आई- वडीलांपासून निर्माण झालेले हे शरीर आपले न मानता ते माता-पित्यांचेच मानतात, तेच खरे पुत्र होत. स्थूल, सूक्ष्म अथवा कारण. यापैकी कोणत्याही प्रकारचे शरीर का असेना, त्यावर ते (पुत्र) आपल्या आई- वडीलांचाच अधिकार मानतात. श्रीमनुने म्हटले आहे की, पुत्र जे काही तीर्थ, व्रत , भजन, स्मरण इत्यादी प्रकारची शुभाशुभ कर्मे करतो, ती त्याने आपल्या आई- वडीलांनाच अर्पण करावीत.
आई- वडील जीवंत असेपर्यंत त्यांची तत्परतेने सेवा करावी. त्यांचे मन नेहमी प्रसन्न व आनंदी राहील, अशीच वर्तणूक करावी. मृत्यूनंतर नांवाने पिंडदान द्यावे, श्राध्द-तर्पण करावे. त्यांच्याकरिता तीर्थ, व्रत इत्यादी शुभ कर्मांचे आचरण करावे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन पुत्राचे इहलोकात आणि परलोकातही कल्याण होते. भीष्माचार्यांनी आपल्या पित्याच्या सुखासाठी वैयक्तिक सुखाला तिलांजली देऊन मरेपर्यंत ब्रम्हचर्याचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी कनक आणि कामिनी या दोन्हीचाही त्याग केला. त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांच्या वडीलांनी त्यांना इच्छामृत्यूचे वरदान दिले. हे सामर्थ्य त्यांना केवळ पित्याची सेवा केल्यानेच प्राप्त झाले.
श्रीरामचंद्रांनी पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याकरिता राज्य वैभव, सुख, आराम इत्यादींचा त्याग केला. वाल्मिकी रामायणामध्ये असे वर्णन आढळते की, श्री रामचंद्रांनी स्वतः असे म्हटले आहे की, पित्याच्या इच्छेखातर- आज्ञेखातर मी विषाचे देखील भक्षण करू शकतो, अग्नीकाष्ठात आणि भयानक समुद्रात देखील प्रवेश करू शकतो, परंतु पित्याची आज्ञा मोडू शकत नाही. श्रीरामचंद्र पित्याची आज्ञा पालन करीत होते. अर्थात् वडीलांनी कोणत्या प्रकारची आज्ञा केली, कोणत्या स्थल-कालामध्ये केली, कोणत्या अवस्थेमध्ये आणि कोणत्या परिस्थितीत केली, इत्यादीचा काहीही विचार न करता, ते वनवासामध्ये गेले. त्यामुळे आई-वडीलांची आज्ञा पालन करणाऱ्यांसाठी श्रीराम "आदर्श" बनले. श्रीगोस्वामी तुलसीदासजी यांनी म्हटले आहे, प्रत्येक पुत्राने श्रीरामचंद्रांप्रमाणे आपले आचरण आदर्श बनवावयास पाहिजे.
मुलांनी आई-वडीलांची कितीही सेवा केली तरी, ते त्यांचे ऋण फेडू शकत नाहीत. कारण ज्या मनुष्य शरीराच्या योगाने आपले कल्याण होऊ शकते, जीवन्मुक्ति मिळू शकते, भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होऊ शकते, भगवंताचा मुकुटमणी बनू. एवढ्या उच्च पदाची प्राप्ती होऊ शकते, ते मनुष्य शरीर आपणाला माता-पित्यांनी दिले आहे. त्यांचे हे एवढे मोठे ऋण कोणताही पुत्र फेडू शकत नाही..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा