शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

1395. बाप्पाची मूर्ती

 "या मूर्तीचे किती?"
" साहेब, दीड हजार !"
"अरे एवढे कसे, लहान तर आहे मूर्ती, कमी कर."
"साहेब, नाही जमणार."
"हजारला दे, जमेल, देवासाठी कर रे."
"साहेब, नाही परवडत हो, खर्च किती वाढलाय, कलरचा भाव पण आणि स्वतः च्या हाताने घडवतो हो एकदम घरगुती."
" किती रडता रे, चल बाराशे घे"
" बरं, ठीक आहे, जा घेऊन"
गिऱ्हाईकाने हातावर पैसे ठेवले आणि आलेल्या माणसासोबत गणपती बाप्पा मोरया म्हणत मूर्ती उचलली.
कथाविश्व ग्रुप 
उरलेल्या मूर्तींकडे पाहत गण्याने पैसे खिशात कोंबले. ऑर्डरच्या मूर्ती अजून चार शिल्लक आहेत आणि किरकोळ विक्रीसाठी ठेवलेल्या अजून पाच सहा, त्या गेल्या की गण्या आपल्या घरी पेणला निघणार होता. गण्याचा हा वडिलोपार्जित व्यवसाय, पेण वरून मुंबईत गणपती मूर्ती घेऊन यायच्या, तात्पुरती जागा भाड्याने घेऊन तिथेच कारखाना थाटायचा, ऑर्डर दिली कुणी तर ठीक नाहीतर किरकोळ विकायचे. मूर्त्यांचं फिनिशिंग इथेच करायचं. या वर्षी घरी बसवण्यासाठीची मूर्तीही याच कारखान्यात बनवली होती, अगदी जीव ओतला होता त्यात. कारखान्याच्या कोपऱ्यात सिंहासनावर आरूढ बोलक्या डोळ्यांची ती सुकुमार मूर्ती गण्याने व्यवस्थित झाकून ठेवली होती. उरलेल्या मुर्त्या विकल्या गेल्या की तो टेम्पोत ती मूर्ती घेऊन गावी निघणार होता. ऑर्डर दिलेले गणपती घ्यायला लोकं येत होते. अधून मधून किरकोळ विक्रीसाठी सुद्धा घासाघीस करून एकतर मूर्ती घेतली जात होती किंवा गिऱ्हाईक पुढच्या कारखान्यात जात होतं.
      एक एक करून अकरा वाजता मुर्त्या विकल्या गेल्या,  आता गण्याने आवराआवर करायला सुरुवात केली. इतक्यात एक आलिशान कार कारखान्याबाहेर थांबली, त्यातून एक जोडपं आपल्या दहाएक वर्षाच्या मुलीसोबत उतरले. कपड्यातून आणि एकंदरीत जामानिम्यातून खूप श्रीमंत वाटतं होते. मुलीच्या डोक्यावर पिसे असलेली हॅट होती आणि एखाद्या परीसारखा ड्रेस. ती समोर येताच गण्याला आपली गौरी डोळ्यासमोर आली, आता असती तर हिच्या एवढीच असती. पण नियतीने अकालीच हिरावून घेतली तिला. गण्या पुढे सरसावला आणि एक शेवटची मूर्ती शिल्लक राहिली आहे, हे सांगितले. पण तो पर्यंत ती हॅट वाली लहानगी कोपऱ्यात झाकून ठेवलेल्या मूर्ती पाशी पोचली, आणि वरचा कपडा दूर केला,  " येस डॅड, i want this idol only." असं जवळजवळ ओरडलीच. 
" माफ करा साहेब, पण ती घरची मूर्ती आहे, विकण्यासाठी नाही." गण्या.
" तुम्ही फक्त किंमत सांगा, सांगाल ती किंमत देईन, पण फक्त ती मूर्ती द्या, आमच्या मुलीला तीच मूर्ती आवडलीय, प्लिज."
" ही दुसरी मुर्ती घ्या ना, ही पण छान आहे. या मूर्तीचा हट्ट नका धरू." गण्या जमेल तेवढे समजावण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात स्टँड फॅन च्या वाऱ्याने छोटीची हॅट उडाली आणि गण्याचं पटकन लक्ष तिकडे गेलं, जे त्याने पाहिलं त्यानंतर तो जागीच थबकला, तिचं बोडकं डोकं पाहून सुन्न झाला. मुलीचे वडील पुढे सरसावले आणि पुन्हा हॅट तिच्या डोक्यावर ठेवत म्हणाले, " लास्ट स्टेज, तरीही आम्ही आशा सोडलेली नाही, आता सगळा भरवसा या मंगलमूर्ती वर. आज अचानक सकाळी हिने हट्ट धरला की आपण बाप्पा घरी आणायचा, आम्ही कधी आणत नाही गणपती घरी."
गण्याला काय बोलावे कळेना. तो केवळ त्या हॅट घातलेल्या निरागस चेहऱ्याकडे आणि कोपऱ्यातल्या सिहांसनावर आरूढ मूर्ती कडे आळीपाळीने पाहत होता."  साहेब, घेऊन जा ती मूर्ती तुम्ही. "गण्याने साहेबाला सांगितले.
"किती पैसे द्यायचे?" साहेबांनी पाकीट काढत विचारले.
गण्याने पुढे होऊन त्यांचे हात धरले, "काहीच नाही, तुम्ही घेऊन जा मूर्ती, पैसे पोच होतील मला." दोघांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या आणि गणपती मंद मंद स्मित हास्य करीत आहे हे गण्याने पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू आलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...