कॅफे जावा मधे कार्लोस ला काम करायला लागून २० वर्षे होत आली होती. गिर्हाईकाला कॉफी, लाटे, एसप्रेसो, कॅपचिनो, मोका,कॅफे व्हीएन्ना असे कॉफीचे हजारो प्रकार बनवण्यात कार्लोस चा सगळा दिवस जात असे. कार्लोसच्या हातात जादू होती. मालकांना हे माहिती होतं म्हणूनच कार्लोसचं मंगळवार व गुरूवार दुपारी काम न करणं ते चालवून घेत असत. कार्लोसचं एक व्रत होतं. दर मंगळवारी, गुरुवारी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळी दुपार तिथे घालवणे. कार्लोस ने त्या दिवशी ही २५ कप हेझलनट मिडियम रोस्ट कॉफी बनवण्यासाठी हेझलनट बीन्स ब्लेंडर मध्ये घालून त्याची पावडर केली. फ्रेंच प्रेस वापरून कॉफी बनवली. त्यात उकळते क्रिम घातले. फोम घातले. ताज्या हेझलनट बीन्सचा वास पार दुकानाबाहेर रस्त्यावर जाऊन पोचला. कार्लोसने मालकांना कॉफीचे पैसे दिले. त्याने कॅाफी थर्मास मधे भरली व जवळच्या हॉस्पिटलमध्ये तो पोचला. त्याला त्याचा मित्र थॅामस बाहेरच दिसला.
“कार्लोस मरणाऱ्या लोकांवर वेळ घालवण्यापेक्षा जिवंत लोकांकडे लक्ष देत जा! माझं ऐकलं असतस तर तुझ्या मनातलं तुझं स्वत:चं कॅाफीचं दुकान आज उभं राहिलं असतं. पण तू ऐकत नाहीस.” जाता जाता थॅामस म्हणाला.
कार्लोस काही बोलला नाही.
नेहमीच्या वॅार्डमधे गेल्यावर त्याने तिथल्या सर्व नर्सेस व डॅाक्टर्सना वाफाळत्या कॉफीचे कप दिले.
“कार्लोस मॅन, Gracias, thank you! काय कॅाफी बनवतोस तू! कामाचा शीण जातो बघ.” एक डॉक्टर म्हणाला.
"सर, तुमच्यासाठी एवढचं करू शकतो मी. तुम्ही, या नर्सेस आणि तुमचा स्टाफ रात्रंदिवस पेशंट्स साठी झटता म्हणून माझ्यासारख्या सामान्य माणसाकडून ही छोटीशी भेट.” कार्लोस म्हणाला.
हेड नर्स रूबी कॅाफीचा घोट घेत म्हणाली,” कार्लोस, Visiting hour सुरू झाला आहे. बोलून घे ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी!”
कार्लोस वॉर्डात गेला. प्रत्येक खोलीतील व्यक्ती आपली आपली लढाई लढत होती. कार्लोस आलेला बघून त्या नळ्या जोडलेल्या,शिणलेल्या चेहऱ्यावर हसू उमटू लागले. वेदना बाहेर पडण्यास तिथे ओळख लागत नाही. मन मोकळं करताना उत्तम श्रोता असेल तर आत भळभळणारं दु:ख पूर्ण बाहेर पडतं. कार्लोस पेशंट जे बोलतो ते लक्ष देऊन ऐकत असे.
“सगळं आयुष्य काम करण्यात गेलं. बायका मुलांना वेळ देऊ शकलो नाही. बरा झालो तर प्रथम बायकोचे लाड करेन. मुलांना घट्ट मिठी मारून सांगेन how much I love them.”
“मला हवं तसं मी जगलोच नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यात आयुष्य वाया गेलं.”
“मी किती जणांना दुखवलं त्यांची माफी मागायची आहे.”
“ आई वडिलांकडे लक्ष द्यायला हवं होतं. मला जमले नाही. आई सारखा फोन करायची पण मला वेळ नव्हता.”
“शरीराची काळजी घ्यायला हवी होती. धड खाल्लं असतं तर आज घरी असते.. “
चेहरे वेगळे पण भावना त्याच. आजाराची नावे वेगळी पण वेदना तिच. जीवन मरणाच्या रेषेवर उभे असलेले चेहरे वेगळे पण मुखवटे तेच.
ते मुखवटे अशा वेळी निघून यायचे. पश्चातापाने विदीर्ण झालेल्या मनाच्या यातना शारीरिक यातना पेक्षा जास्त असत. मृत्यूच्या दाहक दर्शनात आयुष्याचे सोनेरी क्षण निसटून गेल्याची खंत होती. कार्लोसला या सगळ्याची सवय होती.
