नक्की समजत नाही पण हल्ली खूपच कंटाळा येऊ लागलाय. रिटायर झाले नंतर सुरवातीची काही वर्षे जुन्या मित्र मैत्रिणींना भेटणे. इकडे तिकडे भटकंती करणे, आवडीची गाणी ऐकणे अधून मधून नाटक, सिनेमा एन्जाॅय करणे यात कशी गेली समजलचं नाही. त्यानंतर मात्र दिवस मोठा वाटू लागला. मग मॉर्निग वाॅक, घरातील कामे, बाहेरची स्वच्छता आणि जमेल तसं बागकाम इत्यादीत मन रमवू लागलो. पण कुठ माशी शिंकली कळलं नाही.थोडसं आजारी पडल्याच निमित्य झालं आणि सारचं बदलून गेलं. अंगात कुठून आळस शिरला पत्ताच लागला नाही.थकवा जाणवू लागला, कशातच मन लागेनासं झालं.काहीस एकटं एकटं वाटू लागलं, पहिल्या सारखा उत्साह,जोम राहीलाच नाही.कालचा,आजचा आणि उद्याचा दिवस सारखाच वाटू लागला.प्रत्येक कृती यंत्रिक बनत चालली.आजूबाजूची सारी दुनिया मजेत असताना माझ्याच वाट्याला हे का आलं याचा विचार करताना माझ्या बायकोकडे लक्ष गेल. ती अगदीच टवटवीत आणि फ्रेश दिसत होती. चोवीस तास तिचा उत्साह ओसंडून वहात असायचा. नातवंडात ती अशी काही रमायची की त्यांच्या पेक्षा तिचचं हसणं, गाणं आणि नाचणं ज्यास्त व्हायचं. शेजारचा कार्यक्रम मग ते हळदी कुंकू असो वा लग्न,ओटीभरण असो वा बारसं तिच्या सहभागा शिवाय पूर्ण होतचं नव्हतं. इतकचं काय, कॉलनीतली गौरी, गणपती, नवरात्र, दांडीया हे सारं काही करताना तिला रात्र कमी पडायची.
खरंतर तिच्या पेक्षा केवळ दोन वर्षानीच मी मोठा होतो तरीपण तिच्यात आणि माझ्यात इतका कसा काय फरक असू शकतो हे मोठं कोडचं होतं.यामागे ओल्डएज या फॅक्टरचा दुरान्वयानही संबंध येत नव्हता याची मला खात्री होती.कारण बायकोच्यात आणि माझ्यात तस फारसं अंतर नव्हतचं.शिवाय माझी प्रकृती अगदीच एथलॅटिक नसली तरी चारचौघा सारखी होती.सुदैवानं अजुन तरी बीपी, शुगरादी मित्रांची चाहूल लागली नव्हती. तरीही हल्ली कशातच मन लागतं नव्हतं ही गोष्ट मात्र खरी होती. इतकचं काय पूर्वी सारखं थोडसं वावडं खाण्याची किंवा पिण्याची इच्छाही होत नव्हती.थोडक्यात वयाचा प्रश्न नव्हता, तब्बेतही तशी ठीक होती.तरीही असं उदास, निरूत्साही आणि मरगळल्या सारखं का वाटतय हा संशोधनाचा विषय बनून राहिला होता. मग म्हटलं एखाद्या डॉक्टरकडं जावं पण त्यानं भलतच काहीतरी सांगितलं म्हणे माझी ही लक्षण सायकोडिप्रोफ्रेझिया किंवा अशाच काहीश्या गंभीर रोगाशी साम्यभाव दाखवतात.अर्थात डॉक्टर काय म्हणतात ते मला काहीच समजलं नव्हतं.पण घरच्यांच्या प्रेशरखाली कौन्सिलिंग,मेडीसीन यात बराच पैसा व वेळ खर्च केला आणि त्यातून काहीच निष्पन्न झाल नाही. त्यामुळचं मला नक्की काय होतय हे समजून न आल्यानं खूपच काळजी वाटू लागली.कॉन्फिडन्सलेस वाटू लागलं. दाढी न करताच बाथरूमला जाताना टावेल विसरण. माझी समजून मुलाची अंडरवेअर घालणं, भाजी मंडईत गाडी नक्की कुठ पार्क केली हे न समजणं असं वारंवार घडू लागलं. खूप विचार केला. मग लक्षात आलं काहीतरी नक्कीच चुकलेलं आहे. कॉलेजमधे असताना मित्र मैत्रीणीत रमणारा, कथा, कविता करणारा, समाजसेवेची आवड असणारा माझ्यातला हरहुन्नरी मी, नोकरी आणि लग्नानंतर संसाराचा रगाडा हाकताना दुनियादारीच्या दुष्ट चक्रव्युहात कुठंतरी हरवून गेलेला होता. तरूणपणी स्विकारलेले सारे छंदमार्ग केंव्हाच दृष्टीआड झाले होते.त्यातील एखाद्या मार्गावर थोडीसी जरी वहीवाट ठेवली असती तरी आत्ताच्या कंटाळवाण्या परिस्थितीला सामोरी जायला लागलं नसतं. पण आता केलेल्या चुका पुन्हा पुन्हा उगाळून काहीच उपयोग नव्हता हेही खरंच होतं. मग,असचं एकदा ठरवलं,चला एक दिवस सगळे पाश तोडूया,सगळं काही विसरूया आणि थोडसं रूमानी होतं मनसोक्त उनाड भटकंती करूया. मग,घरी कुणालाही न सांगता हळूच माझी जुनी मारूती काढली.पेट्रोल टाकी फुल्ल केली.खिशातलं पैशाचं पाकीट चेक केलं.एटीएम कार्ड घेतल्याची खात्री केली आणि गाडी स्टार्ट केली. आता गाव कधीच माग पडलं होतं. दुपारची वेळ झाली होती. नक्की कुठे आलो होतो माहित नव्हतं पण समोरच एक डिसेन्ट गार्डन रेस्टॉरंट दिसत होत. गर्द झाडीत गाडी पार्क करून बिनधास्त आत शिरलो. चमचमीत,चटपटीत,चरचरित,सामिष वगैरे जेजे काही उपलब्ध होतं त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. एकदोन आइस्क्रीम रिचवली आणि पान टपरीवर येऊन मस्त पैकी शिगार शिलगावली. सहज घड्याळात लक्ष गेल.
बापरे !,संध्याकाळचे चार वाजत होते. पाठोपाठ बायकोचाच फोन वाजला.
"अहो, कुठे गेलात इतका उशीर? आणि सांगायची वगैरे पध्दत आहे की नाही? अचानक झालेल्या या नेमक्या हल्लाबोला मुळं मी थोडासा बिथरलो. तरीही धाडस करून तिला सांगितल.
"हे काय इथचं आहे,येतोय तासाभरात घरीच येतोय."
आता मात्र पंचाईत झाली होती.गावा पासून मी किती दूर आलेलो आहे आणि नेमका कुठे आहे याची काहीच कल्पना येत नव्हती. आलेला मार्ग, जायचा मार्ग, लांबचा मार्ग, जवळचा मार्ग, नेमक्या कोणत्या मार्गाने परत जायच काहीच सुचत नव्हतं. मग,पटकन गाडीत बसून इंजिन स्टार्ट केलं आणि मोबाइल वरचा गुगल रोडमॅप ऑन केला.
ओके !.
