रेमाने त्यांच्याशी बोलत अनुपमने त्याचा हात धरला आणि त्यांना उभे राहण्यास मदत केली. डोळ्यात येणारे पाणी आवर्जून रोखत रमाकांत जोशी त्याच्याकडे पाहू लागले. शेवटी डोळ्याने दगा दिलाचं आणि येणारे पाणी स्वतःच्या हाताने पुसत त्यांना आधार देत तो त्यांना आत घेऊन गेला. अजूनही विश्वास बसत नव्हता त्या मुलीचा. कारण सरांना फोन करताच सरांंनी पुढच्या दोन तासातील सगळ्या मिटींग्स रद्द करून तातडीने स्वतः त्यांना भेटायला ते बाहेर आले होते. ती अजूनही सर आणि रमाकांत जोशी गेले त्या दिशेनेच पाहत होती. आत जाताच अनुपम अगरवालने त्यांना पाणी दिले. जेवणाची चौकशी करून स्वतःचा घरून आलेला डबा उघडला. स्वतः त्यांना वाढले.
रमाकांत जोशी त्याला सांगत होते "अनुपम, सुनीलचा वाढदिवस होता ना म्हणून नेहमीप्रमाणे कोल्हापूरला जाऊन आलो. अगदी त्याचा जन्म झाल्यापासून आम्ही अंबाबाईला जातो रे, त्याच्या वाढदिवसाला. तिचे माहेर कोल्हापूरचे, तिची फार भक्ती होती अंबाबाई वर. तिथे गेल्यावर देवीच्या पायाशी बसलो, नारळ वाहिला, हळदी-कुंकू वाहून देवीची ओटी भरली आणि नकळतपणे डोळे भरून आले रे. कुणासाठी आणि काय मागू देवीकडे? आता कोणीच नाही रे माझे असे वाटले मला. आणि खरंच सांगतो अंतर्मनाने नकळत देवीकडॆ तुझ्यासाठी आयुष्य मागितले. दुपारची शांत वेळ होती, फारशी गर्दी पण नव्हती आणि नेमके देवीला वाहिलेले घरचे चाफ्याचे फुल कौल म्हणून खाली पडले. पुजाऱ्याने सुध्या सांगितले "काका,...तुमची मनातील इच्छा आता नक्की पूर्ण होणार. देवीने कौल दिलाय." असे म्हणून देवीचा नारळ आणि कौल म्हणून पडलेले फुल माझ्या हातात दिले. मी बराच वेळ देवळात तसाच बसून होतो. मला काही सुचेना. मन विदीर्ण झाले होते. आठवणींचा महापूर येत होता आणि मी एक निर्णय घेतला तुला भेटण्याचा. त्या दिवसापासून आपली परत प्रत्यक्ष अशी भेट झालीच नाही आणि आलो इथे. म्हणाले, तू ओळखशील कि नाही? तुम्ही खूप खूप मोठी माणसे रे, त्यातून खूप व्यस्त. इथे आहेस कि परदेशात ते हि मला माहिती नव्हते . पण मनाने ठरवले आणि आलो...बघ भेटलास मला तू. "
डोळ्यात येणार पाणी आता थांबले होते आणि रमाकांत जोशी मोकळेपणाने बोलत होते. आता आजूबाजूचा माणसांचा ऑफिसामधील गारव्याचा त्यांना त्रास होत नव्हता. उंची सामान, महागडे सागवानी फर्निचर या सगळ्याचा मनावर दबाव नव्हता. त्यांना अजून काहीतरी बोलायचे आहे, हे अनुपमच्या लक्षात आले होते. 
"बोला ना बाबा...असेच बोलत राहा. आज खूप दिवसांनी कोणीतरी मोकळेपणाने माझ्याशी बोलत आहे. सगळेच सर म्हणून आदराने भीतीने घाबरत बोलतात. मलाही तसे बोलणे, वागणे भाग पडते कधी कधी. त्याची गरजही असते. तुम्ही आलात आणि फार फार आनंद झाला....बोला बाबा पुढे बोला "
"दरवर्षी देवळात गेलो कि रंकाळ्याला जायचो, भरपूर भटकायचो. तिथल्याच बाजारात काही-बाही विकत घ्यायचो. बकुळीचे गजरे घेऊन हुंगत बसायचो, तिखटजाळ मिसळ खायची मग थंडगार आईस्क्रिम. असे खूप काही सुनील करायचा रे आणि मलापण करायला लावायचा. त्याचा वाढदिवस म्हणजे माझे एक दिवसाचे बहारदार स्वप्न होते. मी जणू वर्षभर जगायचो त्या स्वप्नावर ! परत कितीही मनात आले तरी कोल्हापूरला जाणे व्हायचे नाही वर्षभर. मागच्या वर्षी गेलो तेव्हा सुनील होता माझ्यासोबत. मला घेऊन रंकाळ्यावर गेला आणि निवांत पाण्याकडे पाहात तसाच बसून राहिला. जणू काही त्याला कळले होते कि तो आता परत इथे येणार नाही म्हणून. तहानभुकेची जाणीव नाही, फोटो काढणे नाही, इतर काही गप्पा पण नाही, पाण्यात दगडसुध्दा फेकणे नाही शांतपणे बसून राहिलेला. मी हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवले तर रडत होता, मूकपणे.
मला म्हणाला "बाबा, मी असलो-नसलो तरी येत राहा इथे. कदाचित मी परत भेटेन दुसऱ्या कुठल्यातरी रूपात. आणि मुख्य म्हणजे मला तुम्ही परत भेटता हो इथे आल्यावर. घरी आपण दोघेच. आई असती तर तुम्हाला सोबत तरी असती. मला दुसरे भाऊ-बहीण पण नाही. आपण इथे आलो ना, माझ्या वाढदिवसाला दरवर्षी, कि मला जणू पुढच्या एक वर्षाचा परवानाच मिळतो जगण्याचा. त्याला हलकेच उभे केले तसे त्याने मला त्याच्या कवेत घेतले. काहीही न बोलता मावळत्या सूर्याच्या साक्षीने माझ्या पहाडासारख्या मुलाच्या कुशीत मी उभा होतो आणि तो शांतपणे माझी मिठी अजून अजून घट्ट करत होता. तुला सांगतो अनुपम...त्याच्या कुशीत मला फक्त त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. एकसारख्या लयीत पडणारे..ठक ठक ठक..."
नकळतपणे अनुपमचा हात त्याच्या हृदयावर गेला तसे रमाकांत जोशी मोकळेपणाने हसले. "देवीचा प्रसाद म्हणून नारळ आणला आहे. घरीने आणि गोडाचा  प्रसाद करून घरातील सगळेजण खा. माझा विश्वास आहे असे समज, नाही म्हणू नकोस." शबनममधून  नारळ काढून अनुपमच्या हातात देत रमाकांत जोशी म्हणाले. अतिशय भक्तिभावाने तो नारळ कपाळाला लावत अनुपम परत त्यांच्या पाया पडला आणि "तुम्ही म्हणाल तसेच करू" असे म्हणत तो नारळ एका कपाटात ठेवून परत त्यांच्या जवळ येऊन बसला.
"पुढे त्याला अचानक अपघात झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. कोणाकोणाला काय काय दान केले त्याने जाण्याच्या आधी. अजून अंगावर काटा येतो माझ्या, ते सगळे आठवले कि. डॉक्टर मला सांगत होते "मुलगा जगणार नाहीचये जोशी पण तुम्ही जर सही केलीत आणि त्याच्या अवयवांचे दान केलेत तर तीन-चार रुग्ण जगू शकतील, तुम्हाला दुवा देतील त्यांचे कुटुंब. तुमच्या हातात आहे सगळे, निर्णय तुम्ही घ्या. हवे असेल तर नाव गुप्त ठेवता येईल."