त्यापैकीं ज्यांना कॉफी हवी असेल त्यांना तो गरम वाफाळती कॉफी ओतून त्यावर दालचिनी पावडर व हृदयातल्या निर्भेळ प्रेमाचे फोम व क्रीम घालून बदामाकृती हार्ट बनवताना कार्लोसला तिथं असलेल्या त्याच्या वडिलांचे शेवटचे दिवस आठवत. फारसे न बोलणारे वडील फार एकटे होते शेवटच्या दिवसात. स्वत:च्या बायकोकडे किंवा कार्लोस व त्याच्या बहिणीकडे मन मोकळे करू शकले नाहीत. त्यांना जे ऐकायचे होते ते कार्लोस ला मोठे झाल्यावर कळले होते. "मी आहे तुझ्या सोबत. तू एकटा नाहीस" हे च तिथे असताना ऐकायला आसुसलेल्या कानाना त्या शब्दाचं दान देताना कार्लोस ला समोरच्या माणसात हसरे बाबा दिसत.
कार्लोस कॉफी पुढे करत त्या व्यक्तीला एखादा विनोद सांगायचा. कधी त्यांना रडताना बघून आपलेही डोळे पुसायचा. पेला अर्धा कसा भरला आहे..अर्धा रिता कसा नाही हे समजावून सांगायचा. त्यांचे बोलणं शांत बसून ऐकूनघ्यायचा. उत्तम श्रोता सर्वात जास्त मदत करू शकतो हा त्याचा अनुभव होता. त्यांचा why me चा राग ऐकून घ्यायचा.. कधी “Make peace ..”गाणं त्याच्या गोड आवाजात ऐकताना पेशंट रिलॅक्स व्हायचे. "अरे यार असे सगळ्यांचेच होते. असचं असते लाइफ. तू फक्त गोड आठवणीकर फोकस कर. काही चूक नाही तुझी!” कार्लोसचे भावनेत ओथंबलेले शब्द कानावर पडताच ते जीव सुखावत असत.
एखादी नवी नर्स आत येऊन “ Family?” असे त्याला विचारायची.
कार्लोस “हो.. खूप जवळचा आहे” हे सांगायचा. नातं केवळ रक्ताचं असावं लागतं असे कोणी सांगितलय?
दोन तासांनी visiting hour संपल्यावर त्याच्यातली सर्व शक्ती संपलेली असे. हेड नर्स रूबी विचारायची, “ पुढच्या आठवड्यात येशील ना? तुझी वाट पहातात ही लोक. काय बोलतोस रे त्यांच्याशी? आणि कॉफी लाजवाब! ये परत.
आणि कॉफीचे पैसे घेत जा रे. आम्ही देऊ पैसे.”
“ असु दे. मॅडम. मला एवढेच करणं शक्य आहे. पण तुम्ही जे काम करता त्याला तोड नाही.”
दमून बाहेर पडताना मन भरून आलेलं असायचे. थॅामस किती दिवस सांगतो आहे स्वत:च्या दुकानासाठी कुठे कसं लोन मिळवायचं पण जमत नाही हा विचार अधून मधून डोकावत असे. पण ते स्वप्न स्वप्नच राहणार अशी त्याची खात्री होती.
तेवढ्यात हेड नर्स रूबी ने परत हाक मारली. सर्व स्टाफ व पेशंटचे नातेवाईक लॉबीमध्ये जमले होते. हॉस्पिटलचे डीन चालत कार्लोस कडे आले.
“तू कार्लोस ना! तुझ्याबद्दल ऐकून आहे. तुला एक विनंती आहे कार्ल! तुला आम्ही डिग्री नसलेला मानसोपचार तज्ञ म्हणतो. तू बोलून गेल्यावर जगण्याची आशा सोडणारे पण सुधारत आहेत. आम्हाला तुझी हॅास्पिटलमधे सर्वत्र जरूर आहे.
लॉबीमध्ये नवं कॉफीचं दुकान उघडत आहेत. ते तुझं!
“कार्लोसेस कॅाफी” नाव असेल. तुझी कॅाफी आणि तुझ्या आशा देणाऱ्या उपदेशाची आम्हाला खूप जरूर आहे.” डीन म्हणाले.
कार्लोसचा कानावर विश्वास बसत नव्हता. पगाराची रक्कम ऐकून तो धन्य झाला होता. मनातील सर्व भावना पाण्याच्या रूपाने डोळ्यातून ओघळत होत्या. त्याची सेवा फळाला आली होती. त्याच्या सेवेचं मोल केलं गेलं होतं.
दोन दोनदा डीनचे हात हातात घेऊन त्याचे आभार मानून तो बाहेर पडला. परत जाताना परत थॅामस दिसला. थॉमसने विचारलं,“ कार्लोस, जेवायला कधी जाऊया?”
कार्लोस हसून म्हणाला, “ तूच लॅाबी मधे कॉफी प्यायला ये. माझं दुकान आहे लॉबीमध्ये.
आणि मित्रा, आपण सगळेच “मरणारे लोक” आहेत हे कधी विसरू नको! मरणारे लोक च आपल्याला मदत करत असतात.”
थॅामस कार्लोस काय बोलतो हे न कळून त्याच्याकडे बघत राहिला.
©® ज्योती रानडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा