शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

1341. याला जीवन ऐसे नाव

      निसर्गामधील जीवन जगण्याच्या अविरत चाललेल्या संघर्षाकडे  जर बारकाईने बघितले तर आपल्याला खूप काही शिकायला मिळते. अवलंबून असत ते तुमच्या दृष्टीकोनावर.!! अशीच एक रोज घडणारी घटना. पण त्या घटनेकडून मला खूप काही वास्तववादी तथ्य शिकायला मिळाले. आमची जेवणाची कॅन्टीन ही तिसऱ्या मजल्यावर. खिडकीजवळ जेवायला बसलो की समोरून खाली दिसणारी घरे आणि इतर बाजूच्या कंपन्याचे मनमोहक दृश्य.!!त्याच वेळी मात्र माझं खरं लक्ष कोणी वेधलं असेल तर बाहेर दिसणाऱ्या एका उंच मोबाईल टॉवर ने!!  माझे लक्ष खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या त्या उंच टॉवरकडे नेहमी जायचे. अगदी उंच असलेला हया टॉवर पेक्षा आज मला कोणी जास्त आकर्षित केल होत तर त्याच्या टोकावर बांधलेल्या पक्ष्याच्या घराने  !!!!
      इतक्या उंचावर बांधलेल्या त्या घरट्याकडे बघून माझे कुतूहल वाढत गेले.  नेहमीच दुपारच्या वेळेस जेवताना त्या घरट्याकडे  मी बघायचो.माझं मन त्या घरट्याशी  एकरूप होऊन गेल,त्यातील हालचाली, पक्ष्यांचे येणे जाणे सर्व मला बसल्या जागी दिसू लागले.  घर मग कोणाचेही असो पक्षी किंवा मनुष्य, प्रत्येकाला त्यासाठी जिवाचे रान करावे लागते.  आपल्या जगण्यासाठी  इतका मोठा  धोका पत्करून अगदी उंचावर घर बांधणे म्हणजे मोठी कमाल होती .मनुष्य सुद्धा आपलं स्वतःचं हक्काचं घर बांधताना अशीच जोखीम उचलतो पण मनुष्याच्या घरांमध्ये आणि पक्ष्यांच्या घरामध्ये तसा जमीन-अस्मानाचा फरक जाणवला. पक्ष्यांची घरे ही फक्त तात्पुरती केलेली व्यवस्था आणि खाली असलेल्या पिलांच्या पंखात बळ येण्यापुरती असतात,आमची घरे ही पिढ्यानं पिढ्या हस्तांतरित होतात.  वेळप्रसंगी संपत्तीवरून वाटणीच्या वेळी त्या घराचे दोन तुकडेही होऊन जातात आणि शेवटी वादाची ठिणगी पण पडते. मोडक्या वाळलेल्या काडक्यांनी बनवलेले ते घर  !! मला ते बघूनच खूप कमाल वाटली. कोणतीही सुरक्षा नाही, सुविधा नाही असे असून सुद्धा त्यांचा आपल्या बांधणीवर किती विश्वास.!!  स्वतःच्या कार्यावर विश्वास असणं  हेच सगळ्या यशाचं गुपित आहे.  स्वतःवर विश्वास असला की जगातली कोणतीच गोष्ट अशक्य नाही.  या कार्यात त्या पक्ष्याला जिची साथ मिळाली ती त्याच्या जोडीदाराची. अगदी एक एक काडी दोघेही खूप लांबून गोळा करून आणत होते. घरातील सर्वांची साथ असेल तरच घराला घरपण येत आणि त्याचे मंदिर बनते. पण घरातील माणसामध्येच जर मतभेद असतील तर चांगल्या घराला पण तडे जातात. संसार करायचा तर संसाराचा गाडा दोघांनीही ओढला पाहिजे किंवा थोडा हातभार तरी लावला पाहिजे. एकट्याने ओढलं की मग ते ओझं होत. त्या घरट्या मध्ये कधी कधी नर आणि मादी दोघेही दिसायचे. पण मला त्यांच्यात कधी वाद दिसला नाही की कधी नाराजी, कसली तक्रार नाही की गोंधळ . अगदी प्रेमाने दोघेही त्या छोट्याश्या घरात राहत होते.