मुलाच्या देहाची चिरफाड करायची आणि मरणोत्तर दान करायचे. फार अवघड गेले मला ठरवायला. डोळे, किडनी, यकृत आणि हृदय. आज वाढलेले माझे नवीन कुटुंब मजेत आहे. रोज नव्याने वाढत आहे. इतके दिवस एकटा सुनील होता माझा. तो आला कि उत्सव, सण वाटायचा मला. आता कोणीही कधीही येते रे घरी, माझी विचारपूस करतात, काळजी घेतात. सुनीलचा फोटो पाहात मागच्या महिन्यात आलेला आकाश बराच वेळ त्याच्या खोलीत बसला होता. मग अचानक माझ्या समोर येऊन माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला "आजोबा, खरंच सांगा, सुनिलकाकाचे  डोळे पण माझ्यासारखेच होते का हो? तपकिरी रंगाचे? मी जर त्याच्याच डोळ्याने हे जग पाहू शकतो तर त्याचे आणि माझे डोळे एकसारखेच असले पाहिजे ना?"
स्वतःचा असाच मोठ्ठा व्यवसाय असणारे महेशशेठ आले होते दिवाळीला भरपूर मिठाई आणि कपडे घेऊन. मी हसायलाच लागलो ते सगळे पाहून. मी काय करणार त्या कपड्यांचे आणि मिठाईचे? मला बळेच गाडीत बसून एका वृद्धश्रमात नेले आणि सुनीलच्या नावाने गरजुंना वाटले सगळे. मी उभ्या आयुष्यात कधी अशी पूण्याई केली नव्हती रे. आयुष्यभर पोरासाठी पैसे साठवले. मी कधी दानधर्म करणार? माझ्या पोराच्या एका किडनीने माझे आयुष्य असे बदलले बघ. त्यांची आता तब्येत पण सुधारली आहे. डायलेसिस थांबल्यावर. त्यांची बायको जाताना पाया पडते तेव्हा नेहमी मलाच दुवा देते. मी कोण रे हे सगळे ठरवणार? तो वर बसलाय.  कोणी कधी जायचे आणि कोणी काय करायचे ते ठरवणारा. मी ठरवले असते तर बसलो असतो सुनीलची वाट पाहत, दिले असते त्यालाच दीर्घायुष्य. तो आला असता वर्षातून दोन-चार वेळा मला भेटायला. बाकी वर्षभर मी एकटा. फोनची वाट पाहणारा आणि त्यातच समाधान मानणारा. जाता जाता मला काय काय पदरी टाकून गेला. किती नवीन जबाबदाऱ्या, किती नवीन माणसे माझ्या जीवनात आली. मला माणसात घेऊन आली हि सगळी. आता मी एकटा कधीच नसतो. सतत कोणाचे ना कोणाचे फोन येत असतात. पत्रव्यवहार वाढलाय माझा सध्या. वृद्धाश्रम काय, देणग्या काय. कसली कसली आभाराची पत्रे येत असतात. मला माहिती पण नसते कि ह्या देणग्या माझ्या नावाने कोण देते ते. मी आपली पत्रे वाचतो."
अनुपम गालातल्या गालात हसत होता. चला बाबा, तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे, असे म्हणून हाताला धरून नेऊ लागला. लिफ्टमधून खाली आल्यावर डाव्या हाताला मागच्या बाजूला खूप मोठे हिरव्यागार गवताचे लॉन केले होते. गोलाकार लोखंडी कमानीवर 'क्षणभर विश्रांती' असे लिहिले होते. भर उन्हात देखील तिथे गारवा होता. आजूबाजूला बेंच होते.
"It all begins with you. If you do not care for yourself, you will not be strong enough to take care of anything in life." Leon Brown असे मोठ्या अक्षरात तेथे लिहिले होते. अनुपमने पायातले बूट काढून बाजूच्या रॅकवर ठेवले, तसे रमाकांत  जोशींनी पण अनुकरण केले. दोघेही आता त्या गवतावरून सावकाश चालत चालले होते. पायाला मऊ कोवळे गवत गुदगुल्या करत होते आणि त्याचवेळी आल्हाददायकही वाटत होते.
“बाबा, मी इथे रोज येतो. संध्याकाळी मन आणि शरीर दोन्ही थकलेले असते. तेव्हा इथे येऊन मी ह्या गवतावरून किमान अर्धातास तरी चालतो. मला वेगळाच आनंद मिळतो इथे आल्यावर. मन शांत होते. आज तुम्ही माझ्यासोबत इथे आहेत, मला फार फार आनंद झालेला आहे. बाबा तुम्हाला अजून काही सांगायचे आहे का? निसंकोचपणे बोला” जवळच्या बेंचवर बसत अनुपम म्हणाला.
“तसे नाही रे...आकाश येतो अधून मधून भेटायला. त्याच्या डोळ्यात डोळे घालुन पाहिले कि मनाला बरे वाटते. सुनील भेटल्यासारखा वाटतो. महेशशेठ पण  येतात. सणावारी मला कुठे कुठे घेऊन जातात, त्यांच्या नातेवाईकांमध्ये मला रमायला लावतात. देवाच्या उत्सवात माझ्या नावाने पूजा वगैरे करता. मुख्य म्हणजे त्यांच्याशी भेट होत राहते. सुनीलचे यकृत दिलेला रामानुजन आता अमेरिकेत असतो. पण तोदेखील फोन करतो रे, रात्री-अपरात्री त्याच्या वेळेनुसार. भाषा जमत नाही आम्हा दोघांची आणि इंग्लिशमधून गप्पा रंगत नाहीत. सगळे समजते त्यालाही आणि मलाही म्हणून तो फोन करायचा थांबत नाही रे. तुझेही तसेच. फोन करतोस, माझ्या नावाने देणग्या देतोस. चालू असतात तुझेही उद्योग अधून-मधून...समजतात मला, पण भेट होत नाही आपली. म्हणून आलो मुद्दामूनच आणि पाहिलंस अंबाबाईच्या देवळात पण तुलाच आयुष्य लाभुदे असा स्वर उमटला मनातून. खूप खूप आतून वाटले तुला भेटावेसे, म्हणून आलो...”
बेन्चवरून उठून बसत अनुपमच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत रमाकांत जोशी म्हणाले "यकृत, किडनी अशा दान केलेल्या अवयवांच्या जागी जखमेचा फक्त एखादा व्रण शिल्लक राहतो. हात लावल्यावर आतली हालचाल कधी जाणवत नाही. डोळ्यात डोळे घालून कितीही पाहिले तरी ते परकेच वाटतात. पण हृदयाचं तसं नसतं. ते असतं. हात लावला की स्पंदने जाणवतात आणि कान लावला की ठोके. एकदा सुनीलला  मारली तशी घट्ट मिठी मारायची आहे तुला आणि हृदयाचे  ठोके ऐकायचे आहेत परत एकदा.तेव्हडी एकच इच्छा होती बघ, तुला भेटायला येताना."
अनुपमने दोन्ही हात फैलावत रमाकांत जोशींना त्याच्या मिठीत सामावून घेतले. त्यांचे मन भरेपर्यंत. रमाकांत जोशी ऐकत होते अनुपमच्या हृदयाचे एकसारख्या लयीत पडणारे ठोके ..ठक ठक ठक
"येतो अनुपम. सुखात राहा.." असे म्हणत रमाकांत जोशी डोळ्यातले पाणी पुसत वळाले. अनुपमने त्यांना दारापर्यंत साथ दिली. ड्राइवर आणि कार त्यांना घरी नेण्यासाठी म्हणुन त्यांच्या पुढ्यात आली.
"असेच येत राहा, बाबा...मला तुमची नेहमीच आठवत येते आणि आता आपण दोघांनी मिळून जायचे कोल्हापूरला पुढच्या वर्षीपासून, एकटे जाऊ नका...." असे म्हणत त्याने दरवाजा बंद केला.

आरती कुलकर्णी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...