सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

1368. शेवटची इच्छा

"म्हातारे...ए, म्हातारे! आहेस का गं? की खपलीस इतक्यातच?" राजीवने झोपलेल्या आईला विचारले. 
"आहे, आहे. इतनी जल्दी तुम्हे चैन की साँस नही लेने दूँगी आणि मेले तरी परत येईन भूत बनून, मानगुटीवर बसायला.", हळूच डोळे उघडत म्हातारी-राजीवची आई म्हणाली. दोघेही मनसोक्त हसले या वाक्यावर. आई आणि मुलाच्यातील असे संवाद नेहमीचेच. प्राजक्ताला त्याची इतक्या वर्षांत सवय झाली होती. 
"चला, माय-लेकराचे प्रेमळ संवाद झाले असतील तर उठा आता, चहा करते आहे, पिऊन घ्या" सासूला हळूच जागेवर बसवत प्राजक्ता म्हणाली.
     वर्षाताईंना म्हणजेच राजीवच्या आईला कॅन्सरचं निदान झालं तेच मुळी शेवटच्या टप्प्यावर. शाळेत शारिरीक शिक्षणाच्या शिक्षिका असलेल्या वर्षाताई प्रकृतीने एकदम धडधाकट आणि ठणठणीत. पस्तीस-चाळीस वर्षांच्या सरकारी शाळेतल्या नोकरीत अत्यंत शिस्तप्रिय, रोखठोक पण तितक्याच प्रेमळ स्वभावाच्या शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या. एकदम जाॅली पर्सनालिटी ! विनोदाची उत्तम जाण आणि आयुष्यात आलेल्या कुठच्याही संकटाला अगदी हसत हसत सामोरं जायची वृत्ती ! नोकरीचं रूटीन सांभाळून त्यांनी प्रकृती पण उत्तम ठेवली होती. त्या नेहमी म्हणत की शारिरीक शिक्षण शिकवणारी शिक्षिकाच जर मरतुकडी असेल तर मुलांना काय डोंबल गोडी लागणार शारीर स्वास्थ्याची? विविध खेळ, कवायती, शालेय कँप्स हे करताना शेवटपर्यंत त्यांनी स्वतःला फिट ठेवलं होतं. त्यांना स्वतःचं मूल नव्हतं. राजीवला त्यांनी बाळ असतानाच दत्तक घेतलं होतं. तो साधारण दहा वर्षांचा असताना नवरा वारला. पण त्यांनी मात्र अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने त्याला वाढवलं.
      राजीवलाही आईचं फार प्रेम. किंबहुना ती आपली जन्मदात्री नाही हे कळल्यानंतर तर त्याचं आईबद्दलचं प्रेम आणि आदर अधिकच वाढला. अनाथ म्हणून आयुष्य काढावं लागलं असतं पण या माऊलीने आपलं मूल म्हणून वाढवलं, शिकवलं, कर्तबगार केलं या भावनेनं तो नेहमीच गहिवरून जायचा. "जन्माचं ॠण आहे हे, फिटणारं नाही कधी" असं म्हणायचा. राजीवनं लग्न केलं ते प्राजक्ताशी. ती ही अनाथ. वर्षांताईंच्या रूपाने तिला सासूपेक्षाही एक आई आणि अत्यंत चांगली मैत्रिण मिळाली होती. राजीव बँकेत उच्चपदस्थ अधिकारी होता. प्राजक्ताकडेही खूप कलागुण होते. आश्रमात शिवणकाम शिकलेल्या प्राजक्ताने पुढे रस घेऊन शिवणकामात खूपच प्राविण्य मिळवलं आणि त्याच कलेचा उपयोग करून स्वतःच एक बुटीक देखील सुरू केलं.
      सर्व काही सुरळीत चालू होतं. सल एकच होता. लग्नाच्या दहा वर्षांनंतर देखील उभयतांना मूल होत नव्हतं. सगळे वैद्यकीय उपाय झाले पण व्यर्थ! राजीव आणि प्राजक्ताने एव्हाना स्विकारलं होतं की ते आता आई-बाबा होऊ शकणार नाहीत. वर्षाताईंनी मात्र फार मनाला लावून घेतलं होतं. प्राजक्ता आणि राजीव त्यांची खूप समजूत काढायचे. म्हणायचे की देवाचीही हीच इच्छा असेल की आम्ही देखील एखादं बाळ दत्तक घ्यावं. पण त्यांना पटायचं नाही. त्यांना राहून राहून वाटायचं की आपल्याला मूल होऊ शकलं नाही आणि आपल्या दत्तक मुलाच्या भाळी पण तेच दुर्दैव आलं. कॅन्सरचं वाढलेलं दुखणं आणि मनात सातत्याने हा एकच विचार, त्यामुळे प्रकृती जास्तच खालावली. वर्षाताई गेल्या. राजीव आणि प्राजक्ताला परत एकदा अनाथ झाल्यासारखं वाटलं. राजीवने आईचं दिवसकार्य केलं. दहाव्याला पिंडाला कावळा शिवेना. राजीव आणि प्राजक्ताने "तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू" म्हंटलं तेव्हा कुठे पिंडाला कावळा शिवला. दिवस करून झाले. हळूहळू दोघंही सावरले; परत आपापल्या कामात आणि व्यवसायात लक्ष घालणं भाग होतं.
      तेराव्यानंतर साधारण पंधरवडा उलटला असेल आणि एक दिवस बुटीकमध्येच प्राजक्ताला अचानक भोवळ आली. बरेच दिवस चाललेलं आईंचं दुखणं आणि मानसिक तणाव यांमुळे नाही म्हंटलं तरी प्राजक्ताच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यात पिरीयड्सही अनियमित झाले होते. अर्थात तारखा मागे-पुढे होत राहतात, त्यामुळे तिने इतकं गांभीर्याने घेतलं नाही. पण एक दिवस सकाळी स्वयंपाक करताना तिला खूप मळमळायला लागलं, उलटी झाली, तसं मग एकदा चेकअप करायचं ठरलं. तिचे गायनॅकाॅलाॅजिस्ट डाॅ. सदानंद यांच्या क्लिनिकच्या कन्सल्टिंग रूममध्ये राजीव बसला होता. चेकअप करून आतल्या खोलीतून डाॅक्टर प्राजक्ताला बाहेर घेऊन आले तेच मुळात आश्चर्यचकीत चेह-याने. 
"एनिथिंग सिरिअस डाॅक्टर?", राजीवने त्यांच्या चेह-यावरचे भाव टिपले होते. 
"नाही, नाही. सिरिअस बिलकुल नाही. पण मिरॅकल नक्कीच आहे. शी इज प्रेग्नंट ! यू टू, आर गोइंग टू बी माॅम अँड डॅड !", डाॅ. सदानंद एका दमात बोलून गेले. राजीव आणि प्राजक्ता अविश्वासाने डाॅक्टरांच्या चेह-याकडे पाहत होते. "पण...पण, हे कसं शक्य आहे?" प्राजक्ता आणि राजीवच्या चेह-यावर अजूनही प्रश्नचिन्ह होतं.
"म्हंटलं ना की हे एक मिरॅकलच आहे. प्राजक्ताच्या आधीच्या सगळ्या टेस्ट्स आणि ट्रीटमेंटवरून वारंवार हेच सिद्ध झालंय की तिला गर्भधारणा होऊ शकत नाही. आपण या क्षेत्रातल्या सर्व तज्ञांकडून तपासलंय, उपाय केलेत. सर्वांचं हेच मत होतं आणि लॅब रिपोर्ट्स पण तेच सांगतात. तरीही हे शक्य झालंय. मला वाटतं आता का, कसं यापेक्षाही पोटातल्या बाळाची आणि आईची काळजी घेणं जास्त महत्वाचं, नाही का?" सदानंदांनी चर्चेला पूर्णविराम देत म्हंटले. राजीव आणि प्राजक्ता दोघेही खूप आनंदात घरी आले पण त्यांना तितकंच वाईटही वाटलं. वर्षाताई असताना जर ही बातमी कळली असती तर निदान मृत्युसमयी तरी त्यांना समाधान मिळालं असतं. वर्षाताई जाऊन आता दोन महिने झाले होते. एका रविवारी सकाळीच राजीव आणि प्राजक्ताने त्यांची खोली आवरायला काढली. अर्थात कॅन्सरचं कळल्यापासून वेळच मिळाला नव्हता. काय सामान ठेवायचे, काय टाकायचे हे पाहणे आवश्यक होते. आवरता आवरता टेबलाच्या खणातली आईची डायरी राजीवने बाहेर काढली. वर्षाताईंची रोज डायरी लिहिण्याची सवय त्याला माहित होती, पण संस्कारच असे होते की इतक्या वर्षांत त्याने कधीच त्यांची कुठचीही डायरी उघडलीदेखील नव्हती. आज मात्र तो डायरीभोवती घुटमळला. उघडावी की नाही या द्विधा आणि काहीशा अपराधी मनस्थितीतच त्याने डायरी उघडली. कॅन्सरचं निदान झाल्यापासूनच्या शेवटच्या तीन महिन्यांत फारसं लिखाण नव्हतंच. पण, शेवटची पानं चाळताना मृत्यु अगोदर एक दिवस आधीचं लिखाण त्याला मिळालं. काय लिहिलं असेल या विचाराने दोघंही तो मजकूर वाचू लागले. त्यात वर्षाताईंनी लिहिलं होतं, 
"कॅन्सरनं सर्व शरीर पोखरल्याचा भास होतोय. असं वाटतंय की कॅन्सरचा हा विषारी सर्प शरीराचा एक एक अवयव गिळतोय. आता सहन होत नाहीये त्रास. इतकी वर्षं प्रयत्नपूर्वक सांभाळलेल्या तब्येतीचे बुरूज ढासळताना पाहून मनाला वेदना होतात. मनाचे मायापाश त्यात अजून भर टाकतात ते निराळंच. राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं. राजीव आणि प्राजक्ताचं स्वतःचं बाळ नाही. त्यांना वाटतं मला माहित नाही पण डाॅ. सदानंदांच्या क्लिनिकचे सगळे रिपोर्ट्स मी नुसते पाहिलेच नाहीत तर डाॅ. साळींकडे जाऊन खातरजमादेखील करून घेतली. प्राजक्ताला प्रेगनन्सी शक्य नाही. एक स्त्री म्हणून तिला काय आणि कसं वाटत असेल हे मीच समजू शकते. पोर खरंच गुणाची आणि धीराची आहे. मनातल्या वेदना कधी चेह-यावर दाखवत नाही. आनंदी राहण्याचा आटोकाट प्रयत्न करते. राजीवलाही किती त्रास होत असेल याची मी फक्त कल्पनाच करू शकते. बाळ दत्तक घेणं यासारखं दुसरं पुण्यकर्म नाहीच. मी खरंच नशीबवान की मला राजीवसारखा मुलगा मिळाला. सत्य कळून सुद्धा पोरगा कधी बिथरला नाही किंवा वाईट मार्गाला लागला नाही. कदाचित माझ्या सख्ख्या मुलानेही कधी इतकं प्रेम दिलं नसतं इतकं प्रेम राजीव आणि प्राजक्ताने मला दिलंय. खरंच, गेल्या जन्माचीच काहीतरी पुण्याई असावी ही की इतकी चांगली लेकरं मला मिळाली. आता समोर पैलतीर दिसतोय. रोज स्वप्नं पडतात की कुणीतरी मला अलगद उचलून घेऊन जातंय. झोपताना डोळे मिटले तर ते उघडतील की नाही याची शाश्वती नाही. आता भगवंताकडे एकच मागणं. पुनर्जन्म, चमत्कार वगैरे काही असलाच तर मलाच राजीव आणि प्राजक्ताचं बाळ म्हणून जन्माला घाल बाबा ! हीच आता शेवटची इच्छा."
"अभिनंदन बाबा ! घ्या आता तुमच्या मुलीला. खणखणीत आवाजात रडते आहे", त्या लहानगीला राजीवच्या हातात देत नर्सिंग होममधील सिस्टर म्हणाल्या. आश्चर्य म्हणजे राजीवने हातात घेताच तिचं रडणं थांबलं. 
"अरे वा ! बाबाचा हात ओळखला पण लगेच." सिस्टरच्या या वाक्याने इतका वेळ थांबवून ठेवलेल्या अश्रूंना राजीवने मोकळी वाट करून दिली.
"म्हातारे...ए म्हातारे ! आलीस का गं? भूत बनून मानगुटीवर बसण्याचं माहित नाही पण मुलगी म्हणून डोक्यावर नक्की बसणार आहेस" मनसोक्त हसत मुलीला प्राजक्ताकडे देत राजीव म्हणाला. एक क्षणच. पण दोघांनाही बाळ हसल्याचा भास झाला. दोघांनीही मुलीच्या कपाळाचा पापा घेतला. कदाचित ॠण फिटलं होतं. कदाचित शेवटची इच्छा पूर्ण झाली होती.

© पराग गोगटे (Soul Réminiscences)

डिसक्लेमर:
गर्भधारणा होणे / न होणे हे व्यक्तीसापेक्ष असून त्यात अनेक शास्त्रीय, वैद्यक, आहार, व्यसनं, अनुवांशिकता इ. कारणांचा समावेश असू शकतो. कथा यातल्या कुठल्याही कारणांचा उल्लेख / ऊहापोह करत नाही. तसेच, कथा कुठच्याही प्रकारच्या अंधविश्वासाला खतपाणी घालत नसून मानवी हस्तक्षेपाबाहेरही काही गोष्टी घडू शकतात असा फक्त विचार / शक्यता मांडते. यातील प्रसंग, पात्रे, पात्रांची नावे, व्यवसाय केवळ कल्पनाविस्ताराचा भाग आहे याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...