     आम्ही मात्र सगळे असून सुद्धा काहीच नसल्यासारखे जेव्हा वागतो, तेव्हा मात्र त्या जगण्याची कीव येते. आमच समाधान कधी होतच नाही. एक फ्लॅट असेल तर दुसरा, दोन असतील तर तिसरा आम्ही फक्त संपत्ती घेऊन ठेवतो हा आमचा लोभ केव्हा संपेल देव जाणे. माणसाच्या गरजा कमी असल्या की तो समाधानी असतो हे जीवनातल अगदी साधं समीकरण आहे . जितक्या गरजा कमी तितके तुम्ही जास्त समाधानी होत जाता. एवढ्यात नर पक्ष्याने अचानक एका सेकंदात घरट्याच्या बाहेर झेप घेतली,  क्षणाचाही विलंब न करता मादी पक्ष्यानेही त्याच दिशेने भरारी घेऊन दोघेही हळुवारपणे नजरे आड होऊन गेले. मी तर हे दृश्य बघतच राहिलो.!! किती समतोल, किती वैचारिक समानता, किती एकमेकातला तो ताळमेळ वा. खरंच कमाल वाटली.  आमच्याकडे छत्तीस गुण जुळून सुद्धा काही महिन्यात लग्न मोडतात तर काही काही अजूनही आयुष्य संपत आले तरी तारा जुळण्याचा शेवटचा प्रयत्न करतांना दिसतात. जगाच्या पाठीवर कोठेही जा. कौटुंबिक वादविवाद, नात्यातील तफावत आणि वैचारिक मतभेद्यांचे वादळ प्रत्येक घरात चालते, फक्त काही वादळ ही पेल्यातील असतात तर काही तुफानी !! तुम्हाला सोबत भरारी मारायची असेल तर  अहंकार सोडावा लागतो आणि त्यागाला कवटाळावे लागते . हे ज्यांना जमलं त्यांचा हा पृथ्वीतलावरचा प्रवास सुखकर झाला म्हणून समजा. परंतु आमचे दुर्दैव्य हे आहे की आम्ही आमच्या अहंकारापायी एकवेळ आत्महत्येसारखा पर्याय निवडतो पण सुखाचा, इच्छाचा त्याग करत नाही. ऊन, वारा आणि पाऊस या सर्वांचा सामना करून त्या घरट्यातील अंड्याचं पिल्लात रूपांतर करण म्हणजे किती दिव्य शक्ती लागत असेल? आपल्या जबाबदारी प्रति किती ती एकनिष्ठता असेल आणि आपल्या पंखावार किती विश्वास असेल. आज सहा फुटी धडधाकड माणूस कर्तव्यशून्य असतो तेव्हा मात्र कोठे तरी तुलना या पक्ष्याबरोबर करावीशी वाटते. यांना मोह नसतो संसाराचा. यांना स्पर्धा नसते आपल्या सहकार्याशी, आपल्या नातेवाईकांशी,त्यामुळे यांच जीवन आपोआप आनंदी होऊन जाते. यांच्या जीवनात अपेक्षा कधी जन्मच घेत नाहीत.
      खरं तर प्रत्येकाने मिळालेले जीवन अगदी ओढाताण न करता जगले तर ते खूप सुखी होऊ शकत, परंतु आपण स्वतःहुन जीवन किचकट बनवतो, गुंतागुंतीचे बनवतो. कारण नसतांना आम्ही कर्जबाजारी होतो. इच्छा शक्ती असतांना आम्ही निष्क्रिय होतो आणि सहज सर्व होत असतांना आम्ही अवघड करून टाकतो. या जगातून आपण गेल्यानंतर पुन्हा कधीही कोणीही परत एकमेकांना भेटणार नाही हे सत्य माहित असून सुद्धा कित्येक जण आयुष्यभर एकमेकांशी बोलत नाही,संवाद साधत नाही यावरून माणसाच्या बुद्धीची खरंच कीव येते. आम्ही संसारात शेवटच्या श्वासापर्यंत अडकलेलो असतो, आमच लक्ष मुलं आणि मुलीच्या संसारात असते. या पक्षांकडे बघितलं तर खूप आश्चर्य वाटते. पिल्लाची घराबाहेर घेतलेली पहिली झेप ही त्या आई वडिलांसाठी शेवटची भेट असते पून्हा ते कधीही एकमेकांना भेटत नसावेत. आमचा मुलांच्या संसारातला हस्तक्षेप किती असतो यावर न बोललेलं बर.!! पुन्हा कित्येक दिवस मला त्या घरट्या कडे कोणी फिरकलेलं दिसलं नाही. घरातील माणसे गेली की त्या घराला आणि चार भिंतीना काही अर्थ उरत नाही. त्या पक्ष्याच्या घराच्या काड्या काय आणि आपल्या भिंती काय सर्वच एकसामान. घरातील माणसं महत्वाची. जो पर्यंत ती आहेत तो पर्यत त्यांच्याशी संवाद साधा. प्रेमाने रहा. आनंदाने रहा. एकदा की ती गेली की घर खायला उठत म्हणतात ते उगाच नाही. घरातील वडिलधारी माणसे यांच फक्त घरात उपस्थित असणं सुद्धा खूप महत्वाचं असत.
निसर्गाच्या या चक्रातून ना पक्षी वाचले ना आपण वाचणार. जीवन हे असेच चालत राहणार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...