आता काहीच काळजी नव्हती. खरंतर येताना नुसतच भटकायचं होतं. कोणतही डेस्टिनेशन नव्हतं पण आता मंजिल मालूम थी म्हणजे घराचं लोकेशन माहीत होतं सिर्फ गुगलको फॉलो करना था और सफर काटना था. पण गंमत अशी झाली की,कधी कधी गुगल काय सांगतोय हे ध्यानी न आल्यान मी भलतीकडेच वळायचा. कधी,"काम चालू रस्ता बंद" हा बोर्ड पाहून गाडी सहीत गुगलही तिथेचं थबकायचा. मग मी मनातल्या मनात एखादी शेलकी....हासडून रागाने उजव्या किंवा डाव्या बाजुला गाडी वळवायचा. पण यावर गुगल वरची गोड आवाजाची निवेदिका आजिबात रागवायची नाही.त्याच मुधुर आवाजात ती पुन्हा परतीच्या मार्गाच रिरूट सादर करायची.असं करता करता मी जवळच्या रस्त्याने अगदी अर्ध्या तासातच चक्क घराच्या गेटपाशी येवून थडकलो. आणि त्याच वेळी मला माझ्या कंटाळ्यावरचं रामबाण उत्तर मिळाल.
"रिरूट "
खरंतर कार चालवतानाच माझ्या ते लक्षात आलं होतं. मी कार चालवत असताना गुगलवरची स्वर्गीय स्वर माधुर्यात चिंब झालेली निवेदिका मला इनडायरेक्टली सांगत होती. प्रिय मित्रा,काळजी करू नकोस. तू फक्त तुझं डेस्टिनेशन ठरव. मग तू कितीही चुकीची वळणं घेतलीस,कितीही वेळा रस्ता चुकवलास, कुठेही भरकटलास तरी हरकत नाही. मी तुझ्यावर आजिबात न रागावणार नाही. पण तुला वचन देते की तुझ्या इच्छित स्थळी मी नक्की पोहचवेन. आपल्या जीवनाचंही असचं आहे. पाठीमागे वळून पाहिलं की झालेल्या चुका,चुकलेले मार्ग पटकन नजरे समोर येतात पण गुगलची स्वरलता भुतकाळाची आणि चुकलेल्या वळणांची चर्चा न करता अपेक्षित डेस्टिनेशनला भिडणाऱ्या रस्त्याचा मॅप पुन्हा पुन्हा रिरूट करत असते. अगदी तसचं,झालं-गेल विसरून आपण स्वतःलाच रिरूट करत राहीलो तर. तर,मला वाटतं,जीवन पटलावरच्या इंद्रधनुत पुन्हा पुन्हा रंग भरायला कोणतीच हरकत राहणार नाही.
तुम्ही हत्तीची गोष्ट ऐकली आहे काय? हो नक्कीच ऐकली असेल. तरी पण आणखी एकदा नव्यानं ऐकूया. एका राजाचा एक हत्ती होता.राजाला तो अतिशय प्रिय होता.प्रत्येक युद्धाच्या प्रसंगी तो राजा सोबत असायचा. निसर्ग नियमा प्रमाणे हत्ती म्हातारा होतो. मग राजा त्याला युद्ध भूमीवर सोबत घेत नाही.त्यामुळे हत्ती उदास राहू लागतो.चालता चालता एकदा हत्तीचे पाय चिखलात रुततात. काही सैनिक धावतच येऊन राजाच्या लाडक्या हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण आत्मविश्वास गमावून बसलेला हत्ती जागचा हलत नाही. मग कोणाला तरी कल्पना सुचते. युद्धभूमी वरची तुतारी अशी काही वाजवली जाते की हत्ती अंगातली सगळी मरगळ झटकून, झटक्यात चिखलातून बाहेर येतो. मित्रहो, निवृत्तीनंतर बऱ्याच जणांची अवस्था हत्ती सारखी होते. चला तर,
कुणीतरी तुतारी वाजवेल याची प्रतिक्षा न करता आपणच ती स्वप्राणाने फुंकूया. आनंदाच डेस्टिनेशन पक्क करूया. झालं गेलं विसरून जाऊया. रस्ता पुन्हा रिरूट करूया आणि आनंद मार्गी होऊया.
-राजन पोळ
7588264328
जेष्ठ नागरिक दिना निमित्य सर्व जेष्ठांना सविनय समर्पित 🙏
(कृपया सदरचा लेख शेयर केल्यास नावासहीत शेयर करावा ही न्रम विनंती)
कथाविश्व - आपले कथांचे अनोखे विश्व 🎉
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा