ज्याबद्दल माहीतच नसत, तिथं आपण निश्चिन्त असतो मग तेच सूत्र सगळीकडे...का नाही वापरत?
-
तुम्ही समजा विमानाने कुठेतरी जाणार आहात. तर तुम्हाला सगळं सगळं माहित असत की,
- तुमचं तिकीट कन्फर्म आहे
- तुमची सीट विंडो सीट आहे की नाही
- प्रवासात तुम्हाला खायला काय मिळणार आहे
- मोठा प्रवास असेल तर आवडीचे ड्रिंक कोणते मिळणार आहे
*
तुम्ही तिकीट काढताच तुम्हाला सगळं सगळं माहित झालेलं असत. फक्त तुम्हाला एकच माहित नसत की विमानाचा पायलट कोण आहे आणि त्याच्या अंगी किती कौशल्य आहे ?
मात्र याबद्दलची अजिबात काहीही माहिती नसताना...तुम्ही विमानात बसल्यावर तुमच्या सीटवर किती आरामात बसता. खाऊन पिऊन झाल्यावर मस्त झोप काढता. किती विश्वास असतो न तुमचा... त्या पायलट वर ?
गंमत म्हणजे ज्याला तुम्ही पाहिलेले देखील नसते. (फार तर सुरुवातीला त्याचा वेलकमचा संदेश देणारा आवाज तुम्ही ऐकता) पण बाकी काहीच माहित नसत. तरी तुम्ही रिलॅक्स असता.
असता न ??
मग आता मला सांगा.... तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं तो पायलट नक्की घेऊन जाणार आहे हि खात्री तुम्हाला असते.... त्याला न पाहताही !
मग मंडळी.....
हे जग चालवणारी जी एक शक्ती आहे, त्याला कुणी गणपती म्हणेल, कुणी पांडुरंग म्हणेल तर कुणी गुरु दा खालसा म्हणेल किंवा अजून काही म्हणेल पण त्याचे अस्तित्व दिसत नसले तरी "तो आहे" हे तर मान्य करतो न आपण ? मग साधं विमान चालवणाऱ्याला तुम्ही पाहिलेलं नसत तरी रिलॅक्स असता मग हे पूर्ण जग चालवणारा जो कुणी तो "वरती" बसलाय न त्यावर विश्वास ठेवायला काय प्रॉब्लेम आहे ? तुम्ही जन्माला आला तेव्हाच तुमचा प्रवास कसा व कुठवर होणार आहे हे "त्याला" माहित असत. आणि त्याप्रमाणे तो तुम्हला नेतो. त्याला खरेतर सगळ्यांनाच "चांगल्या दिशेला" न्यायच असत पण काहीजण ते ऐकत नाहीत. आणि मग त्यांना त्या कर्माची फळेही तो वर बसलेला देतो. कारण त्याच्या काठीला आवाज नसतो पण वाजते तेव्हा परिणाम दिसतो. मात्र "तो आहे पाठीशी" हि श्रद्धा ठेवून हातातले काम प्रामाणिकपणे करत राहिलो तर जीवनाचा प्रवास नक्कीच सुखाचा होतो. आपण टेन्शन घ्यायच नाही. ताणात जगायच नाही. कारण आपला वरती बसलेला पायलट निष्णांत आहे. तुम्हाला योग्य ठिकाणी तो नेणार आहे. मग हि धावपळ, पळापळ, स्पर्धा, असूया, वाद, विकोप, मत्सर कशासाठी ? उद्याची काळजी करत करत "आज"चे क्षण का वाया घालवता ? व्हा न रिलॅक्स थोडे.... विमानात बसल्यासारखे ! मग पहा...किती मस्त वाटत ! काम तर होत राहतील पण ती कामे करताना तुम्ही अजून जास्त रिलॅक्स असाल. हे नक्की.
डॉ. डीडी क्लास : कामे कुणाला चुकली नाहीत. जणूकाही हि कामे म्हणजेच आपला "प्रवास" आहे. तर आपण ठरल्या वेळी, ठरल्या सीटवर जाऊन निवांत बसावे, खावे, प्यावे, अधून मधून खिडकीतून बाहेर पाहून आनंद घ्यावा. (म्हणजेच कामातून ब्रेक घेऊन भटकून यावे) खूप मस्त वाटते. चार लोक काय म्हणतील ? हा विचारच अनेकांचे जगणे अवघड करून ठेवतो. लोक काय म्हणतील हे त्याच चार लोकांना ठरवू द्या न ! त्याचाहि विचार तुम्हीच करू लागला तर मग त्यांनी काय करायचं न ? 😃 😄 😃
तर मंडळी...."वरच्या" पायलट वर विश्वास ठेवून मस्त जगा.... आपल्याच मस्तीत (पण थोडं शिस्तीत) जगा. त्यासाठी शुभेच्छा आहेतच !
ⓒ डॉ. धनंजय देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा