मला आठवतंय आजही टक्कं नीट. आम्ही, म्हणजे तुझी ममा आणि मी पहिल्यांदा फॉर्मली भेटलो ते जॉय भाटियाच्या पार्टीत. जनरल ओळख झाली, गप्पाटप्पा झाल्या. मग पुन्हा भेटलो डॉली अहलुवालियाच्या घरी आणि मग भेटीगाठी होत गेल्या. तुझ्याबद्दल ममाने पहिल्या भेटीतच मला सगळं सांगितले होतं इत्यंभूत. म्हणजे, तुझ्या जन्मानंतर तुझा डॅडी वर्षभरात गेल्यापासून सगळं डिटेल. ती वर्किंग वुमन होती, सिंगल पेरेंट. मग आपण दोघं भेटलो आठवतंय तुला. नसेल आठवत म्हणा. तु तेव्हा अगदीच प्लेग्रुपमधे असशील. कापसाच्या शुभ्र पांढऱ्या बाहुली सारखी होतीस तेव्हा. आजही तशीच आहेस. थोडी गुटगुटीत आणि लख्खं गोरी. Adorable.. आपलं दोघांचं सूत पहिल्या भेटीतच जुळलं. तुला Toblerone चॉकलेट आवडतं असं ममा बोलली होती. पण मी मुद्दामच ते नाही घेतलं. फारच प्रेडिक्टेबल वाटलं असतं. मी Droste घेतलं, माझ्या आवडीचं. लेट्स सी आणि तुलाही ते सॉलिड आवडलं होतं. मग ममा राहिली बाजूलाच आणि आपल्या गप्पा रंगल्या. मला तशी लहान मुलांची फार सवय नव्हती. पण तुझ्याशी चटकन जमून गेलं. मला आजही तु बोलताना आपसूकच मोठे होणारे तुझे निळे डोळे, हातवारे करणं सगळे तस्संच दिसतंय. किती गप्पा मारल्या होत्या आपण आणि ममा तेव्हाही फोनवरच बोलत होती. मग आमचं लग्न झालं. लग्नात आमच्या दोघांच्या फोटोपेक्षा आपल्या तिघांचे आणि त्यातही आपल्या दोघांचे फोटो जास्त. मस्त दिवस होते नं ते.
सिया हेच आपलं दोघांचं मुल. आता नंतर बायॉलॉजिकल चाईल्ड नको. तुझ्या आईचं ठाम मत आणि तुझ्या सहवासात मलाही ते पटायला लागलं. पोटचं मुल सख्ख्या बापावर करेल तशीच माया आणि प्रेम मला तुझ्याकडून मिळालं. दोन वर्ष गेली आणि ममाला फिलाडेल्फियाहून जॉब ऑफर आली. मग मोठाच प्रश्न निर्माण झाला. इनिशिअली मी नको म्हणत होतो पण तुझी ममा खूप ॲम्बिशिअस. मग मी माघार घेतली. तिला तुला तिथे नेणं शक्य नव्हते आणि मी इथला बिझनेस सोडून तिथे जाणं मुर्खपणा ठरला असता. मग तु आणि मी दोघंच इथे राहिलो. ममाचं कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षे होतं. ती दोन वर्षांत आलीच नाही.
मला पहिला धक्का बसला तो शिरोडकरांचा फोन आला तेव्हा तुझी आजी म्हणजे ममाची आई जेव्हा इथलं सगळे विकून युएसला मुलीकडे निघून गेली तेव्हा. आपल्याला काहीही न सांगता सवरता. मग हळूहळू गोष्टी समजत गेल्या. तुझी ममा सहा महिन्यांपूर्वी फिलाडेल्फियाहून शिकागोला शिफ्ट झाली होती. एका पंजाबी माणसाशी लग्नही झालं होतं. माझ्यातर पायाखालची जमीन सरकली. निव्वळ युएसला जाऊन सेटल होण्यासाठी तिने बरेच जुगाड केले होते. मग कालांतराने तिचे फोन येणं थांबलं. माझं सोड, तिला तुझ्याविषयी ममत्व वाटू नये याचं सगळ्यांना नवल वाटले. मी ताबडतोब तुझं कायदेशीर पालकत्व घेतल. आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
आणि मग आपलं बापलेकीचं जग सुरु झालं. बिझनेसचा व्याप सांभाळून तुझं सगळं करत होतो. रेखामावशी आणि चंदर होतेच मदतीला. पण आपलं एकंदरीत छान जुळलं होतं. तुझे बर्थडे सेलिब्रेशन, तुझ्या शाळेच्या ट्रीप्स , आपले वीकेंड... नुसती धमाल. तुला आठवतंय, नववीत तुझी ट्रीप महाबळेश्वर पाचगणीला गेली होती, तेव्हा तुझ्या काळजीने मी आणि चंदर तुमच्या बसच्या पाठीपाठी शेवटपर्यंत आलेलो. तु कसली वैतागली होतीस ना. तु एफवाय ला असताना तुझ्या मागे एक मवाली लागला होता तेव्हा मी आणि बिपीनकाकाने कसला फोडलाय त्याला चिनॉयच्या दारात. केवढी गर्दी जमलेली. तुझ्या पाया पडायला लावला तेव्हा तु किती ऑकवर्ड झाली होती आठवतंय. पण रात्री मला म्हणालीस. आय एम प्राऊड ऑफ यू पपा. तेव्हा किती छान वाटलं मला. मी तुझा हिरो होतो तेव्हा आणि अर्थात आजही. तुझा प्रत्येक बर्थडे आपण दणक्यात सेलिब्रेट करायचो. दरवर्षी एक छान उपयुक्त गिफ्ट. तुझ्या एमबीए नंतर आठवतंय ना. आपण तिथून थेट एअरपोर्टला गेलो. तुझी बॅग रेखामावशी आणि मी आधीच भरुन ठेवलेली. थेट बाली गाठलं आपण. तुझं फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन. किती गमतीजमती केल्या आपण. आईची कमतरता तुला जराही भासू नये यासाठी आकाशपाताळ एक केलं मी.
खरंतर तु माझी कोण? आपल्या दोघांमधे रक्ताचं नातं नाहीच. पण ऋणानुबंधाच्या इतक्या सुंदर गाठी देवाने किंवा नियतीने मारल्या होत्या की त्या कधीच उकलल्या नाहीत. कायम दृढ आणि घट्ट राहिल्या. मी तुझा बायॉलॉजिकल फादर नसलो तरी सर्वार्थाने बापच होतो आणि असेन. वडील आणि लेक यांना एकत्र आणण्यासाठी नियतीने काही वेड्यावाकड्या गमतीजमती केल्या खऱ्या पण तुला खरं सांगू? आज याक्षणी माझ्या मनात तुझ्या ममाविषयी राग चीड नाहीये, असलीच तर कृतज्ञताच आहे. सिरिअसली. इतकं सुरेख, गोंडस आणि सुस्वभावी दान माझ्या पदरात घालून ती जगाच्या पाठीवर कुठेशी अज्ञातात असेल. आज मी तिचे मनापासून आभार मानतो. कदाचित ती असती तर आपलं बापलेकीचं नातं इतकं गहिरं आणि मनभावन नसतंही, कुणास ठाऊक? पण तिची अचानक झालेली एक्झिट ही मला तुझ्याजवळ यायला आणि माझी वात्सल्यभावना पूर्ण करणारीच ठरली. तिचे आभारच.
वरुणसोबत लग्न करुन आता तु न्युझिलंडला जाते आहेस. कन्यादानाचे विधी सुरु असताना मी तुला विचारलंही. ममाची आठवण येतेय का? तु म्हणालीस. “पपा, माझी ममा आणि पपा तुच आहेस. टू इन वन” आपण तेव्हाही दात काढून फिदीफिदी हसलो. आपटे गुरुजी बघतच राहिले, इतक्या सेंटीमेंटल क्षणी बापलेक हसतायत का? आता माझा प्लॅन पण ठरलाय. इथला बिझनेस आता येत्या काही वर्षांत आटोपता घेणार आणि तिथे येणार. तुझ्या जवळपासच एक छान आटोपशीर विला खरेदी करणार आणि मस्त एकटा रहाणार. ऑब्हिअसली, तु आणि वरुण असालच. मग मधल्या काळात राहून गेलेले तुझे वर्षसण आपण तेव्हा करु. दिवाळसण, संक्रात. धमाल करु. तोवर एखादं नातवंड झालं तर मग काय, मजाच मजा.
सिया, या निमित्ताने खरं तर तुझेही औपचारिक आभार मानावेसे वाटतात. नाती रक्ताची असतील तरच घट्ट असतात असं नाही. मनं जुळावी लागतात हेच खरं. मी तुझ्यावर बापासारखं प्रेम केलंच पण तुही मला बाप म्हणून स्विकारलंस त्याबद्दल तुझेही आभार पोरी. चला चला. लेट होतोय. फ्लाईट चुकेल अशाने.
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा