गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

564. छत्तीसगडच्या जंगलात त्याने जो अनुभव घेतला...

    छत्तीसगडच्या जंगलात त्याने जो अनुभव घेतला तो सर्वांपर्यंत पोचावा त्यासाठी आहे. तुमच्या जवळचा माणूस जेव्हा घनदाट जंगलात मरणाच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा २००० किलोमीटर लांब तुम्ही किती हताश आणि हतबल अवस्थेत असता हे दाखवण्यासाठी ही पोस्ट आहे. तुमच्या जवळच्या माणसाचा आलेला कॉल हा शेवटचा असू शकतो हे कळल्यानंतर ही एक थंडगार लहर तुमच्या मेंदूत जाते त्यासाठी ही पोस्ट आहे. आयुष्य हे क्षणभंगुर आहे हे पुस्तकात वाचलेले असतं पण प्रत्यक्षात हे दिसतं तेव्हा काय होतं हे सांगण्यासाठी ही पोस्ट आहे.
     रितेश हा सध्या छत्तीसगढ ओडिसा सीमेवरच्या जंगलात आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव नेमकी जागा मी सांगू शकत नाही. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमध्ये तो असिस्टंट कमांडट आहे. कोब्रा कमांडो फक्त ऑपेरशन असतं तेव्हाच मैदानात उतरतात. या तुकडीचे तो नेतृत्व करतो आहे. अतिशय highly trained अशी ही तुकडी असते. अतिशय खडतर, बिकट आणि जिथं सामान्य शहरी माणसं तग धरु शकणार नाही असा परिस्थितीत हे कोब्रा कमांडो कितीही काळ जगू शकतात. कोब्रा कमांडो हे प्रकरण काय हे नंतर कधीतरी. पण २१ सप्टेंबरला मध्यरात्री घडलेली ही घटना आहे. ज्याठिकाणी रस्ता नाही, नेटवर्क नाही असा जंगलात सीआरपीएफचा कॅम्प लागलेला आहे. आजूबाजूला तारेचं तात्पुरता उभं केलेले (बिनकामी) कुंपण, त्यात लागलेले तंबू, चहूबाजूला जंगल, नक्षलवाद्यांनी वेढलेला हा भाग व्याघ्र प्रकल्पात येतो त्यामुळे जंगली प्राण्यांचे असलेले भय ते वेगळं.
     मी मुद्दाम हे वर्णन करत आहे कारण तुमच्या डोळ्यासमोर एक पट उभा राहावा. १७,१८ सप्टेंबरपासूनच या जंगलात ‘दे मार’ पाऊस झोडत होता. साहजिकच जमीन ओली, तंबू ओला, माणसंसुध्दा ओली पण कोब्रा कमांडो जगत होते. २१ सप्टेंबरला रात्री झोपायच्या वेळेनुसार रितेश त्याच्या तंबूत झोपायला गेला. ना लाईट ना काही...बाहेर कोसळणारा पाऊस, बेडच्या खाली ओली जमीन, ओला तंबू, ठिपकणारा पाणी अशा अवस्थेत तो झोपला. या भागात डासांचा प्रादुर्भाव भयानक असल्यामुळे मच्छरदाणी ही सक्तीची आहे. नक्षलवाद्यांच्या भागाविषयी ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती मलेरिया हा या भागात नक्षलवाद्यांपेक्षा घातक आहे. जास्त माणसं मारतो. या मच्छरदाणीच्या आत मध्यरात्री अडीच तीनच्या सुमारास रितेशला जाग आली कारण पायाला खाज आली. खाज आली म्हणजे डासच असणार या शक्यतेने माणूस ज्या निसर्गसुलभ भावनेने पाय खाजवतो तो त्याने खाजवला पण १० मिनिटात त्याला जाणवलं की हा तो डास नव्हे. रितेश उठला रात्रीच्या अंधारात विजेरीच्या प्रकाशात त्याने बघितलं तर अत्यंत कुप्रसिद्ध अशा खुणा त्याला दिसल्या. ट्रेनिंग घेतल्यामुळे एका सेकंदात त्याला कळलं की आपल्याला साप चावला आहे. तो तसाच धडपडत उठला काही काळ शोधाशोध केली पण साप काही दिसला नाही.
      आता अनेक प्रश्न समोर होते..मानवी वस्तीपासून प्रचंड लांब असलेल्य़ा त्या अटिंग्या रानी आता जीवन मरणाचा खेळ सुरु झाला होता. बाहेर पाऊस, जंगल आणि नक्षलग्रस्त भाग आणि एक कोब्रा कमांडो झगडत होता आयुष्याशी. मध्यरात्री कॅम्प जागा झाला आणि पुढचा थरार हा सुरु झाला. कोब्रा कमांडोला कधीही कॅम्प सोडून बाहेर जाता येत नाही. रात्री अपरात्री तर नाहीच नाही. त्यासाठी परवानग्या लागता. रोड ओपनिंग लागतात. बाहेर नक्षलवादी असतात. रस्त्यात बॉम्ब असतात. मुळात रस्तेच नसतात. त्या पाऊस पण त्यावेळेला जीवावर उदार होऊन पाच कमांडो घेऊन रितेश बोलेरोत जाऊन बसला. रस्त्या नसलेल्या त्या जंगलात तुफान पावसात ती बोलेरा लाईट न लावता पळत होती. (ड्रायव्हिग स्कील काय असेल). पण तासाभरातच स्नेक बाईटने त्याचा परिणाम दाखवायला सुरुवात केली. इतका वेळा शुध्दीत असलेल्या रितेशची शुध्द हरपली. बोबडी वळली, दृष्टी गेली..फेफरं भरल्यागत झालं.....यात काळात कदाचित आपली वेळ आल्याची जाणीव त्याला जाणीव झाली असावी कदाचित काही जणांना फिल्मी वाटेल पण तशाची अवस्थेत त्याने घरी कॉल लावला. घडलेली परिस्थिती कशीबशी सांगितल...घरी एकच सन्नाटा आणि सेकंदात सुरु झाली रडारड...त्या माऊलीची हताश हतबल अवस्था आपण फक्त कल्पना करु शकतो. या सगळ्या गोंधळात जवळच्या रुग्णालयात जायला तीन साडेतीन तास लागले. हे अंतर किमान ५० एक किलोमीटर असेल. तोपर्यंच सीआरपीफच्या अधिकाऱ्यांनी अँटीवेनमची व्यवस्था करुन ठेवली होती. बेशुध्दावस्थेतच रितेश तिथे पोचला आणि त्याला उपचार मिळाले आणि ८ तासानंतर त्याने डोळे उघडले. मला तीन फोटो पाठवले आणि मेसेज आला ‘बॉय वाचलो’ फोटो बघून मी हादरलो होतो कारण त्याला चावलेला साप होता पट्टेरी मण्यार उर्फ branded Crait…
-----------------------------------
P.S.
सह्याद्रीमध्ये फिरताना आपल्या मण्यार माहिती असतो, फुरसं, नाग घोणस पण आता सोशल मिडियामुळे सगळ्यांना माहिती झाले आहेत पण पट्टेरी मण्यार हा फक्त गडचिरोली ते ओडिसाच्या पट्ट्यात सापडतो. २ मीटर लांबीच्या या सापाचे विष हे नागापेक्षा १७ पट विषारी असतं असा म्हणतात. ते मुळात neuro toxic असतं त्यामुळे जास्त भयंकर.... मज्जासंस्थेवर परिणाम करतं. १० वर्षापुर्वी आदरणीय प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात हा साप बघितला होता. या सापाचे मुख्य खाद्य फक्त सापच आहे. याच सापाचे खाद्य म्हणून रात्री जंगलात जाऊन साप पकडण्याचे उद्योगही आम्ही प्रकाश आमटे यांच्यासोबत जाऊन केले होते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा साप चावला तर त्याचे अँटी वेन्हम भारतात काही वर्षापुर्वी पर्यंत मिळत नव्हते. नॉर्मल नाग, घोणस चावणे वेगळे, ते पण विषारीच, जीवघेणेच पण हा सापच मुळात अतिदुर्गम भागात सापडतो त्यामुळे त्याचा स्ट्राईक रेटही जास्तच..
-----------------------------------
रितेश जीवंत राहिला कारण 
तंबूत झोपलेल्या रितेशला साप चावला तो पायाला आणि तो पण ब्लँकेटवरुन... ब्लँकेटच्या जाडीमुळे सापाचा दंश हा पुर्ण क्षमतेने होऊ शकला नाही आणि पुर्ण क्षमतेच्या केवळ ४० ट्क्के दंश रितेशला झाला आणि त्यामुळे परिणामकारकता कमी राहिली. पण ब्लँकेट नसतं तर किंवा साप ब्लँकेटच्या आत आला असता तर....? जीवावर उदार होऊन त्या रानातून, खाचखळग्यातून, परिणामांची तमा न बाळगता बोलेरो नेणाऱ्या कमांडोजमुळे रितेश वाचला.... धन्यवाद
आयष्यातली ही कधीही न विसरता येणारी घटना आहे त्याची नोंद राहावी म्हणून हा लेखन प्रपंच...
-----------------------------------
Rohit Harib यांच्या वाॅलवरून

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...