शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

1358. मानाची टोपली

"ताई, घ्या की व थोड्या मिरच्या" 
"अहो आजी किती आग्रह तुमचा? नको मला सांगितलं ना एकदा. सगळ्या लाल झाल्या आहेत बघा. किती शिळ्या आहेत?  नको नको. तुम्ही जा बर आधी इथुन."
ती आजी काही ऐकायला तयार न्हवती.
"आव घ्या व.. लई उपकार व्हतील बघा तुमचं" 
मानवी तिला कंटाळून " बर द्या १० रुपयांच्या.."
म्हातारी भलतीच सुखावली, तिने लगबगीने वजन केले आणि मानवीला ढोबळी मिरची दिली. मानवीने १० रुपये तिच्या हातावर टेकवताच म्हातारीने ते कपाळाला लावले "दुध घेऊन जाता यील आता." असं म्हणुन ती तिथुन निघून गेली. पण मानवी मात्र विचारात पडली होती, "असं का बोलली असेल ही आजीबाई? तिच्याकडे दुध घेण्यासाठी १० रुपये सुध्दा न्हवते?" दिवसभर तिचं चित्त थाऱ्यावर न्हवते. सतत तिचं गोष्ट तिच्या मनाला सलत होती. घरातल्या कामात आणि इतरही कशातच तिचं मन लागत न्हवते. रात्र झाली. कुशीची अदला बदल सुरू होती. पण झोप काही लागत न्हवती. आजीबाई ने सोडलेला भुंगा तिचं काळीज पोखरून काढत होता. विचारांच्या कलहात कधी पहाट झाली कळालच नाही. मानवीचं मन अजूनही खुमखुम् करत होत. तिने पटकन सगळं आवरल आणि ती आजीबाई जिथे भाजी विकायला बसायची तिथे गेली. आजी नेहमी तिथेच बसायची पण काल मात्र ती टोपली दारोदारी घेऊन फिरत होती.
मानवी तिथे पोहचली. आजीबाई तिथेच बसून भाजी विकत होती.
"आव ताई..घ्या की...काय दिऊ तुम्हाला" 
"आजी, मला बोलायचं होत तुमच्याशी" मानवी थोडी भीतभीतच विचारात होती.
"बोला की"
" तुम्ही काल असं का म्हणालात दुध घेता येईल?  तुमच्याकडे अगदी १० रुपये सुध्दा न्हवते का?"
आजी मानवी कडे बरकाईने पाहू लागली.
"चला माज्या बरबर"
असं म्हणून आजीने तिची टोपली आवरली आणि निघाली. मानवीही कुठला प्रश्न न करता तिच्या मागे मागे जाऊ लागली.. बरचस चालल्या नंतर ती आजी एका छोट्याश्या घरात शिरली.
" या ताई!! माज घर हाये"
मानवी सुन्न डोक्याने आजीच सगळ ऐकत होती.
अगदीच छोटंसं घर. झोपडी म्हणायलाही हरकत नाही. पत्र्याच घरं. त्याला काही बाजूला ताडपत्री गुंडाळलेली. एका बाजुला छोटीशी मोरी, त्यालाच लागून मांडलेली चेंबकी भांडी आणि चूल. एका बाजुला एक सिंगल खाट. त्यावर झोपलेली एक मुलगी आणि तिचं लहानग लेकरू.
हे सगळ पाहून मानवी अजूनच बिथरली.
"माजी लेक हाये.. बाळंतीन हाय ४ महिन्याची."
मानवीची नजर आजीच्या मुलीकडेचं स्तब्ध झाली होती. 
"आव बसा ना" असं म्हणतं आजीने पाट पुढे सरकवला. मानवी खाली बसली.
"चांगलं चुंगलं खायला नाय, म्हनून पोरीचं दुध गेलय. पोराला भायिरच दुध लागतंय."
"मग तिला तिच्या सासरी जाऊद्या ना? तिथं बाळ बाळंतीण दोघींची काळजी तरी घेतली जाईल." 
"नवऱ्यानं टाकलीये तिला" मानवीच वाक्य तोडत म्हातारी दबक्या आवाजात म्हणाली.
आता मात्र मानवीच्या पायाखालची जमीन सरकली..ती अा वासून आजीच्या तोंडाकडे बघत होती.
"लई भांडणं व्हायची बघा. लई मारायचा मेला पोरीला. दिवस राहिलं होत. तरी प्यायचा आणि मारायचा. यक दिवस गेले अन् घेऊनच आले हिकड. काय करता? लेक हाय. न्हाई राहिला बघा जीव. माज्याकड तरी काये. पन तसचं शिळ पाक घालीन म्हनल खायला. त्या मुडद्याचा मार तर नाय लागायचा ना खायला. म्हनुन आले घेऊन.."
मानवीला काय बोलावं काहीच कळत न्हवत..ती फक्त आजीबाई च बोलण ऐकत होती.
"इतक्या दिवसात पहिल्यांदा कुनी तरी ईचारल. लई बर वाटल बघा. म्हनुन चला म्हनल घरला."
मानवीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तिला कसलीच ती शुद्ध राहिली न्हवती. थोड्या वेळाने स्वतःला सावरत तिने तिच्या पाकिटातून २००० रुपयांची नोट काढली आणि म्हातारी समोर धरली. आजी थोडीशी हसत.
"२ दिस झालं कुनिबी भाजी घेतली नाय ताई. घरात व्हते तेबी पैसे संपले व्हते. भिक मागितली आस्ती तरीबी पोटा पुरतं मिळालं अस्त की? पन मान इकून शान कमवण्यारतली नाय ही म्हातारी."
मानवीचा पैशांचा हात आपोआप खाली आला.
"लई वाईट दिस पहिल्यात मी. हे काय नाय त्याफूड. तुमी ईचारल. लई दिसानी कुनीतरी कामा पलीकडल बोल्ल. बर वाटल लय. माजी भाजी घ्या फक्सत रोज. लई उपकार व्हातील बघा." 
तिचं हे बोलण ऐकून मानवीने आजीला जाऊन घट्ट कवेत घेतल आणि तिचा अश्रूंचा बांध फुटला. ती त्या आईच्या कुशीत धसाधसा रडत राहिली. थोड्या वेळाने मानवी स्वतःला सावरत त्या मायेच्या विळख्यातून बाहेर आली आणि काहीही न बोलता तिथुन निघून गेली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...