नारद विष्णूंना विचारतात, 'सत्संगतीने काय लाभ होतो ?'
विष्णू सांगतात, 'हा प्रश्न गटारातील किड्यास विचारावा.'
नारद गटाराजवळ येऊन किड्यास विचारतात, 'सत्संगतीचे महत्त्व काय ?'
गटारातील किडा मरतो. नारद विष्णूकडे घडलेली घटना सांगतात.
दोन दिवसांनी विष्णु नारदांना मृत्युलोकात पाठवितात व सांगतात, 'कुंपणावर सरडा आहे ज्याने नुकताच जन्म घेतला आहे. त्यास सत्संगाचा महिमा विचारा.'
नारद कुंपणाजवळ येऊन सरड्यास सत्संगतीचा महिमा विचारतात. पण सरडा नारदांना पाहून गतप्राण होतो. नारद परत घडलेली हकीगत विष्णूंना सांगतात.
दोन दिवसांनी विष्णू सांगतात, 'झाडावर पोपटाचे पिल्लू जन्मास आले आहे, त्यास सत्संगतीचे महत्त्व विचार.'
नारद झाडाजवळ जातात व पोपटास विचारतात, 'पोपटा, सत्संगतीचे महत्त्व काय ?' पोपट मरतो.
दोन दिवसांनी देव नुकत्याच जन्माला आलेल्या गायीच्या वासराकडे नारदांना सत्संगतीचा लाभ विचारण्याकरिता पाठवितात. पण नारदाच्या दर्शनाने, बोलण्याने वासरू मरते.
नारद विष्णूंना कळवितात. विष्णू म्हणतात, 'आपण आता २१ वर्षाच्या राजपुत्रास जो परमेश्वराचा निस्सीम भक्त आहे, ज्याने एकही दिवस भगवंताचे नामःस्मरण करायचे विसरले नाही त्याला सत्संगतीचा लाभ विचारा.'
नारद म्हणाले, 'देवा, आतापर्यंत ज्यांना सत्संगतीचे महत्त्व विचारले, ते सर्व मरण पावले. जर राजपुत्रास राजवाड्यात जाऊन हा प्रश्न विचारला आणि तो गतप्राण झाला तर माझी काय दशा होईल ?'
विष्णूदेव म्हणाले, 'तसे काही होणार नाही.' आपण निर्धास्त जावे.'
नारद घाबरत घाबरत राजवाड्यात प्रवेश करतात. राजपुत्र स्वागत करतो. पाद्यपूजा होते. नारद हळूच विचारतात, 'राजपुत्रा , सत्संगतीचे काय महत्त्व आहे ?'
राजपुत्र बोलतो, 'ब्रह्मर्षि मी या प्रश्नाचे उत्तर देतो. पण ज्यांनी आपणास येथे पाठविले त्यांना घेऊन यावे.'
नारदांना आनंद होतो. ते विष्णूकडे येऊन म्हणतात, 'तो राजपुत्र आपण तेथे आल्याशिवाय प्रश्नाचे उत्तर देणार नाही. कृपया आपण माझ्याबरोबर यावे.'
विष्णू नारदाबरोबर राजवाड्यात येतात. दोघे राजपुत्राजवळ जातात. राजपुत्र देवभक्तांना नमस्कार करतो. राजपुत्राच्या घराण्याच्या आनंदाला पारा राहत नाही.
राजपुत्र म्हणतो, 'ब्रह्मर्षि नारद, मी प्रथम एका गटारातील किडा होतो. आपले दर्शन झाले. दोन दिवसात सरडा झालो. परत आपले दर्शन झाले व मला त्या योनीतून बढती मिळाली. मी पोपट झालो. पोपटाचा जन्म घेतल्यावर परत आपले दर्शन झाले व त्यापेक्षा उच्च पदवी प्राप्त झाली. मी वासरू झालो. परत आपले दर्शन झाले व अति उच्च पदवी मिळाली. मी दुर्लभ मानव देहात पदार्पण केले. फक्त मानव देह नाही तर राजघराण्यात जन्म घेतला. माझा जन्मोजन्मीचा प्रवास मी तुम्हाला आत्ता सांगू शकत आहे. कारण स्वतः परमेश्वर माझ्या समोर आहे आणि नेहमी माझ्या सोबत आहे म्हणून माझ्या तोंडून हे सर्व आपोआप बोलले जात आहे. तुमच्या दर्शनामुळे आता विष्णूंचे दर्शन झाले. मी कृतार्थ माझे जन्म-मरण संपले.'
चांगल्या संतांच्या संगतीने तसेच चांगल्या विचाराच्या निस्वार्थ व्यक्तीच्या संगतीने अनेक जन्माची पापे धुतली जाऊ शकतात. म्हणजे अनिष्ट निवृत्ती होते व देवाचे दर्शन होते. म्हणजे इष्ट प्राप्ती होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा