शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

1383. हत्ती आणि दोरखंड

 “आयुष्यात कधीच कुणी अपयशी होत नाही, प्रत्येक प्रयत्नातून सर्वांची प्रगतीच होत असते."
एकदा एक मनुष्य फिरायला गेला असता त्याला एका ठिकाणी एका साध्या लाकडी कुंपणाच्या आत बरेच हत्ती  दिसले. पहिल्यांदाच हत्ती पाहत असल्याने तो थोडा जवळ गेला तर तिथे त्याला एक मनुष्य दिसला जो या सर्व हत्तींवर नियंत्रण ठेवत होता. मग तो अजून जवळ गेला असता त्याला असे दिसले की, सर्व हत्तींना एका साध्या दोरखंडाने पायाला बांधले आहे. या हत्तींना त्या कैदेतून पळून जाण्यापासून फक्त एका साध्या दोरखंडाच्या तुकड्याने अडवले होते ज्याची ताकद त्या हतींच्या पुढे अगदी नगण्य होती आणि विशेष म्हणजे ते हत्ती ही तसा प्रयत्न चुकूनही करत नव्हते. क्षणभर त्याने हत्ती आणि त्यांच्या पायातील दोरखंड पहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि स्मित दोन्ही भाव एकदम प्रकट झाले. थोड्या वेळाने हत्तींना न्याहाळून तो मनुष्य हत्तीवर पूर्ण नियंत्रण ठेवणाऱ्या त्या माणसाकडे गेला कारण त्याला हा सर्व प्रकार नेमका काय आहे हे सर्व त्याच्याकडून जाणून घ्यायचे होते. तसे त्याने त्याला या सर्वाबद्दल विचारले आणि त्याचे उत्तर ऐकून तो आश्चर्यचकित झाला.
तो मनुष्य सांगू लागला की- "हे हत्ती जेंव्हा खूपच लहान होते. जेंव्हा त्यांच्याकडे पुरेशी ताकद नव्हती तेंव्हा आम्ही त्यांच्या पायात तेच दोरखंड बांधत असायचो जे सध्या त्यांच्या पायात आहेत. त्यावेळी त्यांना बांधून ठेवायला एवढे दोर पुरेसे होते आणि तेंव्हापासून त्यांच्या मनाची समजूत अशी झाली आहे की आपण हे दोरखंड तोडून पळून जाऊ शकत नाही."
   हत्तींना ते सर्व दोरखंड तोडून मुक्त होण्यापासून एकच गोष्ट अडवत होती ती म्हणजे, 'आपली ताकद या दोराच्या तुकड्यापेक्षा कमी आहे अशी त्यांची असलेली मानसिकता.'
 
बोध
 आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत जे आयुष्यात कधीतरी अपयशी झालेले असतात, प्रयत्न करूनही त्यांना त्यावेळी अपयश आलेले असते आणि कालांतराने त्यांची मानसिकता अशी बनते की, 'आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही ' कारण मी हे याआधी करून बघितलं आहे. अगदी लहानपणीच्या हत्तींसारखेच आणि मी हे करू शकत नाही आयुष्यात कधीच. पण यापेक्षा आपण असा विचार करायला हवा की, 'मी याआधी हे केलंय, त्यावेळी जरी मी अपयशी झालो असलो तरी त्यातून मी बरेच शिकलो आहे. आता मी पूर्ण तयारी करेन आणि पुनःपुन्हा प्रयत्न करेन अगदी यशस्वी होत नाही तोपर्यंत.' तुमच्या आयुष्याला मर्यादा घालू नका. आयुष्य अमर्याद आहे. स्वतःवर मानसिक बंधने तोडून टाका. तुम्ही काहीही करू शकता. प्रयत्न करा रिझल्ट काहीही येवोत. तुम्ही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकालच आणि 'मी प्रयत्न केला नाही' यापेक्षा ‘मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केला’ ही भावना प्रत्येकवेळी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला प्रोत्साहन देईल.
  साधी गोष्ट आहे. मनुष्य आकाशात उडू शकत नाही हीच लोकांची मानसिकता राहिली असती तर आज विमानाचा शोध लागला नसता. विचारपूर्वक प्रयत्न करा, मार्ग नक्की सापडेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...